मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३५

खंड २ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । व्यासांवा सुत शुक असत । साक्षात्‍ शिवस्वरुप जगांत । तप करुनि समाराधित । योगिशिरोमणीसी जन्मापूर्वी ॥१॥
गर्भांतून शुक बाहेर पडत । संग भीतीनें तें पळून जात । संगानें ज्ञानभंग होत । विषयासक्त लोकांचा ॥२॥
त्यांस जाताना पाहून । व्यास धांवे त्याच्यामागुन । बहुविध बोधप्रद वचन । क्रमयुक्त पुत्रासी सांगत ॥३॥
अरे महायोग्या थांब आतां । ऐक तूं माझें वचन तत्त्वता । चार आश्रमांचा क्रम सोडितां । योगभ्रष्ट तूं होशील ॥४॥
प्रथम ब्रह्म वर्याश्रम । दुसरा तो गृहस्थाश्रम । तिसरा तो वानप्रस्थाश्रम । चौथा संन्यस आश्रम हा ॥५॥
ऐसें चार आश्रम सेवित । त्यास योग सुसाध्य होत । अन्यथा योगभ्रष्टता प्राप्त । नरासि होय या जगतीं ॥६॥
भ्रष्ट भाव होता नरकांत । धर्मनाशानें मनुष्य जात । म्हणोनि आश्रम मार्गरत । मनोविजयार्थ होई तूं ॥७॥
अंतीं योगींद्र पूजनीय होशील । परिसहसा जरी त्याग करशील । मनाच्या चंचल भावें पतन होईल । तुझें यांत न संशय ॥८॥
ऐशा विविध वाक्यांनी बोधित । परि संगभयें शुक न ऐकत । जें घडणार तें घडेल निश्चित । ऐसें म्हणोनि व्यास परतला ॥९॥
आपुल्या आश्रमीं परतून । गणेशाचें करी ध्यान । तेथ ब्रह्मदेव स्वयं येऊन । दर्शन देई व्यासांसी ॥१०॥
ब्रह्मदेवासी प्रणाम करित । शुकाचा समस्त वृत्तांत सांगत । तेव्हां ब्रह्मा त्यासी म्हणत । व्यासा तूं चिंता करु नको ॥११॥
शंभूचा अवतार शुक असत । तो भ्रष्ट न होईल जगांत । ऐसें आश्वासन त्यास देत । तेव्हां व्यासासी हर्ष झाला ॥१२॥
ब्रह्मदेवाची पूजा करित । नंतर ब्रह्मा स्वलोकीं परतत । शुक मुनी नर्मदातीरीं संस्थित । योगसेवेंत निमग्न ॥१३॥
सर्वत्र ब्रह्मभाव पाहत । शाश्वत ब्रह्म सदा चिंतित । संप्रज्ञात असंप्रज्ञात । उभय योगांत कुशल झाला ॥१४॥
त्याच्या हृदयीं निवास करित । शिवशंकर साक्षात । शुकेश्वरा त्या बोधित । बादरायणसुता त्या वेळीं ॥१५॥
गुरुहीन शुक अभ्यासित । योगभूमी क्रम समस्त । स्वयंभू ब्रह्माची प्राप्ति होत । विदेह महामुनीसी त्या ॥१६॥
सदैव संस्थित ब्रह्मांत । योग अभेद परम सुखांत । पृथ्वीवरी सर्वत्र हिंडत । सांख्य ब्रह्मांत दृढभाव ॥१७॥
परी सांख्य ब्रह्म निराधार पाहून । संशयपूर्ण झालें त्याचें मन । म्हणोनि जनक राजास भेटून । संशय आपुला विचारी तो ॥१८॥
तेव्हां जनक त्यासी सांगत । सांख्य ज्ञान विदेहयुत । संशय सारा तें फिटत । उमजला रहस्य व्यासपुत्र ॥१९॥
सांख्यज्ञानीं बोधनाश होत । हा विचार समजता मुनि विस्मित । योगभाव पूर्णचित्त । चिंतन करी मानसीं ॥२०॥
बोधानें अहंकाराचें उत्थान । परी बोधहीनतेनें त्याचें प्रशमन । ब्रह्म उत्थानविहीन । विदेह म्हणुनी उपाधि वर्जित ॥२१॥
परी तें मुख्य नसत । शांति प्रद ब्रह्म श्रेष्ठ असत । ऐसा निश्चय मनांत । शुक्रमुनीच्या जाहला ॥२२॥
व्यासांनी वेद शाखा रचिल्या । पुराण ग्रंथांच्या रचना केल्या । ऐशा माझा त्या पित्याला । शरण गेलें पाहिजे ॥२३॥
तोच साक्षात्‍ सर्ववेत्ता । होईल मजसी शांतिदाता । ऐसा विचार मनीं येता । शुक झाला आनंदित ॥२४॥
पित्याजवळीं जाऊन । कर जोडोनि करी नमन । व्यासही उत्तम योगकथन । करी शुकाप्रत त्या वेळीं ॥२५॥
तें ऐकून हर्षभरित । व्यासासी शुक विचारित । शांतियोगदाता कोण असत । उत्तम योग कोणता? ॥२६॥
करुणासिंधू मज सांगावें । योगदायक तूं स्वभावें । परी भ्रांतियुक्त संदेहभावें । योगीन्द्रा व्यर्थ मी भटकलों ॥२७॥
शुक्राचें वचन ऐकून । शांतिप्रद योगाचें वर्णन । त्यासी सांगून महान । म्हणे गणेश शांतिरुप हा ॥२८॥
योग शांतिप्रदायक असत । त्याचें भजन करी जो जगांत । तो महायोगी शांति लाभत । म्हणोनि पूजी गणेशा तूम ॥२९॥
ब्रह्मदेवें मज सांगितलें । म्हणोनि हें मजसी समजलें । तेव्हांपासून गणनायक झाले । आराध्य दैवत माझें सदा ॥३०॥
त्यानें सर्वज्ञता लाभत । योगींद्रही माझा सन्मान करित । हा गणेशकृपेचा प्रभाव असत । यांत संशय काहीम नसे ॥३१॥
गण धातू समूहवाचक असत । बाह्यांतर संयोगें समूह होत । ब्रह्मरुप जें समूह जगांत । त्यांचा स्वामी गणेश्वर ॥३२॥
संयोग अयोग योगें प्राप्त । योग्यांसी होय तो योगमार्गांत । ऐसें सांगून शुकास देत । वेदपादस्तवस्तोत्र ॥३३॥
गणेशाच्या भक्तिपर । विष्णूचें रचिलें जें स्तोत्र सुंदर । शांतियोगप्रद सुखकर । शुकासी शिकविलें त्या वेळीं ॥३४॥
त्या स्तोत्रानें विष्णु सुशांत । इहलोकीं सुख लाभला अद्‌भुत । गणेशनामाचा जप करित । जगताचा पालक झाला ॥३५॥
त्या स्तोत्राचे पाठ करुन । रहस्य अवघें जाणून । शुक झाला गाणपत्य महान । योगिवंद्य महाद्युती ॥३६॥
गणेश माहात्म्य अहोरात्र जपत । शुकमुनीस त्यानें शांति लाभत । वाचील ऐकेल वा हें माहात्म्य अद्‌भुत । त्यासी सर्व सुखें मिळतील ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गल महापुरानणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते शुकोपाख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP