मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४२८ ते ४२९

अनुतापपर अभंग - ४२८ ते ४२९

संत बहेणाबाईचे अभंग

४२८.
जाग रे जगजोगी जगजोगी । तोचि आहे तुमच्या संगी ॥१॥
ऐसे सांगे क्षेत्रपाळ । तुम्ही पूजा रे सकळ ॥२॥
काया - काशीपुर नगरी । आत्मा - शिव राज्य करी ॥३॥
ज्ञान भागीरथीनीर । निर्मळ वाहे स्थिर स्थिर ॥४॥
अखंड पर्वकाळ तेथे । ब्रह्मादिक मिळती जेथे ॥५॥
तया जाती काशीपुरा । होती वेगळे संसारा ॥६॥
पंचतत्व पंचक्रोशी । अवघी लिंगमय काशी ॥७॥
ऐसे देह - काशीपुर । विश्वनाथाचे नगर ॥८॥
काळभैरव दंडपाणी । तेचि विवेक विचार दोन्ही ॥९॥
तेथे उभा धुंडीराज । येथे निजबोध सहज ॥१०॥
प्रयाग त्रिगुण त्रिवेणी । आली गंगेसी मिळोनी ॥११॥
मनागुणा जेथे भेटी । मनकर्णिका तेचि घाटी ॥१२॥
काशी तेचि मूळमाया । मन येता तिच्या ठाया ॥१३॥
दोघा होता जेथे भेटी । जाली ब्रह्मानंदे सृष्टी ॥१४॥
नाम घाट मनकर्णिका । ऐसे म्हणती तेथे देखा ॥१५॥
तेथे घडे जया स्नान । पडती गाठी कोटि पुण्य ॥१६॥
तया पुण्याचेनि योगे । होय भवाचे दर्शन ॥१७॥
भवानी जे निजकळा । शुद्ध ब्रह्मीचा जिव्हाळा ॥१८॥
नव्हे तुरीया ना उन्मनी । तया म्हणती भवानी ॥१९॥
तिचे घडता दर्शन । भेटे ब्रह्म परिपूर्ण ॥२०॥
बहेणि म्हणे भाव धरा । एक वेळ जा रे काशीपुरा ॥२१॥

४२९.
विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा पाळा ॥१॥
तुकोबा तो कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥२॥
एकनाथ खांद्यावरी । कबीराचा हात धरी ॥३॥
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥५॥
बहेणि म्हणे बा गोपाळा । करिसी भक्तांचा सोहळा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP