मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
९१ ते १००

भक्तिपर अभंग - ९१ ते १००

संत बहेणाबाईचे अभंग

९१.
गंगेच्या प्रवाहा सागरीच गति । बोलताती श्रुती ब्रह्मवरी ॥१॥
तैसी जाण बुद्धि चाले तोचिवरी । निश्चय - शिखरी निमोनि जाये ॥२॥
पतिव्रते काम वाढे तो भ्रतारी । सूर्य तो अंबरी प्रभा दावी ॥३॥
बहेणि म्हणे तैसे संतांचे बोलणे । साक्षात्कार मने होय जीवा ॥४॥

९२.
सहज स्वभावे गोडी ते अमृती । पुष्पी जाण दृती अंगीच जी ॥१॥
तैसा तो स्वभाव क्रिया जे वर्तत । वेद मूर्तिमंत आकाराला ॥२॥
परिसाचा गुण अंगी साच खरा । रत्न गार हिरा सूर्य जैसा ॥३॥
बहेणि म्हणे तैसी सहज अंगी शांति । संतांची संपत्ती सर्व कर्म ॥४॥

९३.
संत असंताचे शरीर सारिखे । भिन्नत्व वोळखे क्रियेपासी ॥१॥
काय सांगो फळ दोहीचे वेगळे । जाणत्यासी कळे ज्ञानदृष्टी ॥२॥
परिस आणि गार सारिखे स्वरूप । तेल आणि तू पाहे पा रे ॥३॥
कच आणि मनि पाहाता समान । अंतरिचे गुण भिन्न असे ॥४॥
खरे आणि खोटे सारिखेचि नाणे । तक्र - दुधी गुण वेगळाची ॥५॥
बहेणि म्हणे मैंद साधु वोळखण । पुढे त्याचे गुण अंगिकारी ॥६॥

९४.
चंदनाचा संग लाधलिया वृक्ष । तैसेचि प्रत्यक्ष होती जाण ॥१॥
तैसी हे संगति साधूची जालिया । संत आपसया होती जीव ॥२॥
गावीचा वोहळ मिळालिया गंगे । गंगारुप संगे होय जैसा ॥३॥
परिसाचा संग जालियाने लोह । होय ते विदेह सुवर्णाची ॥४॥
वातीसी लाधला दीपकाचा संग । प्रकाश अभंग साध्य तया ॥५॥
बहेणि म्हणे संग सज्जनाचा करी । तोचि रे संसारी धन्य एक ॥६॥

९५.
दुर्जनाचे संगे दुर्जनाची होय । पाहे अभिप्राय सहज तो ॥१॥
हिंगाची संगती लागली कापुरा । स्वगुण तो खरा हरपला ॥२॥
तक्राचे संगती नासले ते दूध । भांग करी मुग्ध जीव क्षणे ॥३॥
बहेणि म्हणे संगे आपुलेसे करी । म्हणोनी विचारी साधुजना ॥४॥

९६.
वोळखोनि करी संग तू निर्धारी । सुख तू अंतरी पावसील ॥१॥
हा जाण निर्धार विवेकाची युक्ति । न धरावी आसक्ति मनामाजी ॥२॥
सुपंथ जाणोनी सज्जनाच्या संगे । पावसी सर्वांगे आनंद तू ॥३॥
बहेणि म्हणे शास्त्र केले याचिलागी । कळावया जगी मार्गामार्ग ॥४॥

९७.
संतसंगतीचा महिमा अद्भुत । होती ज्ञानवंत सत्त्वगुणी ॥१॥
यालागी सेवावे संतांचे चरण । स्थिर होय मन येक क्षणे ॥२॥
संतांचे बोलणे आइकता कानी । ब्रह्मरूप जनी होय सर्व ॥३॥
बहेणि म्हणे संतसर्शनेचि मोक्ष । अनुभव प्रत्यक्ष पाहे याचा ॥४॥

९८.
तीर्थे हिंडलिया काय होय फळ । अंतर निर्मळ नाही जव ॥१॥
यालागी निर्मळ होय चित्त येणे । संतांचे दर्शने घेतलिया ॥२॥
पाषाणप्रतिमा काय बोलतील । सुख हे देतील काय चित्ता ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे वचने निःसंदेह । होईल विदेह रोकडाची ॥४॥

९९.
प्रपंची असोनि प्रपंचा अतीत । करतिल संत सर्व कर्मी ॥१॥
यालागी सेवावे संतांचे चरण । मोक्षाचे कारण हेचि येक ॥२॥
तक्रातिल लोणी न मिळेचि पुन्हा । वेगळ्याचि गुणाःआत आले ॥३॥
पद्मिनीचे पत्र न मिळे उदकात । असताही तेथे जन्मवरी ॥४॥
बहेणि म्हणे तैसे प्रपंची असोन । न बाधी खूण साधूपासी ॥५॥

१००.
न लागती वेद शास्त्राचे पठण । परमार्थाची खूण वेगळिच ॥१॥
सद्गुरुसी जाई शरण सर्वभावे । मग तू स्वभावे ब्रह्मरूप ॥२॥
न लगती तपे व्रते अनुष्ठान । आत्मत्वाची खूण वेगळीच ॥३॥
न लगती देव तीर्थ क्षेत्र यात्रा । आगमीच्या मंत्रा धांडोळावे ॥४॥
न लगती योग याग प्राणायाम । साधनाचे वर्म वेगळेचि ॥५॥
नलगे ब्रह्मचर्य गृहस्थ संन्यास । व्रताचे हव्यास व्यर्थ तेही ॥६॥
न लगती पंचाग्नी धूम्राचे प्राशन । आकाश - वसन नलगे काही ॥७॥
बहेणि म्हणे एक श्री गुरूवाचोनी । मोक्ष तो गहनी प्राप्त नव्हे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP