मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४०८ ते ४२०

अभंग - ४०८ ते ४२०

संत बहेणाबाईचे अभंग

श्लोक
४०८.
शेषाचे शिखरी विराट नगरी नांदे मही सुंदरी । ते गर्भी मकरी सुधामृत - झरी चंद्रावती दूसरी ॥ तीच्या पैलतिरी उभा विटवर ब्रह्मांड संस्था भरी । ऐसी पुण्यपुरी नसेल दुसरी ते पंढरी भूवरी ॥

अभंग
४०९.
धन्य ते दैवाचे वारकरी साचे । अंकित विठोबाचे जन्मोजन्मी ॥१॥
ऐसियांची भेटी करिता हितगोष्टी । सुखाचिया कोटी हेलावती ॥२॥
कोण सांगो पुण्य पंढरीच्या लोका । अखंड श्रीमुखा न्याहाळिती ॥३॥
चंद्रभागे स्नान देवाचे दर्शन । अखंड कीर्तन महाद्वारी ॥४॥
करिती जयजयकार मिरवे दिंडीभार । गर्जे पै अंबर नामघोषे ॥५॥
प्रपंचपरमार्थ अवघा सुखरूप । कळिकाळाचे मुख स्व्पनी नाही ॥६॥
तुळसीवृंदावन पद्मरांगोळिया । कुंकमाचे पहा सडे द्वारी ॥७॥
कामधाम अवघे जाले विठ्ठलरूप । पंढरीचे लोक विठ्ठल पै ॥८॥
वोखदासी पाप न मिळे पाहता । ब्रह्मसायुज्यता पंढरी हे ॥९॥
जीवन्मुक्तदशा पंढरी - पाटणी । ब्रह्म हे गोठणी विठ्ठलवेषे ॥१०॥
पंढरीवरून येती जाती जीव । मुक्तीचा निर्वाह पशुपक्ष्यां ॥११॥
बहेणि म्हणे आम्ही धन्य जालो सुखी । येता नाम मुखी पंढरीचे ॥१२॥

४१०.
पंढरीचे सुख काय सांगो आता । जेथे चारी वाचा वोसरल्या ॥१॥
जेथे पुंडलिके केला रहिवास । धन्य त्याचा वंश मातापिता ॥२॥
पंढरीचा महिमा कोण करी सीमा । वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥३॥
बहेणि म्हणे क्षेत्र पंढरीसारिखे नाही क्षेत्र हे न देखे भूमंडळी ॥४॥

४११.
उदंड ऐकिला उदंड गाइला । उदंड देखिला क्षेत्रमहिमा ॥१॥
पंढरीसारिखे नाही क्षेत्र कोठे । जरी ते वैकुंठ दाखविले ॥२॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥३॥
ऐसे वाळुवंट ऐसी हरिकथा । ठाई ठाई देखा दिंडीभार ॥४॥
ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख । ऐसा नामघोष सांगा कोठे ॥५॥
बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण । पंढरी निर्माण केली देवे ॥६॥

४१२.
चोविसा - मूर्तीसी आसन - मुद्रा - ध्यान । हा पांडुरंग जाण निर्गुणरूप ॥१॥
ज्याचे पायी जन्म देवा आणि तीर्था । ते मूर्ती तत्त्वता विठोबाची ॥२॥
वेदा आणि शास्त्रा ॐकार हा मूळ । सर्वांचे समूळ पांडुरंग ॥३॥
विटेचा संकेत पाचवी अवस्था । ब्रह्मसायुज्यता निखळरूप ॥४॥
कटी हात दोन्ही खुणाची दाखवी । अनेक एकत्वी पहा कैसे ॥५॥
बहेणि म्हणे तया लोधले हे मन । धन्य जया खूण कळो आली ॥६॥

४१३.
तीर्था तीर्थाराव ती एक पंढरी । पाहता पृथ्वीवरी आणिक नाही ॥१॥
धन्य ते दैवाचे घेती प्रेमसुख । सदा नामघोष मुखी वसे ॥२॥
भीमा चंद्रभागा दोहींचा संगम । नांदे मेघश्याम पांडुरंग ॥३॥
पुण्य पुष्पावती तीरी वेणुनाद । सप्रेम गोविंद क्रीडा करी ॥४॥
बैसोनि विमानी येती देव तिन्ही । काळ हा साधुनी माध्यान्निके ॥५॥
ब्रह्मत्रय - क्षेत्र पंढरी - पाटण । म्हणोनी श्रेष्ठ जाण बहुता गुणे ॥६॥
कर्मब्रह्म काशी नामब्रह्म पंढरी । सर्वब्रह्मगिरी खलुविद ॥७॥
पंढरीमाझारी ब्रह्मत्रयवास । म्हणोन विशेष पंढरी हे ॥८॥
बहेणि म्हणे पंढरीं सर्वांही वरिष्ठ । ऐशा श्रुती स्पष्ट बोलताती ॥९॥

४१४.
अष्टधा प्रकृति तेचि या गोपिका । अष्टभाव देखा गोपाळ हे ॥१॥
क्रीडती गोकुळि सदा या शरीरी । स्वानंदे निर्भरी परमानंद ॥२॥
इंद्रियगोधने विषय - तृण चरे । दुभती अपारे निजसत्त्वे ॥३॥
गोरसाचे डेरे अख्डं संचले । सुखे सुखावले स्वानुभवे ॥४॥
तेणे सुखानंदे नाचती गोपळ । करिती गदारोळ गोपिका त्या ॥५॥
बहेणि म्हणे जेथे कृष्णाचा अवतार । तेथे व्यभिचार स्वप्नी नाही ॥६॥

४१५.
पतिव्रता धर्म ऐका गे साजणी । धन्य ज्या गर्तिनी पुण्यसीळ ॥१॥
येणेचि श्रवणे मुक्ति होय जीवा । पतीविण देवा नाठविजे ॥२॥
आपण आपण वोळखिले जिने । धन्ये तेचि जाणे पतिव्रता ॥३॥
प्रपंच परमार्थ चालवी समान । तिनेचि गगन झेलियेले ॥४॥
कर्म तेचि ब्रह्म ब्रह्म तेचि कर्म । ऐसे जिने वर्म जाणितले ॥५॥
अखंड तो मनी भगवंत सर्वथा । तेचि पतिव्रता निकी लोकी ॥६॥
रागद्वेष मनी जाणिवेचा फुंग । न धरिजे संग अधर्माचा ॥७॥
इंद्रियांच्या वृत्ति विधीने सावरी । न दिसे अंतरी द्वैतभाव ॥८॥
साधुसंतसेवा पतीचे वचन । पाळी तेचि धन्य पतिव्रता ॥९॥
शांतिक्षमादया पाळी भूतकृपा । जाणानी स्वरूपा पतीचिया ॥१०॥
पतीचे वचन अमृतासमान । धन्य तिचा जन्म मातापिता ॥११॥
बहेणि म्हणे तिने जिंतिला संसार । वैकुंठीची थार केली तिने ॥१२॥

४१६.
परपुरूषाचे काय सांगो सुख । हरे सर्व दुःख संसाराचे ॥१॥
म्हणानिया संग धरावा तयाचा । सकळ सुखाचा सुखदाता ॥२॥
परपुरूषाचे देखता चरण । उपरमे मन सुखावोनी ॥३॥
परपुरूषाचे देखता स्वरूप । कोटी सूर्यदीप हारपती ॥४॥
परपुरूषाचे सुख लाहे जरी । उतरोनी करी सीस घ्यावे ॥५॥
बहेणि म्हणे कोण न कळे पुण्य केले । सुख हे लाधले परपुरूषाचे ॥६॥

४१७.
पतीचिया बोला सर्वस्वे उदार । न भंगी उत्तर जीव जाता ॥१॥
धन्य ते संसारी जाति गोत कूळ । वैकुंठीचे मूळ तियेलागी ॥२॥
कायावाचामने पतीसी शरण । तिच्या ब्रह्मज्ञान दारी लोळे ॥३॥
पापपुण्य काही न विचारी मनी । पतीच्या वचनी जीव द्यावा ॥४॥
विधीचे भजन अखंड शेजारी । जैसी ते कामारी दासी पाहे ॥५॥
बहेणि म्हणे तिने उभयता कुळे । तारियेली बळे पतिधर्मे ॥६॥

४१८.
ऐका गे साजणी स्वहिताच्या कोन्ही । सांगता हे मनी धरा बाई ॥१॥
आपुलिया संसारा काही हित करा । सांगताहे धरा मनोभावे ॥२॥
पाहिजे ते पुण्य सुकृताच्या कोडी । तेव्हा लागे गोडी परपुरूषी ॥३॥
परपुरूषे रातली सप्रेमे मातली । तिची काय बोली येथे आता ॥४॥
स्वसुखे रातली जनांत न्हावली । निघोनिया गेली लोकाचारी ॥५॥
क्रियानष्ट धर्म आचरो लागली । वाळोनी टाकिली गणगोती ॥६॥
न कळे याति कुळ नाव रूप कोन्हा । गेली पै रिघोन त्याजसवे ॥७॥
तियेचेनि नावे फोडावी घागरी । नाहीते संसारी बहेणि म्हणे ॥८॥

४१९.
ऐसी कोण आहे उदार जीवावी । गोडी घे तयाची मनोभावे ॥१॥
आपुलेनि हाते धरा लावी आगी । मग त्याच्या संगी सुख भोगी ॥२॥
जनवाद लोक बोलती अपार । न संडी निर्धार संग त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे कायावाचामनप्राण । परपुरूषालागोन रातलीसे ॥४॥

४२०.
साडियेली लाज लौकिकवेव्हार । मांडियेले चार परपुरूषी ॥१॥
आता आम्हासवे काय जना चाड । कासयाची भीड धरू बाई ॥२॥
लोकलाज शंका सारिला पडदा । परपुरूषी सदा रळी करू ॥३॥
मान - अपमानी नाही आम्हां काज । एकांतीचे गुज सेवू बाई ॥४॥
बहेणि म्हणे तोंड नलगे दावावे । ऐसे केले देवे काय करू ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP