मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ७१

खंड १ - अध्याय ७१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । प्रल्हाद तेव्हां विचारित । कोण तो गणासुर प्रख्यात । समर्थ कपिलमुनीसीही ठकवित । साक्षात्‍ प्रलयानलासमासी ॥१॥
ज्याच्या क्रोधपर दृष्टानें दहन । सागरचें झालें तत्क्षण । त्याचा तिरस्कार करुन । गणासुर जिवंत कैसा परतला? ॥२॥
गृत्समद त्यास सांगत । प्रल्हादा ऐक त्या गणासुराचें चरित । गणेशचरिताधारें कथित । सर्वही तें तुज आतां ॥३॥
अभिजित नामें कोणी नृपति । त्यासी नव्हती पुत्रसंतती । पुत्रार्थ सोडून राज्य भूपति । वनांत तप करण्या गेला ॥४॥
वनांत योगायोगें भेटत । वैशंपायन योगीश तयाप्रत । त्यांस नमून पत्नीसहित । विचार नृप विनयानें ॥५॥
अहो मुने मज पुत्र नसत । उपाय सांगा होण्या सुत । वैशंपायन मंत्रराज सांगत । गणेशाचा तयासी ॥६॥
चातुर्मास्य प्रयोगविधि सांगत । प्रभास तीर्थक्षेत्री जा म्हणत । तेथ जाऊन श्रद्धायुक्त । आचरण करी तूं नृपा ॥७॥
अभिजित त्यांसी नमून । राणीसह गेला उत्सुकमन । प्रभास क्षेत्रांत जाऊन । अनुष्ठान करी यथायोग्य ॥८॥
येथेच ब्रह्मदेवें तप आचरिले । सरस्वतीसह पूर्वीं भलें । मुलीसह ते गेले । एकदा त्या तीर्थक्षेत्रीं ॥९॥
तेथ एकवस्त्रयुत सरस्वती । विधि आपुली सुता पाहती । यौवनस्था कुचकुंभा रुपवती । स्नानार्थ जी प्रवेशली ॥१०॥
अकस्मात तीर्थजळांत । विधीचें चित्त कामबाणें विचलित । पुत्रीभाव जाणून क्षणांत । चंचलचित्ता आवरी तो ॥११॥
परी कामपीडित जगद्‌गुरुचें पडत । वीर्य गळून जळांत । नंतर सरस्वतीसह परतत । सत्यलोकीं ब्रह्मदेव ॥१२॥
अभिजित राजाचा प्रयोग होत । त्याच दिवशीं दैवसंकेत । राणीसह तो स्नानास जात। तीर्थ जळांत त्याच जागीं ॥१३॥
त्याची राणी तृषार्त । तीर्थजळ प्याली प्रसन्नचित्त । दैवयोगें ब्रह्मदेवाचें वीर्य जात । तिच्या उदरीं प्रल्हादा ॥१४॥
विधीचें अमोघ वीर्य उदरांत । प्रवेशलें हें तिज अज्ञात । मंत्रानुष्ठान संपता परतत । राजा स्वनगरीं मोदानें ॥१५॥
कालांतरें झालें ज्ञात । राणी गर्भवती हा  वृत्तान्त । योग्य काळ भरतां प्रसवत । एकपुत्रा ती चारुहासिनी ॥१६॥
तेजोयुक्त महावीर्ययुक्त । शुभलक्षणांनी तो युक्त । जातकर्मादिक नृप करित । विधिपूर्वक त्या सुताचें ॥१७॥
नंतर त्याची मुंज करीत । वेदाभ्यास त्यास शिकवीत । गणनामा तो राजसुत । झाला शास्त्रांत पारंगत ॥१८॥
एकदा गण जाई वनांत । तेथ त्याला शुक्र भेटत । शिवपंचाक्षर मंत्र देत । शैवदीक्षा देई तया ॥१९॥
महा उग्र तप तो करित । दहा हजार वर्षपर्यत । वायु भक्षण करुन राहात । शिवध्यानपर सदा ॥२०॥
त्याच्या भक्तीनें संतुष्ट होत । सदाशिव त्याला दर्शन देत । शंकरासी तो पूजित । विविध स्तोत्रें स्तुति करी ॥२१॥
सदाशिव त्यासी म्हणत । भक्ता वर माग मनोवांछित । त्रिगुणापासून अभय जगांत । त्रैलोक्य राज्य मागे तें ॥२२॥
‘तथास्तु’ म्हणुनि महादेव जात । त्वरित ते कैलासाप्रत । गण परतला अति हर्षित । वृत्तात्न सांगे मातापित्यासी ॥२३॥
नंतर पृथ्वी तो जिंकित । तेव्हां त्यास अभिषेक करित । राज्या वरी बैसवित । नृपति अभिजित तेधवा ॥२४॥
नाना दिशांतून येत । विविध दैत्य त्य उत्सवांत । गणाचे अभिनंदन करित । म्हणती नेता तूं आमुचा ॥२५॥
तुझ्यासह करुन त्रिभुवन अंकित । गण नृपति त्यांचा सत्कार करित । पाताल लोकीं प्रथम जात । तेथ नागासी जिंकिलें ॥२६॥
तेथ महाघोर युद्ध झालें । असुरांनी तें जिंकिले । नंतर ते स्वर्गलोकी गेले । जिंकिला समग्र स्वर्गही ॥२७॥
इंद्र, ब्रह्मा, विष्णु शंकर । देती त्यासी करभार । अधिकारी नेमून एकेक असुर । त्यांचें स्थान परत देई ॥२८॥
नंतर परतला गण नृपति । आपुल्या राज्यीं तो दुष्टपति । पसरली होती त्रिभुवनी ख्याती । त्यानेंच पळविला चिंतामणि ॥२९॥
कपिल गणनांवाचा भक्त । होता परम भाविक अत्यंत । घोर तप करी तो वनांत । एक वर्ष त्यानंतर ॥३०॥
तेव्हां गणेश प्रकटत । मूषकवाहन सिद्धिबुद्धियुक्त । कपिल त्यांची पूजा करित । आनंदाश्रू ओघळले तें ॥३१॥
प्रेम गद्‌गदस्वरें स्तवित । नमस्कार विघ्नराजा तुजप्रत । विघ्नहारी देवा मी विनत । अभक्तांसी तूं विघ्नकर्ता ॥३२॥
आकाशस्वरुपा तुज नमन । भूतांच्या मानसी तुझें स्थान । बुद्धिरुपा तुला नमन । देहांत तूं बिंदूरुप ॥३३॥
प्राणिमात्रांत सोऽहं रुपासी । अभेदभाव बोधासी । सांख्यरुपासी विदेहासी । नानारुपधरा नमन ॥३४॥
शक्तिरुपासी आत्मसूर्यासी । हेरंबासी आनंदासी । महाविष्णुस्वरुपासी । शंकरासी नमो नमः ॥३५॥
कर्मांत कर्मयोगासी । ज्ञानांत ज्ञानयोगासी । समभावीं समभावासी । लंबोदरा नमन तुला ॥३६॥
स्वाधीनांचा गणाध्यक्ष अससी । अभेदभावें स्वानंददेसी । निर्मायिकस्वरुपीं अयोगासी । योगांत योगरुपा नमन ॥३७॥
शांतियोग प्रदात्यासी । शांतियोगमया तुजसी । किती स्तवूं मी देवा तुजसी । शरण तुजला आताम आलो ॥३८॥
गणनाथ तेव्हां हर्षयुक्त । भक्तोत्तमा त्या सांगत । तूं रचिलेलें स्तोत्र अद्‌भुत । योगप्रद हें होईल ॥३९॥
धर्मार्थ काम मोक्षदायक । वाचकां श्रोत्यांसी पावक । वर माग तूं निःशंक । भक्तीने प्रसन्न मीं तुजवरी ॥४०॥
तुझ्यासम तत्त्वज्ञान प्रकाशक नसत । ‘कपिल’ मुने या जगांत । तेव्हां तो मुनि याचित । अचल भक्ति तुझी देई ॥४१॥
विघ्नेशा, तुझें भूषण गणासुर पळवित । चिंतामणि रत्न क्षणांत । माझ्या विलसत होते कंठात । आजवरी जें माझ्या ॥४२॥
जों हें रत्न पळवित । त्या गणासुरासी मारावें त्वरित । चिंतामणि परत आणून चित्त । तोषवी माझें गजानना ॥४३॥
जेव्हा जेव्हां स्मरण करीन । तेव्हां तेव्हां द्यावें दर्शन । हेंचि द्यावें मज वरदान । गणनाथा तुज वंदन असो ॥४४॥
त्याचें तें वचन ऐकून । हर्षयुक्त झाला गजानन । म्हणे वांछित पूर्ण करीन । महाभागा तुझें मीं ॥४५॥
कपिलरुपें तूं विष्णु असत । पुरविन तुझें सर्व प्रार्थित । होईन मीं तुझा सुत । गणासुराचा वध करण्या ॥४६॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला ढुंढिराज गजानन । कपिल मुनि त्याचें करित चिंतन । आश्रमीं आपुल्या परतला ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते कपिलवरप्रदानं नामैकसप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP