मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ५५

खंड २ - अध्याय ५५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । मदासुर झाला शांत । तें पाहून विष्णुप्रमुख सुर जात । एकदंतासमीप ॥१॥
भृगू आदी योगींद्रही दर्शना जात । प्रणाम करुनी स्तवित । हर्षसंयुक्त स्तोत्र गात । एकदंत गजाननाचें ॥२॥
सदात्मरुपासी सकलादि भूतासी । अमायिकासी अचिंत्यासी । अबोधासी आदिमध्यांतविहीनासी । त्या एकदंता शरण जातों ॥३॥
अनंत चिद्रूपमयासी । गणेशासी भेदाभेद विहीनासी । आद्यासी हृदयस्थ प्रकाशासी । स्वाधीन एकदंता शरण जातों ॥४॥
समाधिसंस्थासी । योगिहृदयनिवासासी । सदा निरालंबासी समाधिगम्यासी । त्या एकदंता शरण जातों ॥५॥
आपुल्या बिंबभावें विकासयुक्त । ऐशी विविधस्वरुप माया प्रवृत्त । करुनी वीर्य तेथ स्थापित । त्या एकदंता शरण जातों ॥६॥
ज्याच्या वीर्ये मायेंत रचित । तुरीयक आत्मकवित्तिसंज्ञ जगत । गुणेश्वर जो गुणबोधित असत । त्या एकदन्ता शरण जातों ॥७॥
तुझी सत्ताधारकासी । गुणेश्वर आद्य त्या अजासी । त्रिसंस्थित भजती ज्यासी । त्या एकदंता शरण जातों ॥८॥
नंतर नादप्रेरित होऊन । सुषुप्सिसंज्ञ जग रचून । समान भूत तैसा एकभूत सुमन । त्या एकदंता शरण जातों ॥९॥
तेच विश्व कृपा संभूत । तमोगुणें द्विधाभाव होत । अनेकभूत तैसा एकभूत । त्या एकदंता शरण जातों ॥१०॥
नंतर तुझ्या प्रेरणेनें निर्मित । सूक्ष्म भाव जग एकसंस्थित । सुसात्त्विक स्वप्न आद्य अनंत । त्या एकदन्ता शरण जातों ॥११॥
तत्‍ स्वप्नही तपप्रभावें होत । द्विविध सुसिद्धिरुपांत । सदा एकरुप तव कृपेनें असत । त्या एकदंता तुज शरण जातों ॥१२॥
तुझ्या आज्ञेनें तो निर्मित । हृदिस्था जगदंशरुप समस्त । जागृत्त अप्रमेय वस्तुजात । त्या एकदंता शरण जातों ॥१३॥
ते जागृत रजें विलोकित । झालें विभिन्न सदैकरुप जगांत । ज्याची लीला ही असत । त्या एकदंता शरण जातों ॥१४॥
प्रकृतिस्वभावें जग निर्मून । त्यांत तूंच विलससी नित्य महान । बुद्धिदाता गणनाथा होऊन । त्या एकदंता तुज शरण जातों ॥१५॥
सर्व ग्रह राशी प्रकाशत । ज्याच्या आज्ञेनें आकाशांत । आपुलें भ्रमण करिती अविरत । त्या एकदंता शरण जातें ॥१६॥
तुझ्या आज्ञेनें विधाता जग निर्मित । तुझ्या आज्ञेनें विष्णु तें पाळित । तुझ्या आज्ञेनें हर संहार करित । त्या एकदंता तुज शरण जातों ॥१७॥
ज्याच्या आज्ञेनें पृथ्वी जलांत । झाली असे प्रतिष्ठित । ज्याच्या आज्ञेनें नद्या वाहत । त्या एकदंता शरण जातों ॥१८॥
ज्याच्या आज्ञेने सागर । उल्लंघन न करी स्वतीर । ज्याच्या आज्ञेनें देवगण अमर । कर्मफलें स्वर्गी देती नरा ॥१९॥
ज्याच्या आज्ञेनें पर्वतगण स्थिर । ज्याच्या आज्ञनें शेष पृथ्वीधर । ज्याच्या आज्ञेनें काम मोहकर । त्या एकदंता शरण जातों ॥२०॥
ज्याच्या आज्ञेनें अर्यमा कालधर । ज्याच्या आज्ञेनें वाहतो समीर । ज्याच्या आज्ञेने वायू आश्रयी जठर । त्या एकदंता शरण जातों ॥२१॥
ज्याच्या आज्ञेंत चराचर । अंतरिक्ष तैसें अन्य सर्व । ज्याच्या आज्ञेनें विलसे अपूर्व । त्या एकदंता शरण जातों ॥२२॥
अनंतरुप हृदयीं बोधकर । योगी योगबलें लाभती ज्या उदार । त्याच्या स्तवनीं असमर्थ अमर नर । त्या एकदंता शरण जातों ॥२३॥
ऐशी स्तुति गाऊन । देव मुनीसह करिती नर्तन । हर्षयुक्त गाती स्तवन । प्रसन्न जाहला एकदंत ॥२४॥
प्रीतात्मा देवर्षीच्या स्तवनें म्हणत । भक्तवत्सल महाभागांप्रत । य स्तोत्रानें मी प्रसन्नचित्त । मागा इच्छित देव ऋषींनो ॥२५॥
तुम्ही रचिलेलें हें स्तोत्र । मज प्रीतिकर होईल जगांत । जें जें वांछी नर ईप्सित । तें तें लाभेल स्तोत्रप्रभावें ॥२६॥
पुत्रपौत्रादिक स्तोत्रपाठक । लाभेल धनधान्यादिक । गजाश्व राज्य भोगादिक युक्ति मुक्ति योग शांती ॥२७॥
मारण उच्चाटनादी नष्ट होत । कारावासातून होत मुक्त । वाचकर श्रोत्या नराप्रत । बंधहीनता प्राप्त होय ॥२८॥
हे एकवीस श्लोक पठन । एकवीस दिवस करुन । एकवीस दिवस माझें मनन । करितां दुर्लभ नसे कांहीं ॥२९॥
त्रैलोक्यांतही असाध्य नसत । भर्त्यासी जो विजयी होत । सर्वत्र सुख प्राप्त होत । नित्य वाचनें ब्रह्मीभूत ॥३०॥
त्याच्या दर्शनें देवही पुनीत । होतील ऐसें हें स्तोत्र अद्‌भुत । ऐसें एकदंत वचन ऐकत । आनंदित झाले अमरमुनी ॥३१॥
हात जोडून भक्तियुक्त । विनविती ते गजाननाप्रत । धन्य आम्हीं गणेशा सांप्रत । एकदंता तव दर्शनानें ॥३२॥
तुझें भाषण ऐकिलें । धन्य कान आमुचे जाहले । आता दृढ भक्तीचें जाहलें । पाहिजे अटळ स्थान हृदयांत ॥३३॥
ऐसें वरदान द्यावें । मायाहीनत्व पावावें । कृतकृत्य जगीं व्हावें  । प्रभो देवा एकदंता ॥३४॥
जेव्हां असू संकटग्रस्त । तेव्हां रक्षण करी अविरत । देवेशा हा वर उचित । मागतो आम्हीं समस्त ॥३५॥
त्यांचे वचन ऐकून । तथास्तु म्हणे गजानन । अन्तर्धान तत्क्षणीं पावून । एकदंत स्वानंदलोकीं गेले ॥३६॥
देव मुनिगण आपापल्या सदनांत । परतोनी झाले धर्मयुक्त । नित्य एकदंतासी भजत । मदासुरा ऐसें शांत केलें ॥३७॥
प्रल्हादा ऐसें एकदंत चरित । सांगितलेम तुज अद्‌भुत । दुष्ट संगें मदोत्सिक्त । भ्रष्ट झालास ज्ञानापासून ॥३८॥
विधात्यासी अवमानिलें । म्हणून तुज दुःख झालें । एकदंता भजता नेमें भलें । तुझें होईल दैत्यनायका ॥३९॥
त्याच्या भजनें होशील शांत । ऐसें गृत्समद प्रल्हादा सांगत । तो देव एकदांत । भक्तकार्य सिद्ध करी ॥४०॥
नाना अवतार तो घेत । नाना रुपें दाखवित । देवांतक नरांतकांचे हनन करित । कश्यपगृहीं जन्मून ॥४१॥
तसाच दुर्मति नामक झाला । दैत्य धर्मलोपक त्याला । शांत करी विघ्नेश भला । शिवाचा पुत्र होऊन ॥४२॥
गणासुरें जेव्हां धर्मलोप केला । तेव्हां जो कपिलपुत्र जाहला । तोच हा एकदंत त्याला । शरण जाई प्रल्हादा ॥४३॥
तो नाना अवतार घेऊन । करितो सर्व जगाचें पालन । कलांशानें धर्मरक्षण । एकदंत करीतसे ॥४४॥
त्या एकदंत अवताराच्या कथा । वर्णन करण्या संपूर्ण सर्वथा । सर्वांची असे असमर्थता । गुणांत त्याचा कोण जाणे ॥४५॥
ब्रह्मादी सुर न जाणती । मुनीही त्याची महती । म्हणोनी तूं त्या एकदंता स्वचित्तीं । भावभक्तीनें भजावें ॥४६॥
दैत्यपा तेणें सर्व ज्ञान । सुशांतिद तें पावून । अंतीं लाभशील समाधान । एकदंतांच्या कृपेनें ॥४७॥
ऐसे मदासुराचें खंडन । केले एकदंतें तें कथन । संक्षेपें चरित्र पावन । सांगितलें तुम्हांप्रती ॥४८॥
जो कोणी हें वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास भुक्ति मुक्ति देईल । एकदंत सुप्रसन्न ॥४९॥
एकदंत सौख्यद होत । असुरभावें मदनपीडित । दैत्यनायक तो शांत होत । एकदंत भक्ता संरक्षील ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते मदासुरचरिततसमाप्तिर्नाम पंचपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP