मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१३१ ते १४२

अनुतापपर अभंग - १३१ ते १४२

संत बहेणाबाईचे अभंग

१३१.
त्रिगुणापरते आहे तेची एक । भावने भाविक जाणती ते ॥१॥
सर्वांमाजी असे सर्वांही वेगळे । इंद्रिया नाकळे अखंडत्वे ॥२॥
आहे म्हणो तरी न दिसेच डोळा । नाही तो आगळा भास याचा ॥३॥
बहेणि म्हणे नाही नामरूप गुण । सर्वांठायी पूर्ण सदोदित ॥४॥

१३२.
जाला वासनेचा अंत । तेचि जाणावे लळित ॥१॥
ऐसे जाणती सज्जन । साक्षी जया आले मन ॥२॥
आला विषयाचा त्रास । पुढे राहिले सायास ॥३॥
चित्त जाले पाठिमोरे । एक आपुल्या निर्धारे ॥४॥
ज्ञाने जाळिले संचित । हेत राहिला निवांत ॥५॥
बहेणि म्हणे स्थिर बुद्धि । हेचि अखंड समाधि ॥६॥

१३३.
रूप नसोनिया डोळियांसी दिसे । तेजही प्रवेशे नेत्रांमाजी ॥१॥
ते रूप चोरटे ओळखे तू चित्ता । बुद्धीचा आरूता पैस जेथे ॥२॥
सगुण निर्गुण लक्षातीत वस्तु । जाला तेथ अस्तु इंद्रियांचा ॥३॥
बहेणि म्हणे शब्दी न सापडे तरी । शब्द त्या भीतरी अंतर्बाह्य ॥४॥

१३४.
पृथ्वीयेचा गंध उदकीचा रस । तेजामाजी अंश आत्मयाचा ॥१॥
परी तो न दिसे ज्ञानचक्षूविण । पाहिजे अंजन गुरूकृपेचे ॥२॥
वायूमाजी ज्याचे वसतसे रूप । नभी असे दीप आत्मयाचा ॥३॥
बहेणि म्हणे तेथ व्यवहार राहिला । जे वेळी पाहिला देवराणा ॥४॥

१३६.
बोध नंद बुधि यशोदा गोकुळी । जन्म झाला कुळी गौळियाचे ॥१॥
ते रूप सावळे पहा डोळेभरी । बाह्य अभ्यंतरी वोतप्रोत ॥२॥
नवविध नवमास पूर्ण जाले तेथे । कृष्ण अखंडित जन्मला तो ॥३॥
बहेणि म्हणे रूप सावळे सुकुमार । राक्षसांचा भार उतरिला ॥४॥

१३७.
आकाशीचा सूर्य जळात बिंबला । तरी काय बुडाला तयामाजी ॥१॥
तैसा या शरीरी अलिप्तचि असे । इंद्रियसमरसे असोनिया ॥२॥
चुंबकदर्शने लोखंडा चळण । आत्मा देही जाण तैसा असे ॥३॥
पूर्ण चंद्र होता सिंधूसी भरते । तैसा देह वर्ते आत्मयाने ॥४॥
आलिया वसंत येती पुष्पेफळे । तैसा देह चळे आत्मसत्ता ॥५॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वांही अतीत । अनुभवे पदार्थ सर्व कळे ॥६॥

१३८.
कवणे ठायी असे कवणे ठायी नसे । ऐसे तो मानसे चोजवेना ॥१॥
यालागी सद्गुरू बोलती जे भावे । आत्मा तो स्वभावे कळावया ॥२॥
कवण याचा ठाव कवण याचा गाव । न कळे स्वयमेव काय करू ॥३॥
कवण याचे कूळ कवण याचे स्थळ । कवण यासी बळ कळेचिना ॥४॥
कवण याची माता कवण याचा पिता । अमुकची तत्त्वता कवण जाणे ॥५॥
बहेणि म्हणे कोणा पुसो याची कथा । ऐसे विवंचिता कल्प गेले ॥६॥

१३९.
सत्य म्हणता माया ज्ञान लया जाय । असत्य तरी नव्हे कदा काळी ॥१॥
जाणती अनुभव ज्ञान दृष्टिरूप । मायेचे अमूप रूप वाढे ॥२॥
आकारले जे जे मायिक ते खरे । शब्द तो निर्धारे मायारूप ॥३॥
ज्ञान तेही माया ध्यान ते मायाचि । मायेविण कैची दृष्टी वाढे ॥४॥
जोवरी हे द्विअत मनामाजी वसे । तोवरी मायांशे लोकत्रय ॥५॥
बहेणि म्हणे माया लटकी म्हणो नेदी । करोनी वेवादी पहा बरे ॥६॥

१४०.
घट भंगलियावरी । नभ नभाचे भीतरी ॥१॥
तैसा देह गेलियाने । जीव शिव मिथ्या भान ॥२॥
जळ आटलियावरी । प्रतिबिंबा कैची उरी ॥३॥
बहेणि म्हणे भासे द्वैत । जाण उपाधीने येथ ॥४॥

१४१.
चालता पाऊल पंढरीच्या वाटे । ब्रह्मसुख भेटे रोकडेची ॥१॥
दिंडी ध्वजा भार चालती अपार । मृदंग - गंभीर - स्वरश्रुति ॥२॥
हमामा हुंबली घालिती परवडी । होउनी उघडी विष्णुदास ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा । कोण तो दैवाचा देखे डोळा ॥४॥

१४२.
वाया का भ्रमसी उपास करिसी कंदेमुळे सेविसी । भस्मा उद्धरिसी कपाटि रिघसी पंचाग्नी पै साधिसी ॥ भूमीसी निजसी वनी विचरसी मिथ्या तनू आटिसी । आत्मा नोळखिसी म्हणे रे बहेणि मोक्षासि कै पावसी ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP