मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय २०

खंड २ - अध्याय २०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सिंधुदेशाधिपति जगांत । रहूगण नामें प्रख्यात । पूर्वसंस्कारयोगें होत । अंतर्निष्ठ तो जीवनीं ॥१॥
शांति लाभावी म्हणून करित । प्रयत्न बहू परि न लाभत । गंगेजवळी कपिलाश्रमी जात । म्हणोनि आदरपूर्वक तो ॥२॥
गौतमीच्या दक्षिण तीरीं असत । आश्रम तो ऐकून सुविख्यात । राजा शिबिकेत बसून जात । स्वनगराच्या बाहेरी ॥३॥
मार्गक्रमण त्वरायुक्त । करी तेव्हां भोई श्रान्त । म्हणोनि पहिले बदलून आणित । दुसरे पालखीवाहक ॥४॥
तेथ दैवयोगें महामुनीला । आंगिरसा जडभरता पकडून आणला । राजाच्या पालखीला । वाहूं लागला अन्यांसह ॥५॥
तो महायोगी तें मानित । प्रारब्धाचे भोग मनांत । म्हणोनि दुःख न करिता पालखी वाहत । रहूगण राजाची त्या ॥६॥
परी तो अहिंसा व्रतधारी असत । मार्गी जंतुनाश टाळित । प्राणिवर्जित स्थानीं टाकित । पाऊल आपुलें कटाक्षानें ॥७॥
तेणें अन्य वाहकांची गति । मंदावली त्याच्यामुळें निश्चिती । पालखी हालून राजाप्रती । पीडा फार जाहली ॥८॥
म्हणोनि क्रोधाविष्ट होत । रहूगण राजा वाहकां आज्ञापित । म्हणे नीट वाहून न्या पालखी त्वरित । लक्ष देऊन प्रयत्नें ॥९॥
अन्य वाहक भयभीत । राजासी तेव्हां विनवीत । ही आमुची चूक नसत । विचारा नव्या वाहकासी ॥१०॥
आपण कोण हा बोलाविला । तो दुरात्म वाटेत असला । दारुडयापरी चालतो त्याला । जाब विचारा मंदगतीचा ॥११॥
तेव्हां राजा त्या महात्म्याप्रत । म्हणे शठा तूं उन्मत्त । दुष्टा मंदगति का चालत । माझ्या सन्मुख या वेळीं ॥१२॥
जडभरत त्याला उत्तर देत । रहूगणासी जो योग इच्छित । अनादरें जाणून पात्रभूत । भविष्याच्या प्रभावें ॥१३॥
मायामय हे सर्व असत । भरांतिरुप असत्य ज्यांत । तेथ राजजन कैसे पाहत । सामान्य जनासी या जगीं ॥१४॥
आम्ही द्वद्वाचा त्याग करुन । समभावीं लाविलें आमुचें मन । आमुचा राजा महाबल असून । शिक्षाकर्ता न होईल ॥१५॥
तेव्हां योगमार्ग सोडून सांप्रत । क्रोध कां करावा मनांत । त्याच्या अधीन व्हावें प्रशांत । अज्ञानें हा बोले म्हणुनी ॥१६॥
इतुके बोलुन शिबिका वाहत । मौन धरुनी जडभरत । महायोगी तो हृदयांत । गणपतीचें चिंतन करी ॥१७॥
परी त्याचें योगग्रथित । महावाक्य राजा जेव्हां ऐकत । तेव्हां मनीं तो भयभीत । होऊनि उतरला धरणीवरी ॥१८॥
यज्ञोपवीत संयुत । मलिन विप्रा त्या पहात । चिंध्या अंगावरी दिसत । परी मुखीं ब्रह्मतेज ॥१९॥
तत्काळ साष्टांग नमस्कार । घाली राजा जोडून कर । धर्मज्ञ रहूगण राजा थोर । भयविव्हल होऊनी ॥२०॥
अज्ञानानें पाप घडलें । म्हणोनि तुम्हां दुःख दिधलें । दयानिधे क्षमा पाहिजे केले । अपराध माझे आपण ॥२१॥
आपण कोण विप्र तें सांगावें । उपकृत मजसी करावें । अवधूत महात्मे योगभावे । संचरती कुठेही ॥२२॥
तैसे तुम्ही यज्ञोपवीत धारक । मजसी वाटता निष्कलंक । कपिल नारद की पुलहक । अंगिरा ऋतु दत्त अथवा? ॥२३॥
किंवा याज्ञवल्क्य आपण आहांत । ऐशा स्वरुपें फिरता जगांत । सांगावें मजसी अविलंबित । आपुलें नांव काय असे? ॥२४॥
ब्राह्मणांचा अनादर होत । तेव्हा विप्रेंद्रा मी भयभीत । ब्राह्मणासम अन्य नसत । दैवत या चराचरीं ॥२५॥
साक्षात्‍ परमेश्वराचीं शरीरें । वेद ब्राह्मणां मानिती आदरें । कर्म ज्ञान ब्रह्म सारें । आधार त्यांचा ब्राह्मण ॥२६॥
ब्राह्मणांच्या मुखांतून । जें ऐकिलें तें पावन । देवस्थानांत देवांसमान । वेदज्ञ ब्राह्मण जाणावे ॥२७॥
ब्राह्मणांसी दिलें दान । तें अक्षय पदाचें साधन । उद्वरुन जाती जन । ब्राह्मणांच्या आशीर्वादें ॥२८॥
मंत्राधीन देवगण असत । ते मंत्र विप्राधीन जगांत । म्हणोनि देवांचें जीवित । द्विजाधीन सर्व असे ॥२९॥
मंत्रहीन तें कर्म निष्फळ । कर्माधीन जग सकळ । म्हणोनि ब्राह्मण असे सबळ । मंत्रज्ञाता सर्वमूळ ॥३०॥
कर्मनिष्ठ तपोनिष्ठ । द्विजोत्तम ज्ञाननिष्ठ । योगीजन ऐसे वरिष्ठ । तारक सकळां जगतांत ॥३१॥
सर्वांचे गुरु ब्राह्मण असत । म्हणोनि ज्ञानदाते ते प्रख्यात । साक्षात्‍ ब्रह्मस्वरुप असत । ब्राह्मण जगतीं निःसंशय ॥३२॥
त्यांची अवहेलना करित । ते शिवमुख्यादि देवही पतित । त्यांची सेवा करिता जगांत । लाभतें सारें इच्छित ॥३३॥
ब्राह्मणांच्या शापानें पतित । विष्णु प्रमुख सुरेश्वर जगांत । त्यांचा उद्धार त्या अवतारांत । ब्राह्मणांनीच केला असे ॥३४॥
विष्णू शिव आदि देवासीही न भीत । परी ब्राह्मणरोषें मी भयभीत । आता विप्रेशा सांगावें त्वरित । आपण कोण हें मजला ॥३५॥
ऐसें बोलून चरण धरित । पुनःपुन्हा त्यासी वंदिते । चरणकमलावरी ठेवित । आपुलें शिर रहूगण ॥३६॥
भयव्याकुळ रुदन करित । तेव्हां जडभरता करुणा येत । उठवून त्यासी मृदु स्वरें म्हणत । सांगतों सारें नृपशार्दूला ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते जडभरतरहूगणमिलनोनाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP