मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४३४ ते ४४५

ज्ञानपर अभंग - ४३४ ते ४४५

संत बहेणाबाईचे अभंग

४३४.
विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानद्टेटी । घेऊनी कसोटी वेदशास्त्रे ॥१॥
काय उणे मग आपुल्या स्वमुखा । होऊनिया मुका राहे तेथे ॥२॥
पुष्पामाजी वास नेणती ते नेत्र । घ्राणेविण श्रोत्र व्यर्थ सर्व ॥३॥
बहेणि म्हणे देवे व्यापियेले जग । ज्ञानदृष्टि चांग पाहिजे ते ॥४॥

४३५.
पाहिजे ते ज्ञान सात्त्विक चांगले । निर्द्वंद्व एकले एकनिष्ठ ॥१॥
तेणेचि तो वसे विश्वामाजी हरी । बाह्य - अभ्यंतरी वोतप्रोत ॥२॥
असलीया नेत्र सूर्य वस्तु दिसे । पुष्पाचे विकासे फळप्राप्ती ॥३॥
बहेणि म्हणे सत्त्वगुणी पूर्ण कृपा । तैच आत्मरूपा पावसील ॥४॥

४३६.
भेटी होय म्हणो जाता आले द्वैत । आत्मा अखंडित सर्वव्यापी ॥१॥
श्रुतिस्मृतिसाक्ष सिद्ध - ऋषिमते । आत्म्याविण रिते नाही स्थळ ॥२॥
कल्पना मनात वाढली अपार । तेणेचि अंतर आत्मयासी ॥३॥
बहेणि म्हणे द्वैत जाय जै कल्पना । तैच नारायणा पावसील ॥४॥

४३७.
विश्वरूप आत्मा भाविसील जरी । असत्य विश्वाकार ॥१॥
सद्गुरूची कृपा होईल जे क्षणी । वोळखसी जनी जनार्दन ॥२॥
दिसे ते ते सर्व नासेल सर्वथा । आकारले वृथा भास याचा ॥३॥
बहेणि म्हणे दृश्या अतीत बोलती । तयाची प्रचीती घेई का रे ॥४॥

४३८.
दृश्य मिथ्या वाचा घेवोनी अनुभव । मग तुझा देव तुजपासी ॥१॥
सद्गुरूचे पायी वोळगे सर्वस्वी । मग तुज विश्वी विश्वंभर ॥२॥
दृष्टि सत्य तेव्हा दृश्य होते सत्य । तुम्ही यथातथ्य शोध करा ॥३॥
बहेणि म्हणे वाचा वोसरली परा । दृश्यपणा थारा तेथ कैचा ॥४॥

४३९.
दृश्यत्वीच देव सापडता जरी । शास्त्रार्थविचारी कोण धावे ॥१॥
पाहे विचारोनी आपुलिया देही । हिंडसील मही कासयासी ॥२॥
नेत्रांसी गोचर होता जरी आत्मा । भजनसंभ्रमा काय काज ॥३॥
बहेणि म्हणे दृष्य सर्वहि मायिक । आत्मा तो सम्यक वेगळाची ॥४॥

४४०.
श्रुतिपथ पडले हो पाहसी सर्व काळी । विविध भजन मार्गी कासया देह जाळी । गुरूपदभजनाचा हेत हा हो जयासी । म्हणत बहेणि नेत्री देखसी आत्मयासी ॥१॥

४४१.
तीर्थ तपे व्रते अनुष्ठाने नाना । धरिता धारणा योगमुद्रा ॥१॥
न सापडे त्यासी तत्त्व आत्मयाचे । जगीच ते साचे केवी घडे ॥२॥
मस - उपवासी नाना कृच्छ्रे चांद्रायणे । आत्मतत्त्व येणे दृष्टी न पडे ॥३॥
बहेणि म्हणे चक्रे भेदुनीया मना । कोंडिती पवना जयालागी ॥४॥

४४२.
वैराग्य विरक्ति साधिती शम दम । धूम्रपाने नेम इम्द्रियांचा ॥१॥
परी ते न साधे आत्मतत्त्व तया । अद्यापि संशया न सांडिती ॥२॥
राज्य त्यजूनिया बैसले वनात । एक ते ध्यानस्थ सर्वकाळ ॥३॥
बहेणि म्हणे देव प्रपंची असता । तरी का हे अवस्था भोगिती ते ॥४॥

४४३.
एक दिगंबर हिंडताती नम्र । एक ते निमग्न सर्वकाळ ॥१॥
परि त्या अद्यापि न सापडे सत्य । सोलीव जे तत्त्व विवेकाचे ॥२॥
मुंडिती खंडिती दंडिती देहासी । एक मौनवेषी हिंडताती ॥३॥
बहेणि म्हणे जटा नखे वाढवूनी । हिंडती अवनी भ्रांतवेषे ॥४॥

४४४.
दृश्य नव्हे वस्तु हा खरा निर्धार । वेदेही साचार हाचि केला ॥१॥
सद्गुरू - अंजन घालोनी पहासी । तरीस पावसी आत्मयासी ॥२॥
सगुण मायिक नासेल सर्वथा । निर्गुण पहाता आडळेना ॥३॥
बहेणि म्हणे आता विवेकाचा दीप । घेवोनी स्वरूप पहे डोळा ॥४॥

४४५.
विवेक - वैराग्य सद्गुरूची कृपा । होय तई सोपा आत्मबोधू ॥१॥
नाही त्या संदेह निश्चय मानसी । याचि साधनासी प्रवतार्वे ॥२॥
श्रवण मनन सदा निजध्यास । पुढे होय त्यास साक्षात्कार ॥३॥
बहेणि म्हणे तुज पावावया निज । उपाय सहज हाचि असे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP