मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ५७

खंड २ - अध्याय ५७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । धर्मदत्त मुनी विनायका नेत । आपुल्या गृहीं तें मार्गांत । गर्दभवेषधर असुर मारी ॥१॥
नंतर राजवेषधर तैसेच । दोन असुर काम क्रोध मारित । मुनी सुमनें तया पूजित । सिद्धिबुद्धि कन्या अर्पी ॥२॥
ऐशियापरी सुमंगल झालें । विनायकाचे तेथ भलें । तदनंतर विघ्न एक आलें । जुंभा राक्षसी प्रकटली ॥३॥
सुप्रसन्न ललनेचें रुपसुंदर । घेऊन आली राक्षसी भयंकर । विषयुक्त तेलानें मर्दन सत्वर । विनायकाचें करी ती ॥४॥
देवदेवाने कपट जाणलें । तत्क्षणीं त्या नारीस ताडिलें । प्राण पंचत्वीं पावले । राक्षसरुप उघड होई ॥५॥
चवथ्या दिवशी दैत्य येत । ज्वालामुख व्याघ्र महाबल आमच्यात । दारुण सारे हननोद्यत । विनायका आव्हान देती ॥६॥
योगभावें त्यांस जाणून । लीलेनें त्यांचें हनन करुन । दाखवी पराक्रम अद्‌भुत महान । पाहण्या आले सुरवर ॥७॥
ब्रह्मा विष्णु प्रमुख अमर । आश्चर्य उत्कट पाहण्या आतुर । बाळ विनायकाची क्रीडा अपूर्व । पाहोनी आश्चर्य वाटे तयां ॥८॥
पाचव्या दिवशीं बोलावित । भोजनार्थ स्वगृहाप्रत । काशीराज विनायका भक्तियुत । शुक्ल चतुर्थी ती होती ॥९॥
प्रातःकाळीं महामुनी । भरुशुंडी प्रभूसी पूजित मनीं । ती पूजा विनायका पावोनी । आश्चर्य चकित नृप झाला ॥१०॥
कोणी केली पूजा म्हणत । माझ्या आधीं अकस्मात । तें सांगावें मजप्रत । आश्चर्य वाटे बहु मजला ॥११॥
तेव्हां विनायक सांगत । भरुशुंडी नामक माझा भक्त । एकनिष्ठपणें मज भजत । अन्य कांहीं न पूजी तो ॥१२॥
अन्य देवासी न मानित । तीर्थाटनें न करित । प्रतिदिनीं मानसीं मज भजत । महाभक्त तो माझा ॥१३॥
त्यांचें वचन ऐकून । नृपती बोले विनत होऊन । भक्तिभावें प्रणाम करुन । म्हणे दाखवा योगी तो मजला ॥१४॥
काशीराजाचें वचन ऐकून । भरुशुंडीचे निवासस्थान । विनायक सांगती पावन । अश्वारुढ नृप निघाला ॥१५॥
जाऊन पाहे आश्रमांत । तेव्हा जाहला विस्मित । पाहून प्रत्यक्ष शुंडायुक्त । महामुनी भरुशुंडीस ॥१६॥
हात जोडून विनवीत । विनायकाच्या आज्ञेनें त्वरित । स्वामी आलों आश्रमाप्रत । आतां काशीस चलावें ॥१७॥
माझ्या घरीं देव निवसत । तुम्हांसी तो बोलावित । आपण जी मानस पूजा भक्तियुत । केलीत ती मीं पाहिली ॥१८॥
चतुर्थीचें महाव्रत । आपण ज्याचे करिता अविरत । तो विनायक वसत । माझ्या सदनीं प्रत्यक्ष ॥१९॥
कश्यपाच्या घरीं जन्मला । विनायक नामें ख्यात झाल । तपश्चर्येनें तोषला । गणनायक त्याच्या वरती ॥२०॥
मीं त्याचा दास तैसा यजमान । पुत्रविवाहार्थ बोलावून । काशीस नेला महत्‍ भाग्यें करुन । त्यानें बोलाविलें तुम्हांसी ॥२१॥
म्हणून मीं याचित । यावें आपण काशीपुरींत । तें ऐकून अति विस्मित । योगीन्द्र म्हणे तयासी ॥२२॥
महाभागा वेदान्त गोचर । कश्यपा घरीं घेऊन अवतार । तुझ्या सदनीं आता उदार । सुखकारक ही वार्ता ॥२३॥
परी तो शुंडाहीन म्हणून । मी त्यासी न करी वंदन । कदापिही हें सत्य मान । कलांशादि युक्त तो ॥२४॥
कलात्मक विष्णु शिवादि अमर । ते सर्व मज नमिती सादर । शुंडाभक्तियुत थोर । जगामाजीं मीं निश्चित ॥२५॥
ज्याचें असे गजाचें आनन । अन्यासी न पूजी त्यासी सोडून । म्हणोनी तूं काशीस जा परतून । विनायकाप्रत न येईन मी ॥२६॥
त्याचें तें वचन ऐकून । राजा म्हणे प्रणाम करुन । काशीस परतण्या मन । सांप्रत तत्पर माझें नसे ॥२७॥
आज काशीस परतण्या न शकत । अश्व झाला माझा श्रांत । तेव्हां मुनी म्हणे नृपाप्रत । डोळे मीट तूं क्षणभरी ॥२८॥
आपुल्या योगबळें तयास पाठवित । काशीपुरीस क्षणार्धांत । नृप नेत्र उघडून पाहत । तो होता आपुल्याच मंदिरीं ॥२९॥
तें पाहून झाला विस्मित । विनायकासी प्रणाम करित । ऐकून सर्व वृत्तान्त । विनायकही प्रभाव दावी ॥३०॥
मायेनें काशीराजास पाठवित । भरुशुंडीच्या आश्रमांत । पुनरपि तोही क्षणार्धात । पाहोनि चकित महामुनी ॥३१॥
म्हणे पुनरपि कां आलास । राजा माझ्या आश्रमास । राजशार्दूल बोले वचनास । विनायकें मज पाठविलें ॥३२॥
शुंडादंड धर तो असत । योगींद्रा आपणा बोलावित । चलावें शीघ्र माझ्यासहित । पूर्णरुप गजानना पहावया ॥३३॥
तें ऐकता त्याचें वचन । भूमीवरी लोळे आनंदून । अश्रुपूर्ण मुनीचे नयन । रोमांचित झाली सर्व काया ॥३४॥
त्याचा ती स्थिति पाहत । काशीराज मनीं विस्मित । म्हणे ही भक्ति साक्षात । देहधारिणीं पाहिली मी ॥३५॥
पुनरपि देहभाग धरुन । यात्रा करण्या उद्युक्त मन । भरुशुंडी नृपासहित तत्क्षण । चालला आश्रम सोडोनि ॥३६॥
परी योगबळें न जात । देहश्रमानें यात्रा करीत । पायीं चालला काशीप्रत । महामुनी त्या वेळीं ॥३७॥
त्याचा निश्चय जाणून । धरणी करीतसे आश्चर्य महान । काशी नगरी समीप आणून । ठेविली तेव्हां क्षणार्धांत ॥३८॥
नृप झाला आश्चर्यचकित । म्हणे महामुने हे अघटित । प्रत्यक्ष काशी येथ प्रकटत । तपःप्रभावें आपुल्या ॥३९॥
नंतर त्यास घरीं नेऊन । नृपसत्तम करी पूजन । अश्रुपूर्ण झाले नयन । आनंदानें विनायकाचे ॥४०॥
त्याचा भक्तिभाव जाणून । सोंड सत्वर धारण करुन । मूषकावरी बसून । स्वागता गेला विनायका ॥४१॥
भरुशुंडी त्यास पाहत । चतुर्भुजधर शेषनाभि जो असत । महोदर तो एकदन्त । प्रणाम करी त्या भक्तिभावें ॥४२॥
नंतर विधिपूर्वक पूजा करीत । नाना स्तोत्रें स्तवन करित । भक्तिरस परिप्लुत । अडखळत करी प्रार्थना ॥४३॥
आपुल्या गजानन नाथाते । कृतकृत्य भरुशुंडी स्वचित्तें । शरण जाऊन म्हणे जगत्पते । कृतकृत्य केलेस दर्शनें तूं ॥४४॥
महाभाग्यें तुझे वरण पाहिले । आता वरदान पाहिजे दिले । जेणें संतुष्ट होऊन भलें । तुज न विस्मरी चित्त कदा ॥४५॥
याच स्वरुपें मम हृदयांत । गणेशा तू होई संस्थित । आशापूरक नामें प्रख्यात । ह्या स्थानीं होई गजानना ॥४६॥
अथवा मुद्‌गलाहून करी । अधिक मजला तू गुणांतरी । विघ्नपा त्याचा सुत वा शिष्य परी । अल्प न व्हावें मी कदा ॥४७॥
ऐसी प्रार्थना ऐकून । तथास्तु म्हणे गजानन । पुन्हां बाळरुप घेऊन । खेळूं लागला कौतुकें ॥४८॥
भरुशुंडी तयासी नमून । गेला स्वस्थाना परतून । काशीराज विस्मितमन । विचार करी स्वमानसीं ॥४९॥
भरुशुंडीचें चरित्र पाहून । नृपही झाला एकनिष्ठापन । म्हणे मुनिवर तो महान । माया त्यागें धन्य वाटे ॥५०॥
योगसाहाय्यें गणनायका भजत । सर्वं ब्रह्मांचा योग एक । तो हा गणेश पावक । म्हणोनि एकनिष्ठ महामुनी ॥५१॥
त्याची एकनिष्ठ भक्ति अद्‌भुत । ऐसी न झाली न होईल जगांत । कोटयंश सम अन्य नसत । पूर्णरुपा पूजितसे ॥५२॥
गणराज हा सर्वत्र वसत । यांत अल्पही संशय नसत । अन्य भजनीं जें फळ मिळत । तें कलांशे गणेशाच्या ॥५३॥
गणेश भजन जरी होत । तरी भजनापूर्णत्व येत । सर्वांचा अनुभव हाचि असत । गणेश भरुशुंडी आश्रयस्थान ॥५४॥
अहो भरुशुंडीसम अन्य न दिसत प्रत्यक्ष हा गणराज शुंडावंत । सर्वांचा काशींत मुक्तिस्वरुप क्षेत्रांत । आगमन केलें तयानें ॥५५॥
परी मणिकर्णी विश्वेशा न स्मरला । मनानेंही तेथ न गेल । गणेशदर्शनार्थ आला । पातलां केवळ तया न पूर्ण ॥५६॥
ऐशा विस्मभावें भजन । काशीराज करी मनन । गणेशाचें समत्वरुप पावून । सुखावला तो काशीराज ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भरुशुंडीभक्तिवर्णन नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP