मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ७

खंड २ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षप्रजापतीस । दक्षकन्यांच्या अपत्यांस । पितरें गणेशाराधना विशेष । आदरपूर्वक शिकविली ॥१॥
पितरांचा उपदेश ऐकून । वनांत जाऊन करिती ध्यान । नाना मंत्रें यथान्याय मनन । तप तैसें हेरंबाचें ॥२॥
हजार वर्षे लोटती । तेव्हां संतुष्ट होत गणपति । वर देण्या परम प्रीति । त्यांच्या पुढे प्रकटला तें ॥३॥
त्यास पाहून संतुष्ट चित्त । सर्व ते करांजले जोडित । गणेशा सर्व सिद्धिदात्यास स्तवित । भक्तिभावें त्या वेळी ॥४॥
वक्रतुंडासी भक्तरक्षकरुपासी । ब्रह्माकारासी देवासी । ब्रह्म भूतासी मनोवाणी अतीतासी । योगाकारा नमन तुला ॥५॥
मनोवाणीगम्यरुपासी । योगासी योग्यासी निराकारासी । विघ्नेशासी भक्तविघ्ननिवारकासी । शांतिरुपा नमन तुला ॥६॥
सृष्टिरक्षक संहारकासी । सर्वपूज्यासी सर्वांसी । सर्वादिमूर्तीसी मायिकासी । मायाविकारहीना नमन ॥७॥
मोहदात्यासी मायाआधारासी । मायाचालकासी अनंतहस्तासी । अनंतानना अनंतविभवासी । अनंत उदार पराक्रमा नमन ॥८॥
सर्वसाक्षीसी वेदांतगम्य रुपासी । गजानना नमन तुजसी । माझ्या भाग्यगौरवें दिसलासी । स्तवन करण्या न समर्थ  ॥९॥
धन्य आमुची मातापिता । आम्हीं धन्य विभो आता । विद्या व्रत तप मंत्र तत्त्वतां । गणपा तव दर्शनें धन्य ॥१०॥
वरदा एकदंता तुझी भक्ति । दृढ करी आमुच्या चितीं । जेणें मायामय मोह विघ्नें नष्ट होतीं । वरदा तुझा कृपा प्रसादें ॥११॥
स्वस्वकार्यी सामर्थ्य द्यावें । इच्छा करुं तें सफल व्हावें । ऐसें वरदान द्यावें बरवें । पूजितों तुज उपचारांनी ॥१२॥
ऋषि सारे प्रणाम करिती । भक्तिभावें त्यास वंदिती । अवघे रोमांचित होती । देव गजानन त्यांना म्हणे ॥१३॥
जें जें तुमच्या मनांत कांक्षित । तें तें सर्व सफळ होत । माझ्या चरणीं भक्ति दृढ होत । स्वकार्यी सामर्थ्य वाढेल ॥१४॥
तूं रचिलेलें हें स्त्रोत्र वाचील । त्यासी सर्वसिद्धि लाभतील । ऐकताही यश मिळेल । अंगीकृत कार्यांत ॥१५॥
एकवीस वेळा एकवीस दिवस । वाचील जो ठेवून विश्वास । पावेल तो मनोवांछितास । निःसंशय जगतांत ॥१६॥
ऐसें बोलून अंतर्धान । गणाधीश झाला तत्क्षण । सर्व ऋषि हर्षयुक्तमन । आपुल्या घरीं गेले ॥१७॥
स्त्री पुरुष सारे दक्षवंशज । तैसेचि दक्षकन्यांचे वंशजु । आपल्या कार्यांत  सहज । ज्ञानसंयुत जाहले ॥१८॥
शौनक म्हणती सूताप्रत । अत्रिपुत्रांचे सांगा चरित । महाभाग जे ब्रह्मविष्णु शिवोजयुक्त । कुतूहल फार चित्तांत ॥१९॥
सूत म्हणती ब्रह्मांशसमुद्‌भूत । चंद्र तपश्चर्या करित । गणेशाचा वर लाभत । अमृतरुप तो जाहला ॥२०॥
कलांनी आपुल्या पोषक होत । सर्व देवां मनुजांप्रत । किरणांनी अन्नभाव वाढवित । सर्वकाळ ह्या जगतीं ॥२१॥
विष्णुकलांशापासून संभूत । दत्त तो योगमार्ग स्वीकारित । क्रमाक्रमानें नानाब्रह्मांत । संस्थित तो जाहला ॥२२॥
जड उन्मत्त पिशाचादि । अवस्था बालानंदादी । नाना भूमिप्रकाशिकांची सिद्धी । साध्य केली तयानें ॥२३॥
त्यास पाहून सर्वजन । झाले योगिसेवेंत निमग्न । ब्राह्मणादी सर्ववर्ण । सर्वाश्रमींचे भक्तिभावें ॥२४॥
त्या मुनिसत्तमासी न लाभत । क्षणभरही विश्रांति आश्रमांत । म्हणूनि तो विव्हल होत । काप करावें ह्या विचारें ॥२५॥
नंतर तो योगधारणा करुन । जाहला पाण्यांत निमग्न । सर्व जन वाट पाहती उन्मन । तीरावरी चातकापरी ॥२६॥
दत्त तेव्हां प्रकटवित । सिद्धा मोक्षलक्ष्मी अद्‌भुत । तीस वामभागीं घेऊन पडत । पाण्यांतून तो बाहेरी ॥२७॥
मद्यकुंभ उजव्या हातांत । धरुन तो मद्यपान करित । स्त्रीसंगतीत विलासयुक्त । भोगयुक्त जाहला ॥२८॥
तें पाहून लोक विस्मित । योगी भ्रष्ट झाला म्हणत । त्या अत्रिपुत्राचा त्याग करित । दत्त सुखी त्यायोगें ॥२९॥
योगाचा आश्रय घेऊन । दत्त झाले स्वस्थचित्त प्रसन्न । कालांतरें देवासुर युद्ध दारुण । सुरु जाहलें समीप ॥३०॥
दैत्यांनी देवांसी हरविलें । देव दशदिशांत पळाले । दत्ताच्या आश्रया आले । रक्षण करा वाचवा म्हणती ॥३१॥
दैत्य देवांचा पाठलाग । करीत आले जागोजाग । महालक्ष्मी पाहती सुभग । मोक्षरुपा सुरुपिणी ॥३२॥
मोहवश होऊन पकडती । मस्तक तिचे स्वहस्ती । जरी तिचे चरण पकडती । तरी जय त्यासी लाभता ॥३३॥
परी ऐसे दैत्यें न केलें । म्हणोनी देवांनी त्यांसे जिंकिले । युद्धांत अत्यंत पीडा पावेल । पाताळलोकी घुसले सर्व ॥३४॥
मोक्षलक्ष्मी त्यांच्या देखत । मुनिसत्तमा अंतर्धान पावत । देवी ब्रह्मभावित । ब्रह्मांत विलीन तें झाली ॥३५॥
शौनक सूतासी विचारिती । सुता तुझी क्रूटोक्ति । नाही समजली आम्हांसी ती । विशद करुन सांगावी ॥३६॥
मोक्षलक्ष्मीचें शिर स्पर्शूंन । दैत्या दुःख झालें काय कारण । सूत म्हणती सुंदर प्रश्न । विचारला तुम्हीं शौनका ॥३७॥
जैसें सर्वज्ञ व्यासमुखांतून । मीं ऐकिलें सोल्हासमन । तदनुसार सर्व सांगेन । योग्य प्रश्न तुझा असे ॥३८॥
दैत्य रज तमोगुणयुक्त । भोगलक्ष्मीपरायण सतत । परद्रव्यहर परस्त्रीगामी होत । परांसी सदा अपकार ॥३९॥
प्राण्यांसी सर्वदा दुःख देती । नित्य मद्यपानादी करिती । पापाचरण विशेष प्रीति । भयदायक तें सारें ॥४०॥
साधुमुनिदेवयोगिजननिन्दा । करिती ते सदासर्वदा । बहुदोष युक्त असती सदा । महा असुर भोगप्रिय ॥४१॥
मुक्तिपात्र ते नसती । भोगच्छेत मन रमविती । सर्व क्रिया करण्या मति । सबळ शरीर लाभतां ॥४२॥
म्हणोनि चरणाघात । केला त्यांनी मुक्तीप्रत । भोगलक्ष्मी शिरीं घेत । यत्नें वंदिती तिजलागीं ॥४३॥
देवऋषि सर्वदा वांछिती । यत्नपूर्वक परी मुक्ति । म्हणोनि ते मस्तकी धरिती । मुक्तिदेवीस नमरपणें ॥४४॥
असुरांनी योगिसंगात । मुक्ति मस्तकी धरली निश्चित । परी ती त्यांसी शुभ न होत । कारण त्याचें सांगतो ॥४५॥
दुराचारादींनी युक्त । भोगबुद्धीपरायण असत । ऐश्या असुरां शुभदा होत । हें कैसे संभाव्य? ॥४६॥
जरी ती होय कुपित । मारील सारे असुर निश्चित । ती पकडिता विषयासक्त । असुरांसी चरणघातें मारी ॥४७॥
भोगेप्सुनां वंद्य होत । भोगप्रदायिनी देवी जगांत । मुक्तीस दुराचारी पकाडित । तरी ती त्यांस विनष्ट करी ॥४८॥
ऐसें सर्व तुज सांगितलें । मोक्षेच्छूंनीं लाथाडिलें । भोगलक्ष्मीस त्या वेळे । कारण स्पष्ट ह्या कृतीचें ॥४९॥
जेथ भोग नित्य प्रिय । तेथ मुक्तीचा वास अशक्य । जेथ मुक्ति होत प्रिय । तेथ भोगां स्थान न मिळें ॥५०॥
भोगलक्ष्मी वासनायुक्त । मोक्षलक्ष्मी वासनारहित । शौनका ऐसें जाण निश्चित । लक्ष्मीचीं हीं भिन्न रुपें ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते भोगमोक्षवर्णन नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP