मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
६ ते १०

स्फ़ुट पदें व अभंग - ६ ते १०

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


६ पद
गुण गाईं गोविंदाचे ॥धृ०॥
काम मनांतिल काढीं आधीं ॥
त्यावरि कीर्तनिं निर्मळ नाचें ॥१॥
नामबळें भवदोष निवारीं ॥
काळ कॄतांतहि अंतरिं काचे ॥२॥
कॄष्णदयार्णव पूर्ण सुखाचा ॥
सेविं निरंतर प्रेम तयाचें ॥३॥

७ अभंग
तोचि विचक्षण जाणावा निपुण ॥
एकनिष्ठ ज्ञानविरक्तीसी ॥१॥
धर्मतत्व जाणे, विश्वासे अंतरीं ॥
कामें दिगंतरीं धांवे ना जो ॥२॥
इंद्रियांचा धर्म विषयांची प्रवृत्ति ॥
तेथे लावी श्रुतिज्ञानचक्षु ॥३॥
विवेकें विचार विचारी साचार ॥
शोधी सारासार गुरुवाक्य ॥४॥
आशंकापरिहार करुनी संशय ॥
तोडुनि निश्चय गांठी बांधे ॥५॥
कॄष्णदयार्णव निर्धारुनि ठेवी ॥
सर्व देवोदेवीं आत्मरुप ॥६॥

८ अभंग
चतुरंग जिणे तो नव्हे जुंझार । जिंके जो अंतर शूर तोचि ॥१॥
अंतरींची सेना अजिंक्य दुर्धर्ष । बळें विश्वाभास उभारी ती ॥२॥
काम क्रोध लोभ मोहो मद दंभ ॥
साही हे स्वयंभ यूथपती ॥३॥
देहबुध्दीचे दुर्ग इंद्रियांची सेना ॥
करुनी त्रिभुवना नाचवीती ॥४॥
आशातृष्णापाईं बांधोनियां जीव ॥
धोबडिता कींव न ये यांसी ॥५॥
कॄष्णदयार्णव न देती आठवूं ॥
दंडिताति बहु निंदाद्वेषें ॥६॥

९ अभंग
अहिंसेचा घोटु भरों धांवे कोप ॥
ब्रह्यचर्या दाप कंदर्पाचा ॥१॥
निस्पॄहता मारुं धांवे लोभ बळी ॥
तेथे होय होळी सत्याऽस्तेयां ॥२॥
अपरोक्षज्ञानाचा घोंटु भरी मोहो ॥
दॄश्य करी रोहो दॄष्टीपुढें ॥३॥
नाहीं तेंचि सत्य करुनि दाखवी ॥
असंगा चोखवी सुखदु:ख ॥४॥
कॄष्णदयार्णव पाहों नेदी पाशीं ॥
बळें मोहो नाशी ज्ञानदॄष्टि ॥५॥

१० अभंग
दंभें नागविलें विनयतेचें भाग्य ॥
औघें त्या अभाग्य विस्तारिलें ॥१॥
दंभाचिया मैंदी आस्तिक्य लूटिलें ॥
घर बुडवीलें विश्वासाचें ॥२॥
नास्तिक्यें विषयाचा घुमाड मांडिला ॥
खडूनि सांडिला बोधमार्ग ॥३॥
विषयांच्या निरोधी त्र्कोध बळावल ॥
संबंधे वाढला काम बळी ॥४॥
मोहाची झांपडी दृष्टि झाली अंध ॥
सखा आत्मबोध नोळखेचि ॥५॥
कॄष्णदयार्णव पाशींच न दिसे ॥
मिथ्यामोहपाशें बध्द जाले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP