मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ७०

खंड २ - अध्याय ७०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । एकदा कपिलाच्या आश्रमांत । देवपती सर्व देवांसहित । जाऊन वंदन करी तयासी ॥१॥
अपराहणकाळी इंद्र येत । भोजनासी त्यास निमंत्रण देत । सर्व देवगणांसहित योगीश्वर कपिल तेव्हां ॥२॥
सिद्धियुक्त गणेशा चित्तांत । घ्याऊन भोजन संकल्पित । त्या सर्वांसी तोषवित । उत्तम अमृतोपम भोजनानें ॥३॥
पृथ्वीवरील अमृतभोग भोगून । सुरनायक संतुष्ट मन । वायुसाहाय्यें आणवून । मणि उत्तम देत कपिलासी ॥४॥
चिंतामणि गणेशाचें भूषण । ऐसें सांगत पुराण । तें धारण करुन तत्क्षण । कृतार्थ वाटे कपिलासी ॥५॥
कपिल तेथ मनांत । गणेश मीच ऐसा विचार करित । योगमार्गपरायण असत । न भिन्न त्या देवाहून ॥६॥
म्हणून हा मणि महान । मज दिला प्रेरणा देऊन । आतां तो कंठी बांधीन । गणपति देवासम मीं ॥७॥
तें पाहून इंद्र हर्षित । झाला देवगणांसहित । इन्द्रपुरींत परतून जात । कपिल राहिला निजाश्रमीं ॥८॥
प्रल्हाद गृत्समदा विचारित । चिंतामणि गणेशाचा असत । तरी इंद्राच्या हस्तगत । कैसा झाला तें सांगा ॥९॥
स्वनंदवासकारी ब्रह्मनायक । असे गणेश जगीं एक । तरी त्याचा मणि पावक । कैसा मिळविला इंद्रानें ॥१०॥
गृत्समद तेव्हां सांगत । चिंतामणीचें माहात्म्य अद्‌भुत । सर्व पापांचा जें नाश करित । परमानंदे प्रल्हादा ॥११॥
एकदां दारुण तप आचरित । विष्णु पूर्वीं षडक्षर मंत्रयुत । तेणें शांति तयास प्राप्त । परीक्षा त्याची घेत प्रभू ॥१२॥
भक्तीची परीक्षा घेत । चिंतामणि तयास देत । चिंतिला अर्थ जो पुरवीत । ऐसा तो अद्‌भुत चिंतामणि ॥१३॥
विष्णु तो मणि ठेवित । नित्य आपुल्या पूजेंत । म्हणे मी गणेशाचा भक्त । त्याचें भूषण कैसें घालूं? ॥१४॥
गणेशाच्या भूषणाचें पूजन । करावें भक्तिभाव धरुन । देवदासांनी देवांचे भुषण । धारण कधीं करुं नये ॥१५॥
शांतियोगें विघ्नेश हृदयांत । जरी साठविला मीं सतत । तरी तो स्वामी दास मीं असत । ऐसा हा मूळ स्वभाव ॥१६॥
नंतर बहुत काळ जात । इन्द्र करुं लागला तप उदात्त । एकाक्षरविधानें तोषवित । गणनायका त्या वेळीं ॥१७॥
देवनायक सतत ध्यानयुक्त । क्रमानें होत योगयुक्त । गाणपत्य तो शांति लाभत । अभेद स्थिति प्राप्त तया ॥१८॥
गणेशाचें अद्वैत पावून । स्वगृहीं गेला परतून । देव राज्य करी उदासीन । इंद्र श्रेष्ठ गणपभक्त ॥१९॥
एके दिनीं स्वगृहांत । केशव आकाशवाणी ऐकत । इंद्रास देई चिंतामणि त्वरित । शांतियोगधरा मद्‍भक्तासी ॥२०॥
ती आकाशवाणी ऐकत । विष्णु अमरावतीस जात । तो चिंतामणि इंद्रास देत । चिंतितार्थ फलप्रद ॥२१॥
मघवा दासभावें संस्थापित । मण्याची त्या पूजा करित । परी योगमदें न होत व्याप्त । प्रतापी तो महेंद्रही ॥२२॥
कपिलास शांतियोगमग्न पाहून । इंद्र देई तया प्रसन्न । भावयुक्त मनें मनीं चिंतून । आम्हीं गृहस्थ या मण्यास न योग्य ॥२३॥
हा कपिल साक्षात्‍ सिद्धेश्वर । मणि धारण करण्या मुनिवर । सर्वथैव योग्य उदार । यास द्यावा हा चिन्तामणी ॥२४॥
ऐशा क्रमानें विष्णू इंद्राप्रत । इंद्र देत कपिलाप्रत । लाभतां कपिल प्रमुदित । चिंतामणी अमूल्य तें ॥२५॥
कपिल आपुल्या गळ्यांत । सदैव गणराजापरी तो बांधित । कांहीं काळ ऐसा लोटत । एकदां आला कपिलाश्रमी ॥२६॥
मृगया करीत गणासुर । सैन्य ठेवून आश्रमाबाहेर । एकाकी मुनीस भेटला उग्र । प्रणाम करी कर जोडून ॥२७॥
त्याचा विनीत भाव पाहून । कपिल विचारी तयास सुमन । आपण कोण कोठून । आलात तें सांगा नरोत्तमा ॥२८॥
गणासुर तेव्हां सांगत । मी गणासुर नामें ख्यात । मुनिसत्तमा मृगयारत । दैववशें आलों या आश्रमीं ॥२९॥
मी असे फार क्षुधायुक्त । माझा अश्वही झाला श्रांत । सैन्यासह येऊन आराम करित । अमृतासम जल चिद्रती ॥३०॥
कंदमृळ फळे खाऊन । सर्वांचें झालें समाधान । तुमचें घ्यावें दर्शन । म्हणोनि एकटा मीं आलो ॥३१॥
माझी सेना तळ्याच्या तीरावर । ठेवोनि आलों येथवर । तुमच्या दर्शनें पाप समग्र । मुनिसत्तमा दूर झालें ॥३२॥
आतां आज्ञा द्यावी परतत । सैन्यासह मी स्वनगरांत । त्याचें वचन ऐकून संतोषत । कपिल म्हणे तयासी ॥३३॥
नृपसत्तमा माझ्या आश्रमांत । माध्यान्हकाळीं अतिथी येत । ते स्वागता वाचून परतत । हे मजला मान्य नसे ॥३४॥
म्हणोनि सेनेसहित भोजन । करावें आपण प्रसन्न मन । त्याचा आग्रह तो मानून । गणासुर विनयें मान्य करी ॥३५॥
कपिल त्याचा सत्कार करित । कपिल शिष्य गणासुर सैन्यास आणित । त्या सर्वाचें आतिथ्य करित । तेव्हां महामुनी कपिल तो ॥३६॥
चिंतामणीची पूजा करुन । करी त्यासी प्रार्थना नमून । गणासुरासी सेनेसहित भोजन । द्यावें रत्ना यथारुची ॥३७॥
तेव्हां मणिप्रसादें लाभत । षड्‌स भोजन उत्तम पात्रांत । तें खाऊन सर्वही तृप्त । गणासुराचे सैनिक ॥३८॥
गणदैत्यही झाला तृप्त । परी विस्मित होत चित्तांत । मुनीस प्रणाम करुन म्हणत । कैसी केली ही व्यवस्था? ॥३९॥
तेव्हां कपिल तयास सांगत । हा चिंतामणीचा प्रभाव अद्‌भुत । त्यानें निर्माण केलें क्षणांत । षड्रस भोजन उत्तम हें ॥४०॥
गणासुर तें ऐकतां प्रार्थित । द्यावा मज तो चिंतामणी अद्‌भुत । परी गणेशभूषण तें पुनीत । कपिलें देण्या दिला नकार ॥४१॥
मुनीचा तिरस्कार करित । गणासुर तो हिसकावित । त्याच्या हातून बळें नेत । चिंतामणीं तें उन्मादें ॥४२॥
परतला आपुल्या नगरांत । हर्षनिर्भर तो असुर होत । इकडे कपिल क्षुब्ध चित्त । विनाश उपाय चिंती मनीं ॥४३॥
विचार करी चित्तांत । अहो केवढा गोड बोलला मजप्रत । दैत्य हा दुष्ट अविनीत । जाति सदृश कर्म केलें ॥४४॥
म्हणून दुष्ट अविनीतावर । ठेवूं नये विश्वास तिळभर । दुष्ट संगतीनें ज्ञान अपूर्व । भ्रष्ट होतें जगतांत ॥४५॥
ओमिति श्रीमदात्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते चिंतामणिहरणं नाम सप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP