मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ७४

खंड २ - अध्याय ७४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्‌गलाप्रत । एकदंताचें क्षेत्र ज्ञात । संक्षेपें कथिलें तें मजप्रत । सांगा विस्तारानें तुम्हीं ॥१॥
अग्निकोण दिशा प्रांतांत । जलधीतटीं वसत । स्वस्वखंडी एकदंत । गणेशक्षेत्र तें जाणावें ॥२॥
दश योजनें विस्तार विस्तार असत । त्याच्या जाण आसमंतांत । मध्ये गणेशान एकदंत । सिद्धसाधक पूजिती ॥३॥
त्याच्या वामांगीं सिद्धी असत । दक्षिणांगी बुद्धी स्थित । मूषक समोर उभा असत । गजाननाचें वाहन ॥४॥
अष्टसिद्धी त्याच्या पुढती । भक्तिकारिका विलसती । वामभागीं देवादी उभे असती । भावभक्ती संपूर्ण ॥५॥
दक्षिणांगीं वेदादि शास्त्रें स्तवित । मार्गे काशी आदि क्षेत्रें भजत । श्रेष्ठस्वरुप जे त्रिभुवनांत । ते या क्षेत्रीं गणेशा भजती ॥६॥
समुद्रांत स्नान करिती । स्वनामांकित तीर्थीं वसती । सूक्ष्मरुपधर देव प्रीती । एकदंत तीर्थ सर्वप्रख्यात ॥७॥
त्याच्या दर्शनें पापें हरत । भुक्तिमुक्तिप्रद ते जगांत । भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिनीं पुनीत । महोत्सव तेथ होई ॥८॥
त्रैलोक्यांतले लोक जात । यात्रेसाठीं त्या क्षेत्रांत । ब्रह्मभूयकर शास्त्रसंमत । गणेशक्षेत्र तें प्रख्यात ॥९॥
तेथ मरण जरी येत । तरी स्वानंदाचा वास लाभत । संक्षेपानें तुजप्रत । कथिलें अमल हें माहात्म्य ॥१०॥
अयुतायुत वर्षे वर्णन करिती । तरी विस्तारें महिमा वर्णानातीत । एकदंताचें हें चरित । माहात्म्यासह कथिलें तुज ॥११॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । शुकही समर्थ न करण्या विस्तारें महिमा तुज कथिलें सार । दक्ष प्रजापते जमलें तैसें ॥१२॥
ऐसें हें एकदंत चरित । वाचील किंवा ऐकेल पुनीत । लाभे त्यासी सर्व वांछित । सर्वासिद्धिप्रद हें असे ॥१३॥
पुत्रपौत्रादिक सर्व लाभत । होई तो धनधान्ययुक्त । सुखद कलत्र होय प्राप्त । यांत संशय कांहीं नसे ॥१४॥
ऐशा दृढभावें एकदंत । नित्य स्तवी जो जगांत । तो एकदंतरुप होत । धरातळीं पुण्यवान ॥१५॥
त्याच्या दर्शन मात्रें वसत । कृतकृत्य प्राणी विश्वांत । देवादीही निःसंदेह होत । ब्रह्माकार स्वरुपी ॥१६॥
हया खंडाच्या श्रवणें होत । कृतकृत्य नर जगांत । नारी पशू वा मुनींसी प्राप्त । समान फळ वाचन श्रवणें ॥१७॥
सर्व तीर्थीं करितां स्नान । तैसें जगतीं करितां सर्व दान । तैसें अगणित तपांचें आचरण । सर्व यात्रांचे पुण्यही ॥१८॥
इष्टापूर्तादिक भक्तिसंयुक्त । कर्मे करि जो सतत । त्यांसी मिळे जें पुण्य जगांत । शतपट त्याच्या हा खंड ऐकतां ॥१९॥
धर्म अर्थ काम मोक्ष लाभत । श्रवणें याच्या हया जगांत । यांत संदेहलव नसत । ब्रह्मभूत होई नर ॥२०॥
जें जें इच्छित तें तें लाभत । महत्त्व तैसें नर लाभत । जो करी श्रवण एकदंतचरित । संपूर्ण वर्णनातीत महिमा ॥२१॥
ब्रह्मादिकांसही हें न जमत । सांगितलें सार तुजप्रत । सूत सांगती मुनींप्रत । मुद्‌गल नंतर थांबले ॥२२॥
ऐसें मुद्‌गल वचन ऐकून । दक्ष हर्षभरें करी अभिवादन । कृतांजली करी स्तवन । महोदरकथेची लालसा असे ॥२३॥
तरी महोदराचें महिमान । सांगा मज मुद्‌गला महान । दक्षासी ते देती वचन । पुढें वर्णीन तें सारें ॥२४॥
जैसें मुद्‌गलें दक्षा सांगितलें । तैसें शौनका मीं तुज कथिले । मुख्य चरित्र एकदंताचें भलें । सर्वसिद्धिप्रदायक जें ॥२५॥
विप्रा तूं भावभक्तीनें ऐकत । पुन्हां ऐकण्या असे का मनांत । इच्छा तें सांग त्वरित । पुरवीन तीही प्रेमानें ॥२६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते चरितमाहात्म्यं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

॥ इति श्रीमुद्‌गलपुराणे द्वितीयः खंडः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP