मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १६

खंड २ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । प्रियव्रताचा आग्नीध्रसुत । नाभि त्याचा पुत्र ख्यात । यज्ञापासून संप्राप्त । साक्षात्‍ विष्णु कलारुप ॥१॥
पुत्रभावें नाभीच्या सदनीं । राहे देहधारण करुनी । विष्णूची कृपा लाभता मनीं । संतुष्ट तो जाहला ॥२॥
त्यास पुत्र झाले शंभर । त्यांत भरत भूषवी अग्र । एक्यायशी तप करुन थोर । ब्राह्मण जाहले नाभिस्उत ॥३॥
नवयोगी अन्य होत । सर्व झाले सर्वत्र संमत । गाणपत्य महाभाग विवर्जित । सर्व देह बंधनांतुनी ॥४॥
कविहरी अंतरिक्ष विपिलायन । प्रबुद्ध आविर्होत्र करभाजन । द्रुमिल चमस ऊर्ध्वरेत महान । योगधर सर्वग ते ॥५॥
सर्वसामान्य ते भ्रमण करिती । त्रिभुवनांत अखंडिती । नऊ राजे राज्य करिती । जंबुद्धीपांत प्रजापते ॥६॥
त्या नवखंडाचा मुख्य भरत । जो ज्येष्ठ पुत्र उदात्त । नऊ भावांचा सम्राट होत । ऐसा महिमा तयाचा ॥७॥
ऐश्यापरे राज्य विभागून । ऋषभवनीं तप करुन । नाना विध तो पावन । अवधूत योगज्ञ जाहला ॥८॥
नानायोगभेदें फिरत । नानाभूमीवरी जडोन्मत्त । पिशाचादि सम सहज संस्थित । शांकर ब्रह्माचा आश्रय करी ॥९॥
मोहहीन जें सहज ब्रह्म । शांकर चतुर्थ अनुपम । स्वाधीन नेतिरुप अव्यक्त परम । त्याचा आश्रय घेवोनी ॥१०॥
शांभव तो झाला त्वरित । शिवमार्ग प्रकाशक होत । जिथे तिथे संचार करित । शिवयोग जनां उपदेशित ॥११॥
नंतर योगानें तेथेच पाहत । स्वाधीन ब्रह्मदूषण प्राप्त । तें पाहून झाला विस्मित । शांति विनष्ट होवोनी ॥१२॥
ब्रह्माम्त पराधीन वा स्वाधीन । ऐसे न होय कदाचन । शिव स्वाधीनरुप म्हणूत । योगींद्र कैसे होईल ॥१३॥
ऐसा विचार करुन । मनीं विक्षेप येऊन । तत्काळ शिवलोकीं जाऊन । प्रणाम करुन उभा राहे ॥१४॥
शिव त्या योग्याचा सम्मान करित । योगी शिवशिष्यसमूहांत । त्यांत गणापत्यं पाहून विस्सित । मानसांत तो जाहला ॥१५॥
नंतर संधि मिळता म्हणत । भक्तीनें ओंजळ जोडून तया प्रत । शंकरा योगरुपा तुला वंदित । जगदाधारा ब्रह्माधिपते मीं ॥१६॥
पूर्णशांति प्रदायक । ऐसा सांगावा शांतियोग एक । तुमचा दास मी दयानिधे निःशंक । करावे मज हयायोगें ॥१७॥
सहजाहून पर न जाणलें । मी ब्रह्म विवेकें ना चिंतिलें । सहजीं स्वाधीनत्व पाहिलें । म्हणोने शांति हरपली ॥१८॥
मुद्‌गल म्हणती ऋषभाचें वचन । ऐकून झाले शंकर प्रसन्न । त्या महाभक्ता पाशुपत वचन । पूर्णत्वें तेव्हां सांगती ॥१९॥
हे महायोग्या तुवा विचारिलें । योग्याचें तारक मत भलें । मानस माझें प्रीतियुक्त झालें । ऐक एकाग्रचित्तें आतां ॥२०॥
वेदांत सांगितला शांति योगात्मक । गणेश योगरुप पावक । योगी सेविती सदा निःशंक । त्याच्यापासून जग जन्मलें ॥२१॥
त्याच्या आधारें सर्व संस्थित । अंतीं तदाकार तें होत । योगानें हे वेदरहस्य उक्त । सामवेदांत ऐक तें ॥२२॥
जे ऐकतां शांतिसंयुक्त । होशील तूं निश्चित । दृश्यादृश्य स्वरुप असत । मनोवाणीमय सारें ॥२३॥
गकारात्मक हे विलसत । तेथ ब्रह्म गकार असत । मनोवाणीमय असत । दृश्यरुप जें सारें ॥२४॥
परी जें मनोवाणी विहीन । ‘ण’ कारात्मक तें जाण । ऐसे संयोग अयोग रुप महान । ‘गण’ शब्दाचें जाणावें ॥२५॥
गकारापासून प्रसूत । विविध ब्रह्में तत्त्वरुप ख्यात । णकारापासून निरोधात्मक संजात । नाना ब्रह्में योगी म्हणती ॥२६॥
गकार णकार गणपतीस स्थित । म्हणून ब्रह्माकार उक्त । श्रुतिमुखांतून हें ज्ञात । त्यांचा स्वामी गणेश असे ॥२७॥
तो योगरुपानें संस्थित । शांतिमार्गानें भज त्यास सतत । मनवाणीमय सर्व असत । गणेश आकार भावित ॥२८॥
मनोवाणी विहीन । तेही तदाकार जाण । मनोवाणीमय ते सान । मायारुप म्हणताती ॥२९॥
मनवाणी विहीन । तेही मायारुप जाण । चित्ताच्या पंचभूमी प्रकाशवी म्हणून । चिंतामणि हयास नांव ॥३०॥
त्या गणनायकाचे करी भजन । योगाकार जो शांतिसंपन्न । चित्त पंचभूमीचा त्याग करुन । चित्तशांति तुज लाभेल ॥३१॥
गणेशसंयोग अयोग वर्जित । मायेनें भ्रांति उत्पन्न होत । ती माया त्यागिता होय प्राप्त । सुख तुजसी अवलंबित ॥३२॥
ऐसें बोलुन थांबत । शिवकर शिव जो सज्जनांप्रत । ऋषभही प्रसन्न चित्त । प्रणाम करुन वनीं गेला ॥३३॥
शंकरें जो सांगितला । तो उत्तम योग त्यानें अभ्यासिला । क्रमानें तो पूर्वयोगी झाला । प्रशांति स्वरुपधारी ॥३४॥
परी गणपतीस दक्षा क्षण । न सोडी तो करी सदा ध्यान । तेणें प्रसन्न होऊन । गणेश प्रकटला त्यापुढतीं ॥३५॥
गणपतीस साष्टांग नमन । करी हर्ष गद्‌गद भाषण । आनंदाश्रू नयनीं ओघळून । रोमांचित काया तयाची ॥३६॥
महायश तो कर जोडून । करी गणेशाचें स्तवन । ब्रह्मरुपा तुला नमन । गणेशा करुणानिधे तुला ॥३७॥
भेदाभेदहीनासी । गणांच्या पतीसी निराकारासी । नित्यासी जगदाकारमूर्तीसे । अनंतासी नमन असो ॥३८॥
परेशासी परात्परतरासी । आदिमध्यांतहीनासी । गुणाकारासी गुणेशासी । जगत्स्त्रष्टयासी नमन असो ॥३९॥
पालकासी संहारकासी । नाना अवतार धारकासी । भक्तपालन हेतूसी । सुरा सुरमया नमन असो ॥४०॥
सुरासुर पूजितासी । योगासी योगदात्यासी । योगाकारासी योगपतीसी । ब्रह्मपतीसी नमन असो ॥४१॥
सर्वांदीस गणा ध्यक्षास । सर्वपूज्यास ढुंढीस । सर्वांती अवशिष्टास । विघ्नेशास नमन असो ॥४२॥
हेरंबासी निजानंदवासीसी  सिद्धसेवितासी नाना खेळकरासी । सिद्धिबुद्धिपतीसी ब्रह्मभूतमयासी । धमार्थ काम मोक्षदायका नमन ॥४३॥
ब्रह्मी भूतकारासी नमन । गणाधीशा काय मी करु स्तवन । योगशांतिमया तुझें भजन । अशक्य वेदादिकांनाही ॥४४॥
तथापि यथाबुद्धि ज्ञानें स्तवन । केलें तुझें हो प्रसन्न । तुझी दृढ भक्ति देई मजलागुन । अव्यभिचारी सर्वदा ॥४५॥
ऐसें बोलून पाया पडत । त्या महायशा गणेश उठवित । ऋषभा भक्तवरा म्हणत । शिवशिष्या शिवप्रज्ञ ॥४६॥
साक्षात्‍ सनातन विष्णूस । गणेश म्हणे वचनास । माझी भक्ति अचल सुरस । अनघा ठसेल तव चित्तीं ॥४७॥
तूं रचिलेलें स्तोत्र होईल । शांतिप्रद सर्वदा मज आवडेल । हे स्तोत्र वाचकासी प्राप्त होईल । वांछित सारें मम प्रसादें ॥४८॥
अथवा जो हें ऐकेल । तोही मनेप्सित लाभेल । यांत नसे संदेह अटळ । भावपूर्ण वरदान माझें ॥४९॥
ऐसें बोलून अंतर्धान । गणवल्लभ पावला तक्षण । ऋषभ योगीसदा शांत होऊन । गणेशएकता पावला ॥५०॥
जो नरश्रेष्ठ हे चरित्र वाचील । ऋषभाचें तो पुण्य लाभेल । वाचील त्यासही होईल । लाभप्रद सर्वदा ॥५१॥
ब्रह्मभूयप्रद शांतिद । तैसेचि हें होय सुखप्रद । भक्तिसंयुक्त शांतचित्त विशद । यांत संदेह कांहीं नसे ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते ऋषभचरित्रवर्णन नाम षोडशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP