मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५७१ ते ५७४

ओव्या - ५७१ ते ५७४

संत बहेणाबाईचे अभंग

५७१.
आजि माझा जन्म सफल गे माये । संतसज्जनांचे देखियले पाये । त्यांचे चरणरजे देहभार जाये । सुख हे होय अनिवार ॥१॥
आजि माझे भाय फळासी आले । साधुसंतांचे पाय देखिले । सप्रेम या देही दाटले । सुख सुखावले सहजची ॥२॥
एकपणे होते अनेक झाले । पाहाता विश्वाकार विस्तारले । वटबीजन्याये कैसे विरूढले । सर्व होउनी ठेले माझी मीच ॥३॥
आले गेले अवधान नाथिला भ्रम । आजवरी प्रकृतीचे केला हा धर्म । रज्जुसर्पन्याये मिथ्या जाला भ्रम । देखता चरणरज नाचे ॥४॥
बहिणी म्हणे तेणे अहंपण माझे । संसारदुःख उतरिले वोझे । तुकाराम भेटला धन्य जिणे माझे । कृतकृत्य जाले सहजची ॥५॥

५७२.
अजी सर्वन्याये ठकावले मन । तटस्थता जाण होउनी ठेली ।१॥
तेथे आता काय पुसावे सांगावे । स्वानुभव अंगे नाही जया ॥२॥
कीटकभृंगीन्याये जाली तद्रूपता । निमाल्या अवस्था चारी तेथे ॥३॥
बहिणीसी उन्मनी लागली अवस्था । भोगी त्यापरता ब्रह्मानंद ॥४॥

५७३.
अदळ कमळी कमळ विकसले । ते म्या गगनी उफराटे देखिले ॥ध्रु०॥
बाइये स्वानुभवे पाहा कैसे । जेणे आत्माराम भेटे तैसे ॥१॥
मनाच्या उल्हासे कमळी कमळ भेटे । आनंदाचा पूर लोटे गे बाई ॥२॥
तेथे काय कारण सरले शेवटीचे एक उरले । बहिणी म्हणे ते म्या देखिले गगनाचे माथा ॥३॥

५७४.
ऐका हरिभक्ताचा महिमा । केली पुंडलिके थोर सीमा । गवसणी घातली व्योमा । पुरूषी सर्वोत्तमा साधिले ॥१॥
पुंडलिकाऐसा पतित । नसे त्रिभुवनी अपवित्र । पितरांची मर्यादा न पाळित । गालिप्रदाने समर्पी ॥२॥
पितरे जे सांगावे । तें पुंडलिके न ऐकावे । शिव्यागाळीस द्यावे । आणि संपादावे पापासी ॥३॥
ज्या पितरांचेनि हा संसारू । सुखाचे भोगिजे सुखतरू । त्या पितरांचे मांडिले चारू । ऐसा पुत्र निजपला ॥४॥
ऐसे करिता किती एक दिवशी । असोनि चालिला वाराणशी । सवे कर्मभोग घेउनी पुत्र विवशी । क्रमित वाट चालिला ॥५॥
तव भाग्योदयकाळ आला । पापाचा संग्रह तुटला । उभयांचा भोग सरला । दिवस उदेला पुण्याचा ॥६॥
जेवी गाय सापडे वाघा । तै हरी वळे पै गा । अवचट धावणे पावे वेगा । तेवी या उभयवर्गी देव पावला ॥७॥
जेवी पाषाण फुटे झरा । की वांझ प्रसवली पुत्रा । तल्हाति केस अंतरा । उपजला मोह पुंडलिका ॥८॥
देखोनि अपवित्राचरण । पुंडलिक त्रास घेत मानून । म्हणे मी घोर पापी गहन । चुकले भजन पितरांचे ॥९॥
कोण पाप होते पोटी । पाय कवटाळी पितरांचे ॥१०॥
म्हणे काय करावी वाराणशी । मातापितर हेचि माझी काशी । मुरडोनी आला मान देशासी । अटक वनासी प्रार्थिले ॥११॥
सभोती बारा योजन । देखोनि अंती दंडकारन्य । स्वनी येती पक्षी जाण । न पडे कदा दृष्टीसी ॥१२॥
अत्यंत वृक्षांची दाटणी । झेपावल्या दिसती गगनी । जेथे सूर्याचे दर्शनी । मोकळीक अयेचिना ॥१३॥
ऐसे भयानक वन । तेथे पुंडलिक राहिला जाण । पाहोनी सरोवराचे जीवन । केले नामग्रहण चंद्रभागा ॥१४॥
तेथे आरंभिली सेवा । पुंडलिका उपजला भावा । मानित मातापिता देवा । जडला सद्भावा चरणी त्यांच्या ॥१५॥
ऐसे जाले कितीएक काळ । तव देखिले नारदे एके वेळ । म्हणे हा तो येथे प्रबळ । कोण भक्तराव उदेला ॥१६॥
देखोनि पुंडलिकाची निष्ठा । जडली देहा पूर्ण काष्ठा । दृष्य सारूनिया अनिष्ठा । नेणो हृदयस्था भेटी जाली ॥१७॥
देखोनिया भरतमुनि । जाला हर्षयुक्त अंतःकरणी । थोर कौतुक वाटले मनी । अश्रु नयनी लोटता ॥१८॥
नारदे देखोनी निष्ठा । त्वरे गेला वैकुंठा । म्हणे नवल देखिले भगवंता । हर्ष चित्ता न समाये ॥१९॥
सप्रेम दाटंला कंठ । बोलता कापती ओठ । नयनी होत अश्रुपात । म्हणे भगवंत काय जाले ॥२०॥
देवे आलंगिला हृदयी । नारदासी म्हणे सांग काही । नवल वर्तले लवलाही । ते गुज काही सांग पा ॥२१॥
तंव नारद म्हणे नारायणा । मी गेलो होतो भ्रमणा । तेथे देखिले नवल जाणा । त्या वचना ऐकावे ॥२२॥
मृत्युलोकाठायी । दंडकारण्य नाम पाही । मानदेश अभिधानेही । तेथे ठायी देखिले ॥२३॥
भ्रमण करिता गेलो तेथे । तव अवचिता देखिले नवलाते । संतोष वाटला चित्ताते । ते तुज हृदयी ठाउके ॥२४॥
तया अरण्यामाझारी । द्विज एक पितृसेवा करी । त्याची देखोनिया भजन - कुसरी । काय वानू थोरी तयाची ॥२५॥
वायू उफराटा नेववेल । हे भूगोल पालथे घालवेल । अग्निप्रवेशही करवेल । परी तद्भक्ति - नवल सांगवेना ॥२६॥
विषाचे कवल घेववती । सहा समुद्र कोरडे करवती । परी तद्भक्तीची अपार शक्ती । ते चोज तुजप्रती काय सांगो ॥२७॥
वरकड साधन ते काये । कोण त्यांचे नवल पाहे । साधनरापरीस या पाहे । मज तो नव्हे साध्यता ॥२८॥
त्याची भक्ती देवा पहाता । नेणे पावाल दातात्म्यता । की हे ब्रह्मसायुज्यता । आली तत्त्वता रणांगणासी ॥२९॥
ऐकोनी भक्तीचे रहस्य । देवाचे उचंबळले मानस । हाती धरूनिया नारदास । गुप्त रूपेसी निघाले ॥३०॥
सेजी होती रूक्मिणी । तीसही साकळण करूनी । गरूडासही सोडुनी । निघाले चक्रपाणी नारद ॥३१॥
पहा हा देव, भक्त - शिरोमणी । भक्तासाठी चालिला चरणी । उडी घातली वैकुंठाहुनी । आले क्षणी मानदेशी ॥३२॥
सवे नारद माझारिया । वन उपवन दावितसे देवराया । अवचित देखिले भक्तराया । तया पुंडलीकासी ॥३३॥
देवे देखोनी पुंदलीकासी । विस्मित झाला थोर मानसी । पुंडलीक न देखेचि तयासी । चाड मानसी धरीचना ॥३४॥
मग नारद बोलिला मात । पुंडलिका आले रे भगवंत । जयासाठी येवढे क्लेशार्थ । तो धावत आला पाहे ॥३५॥
पुंडलीक जाला एकनिष्ठ । फिरोनी न करीच दीठ । दिली भिरकावुनी वीट । तीवर वैकुंठ उभे ठेले ॥३६॥
ठेवोनिया हात कटी । ठाकले ब्रह्म विटी । नखाग्री लावुनी दृष्टी । ब्रह्म सृष्टी न्याहाळीत ॥३७॥
नेणो मुद्रा लागली खेचरी । तटस्थता लागली शरीरीं । दृष्टी ठेवूनी पुंडलीकावरी । जाला अंगभरी श्रीविठ्ठल ॥३८॥
जयाच्या अंतरी प्रवेशे देव । तयासी पुसी संसाराचा ठाव । व्यापकपणे नांदे स्वयमेव । देखोन सद्भाव भक्तीचा ॥३९॥
पुंडलीकाची देखोन भक्ती । धावोनि आला वैकुंठपति । पुंडलीकाची निजस्थिती । प्रवेशला चित्ती हरी त्याचे ॥४०॥
देखोन पुंडलिकाचा भावो । वास केला तया ठावो । वाहविला कीर्तीचा महिमा वो । पंढरी नाम स्थापियले ॥४१॥
येरीकडे वैकुंठभुवनी । उठोनी पाहे जव रूक्मिणी । तव न दिसे चक्रपाणी । थोर चिंतनी पडियेली ॥४२॥
गरूडासी जव पाहे । तव तो द्वारीच उभा आहे । मग म्हणे कटकटा माये । काय झाले कळेना ॥४३॥
कोणीकडे निजे केले । नेणो कोणाचे धावणे काढिले । ऐसे कोण सांकडे पडिले । मौनेच गेले श्रीपती ॥४४॥
गरूडासी म्हणे रूक्मिणी । आज विपरीत गमते गा मनी । न पुसता गेले चक्रपाणी । भक्ताशिरोमणी कोण भेटला ॥४५॥
तव जाला हाहाःकार । देव मिळाले सबळ । म्हणती थोर जाले नवल । नेणो गोपाळ कोठे गेले ॥४६॥
नित्य - दर्शना पडिले पाणी । उदास झाली वैकुंठभुवनी । जैसी विधवा अलंकरोनी । कोण जनी मंडिता ॥४७॥
देव करिताती रूदन । रूक्मिणी आक्रंदती गहन । थोर प्रळय मांडिला जाण । न लगे मार्ग भगवंताचा  ॥४८॥
तव अकस्मात नारदमुनी । रूक्मिणीने देखिला नयनी । पुसती जाली तयालागुनी । दीनवाणी जगन्माता ॥४९॥
वैकुंठीचे सकळ देव । हाहाकृत देखिला भाव । मग सांगितला निर्वाह । चिम्ता न करा म्हणतसे ॥५०॥
मृत्युलोकाचे ठायी । पुण्यशील देश पाही । पुंडलिक नामे द्विज देही । करी निर्वाण अनुष्ठान ॥५१॥
महावृक्षांची दाटणी । अग्रे झेपावती गगनी । रवी पाहाता नयनी । सर्वकाळ अंधारू ॥५२॥
ऐसिया वनाचे ठायी । पुंडलीक ब्राह्मण पाही । पितृसेवा निर्वाही । चंद्रभागासरोवरी ॥५३॥
त्याचा पहावया भाव । गेला वैकुंठीचा राव । देखोनि भक्तिभाव । देवाधिदेव रहिवासले ॥५४॥
देखोन पुंडलीकाची निष्ठा । नेणो चांगली पूर्ण काष्ठा । उणे आणुनी वैकुंठा । रहिवासले देखा वैकुंठपती ॥५५॥
ऐकोनी नारदाची मात । धावोनि आले देव तेथ । विटी देखोनि भगवंत । मौन - मंडित राहिले ॥५६॥
श्रुतिशास्त्रश्रवण । करिती ब्रह्मादिक गण । परी तो नारायण । अणुमात्र वदेना ॥५७॥
मग म्हणती रे कटकटा । कोणी देखिली पुंडलिकनिष्ठा । उभे केले वैकुंठा । चमत्कार मोठा भक्तीचा ॥५८॥
नाना उग्र साधने । एक साधिती प्राणापाने । ब्रह्मांडी नेला आत्मा जाणे । तेथेही नारायण साधेना ॥५९॥
यावेगळे अनेक । करिती साधने सोसून दुःख । परि भगवंत न सापडे देख । तो कोणे सुखे रातला ॥६०॥
ऐसा करिता विचार । ज्ञाने निवडिता सारासार । तव सापडला भक्तीचा आगर । सेवा थोर पितरांची ॥६१॥
मग म्हणती हा भक्तिराणा । जाणे ब्रह्मप्राप्तीच्या खुणा । प्रत्यक्ष साधिला वैकुंठराणा । खिळून वदन उभा केला ॥६२॥
पहा ते मूळ दंडकारण्य । त्याही वरते ब्रह्मारण्य । तीर तरी चंद्रभागा जाण । देखोनि मन आनंदे ॥६३॥
ऐसियावरी हा भक्तराणा । उदेला दिसे रवी जाणा । देवे जाणुनी पुंडलीक - खुणा । रहिवास जाणा केला सुखे ॥६४॥
ऐसा जाणोनी अंतर्भाव । देवेही केला निर्वाह । ठेविले पंढरपूर नाव । बसविले गाव पुंडलीकाचे ॥६५॥
रूक्मिणीसहवर्तमान । आले समस्त ऋषिगण । दुजे केले वैकुंठभुवन । केले नामग्रहण भूवैकुंठ ॥६६॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसे वाळुवंट पुंडलीक भक्तवीर । ऐसे देव ऐसे नगर । जयजयकार कोठे महाद्वाई ॥६७॥
ऐशा पताका ऐशी निशाणे । शंखभेरी वाजती गहने । ढोल ढमामे तुरे जाणे । टाळ मृदंग वाजती ॥६८॥
घरोघरी तुळसीवृंदावन । पद्मांकित रांगोळी जाण । कुंकुमार्चित सडे गहन । त्रिकाळ जाण पूजा करिती ॥६९॥
धन्य धन्य तेथीचे लोक । नगर नागरिक देख । पतंग भृंग पशुपक्ष्यादिक । तरूवर धन्य झाले ॥७०॥
क्षेत्रावरून जाती येती । हो का नर - पशु - पक्षि याती । पंचक्रोशीमाजी जे सापडती । त्यासी अधोगति नसेचि ॥७१॥
या पंढरीचा महिमा ऐकता नासे कोटी ब्रह्महत्या । या पंढरीस वास करिता । चिंता तयासी कासयाची ॥७२॥
ऐसी कथा ऐसे निरूपण । या पंढरीचे करिता श्रवण । होय बेचाळीस - कुळ - उद्धरण । जन्ममरण चुकले त्या ॥७३॥
इतुका पुंडलिकाचा महिमा । वाढला भक्तिरसप्रेमा । थोर केली भक्तीची सीमा । पुरूषी पुरूषोत्तमा साधिले ॥७४॥
बहिणीचा निजभाव । जाला पंढरीसी निर्वाह । पांडुरंगी जडला भाव । जाला ठाव निजपदी ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP