मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२८१ ते २९०

ज्ञानपर अभंग - २८१ ते २९०

संत बहेणाबाईचे अभंग

२८१.
पंचकोश आणि ताप जे त्रिविध । ईषना प्रसिद्ध हारपल्या ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजेती सत्य । विचारोनी तथ्य सांगितले ॥२॥
साही उर्म्या आणि षड्भाव देहीचे । विचारेही साचे वोसंतिले ॥३॥
बहेणि म्हणे इच्छेचा निरास हा जेथ । ब्राह्मण तो सत्य ब्रह्मवेत्ता ॥४॥

२८२.
वाचे लक्ष याचा जया अंगी बोध । ‘ सत ’ शब्द स्वानंद सापडला ॥१॥
तोचि ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलिजे । विज्ञान सहजे देह त्याचे ॥२॥
ज्ञप्ति अखंडता पूर्णता बाणली । समाधि लागली असंप्रज्ञ ॥३॥
बहेणि म्हणे चिह्न हेचि ब्राह्मणाचे । निश्चये शास्त्राचे सांगितले ॥४॥

२८३.
तत् शब्दी समर्पी स्वधर्माचे फळ । होउनी अढळ ब्रह्मनिष्ठ ॥१॥
तयासी ब्राह्मण आम्ही म्हणो शुद्ध । मोक्ष तो प्रसिद्ध भेटी होता ॥२॥
अहंकार अंगी जयासी न साहे । कर्तेपणी न ये दुजेपण ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण भेटता । ब्रह्म - सायुज्यता घरा आले ॥४॥

२८४.
देव अंतरला योगही लोपला । भाव दुर्‍हाअला प्राणियासी ॥१॥
काय करावे ते संचित वोखटे । विषय गोमटे वाटताती ॥२॥
नाम नये मुखा नावडे ते भक्ति । जिवासी विरक्ति नयेचि ते ॥३॥
बहेणि म्हणे संत साधु महानुभाव । नावडे तो ठाव पातक्यासी ॥४॥

२८५.
जडलेसे चित्त विषयी सर्वदा । नये ब्रह्मबोधा आत्मनिष्ठे ॥१॥
जया पै संचित नाही शुद्ध ज्याचे । देह पातकाचे वोतीव ते ॥२॥
अहंकर देही काम क्रोध लोभ । आवडे अशुभ कर्म ज्यासी ॥३॥
बहेणि म्हणे श्रेष्ठा न मानी प्रमाण । तेचि एक हीन वोळखावे ॥४॥

२८६.
अंधालागी जेवी उदेजेला भानु । कोल्हिया चंदनु व्यर्थ जैसा ॥१॥
ज्ञानहीना तेवी आत्मा हा प्रत्यक्ष । न ये मना साक्ष मूर्खपणे ॥२॥
चंद्राचा प्रकाश कावळ्यांसी पाहे । वानरांसी काये वस्त्रे होती ॥३॥
बहेरियासी काय गीत तानमान । श्वानासी मिष्टान्न जयापरी ॥४॥
नपुंसका जेवी पद्मिनी सुंदरा । प्राणेविण नरा भोग जैसा ॥५॥
बहेणि म्हणे तैसा सन्मार्ग मूर्खासी । बोधिता तयासी सिद्ध नाही ॥६॥

२८७.
नाही जया हेत प्रीति ते सद्बुद्धि । वैराग्याचा विधि ठाउकी हे ॥१॥
तया ज्ञानप्राप्ति न घडे सर्वथा । मोक्षाची ते कथा केवी तेथे ॥२॥
सद्गुरूचा बोध नाही ज्यासी कदा । शास्त्राद्रोही सदा निंद्यधर्मीं ॥३॥
बहेणि म्हणे मोह मानसी अखंड । न मानी जो लंड वेदवाक्य ॥४॥

२८८.
भावना जयाची जये ठायी जैसी । फळप्राप्ती तैसी होय तया ॥१॥
काय तो संदेह असे या अर्थासी । पाहिजे क्रियेसी अंगी बळ ॥२॥
ज्ञानप्राप्तीलागी भजेल जो नर । ज्ञानचि निर्धार होय तया ॥३॥
बहेणि म्हणे हेत धरी जैसा भक्त । तेणेचि तो मुक्त होय भावे ॥४॥

२८९.
घृतासी तो संग अग्नीचा जालिया । का मीठ घातल्या उदकामाजी ॥१॥
संगाचा स्वभाव लागला जयासी । सामर्थ्य ते त्यासी सहज जाण ॥२॥
लोखंड परिसासी झगटले जेव्हा । किंवा ते माधवा वृक्षवल्ली ॥३॥
बहेणि म्हणे चंद्र पौर्णिमेसी द्रवे । सिंधूचे हेलावे सहज येती ॥४॥

२९०.
हिंगाचिया संगे कापूर नासला । लवणे विध्वंसिला क्षीरयोग ॥१॥
म्हणोनिया संग करावा तो करी । जो हा सौख्यकारी प्राणियाते ॥२॥
केशर काजळासी संगत जालिया । काजळाचा तया संग लागे ॥३॥
बहेणि म्हणे संग धरावा तो ऐसा । मोक्ष तो आपैसा होय जेणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP