मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२०१ ते २१०

ज्ञानपर अभंग - २०१ ते २१०

संत बहेणाबाईचे अभंग

२०१.
मनाचा चाळक बुद्धीचा बोधक । पाहता आणिक कोण दुजा ॥१॥
परी तू कल्पना सांडुनी पहासी । तरीच पावसी ब्रह्मपदी ॥२॥
नेत्रीचे पहाणे कानाचे ऐकणे । मुखीचे बोलणे कोणाचेनी ॥३॥
बहेणि म्हणे तुझे शरीरीच पाहे । मग पुढे जाये हिंडावया ॥४॥

२०२.
प्रणवापासोनि सृष्टीचा विस्तार । करोनी विचार सार सेवी ॥१॥
साधन ते कासया साधिसी पामरा । प्रणवीचा खरा वास तुझा ॥२॥
ओंकारापासोनी विस्तारले वेद । अक्षरांचा भेद वोळखावा ॥३॥
बहेणि म्हणे मूळ ओंकाराचे ज्ञान । जालिया निर्वाण ब्रह्म होसी ॥४॥

२०३.
भक्तिप्रेमसुख न कळे आणिका । पंडिता वाचका वैदिकांसी ॥१॥
जीवन्मुक्त जरी जाला आत्मनिष्ठ । भक्तिप्रेमसुख दुर्लभ त्या ॥२॥
अभेदूनी भेद स्थापिला पै अंगी । वाढवावया जगी प्रेमसुख ॥३॥
बहेणि म्हणे देव कृपा करिल काही । तरीच हे ठाई पडे वर्म ॥४॥

२०४.
आकारले ते ते ब्रह्मचि सर्वही । मनामाजी पाही विवेकाने ॥१॥
कासया हिंडसी दंडिसी शरीरा । विकल्प भीतरा वाउगाची ॥२॥
ब्रह्मेविण दुजे नाडळे सर्वथा । अनुभव ऐसा सर्व शास्त्री ॥३॥
बहेणि म्हणे शोध करी तू मनात । ब्रह्म सदोदित सर्व काळ ॥४॥

२०५.
विश्वाकार ब्रह्म विस्तारले सर्व । पाहे तू सावेव ज्ञानामी ॥१॥
माया म्हणवोनी द्वैत का कल्पिसी । नसते जीवासी बंधन ते ॥२॥
सुतेविण वस्त्र काय ते होईल । घट तो नव्हेल मातीविण ॥३॥
बहेणि म्हणे सोन्याविण अलंकार । न घडे साचार जाण ऐसे ॥४॥

२०६.
गुळेविण गोडी पुष्पेविण वास । न दिसे सायास केला जरी ॥१॥
तैसा विश्वी जाण विश्वात्मा पाहिजे । अलक्ष्य सहजे एर्‍हवी तो ॥२॥
सूर्याचिया मूर्ती जेत मुसावले । तेही कळो आले चेष्टेने ते ॥३॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्म विश्व हरी । जाणिजे हे खरी ज्ञानदृष्टी ॥४॥

२०७.
देह अचेतन वर्तनी ते मन । व्यापक त्रिभुवन साक्षिरूप ॥१॥
तयाचे स्वरूप पाहे गुरूमुखे । सर्व तुझी दुःखे निवारती ॥२॥
जागृती जागणे स्वप्नी साक्षिभूत । सुषुप्ती वर्तत साक्षपणे ॥३॥
बहेणि म्हणे याचा घेई बरा शोध । होय मना बोध ब्रह्मपणी ॥४॥

२०८.
विकल्पेचि सृष्टी वाढलीसे जाण । विकल्पेचि मन द्वेत मानी ॥१॥
करावा निरास विकल्पाचा जाण । मग तू पावन होसी तया ॥२॥
विकल्पेचि जन्म, विकल्पेचि मृत्य । विकल्पेचि सत्य हरपले ॥३॥
बहेणि म्हणे बा रे विकल्प घातकी । केवी होसी सुखी संगतीने ॥४॥

२०९.
अवगुण ज्याचे तया न दिसती । म्हणोनी नच होती क्लेश तया ॥१॥
काय करू यासी न चले उपाय । इंद्रावण नोहे गोड कदा ॥२॥
अग्नीचा हा ताप जाळी भलतेया । त्याचा गुण तया बरा वाटे ॥३॥
बचनाग मारक करी प्राणहानि । त्याचे त्यालागोनी न कळे काही ॥४॥
बहेणि म्हणे जाण कोळसा हा शुभ्र । होईल ते अभ्र नभी खरे ॥५॥

२१०.
संचित हे जळे ज्ञानाचेनि मुळे । ज्ञान ते आकळे संतसंगे ॥१॥
म्हणऊनी संग धरावा संतांचा । मने काया वाचा निर्धारू हा ॥२॥
इंद्रियांच्या वृत्ति स्थिरावती मागे । साधूचेनि संगे पाहे बरे ॥३॥
द्वैताचा हाराश वासनेचा नाश । तुटतील पाश संतसंगे ॥४॥
अहंकार जाय ममता देहीची । आसक्ति कामाची संतसंगे ॥५॥
बहेणि म्हणे संग असावा निःसंग । तोचि पांडुरंग पंढरीचा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP