मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५७५ ते ५८६

स्फुट अभंग - ५७५ ते ५८६

संत बहेणाबाईचे अभंग

५७५.
रामा तू माझा जिवलग सांगाती । झणी मज अंती अंतरसी ॥१॥
ऐसीये संकटी पावसी न पाहे । तरी देह जाये तुझ्या माथा ॥२॥
रायाचे लेकरू रंकाने गांजावे । हे तो स्वभावे नवल वाटे ॥३॥
बहिणी म्हणे तुझे ब्रीद काय झाले । सांग कोणी नेले हिरोनिया ॥४॥

५७६.
गुरूवर्णन करिता बोले । सभा देखोनी मुलेबाळे ॥१॥
नाही भेटला सद्गुरू । लोकाचारे उपदेश करू ॥२॥
नाना मते सांगे गोष्टी । तत्त्वज्ञान बोले नेटी ॥३॥
परि अनुभवते बोल । तेथे राहिले सकळ ॥४॥
उपदेश करी जना । “ गुरू न करी स्त्रीजना ” ॥५॥
शूद्र अथवा स्त्रीविरहित जाती । जो मानी गुरूस्थिती ॥६॥
“ तो जाणावा राक्षस । जो घेत स्त्रीउपदेश ” ॥७॥
सभेमाजी ऐसे बोले । सभा देखोनी मिथ्या जळे ॥८॥
जेथे विकल्प तुटला । तेथे वर्णभेद मिथ्या बोला ॥९॥
बहिणी म्हणे ऐशा जना । स्वप्नी न करा संभाषणा ॥१०॥

५७७.
काळभये लंकापती सागरी दुर्ग रचुनी वसे । चक्र फिरे भंवते दिनरात्री तो मग यमा गवसे ॥१॥
ज्यासी पराक्रम, देव बंदी घालुनी हासतसे । तो मरणाप्रती सापडला अरे प्रयत्न वृथाचि असे ॥२॥
होईल मग ते शेवटींचे पाहुनी स्वानुभवो । साध्य असो की असाध्य हो परी प्राक्तन दोहीसरिसे ॥३॥
बहिणी म्हणे न चुकेल विधीचे लेखन पूर्वील हो । प्रयत्न वृथा, परी कीजे पुरूषे प्रयत्न पराक्रम हो ॥४॥

५७८.
कोठे गेला हा स्वामी काय करू । गरूडा न दिसे कृष्ण विचारू ॥ हाहाकार जाला थोरू । प्रीतिकारू सांडिला निजवारू ॥१॥
तुजविणे रे गोविंदा देह पाहे । वियोगे प्राण हा कोण वाहे ॥ धीर नोहे मज पाहे । मग धाय टाकुनी रडे माये ॥२॥
अहो सखिये तिमिर आले डोळा । तेणे योगे शेजारी निद्रावला ॥ कोठे गेला घननीळ हा । पुष्पमाळा टाकिली मज गळा ॥३॥
करी माळा घेऊनि रडे बाळा । कृष्ण झाला सांग हो काय वहिला ॥ वास जाला काय माळा । मनी पाहता विवेक कृष्णे नेला ॥४॥
बहिणी म्हणे चुंबन देता माळे । तव तदृता बांधिले पुष्प गळे ॥ परिमळ कृष्ण कळे नेला बोले । शरीर टाकी बळे ॥५॥

५७९.
लाज नाही येथे येऊनि संसारा । नरकाचा थारा भोगावया ॥१॥
किती मरमर सोसणे अघोर । नेघे तो विचार स्वहिताचा ॥२॥
कासया संपत्ती जळो जळो जिणे । दिसे लाजिरवाणे एकाविणे ॥३॥
हत्ती घोडे दासी छत्री शेषासन । जळो हे भूषण एकाविण ॥४॥
सोयरे धायरे जळो इष्टमित्र । अवघे अपवित्र एकाविण ॥५॥
बहेणि म्हणे तनु अवघी हे चांगली । एकाविण गेली जन्म वाया ॥६॥

५८०.
पृथ्वी ही गिळिली उदकाने पाही । तेजे उदक नाही ऐसे केले ॥१॥
पहा विपरीत प्रळयो मांडिला । ब्रह्माग्नि लागला ब्रह्मत्वासी ॥२॥
वायूने तेज गिळिले एकसरा । ब्रह्मांड - पसारा शुकशुकाट ॥३॥
मग त्या आकाशे गिळियला वायो । ऐसा हा प्रळयो थोर जाला ॥४॥
यासी तो प्रळयो बोलिजे निश्चयो । महाप्रळय भये पुढे आहे ॥५॥
आकाश गिळिले विष्णु - महद्भूते । कैसे विपरीत जाले देखा ॥६॥
विष्णु म्हणायासी जो कोणी उरला । तयाचीया बोला ठाव नाही ॥७॥
ऐसा अवगा परी होऊन आभास । पूर्ण सावकाश नांदतसे ॥८॥
नित्य आनंदघन दाटे परिपूर्ण । बोले खंब्रह्म वेदवाणी ॥९॥
बहिणी म्हणे कैसे विपरीत केले । दुःख तेचि जाले सुखरूप ॥१०॥

५८१.
सराफापासी घेतले सोने । न व्हावे कोणे भिडे त्याचे ॥१॥
जोखून पहावे कसोटीसी । घ्यावे कसी आगळे ते ॥२॥
जयाने घेतले त्याचे भिडे । नागवण घडे झाकिलिया ॥३॥
कसी कसोटीच्या आले । जाणावे ते वरच्या मोले ॥४॥
टांकसाळी कसिले नाणे । बहिणी म्हणे तेचि खरे ॥५॥

५८२.
तया म्हणू भाग्यवंत । जया खंत विठ्ठलाची ॥१॥
नामधन जयागाठी । तोचि कोटी - नारायण ॥२॥
तोचि छत्रपती । ध्यास चित्ती विठोबाचा ॥३॥
तरती दर्शने त्याच्या जीव । तोचि देव मुमुक्षूंचा ॥४॥
बहिणी म्हणे काळशास्ता । तोचि नाम गाता मुखीं सदा ॥५॥

५८३.
जटा न कंथा सिंगी न शंख । अलख भेख हमारा बाबू । झोली न पत्र न कानमें मुद्रा । गगनपर देख थारा ॥१॥
बावा हम तो निरंजनवासी । साधुसंत योगी जान लो । हम क्या जाने घरवासी ॥धृ०॥
माता न पिता, बंधु न भगिनी । गण गोत ओ सब न्यारा ॥ काया न माया, रूप न रेखा । उलटा पंथ हमारा बाबा ॥२॥
धोती न पोथी, जाति न कुल । सहजी सहज भेख पाया ॥ अनुभव पत्रिसी सिद्ध की खाही । उन्मनी ध्यान लगाया ॥३॥
बोध बलपर बैठा भाई । देखत हे तिन्हु लोक । उर्ध्व नयनकी उलटी पाती । जहॉं प्रकाश आनंद कोटी ॥४॥
भाव भगत मॉंगत भिक्षा । तेरा मोक्ष कीर रहा दिखाई । बहिनी कहे मैं दासी संतनकी । तेरे पर बलि जाऊं ॥५॥

५८४.
देखोनिया स्वरूप । सुखावले मन पहाता ( चि ) जाले समाधान ॥धृ०॥
श्यामसुंदर कांती । सर्वांगी विभूती । नाम जयाचे उमापती ॥१॥
माथा जटाभार । वाहे गंगेचे नीर । (स्व)रूप जयाचे अगोचर ॥२॥
मस्तकी ( ही ) डोळा । भाळी चंद्रकळा । अर्धांगी शोभे शैल्यबाळा ॥३॥
रूंडमाळा गळा । त्रिपुंड्र पिवळा । ( श्री ) मुख साजिरे रविकळा ॥४॥
वहन वृषभ साजे । त्रिशुळ डमरू गाजे । शोभती कैसे योगिराजे ॥५॥
सिंगी स्फुरण करी । साजे मेखळा वरी । स्मशानवारू तयापरी ॥६॥
बहिणीचा स्वामी एक । त्रैलोक्यनायक । वसे सदा हृदयी देख ॥७॥

५८५.
वसुदेव, देवकी कृष्णाला म्हणतात - “ स्थानमानातीता । रूप वर्णापरता । वर्तवी स्वसत्ता हरिहर हरि रे ॥ त्रिगुणी नाकळसी । मोहना श्रीदेवा । शेषादिका न वर्णवे रे ॥ परत वाचा । जेथे रिघु नव्हे वेदाचा । अगुणरूपधारी तूचि बा रे ॥ तो तू आम्हा कैसे । निजरू दाखविसी । धन्य तुझा महिमा हरि रे ॥१॥
तुज नमो निश्चिता ब्रह्मबोधा । न कळसी मनबुद्धि भेदा । गुरूवाक्य अनुभवी । जाणवी जो । खुणे तयासी न दिसे आपदा ॥धृ०॥
सप्तही पाताळे । दशदिशा मंडळे । चंद्रसूर्य तुझे उदरी । ताराग्रह वरूणादिक । रीबाबळी देख । सामाविली तुवा श्रीहरी । विराटस्वरूपा अनुपा । न कळसी निजरूपा । दाखविसी नयनी कुसरी ॥ चतुर्भुज कैसा । नयनी दाखविसी । काय वर्णू तुझी थोरी ॥२॥
सहजसिद्धा । सच्चिदानंदकंदा । विश्वतारका स्वामी तू हरि रे । काय पुण्य केले । न कळे कवणे । जन्मी लाधलो आम्ही तुज रे ॥ केवी आम्हा तू । लाधसी कृपाळा । कंस आहे तु शत्रु रे ॥ मारिली बालके । ज्येष्ठे तुजहुनी । ते लोपी चतुर्भुज रूप रे ॥३॥
दैवहीना कायेची । मागणी होय । अभागीया राज्यपद हे । कामधेनु काय । साधे दारिद्र्यासी । मिष्टान्न रोगीया पाहे ॥ कल्पतरूतळी काय । असोनिया । दैव जवे साह्य नोहे ॥ ऐसे आम्हा तू । केवी होसी प्राप्त । माझे मन कळले हे ” ॥४॥
ऐकोनिया स्तवन । दोघांचे पै । कैसा संतोषला कृष्णराणा ॥ “ तपसामुग्रीने । तुम्ही मागितले । मजला, होईल नारायणा ॥ मग मी तीन वेळा । पुत्र झालो तुमचा । तिसरा गे हाचि जाणा ॥ ” म्हणोनिया रूप । दाखविले चतुर्भुज । बहिणी जाणे त्याची खुणा ॥५॥

५८६.
दो दिनकी है दूनिया रे बाबा । दो दिनकी है दुनिया ॥धृ०॥
ले अल्लाका नाम कुळ धरो ध्यान । बंदे ना होना गुंग ॥१॥
नर - तन येही सार । नई आवेगा दूजे बार । वेरी करो है फिकिर । करो अल्लाकी जिकिर ॥२॥
करो अल्लाकी फिकिर । तव मिलेगा गामील पीर । बहिणी कहे तुझे पुकार । कृष्ण नाम तमे हुसीयार ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP