मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १

खंड २ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनकादी ऋषिजन म्हणती । सूता तू सांगितलें आम्हांप्रती । वक्रतुंड  चरित्र अति प्रीती । तेणें कृतकृत्य आम्हीं झालों ॥१॥
तूं सर्वज्ञ महा बुद्धिमंत । म्हणोनि विचारितों धन्य तूं असत । कथा ऐकून तृप्ति न होत । अमृताच्या पेयापरी ॥२॥
म्हणोनी एकदंत चरित । तुम्ही सांगावें सांप्रत । कोणत्या ब्रह्यांत स्थित । एकदंत गजानन ॥३॥
किती त्याचे अवतार । काय कर्म तें सांगा उदार । ऐसें विनविती ऋषि सत्त्वपर । सूत तेव्हा त्यांसी म्हणे ॥४॥
ऐसाच प्रश्न दक्षे विचारला । पूर्वीं महामुनि मुद्‌गलाला । त्यानें उत्तर त्या वेळीं त्याजला । काय दिलें तें सांगतो ॥५॥
दक्ष म्हणे मुनिसत्तमा । माझ्या पुण्याचा हा महिमा । त्यानें पावलों दर्शना । सर्वज्ञा मुद्‌गला तुझ्या निःसंशय ॥६॥
वक्रतुंडचरित्र ऐकलें । तुमच्या मुखांबुजातून जें स्रवलें । तेणें माझें हृदय विसावलें । यज्ञविध्वंसशोक शमला ॥७॥
ढुंढीच्या भक्तीत हर्ष युक्त । मुनिसत्तमा मीं झालों मुदित । सांगा एकदंताचें चरित । कैसा जन्म कोणतें कार्य ॥८॥
कोणतें त्याचें वाहन । कोणतें ब्रह्म त्याची खूण । हें सर्वही व्याख्यान । सांगा मजला करुणानिधे ॥९॥
सूत म्हणती ऐसें ऐकून । दक्षाची भक्ती जाणून । गणेश सर्व सिद्धिदाचें चरित्र महान । मुद्‌गल त्यासी सांगती ॥१०॥
ऐक दक्षा गणेश चरित । एकदंताचे पापनाशन अद्‌भुत । भुक्तिमुक्तिफलप्रद जगांत । धन्य तू एक संसारी ॥११॥
महाभागा म्हणोनि रति । गजानन चरित्र श्रवणीं भक्ति । गृत्समद प्रल्हादांचा संवाद प्रीती । सांगेन इतिहास पुरातन ॥१२॥
मुद्‌गलांचें ऐकून वचन । दक्ष म्हणे हृष्टमन । ब्रह्मदेवाच्या सृष्टिक्रमापासून । त्रिभुवन सृष्टिमार्ग सांगा ॥१३॥
त्यांत प्रल्हादमाहात्म्य येईल । गृत्समद संवादही समजेल । यथावत्‍ सांगा अखिल । वृत्तान्त एकदंताचा ॥१४॥
सूत म्हणती दक्षाचें वचन । शापित मोहिताचें ऐकून । मुद्‌गल सांगतो वृत्तान्त पावन । प्राचीन सृष्टिमार्गाचा ॥१५॥
महाबुद्धे दक्षा ऐकावें । ब्रह्मा लोकपितामह स्वभावें । कैसें निर्मी विविध विश्व आधवें  विस्तारानें तें सर्व ॥१६॥
गणेशाचा वर लाभत । ब्रह्मा सृष्टि निर्मिण्या इच्छित । योगमायेनें प्रवेशत । जनार्दनाच्या शरीरीं तो ॥१७॥
तेथ अब्दपर्यंत राहून । अंती नाभिकमलांतून । बाहेर पडून पुत्रभावें शोभत । विष्णूच्या वरदानानें ॥१८॥
तेथ पद्मावरी बैसोनी । हेरंबासी ध्यात मनीं । तेव्हां त्या विधीच्या देहापासुनी । प्रभूत जळ वाहतसे ॥१९॥
विधिसमक्ष सर्वत्र वाहत । त्या पाण्यानें दशदिशा व्याप्त । त्यात निमग्न होऊन संभरान्त । गणनाथाचें स्मरण करी ॥२०॥
विभो या भयंकर विघ्नांत । रक्षी मजला मी बुडत । ढुंढे वक्रतुंडा मी प्रणत । नमितों तुज पुनःपुन्हा ॥२१॥
त्या स्मरणपूजेच्या प्रभावानें पहात । समीप एक वटवृक्ष पुनीत । त्याच्या एका पानावर सुप्त । गणेशाननही त्यास दिसे ॥२२॥
तीन डोळे चार बाहुयुक्त । शृंडा दंड विराजित । विशाल उदर भाळीं चंद्र विलसत । किरीटयुक्त गजानन ॥२३॥
सर्व अवयव संपूर्ण । नानाभूषणें भूषित सान । आंगठया एवढें परिमाण । होतें त्या बालगणेशाचें ॥२४॥
ऐसा गणेशा पाहून । ब्रह्मा अत्यंत विस्मितमन । महापुरांत हा विराजमान । एक वटवृक्ष सुरक्षित कसा? ॥२५॥
त्य वडाच्याजवळ जात । तेव्हां गणनाथ शिंपडित । ब्रह्मदेवावरी त्वरित । सोंडेने जल पावन ॥२६॥
त्या प्रसादें हृष्टचित्त । ब्रह्मा गजाननासी स्तवित । हात जोडून मान वाकवित । भक्तिनमर होऊन तो ॥२७॥
गणनाथासी प्रलयजळीं विहार कर्त्यासी । वटपत्रशयनासी । हेरंबासी चतुर्भुजधरासी । नाभिशेषासी नमस्कार ॥२८॥
गजवक्त्रासी सर्वेशासी । लंबोदरासी एकदंतासी । नाना शोभा समन्वितासी । अंगुष्ठपर्वमात्रासि नमन असो ॥२९॥
सिद्धिबुद्धियुतासी । भक्तसंरक्षकासी गणेशासी । अनंत विभवासी निर्गुणासी । गुणाधारासी नमन ॥३०॥
सगुणासे एक अनेकादिभेदासी । लीलाकारासी मायावीसी । अनादिबालरुपासी । सृष्टिस्थितिअंतकारका नमन तुला ॥३१॥
महामोहदायकासी नमन । निवारण करी महाविघ्न । मी संकटीं प्रलयजळांत बुडून । गजानना तुज शरण आलों ॥३२॥
भक्तवत्सला रक्षण करी । दयानिधे कृपा मजवरी । मी तुझा दास मज उद्धरी । ऐसी स्तुती करीत असे ॥३३॥
तेव्हां आश्चर्य एक पहात । त्या गजाननाच्या तोंडांत । चराचर विश्व पूर्ण संस्थित । ईश्वरासह दिसे तयासी ॥३४॥
नंतर नाना समीरें आकृष्ट । ब्रह्मा त्याच्या उदरीं प्रवेशत । तेथही विश्वदर्शन लाभत । नाना आश्चर्यमय पुन्हा ॥३५॥
ऐसें त्या प्रभूचें उदर पाहत । नाना ब्रह्मांड संयुक्त । रोमद्वारांतून निघत । बाहेर ब्रह्मा तदनंतर ॥३६॥
पुन्हा त्या बालरुपा गणेशा पाहत । मनीं अत्यंत सुविस्मत । तेव्हां त्या उत्तम भक्ताप्रत । देव श्रीगणेश म्हणे ॥३७॥
तुझें हें स्तोत्र प्रीतिकार । मज आवडतें सिद्धिकर । भुक्तिमुक्ति फलप्रद उदार । पाठका श्रोत्यास होईल ॥३८॥
तो मज मान्य होईल । जो जो वर मनीं चिंतील । तो तो सर्व लाभेल । माझ्या कृपाप्रसादानें ॥३९॥
ब्रह्मदेवा तूं आलास बाहेर । विष्णुच्या नाभिकमलांतून सत्वर । तेव्हा प्रथम अव्हेर । केलास माझ्या विस्मरणानें ॥४०॥
माझी पूजा विसरलास । म्हणोनि विघ्नसंयुक्त झालास । आता माझें स्मरण केलेंस । तेव्हां विघ्न नष्ट झालें ॥४१॥
महामते या पुढतीं करिसी । कोणतेंही कार्य तें माझ्या स्मृतीसीं । नमन करुनी पूजनासी । करी सफल तूं तेणें होय ॥४२॥
आतां माझ्या आज्ञेनें सत्वर । निर्मी जग तू चराचर । माझ्या उदरांत जैसे समग्र । पाहिलेंस पितामहा ॥४३॥
ऐसें बोलून अन्तर्धान । पावले सत्वर बाल गजानन । ब्रह्मा पद्मासनीं विराजनमान । पूर्ववत्‍ झाला त्या समयीं ॥४४॥
नंतर गणेशमंत्र जपत । कमलासन त्यासी पूजन । यथान्याय ध्यान करित । तेव्हा हृदयीं प्रकटला ॥४५॥
अन्तरीं साक्षात्कार होत । ब्रह्मा त्या गजानना नमन । मानसपूजा तो करित । विघ्नहारक देवाची ॥४६॥
दक्षिणा म्हणोनि अर्पित । आपुल्या दोन कन्या तयाप्रत । सिद्धि-बुद्धि ज्या प्रख्यात । गजाननासी प्रीतीनें ॥४७॥
यथाशास्त्र विधानपूजन । स्वीकारुन होत अंतर्धान । हृदयस्थ सर्वनायका त्या नमून । सृष्टिरचना करी विधी ॥४८॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीन्मौद्‌गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते ब्रह्मसृष्टिप्रारंभो नाम प्रथमोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP