मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५५ ते ६०

भक्तिपर अभंग - ५५ ते ६०

संत बहेणाबाईचे अभंग

५५.
भक्ति हे कारण साध वरिष्ठ । रोकडे वैकुंठ हाती वसे ॥१॥
स्थिर करी चित्त प्रेम अखंडित । पावसी अच्युतपद पाहे ॥२॥
भक्तीपासी ज्ञान वैराग्य आंदणे । सर्वही साधने लया जाती ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति विरक्तीचे मूळ । चित्त हे निश्चळ करी का रे ॥४॥

५६.
संताचे वचनी दृढ जया भाव । भक्ति अभिनव हेचि खरी ॥१॥
सांगितली खूण आइके जो मनी । पावेल निर्वाणी तोचि एक ॥२॥
संताचे वचन शास्त्राचे आधारे । भक्तिचे निर्धारे दृढ व्हावे ॥३॥
बहेणि म्हणे संतापायी जया अर्त । हाचि भक्तिपंथ वोळखावा ॥४॥

५७.
नामसंकीर्तन सर्वकाळ जया । भक्तिवंत तया म्हणो आम्ही ॥१॥
क्षण एक नाही नामेविण वाचा । सोस हा भक्तीचा सर्वकाळ ॥२॥
नेत्री हरिध्यान मुखी ते कीर्तन । सर्वदा श्रवण मोक्षशास्त्रे ॥३॥
सेवा घडे हाते पायी प्रदक्षिणा । विश्रांती धारणा आत्मयाची ॥४॥
आठही प्रहर नाही आराणुक । संताघरी रंक होउनि ठेला ॥५॥
बहेणि म्हणे भक्ति खरी मोक्षदाती । पाहिजे संगती संतसेवा ॥६॥

५८.
उदकेवीण मासा जैसा तळमळी । चातक भूतळी मेघ इच्छी ॥१॥
तैसे भक्तिलागी कळवली मन । भक्ति हे निर्वाण तेचि खरी ॥२॥
एकुलता पुत्र सापडे वैरिया । कुरंग हा ठाया पारधीचे ॥३॥
पतिव्रता पतिवियोगे तडफडी । भ्रमर प्राण सांडी पुष्पेविण ॥४॥
तृषाक्रांत जैसा इच्छित जीवना । चकोर हा जाण चंद्रामृता ॥५॥
बहेणि म्हणे तैसी आवडे हरिभक्ति । तेव्हा आंतरविरक्ति वोळखावी ॥६॥

५९.
भक्तीविण काय वाचोनिया व्यर्थ । अंतरला स्वार्थ देखताची ॥१॥
नये त्याचे तोंड पाहे पा सर्वथा । कासयासी माता तया व्याली ॥२॥
न करी सेवन पूजी सज्जन । न करी श्रवण मननामाजी ॥३॥
बहेणि म्हणे जया न घडे हरिभक्ति । मग त्या विरक्ति केवी साधे ॥४॥

६०.
चित्तशुद्धि होय भक्तिचेनि योगे । होईल वाउगे दृश्यजात ॥१॥
वैराग्य संचरे मनामाजी जाण । जैसे हे वामन सर्व तैसे ॥२॥
विषय असत्य रोहिणीचे जळ । वाटते सकळ भ्रांतिरूप ॥३॥
बहेणि म्हणे जंव शुद्ध चित्त नाही । प्रपंच तो काही न सुटेचि ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP