मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ५०

खंड २ - अध्याय ५०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शिव विष्णु सूर्यासी पकडिलें । दैत्यपुत्रांनी बांधून नेलें । तेव्हां देवसैन्य संत्रस्त झाले । कितेक देव रणीं मृत ॥१॥
कोणी दैत्यांस शरण जात । कोणी तेथून पळून जात । ऐसा तो करुण वृत्तांत । शक्तीस कोणी सांगती ॥२॥
दैत्यांच्या पराक्रमाची वार्ता । ऐकतां महामाया क्रोधयुक्ता । संग्राममंडळीं लढण्याकरिता । परमोत्साहें निघाली ॥३॥
मदासुर तेव्हां सुतसहित । प्रधान नाना वीरांसहित । जगदंबेस सामोरा जात । तिनें धनुष्य सज्ज केलें ॥४॥
धनुष्याचा टणत्कार ऐकती । तेव्हां दैत्य भयातुर होती । कोणी मूर्च्छित होऊन पडती । कोणी पळती रणांतून ॥५॥
परी मदासुर शंख वाजवित । त्या नादें जगत्त्रय व्याप्त । देवीहीशंख फुंकित । त्याणें नभ निनादलें ॥६॥
कोलाहल माजला बहुत । वीर सिंहनादें गर्जत । शक्तीही आव्हान देत । रणवाद्यें बहुत वाजत होती ॥७॥
सुर संतोषले मनांत । जेव्हां कालिका क्रोधयुक्त । शक्तींसह दैत्यसैन्य वधित । त्रिशूलें नाना शस्त्रांनी ॥८॥
शक्तींनी उच्छेद पावून । दैत्य दशदिशांत । जाती पळून । तेव्हा मनीं क्रोध लावून । मदासुराचे पुत्र आले ॥९॥
त्यांनी काळरुपी बाण सोडिके । त्यांनी देवगण विद्ध झाले । शक्तींचे गणही मूर्च्छित पडले । हाहाकार माजला ॥१०॥
त्याकालीं शक्ति क्रोधयुत । भयानक रुप धारण करित । दैत्यसेनेचें हनन करित । दैत्य पुत्रांसी पकडिलें ॥११॥
संज्ञा लक्ष्मी सावित्री युद्धांत । धनप्रिय विलासी लोलुपासी बांधित । पाशबद्ध फेकिती विवरांत । तेव्हा मदासुर रणीं आला ॥१२॥
धनुष्य सज्ज करुन । शर सोडी अतिदारुण । संहारास्त्रांपासून । महाबळ पुरुष जन्मला ॥१३॥
तो भक्षी शक्तिसेनेस । त्याच्या अस्त्रांच्या ज्वालांस । स्पर्शितां शक्तींस विशेष । वेदना होती मृत्युप्राय ॥१४॥
कोणी शक्ति होती मृत । कोणी रणांतून पळून जात । निःसहाय भयोद्विग्न परतत । काली मुख्य शक्ति तें ॥१५॥
महामायेजवळी जाऊन । सर्व वृत्त करिती कथन । युद्धीं पराजय ऐकून । रागावली महामाया ॥१६॥
सिंहावर बसून जात । स्वतः महामाया शक्तींसहित । क्रोधयुक्त तीसी पाहत । दैत्येंद्रे प्रणाम तें केला ॥१७॥
गर्वें शक्तीस बोलत । महासुर तेव्हा युद्धांत । देवांचा पक्ष सोडून ये त्वरित । आमच्या तू पक्षांत ॥१८॥
अन्यथा मी तुज मारीन । कर्माचे फल अतिगहन । देवी देवांसहित करीन हनन । पहा माझें पौरुष ॥१९॥
महामाया तें ऐकत । क्रोधें तें त्रिशूल फेकित । दैत्यराजावरी त्वरित । वध त्याचा करावया ॥२०॥
त्रिशूलानें आहत । परी तो दुष्ट न हालत । अति क्रोधे गर्जना करित । मल्लयुद्ध करुन बघे ॥२१॥
शक्तीनेंही घोर रुप घेतलें । मल्लयुद्ध त्यांचे रंगलें । बाहू बाहूंसी भिडले । पायांत पेंच घालिती ॥२२॥
वाहवा ऐसें ओरडती । दारुण मल्लयुद्ध करिती । परस्परां जिंकण्या मती । ऐसे तीन दिवस गेले ॥२३॥
वरदान बळानें केली । शक्ति क्षीणबळ तेणे भली । देहबळें रगडिली । महासुरें ती महाशक्ति ॥२४॥
मूर्च्छित ती पडता रणांत । पकडून तीस हर्षसमन्वित । अन्यशक्तींसही धरित । नंतर स्वगृहीं परतला ॥२५॥
कांहीं शक्ति पळून जात । शक्ति सैन्य झालें संत्रस्त । शक्ती हननीं उद्युक्त । ऐशा दैत्यां दैत्येंद्र म्हणे ॥२६॥
या कुलदेवी शक्ति असत । आमुच्याही आराध्य दैवत । ह्यासी मारुं शका युद्धांत । मदासुरें सोडविले स्वपुत्र ॥२७॥
देवांनी जे पूर्वी पकडले । प्रघानादी रणात पडले । ते सर्वही सोडविले । शक्तिलोकही जिंकला ॥२८॥
गर्वित जाहला मदासुर । विविध परींचे आहार विहार । आपुल्या ज्ञातिबांधवांसह वीर । उपभोगी तें शक्ति मोही ॥२९॥
मोहित झाला दैत्यनायक ।स्त्रीमांसमदिरा सुखदायक । असुरेश्वर झाला अत्युसुक । गर्वे म्हणे शक्तीसी ॥३०॥
महाशक्ते तुज जिंकिलें । माझे मनोरथ सिद्ध झाले । आता देवांसह जा निर्बले । स्वेच्छया कुठेही जगांत ॥३१॥
मोहवश होऊन बोलत । शिव विष्णु सूर्यांप्रत । तुम्हीही जावें शक्तीसहित । जेथ रुची मनासी ॥३२॥
शक्तीस प्रणाम करीत । दैत्येंद्र बोले भक्तिसंयुत । आमुच्या पक्षाचा आश्रय त्वरित । घेसी तरी पूजीन तुज ॥३३॥
तेव्हां म्लानमुख शक्ती सांगून । देवांसह जाईन जगांत । महासुरा काळ फिरला असत । आतां हार मानिते मी ॥३४॥
तेव्हां दैत्यराज गर्वमोहित । महामायेसी सोडून देत । ती देवांसह निवसत । वनांत गिरीं कुहरांत ॥३५॥
जगन्माता देवांसहित । भयसंकुल तेथ राहत । गिरिकंदरी पर्वत गुहांत । दैत्य सुखें भोगिती ॥३६॥
शक्तिलोकींची सुखें भोगितो । दैत्य सारे राज्य करिती । बाणांदीची नियुक्ति । देवपदीं तेव्हां केली ॥३७॥
आपुल्या सुतांसीही स्थापित । उपपदीं शक्ति लोकांत । विलासनगरांत परतत । मदासुर नंतर पृथ्वीवरी ॥३८॥
तेथ राहून राज्य करित । मदासुर त्रैलोक्याचें सुखात । नंतर त्रिपुरासी पाठवित । पाताळविपरीं दिग्विजयार्थ ॥३९॥
शेषनागेंद्राजिंकण्या पाठवित । महाबळ त्या अवलंबित । तो ऐकून वृत्तांत । शेषनाग शरण आला ॥४०॥
खंडणी देण्या संमत । वार्षिक करभार मदासुराप्रत । सविनय शासना मानित । शेषनाग भयग्रस्त ॥४१॥
ऐश्यापरी दुष्ट मदासुर । जिंकून ब्रह्मांडमंडळ समग्र । सर्व भुवनाचे राज्य सुखकर । करीत होता प्रतावंत ॥४२॥
आपुल्या ज्ञातिबांधवासहित । देवदुर्लभ भोग भोगित । अत्युतम जे त्रिभुवनांत । ऐसें अनुकूल दैव होतें ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते मदासुरविजयो नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP