मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३१९ ते ३२६

मनबोधाचे अभंग - ३१९ ते ३२६

संत बहेणाबाईचे अभंग

३१९.
योगयाग भोगत्याग देहासी दंडन । जपतप अनुष्ठान नामेविण विटंबण ॥१॥
ते हे जपा नाम तुम्ही सुखाचे निधान । हरतिल भवयातना तुटेल जीवाचे बंधन ॥२॥
उपास पारणे जरि ते जाले मौनी नग्न । पंचाग्नी धूम्रपानी मिथ्या अवघे नामेविण ॥३॥
बहेणि म्हणे नाम नाही ज्याचे मुखी । नातळावे त्यासी सत्य जाणावा सुतकी ॥४॥

३२०.
जरी जाला भाग्यवंत । धनधान्यसंपन्न अद्भुत । भगवंती नव्हे जयाचे चित्त । तरी तो यथार्थ सुतकी ॥१॥
न वजावे तयाचे घरा । नातळावे घरदारा । जळो त्याचे द्रव्यदारा । पापी खरा सुतकी ॥२॥
कन्यापुत्र कनकसंपन्न । सोयरेधारे धनवंत जाण । भगवंती जयाचे विमुखपण । तरी तो जाणा सुतकी ॥३॥
जरी जाले वेदज्ञ पंडित । शास्त्राभ्यासी तत्त्वार्थ । भगवंती नसे जयाचे चित्त । तरी तो यथार्थ सुतकी ॥४॥
जरी झाले ज्ञानी आणि महानुभाव । पूर्णपणे जरी देखिला देव । नामपाठी जयाचा अभाव । तरी त्या नाव सुतकी ॥५॥
बहेणि म्हणे निवृत्ति कारण । नाम - पाठी ठेविले मन । हरावया देहदोष जाण । हरिकीर्तन करिते ॥६॥

३२१.
भक्तिभाव आम्ही बांधिलासे गाठी । तेणे आम्हा तुटी कासयाची ॥१॥
गाऊ नाचू प्रेमे हरिनाम कीर्तनी । भावोनिया जनी जनार्दन ॥२॥
खाऊ वाटू लुटु उदारासारिखे । सरे ऐसे देखे नाही नाही ॥३॥
कोणाचिया घरा जावे घ्याया देया । स्वप्नी भोगावया दैन्य नाही ॥४॥
बहेणि म्हणे भक्ता कासयाची चिंता । गाठीसी असता पांडुरंग ॥५॥

३२२.
नलगे घ्यावे सोंग टोपी - मुद्रा धरणे । भक्ति ही कारण असो द्यावी ॥१॥
तेथे सर्व सिद्धि नांदती स्वभावे । आपुलाल्या दैवे घ्यावे येथे ॥२॥
नलगे योगायोग नलगे भोगत्याग । असावा अनुराग भक्तिसवे ॥३॥
नलगे जप तप दान तीर्थाटणे । भक्ति असो देणे येक गाठी ॥४॥
नलगे ज्ञान ध्यान नग्न पै हिंडण । भक्ति हे कारण असो द्यावी ॥५॥
बहेणि म्हणे आह्मा भक्ती तेचि मुक्ति । ऐशा वेदश्रुति गर्जताती ॥६॥

३२३.
माझिया रे मना सखया सज्जना । ऐक तू प्रार्थना विनवितसे ॥१॥
सांडी हे मीपण अहंतालक्षण । निवांत आपण सुखी राहे ॥२॥
किती वणवण करिसी भ्रमण । व्यर्थ वायाविण श्रम देही ॥३॥
मायामृगजलापाठी का लागसी । कष्ट का भोगसी चौर्‍यांशीचे ॥४॥
येणे काय हित घडो पाहे तुज । धरी काही लाज सज्जनांची ॥५॥
बहेणि म्हणे गेले संत जया वाटा । पावले ते निष्ठा सुखरूप ॥६॥

३२४.
शुक वामदेव व्यास पराशर । गेले थोर थ्रोर जेणे पंथे ॥१॥
जेणे पंथे सुखी जाले पै निर्भय । मना तेचि सोय धरी का रे ॥२॥
वसिष्ठ अंबऋषी सनकादिक पाहे । गेले लवलाहे जेणे पंथे ॥३॥
बळी बिभीषण प्रल्हाद वाल्मीक । पावले ते सुख जेणे पंथे ॥४॥
ऐसे किती सांगो चहु वर्णांमाझारी । जाले संवसारी सुखरूप ॥५॥
बहेणि म्हणे मना धरी रे धारणा । लागले चरणा निजभावे ॥६॥

३२५.
मना तूचि माझे संचित क्रियमाण । भ्गो हे भोगणे सुखदुःख ॥१॥
तुझेनीच मज बंध मोक्ष जाण । येर्‍हवी पुसे कोण मजलागी ॥२॥
मी हे माझे द्वैत वाढविला विकल्प । पुण्य आणि पाप तुझे देठी ॥३॥
निश्चलता तुज जरी हे असती । सुखदुःखाची प्राप्ति कोणालागी ॥४॥
जीवशिव नामे वाढली उपाधी । तुझेनीच बुद्धि मना जाण ॥५॥
बहेणि म्हणे मना भाकितसे करूणा । सोडवी मज दीना काळाहांती ॥६॥

३२६.
काळ आणि वेळ तास घटिका पळ । तुझेनी हे मूळ गणनेलागी ॥१॥
जेथे नाही काळ तेथे कैची वेळ । उपाधीचे मूळ तूचि मन ॥२॥
अणूचे प्रमाण सूक्ष्मब्रह्मपणा । एवढी हे गणना तुझे मूळ ॥३॥
पंचमहाभूते वर्तती आपण । चंद्रसूर्य जाण दिनमानेसी ॥४॥
अवघी हे गणना ब्रह्मांडरचना । मना तुजविणा नाही नाही ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे काळचक्र चाले । येवढे तुझे चाळे दिसती बापा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP