मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ३३

खंड २ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । महादैत्य तो समीप येत । तेव्हां देव भयभीत । निजनाथा गजानन निवेदित । गजासुराचा वृत्तान्त ॥१॥
देव मुखातून तें वृत्त । ऐकता क्रोधें संतप्त । परशू उग्र पाश करांत । गदा धरुनी निघाला ॥२॥
मूषकावरी बैसला । ऐसा तो गणराज शोभला । त्यासी पाहून दैत्यराज बोलला । बलगर्वोद्धत गजासुर ॥३॥
अरे अधम ब्राह्मणा रणांत । कशास आलास त्वेषांत । तूं नित्य तप करावें वनांत । क्षात्रधर्म कां आचरिसी? ॥४॥
ज्यानें ब्रह्मादिकांसी जिंकलें । त्रिभुवन आपुल्या अंकित केलें । त्याच्यासह युद्ध केलें । पाहिजे तुज संप्रत ॥५॥
या प्रयत्नांत मरशील । वृथा परिश्रम करशील । जरी स्वाश्रमी परतशील । तरी तुजला न मारीन ॥६॥
बालभावें साहस । करण्या उद्युक्त झालास । म्हणोनी सहन करीन खास । धाष्टर्य तुझें गणेशा ॥७॥
गजासुराचें हें उद्वट वचन । ऐकून शंभू क्रोधायमान । त्या महादैत्यासी हितकथन । करी तेव्हां निर्भयपणे ॥८॥
दैत्यराजा तूं मूर्ख अससी । त्यासी ब्राह्मणोत्तम मानतोसी । अरे हा गणेशदेव सर्वांसी । पूजनीय वंद्य असे ॥९॥
योगी यासी नित्य सेविती । भक्तगण आराधिती । पराशराच्या तपप्रभावें जगतीं । अवतरला त्याचा सुत होवोनी ॥१०॥
पराशरासी वरदान । दिलें यानें तुष्ट होऊन । मरण तुझें याच्या हातून । ओढवेल हें निश्चित असे ॥११॥
म्हणोनी वैर सोडून । दैत्यनायका जा गणेशा शरण । अन्यथा मृत्यु पावून । सर्वस्व नाश होय तुझा ॥१२॥
पाताळांत तूं राहशील । तरी गणेश तुजवरी कृपा करेल । तुझा जीव वाचवील । ऐकून कोपला गजासुर हें ॥१३॥
गदाघातें शंभूस मारित । मूर्च्छा येऊन रणीं तो पडत । शस्त्रास्त्रांनी जर्जरित । अन्य देवही त्यानें केलें ॥१४॥
विष्णु आदी देवही पीडित । पडले विद्ध होऊन रणांत । तेव्हां गणेश अस्त्र घेत । दैत्याधिपास मारावया ॥१५॥
संहारास्तव परशू मंत्रून । दैत्यसेनेवरी सोडिला तत्क्षण । यमसंनिभ तो करी हनन । जेथ तेथ दैत्यसेनेचें ॥१६॥
दैत्यराजाच्या पुढयांत । प्रधान कोसळले रणांत । संहारास्त्र निवारण्या करित । नाना यत्न तो गजासुर ॥१७॥
परी ते यत्न निष्फल होत । वरदान प्रभावें एकटा सुरक्षित । परशू अन्य दैत्यासी मारित । परी गजासुरावरी निष्प्रभ ॥१८॥
तेव्हां क्रोधसंतप्त असुर धावत । विघ्नपाजवळी अकस्मात । शस्त्रें टाकुनी मल्लयुद्धा करित । आव्हान तो गणेशासी ॥१९॥
त्यास तेव्हां दाखवित । गणेश क्रोधसमन्वित । स्वानंदरुप अतुल असत । भीतीप्रद जें तेजस्वी ॥२०॥
अनंत आदि त्यांच्या समान । गजमुखायुक्त महान । ज्योतिगर्णांचे तेज संपूर्ण । सामावलें गणेशरुपीं ॥२१॥
योगरुपा त्या शांतिप्रदास । दैत्यराज धावे पकडण्यास । परी आकाशासम तें त्यास । हस्तगत न जाहले ॥२२॥
आश्चर्य त्याचें वाटून । दैत्येश झाला विहवल मन । अहो मीं हातीं पकडला असून । ढुंढी कैसा निसटलों? ॥२३॥
हें कौतुक काय असत । गणेश हा सनातन वाटत । ब्रह्माकार यात संदेह नसत । मारील मज हा निश्चयें ॥२४॥
गणेशानें शस्त्र करांत । धरलें त्यानें मी झालों हत । तरी धन्य जन्म माझा होत । धन्य पितरें आश्रमादिक ॥२५॥
शुकादी योग्यां योगानें प्राप्त । जें गणेशरुप साक्षात्‍ । तें विनासायास मज लाभत । धन्य मी एक सत्यार्थे ॥२६॥
ऐसा विचार करुन । गजासुर करी नमन । महाभक्तीनें पूर्ण मन । प्रार्थना करी त्या वेळीं ॥२७॥
ब्रह्मा ब्रह्मेशा मार मजसी । गणनायका मी शरण तुजसी । परी वर एक मिलवावयासी । आतुर असे मन माझें ॥२८॥
तुझ्या दर्शनापासून । संसारमुखीं न रमे मन । तुझ्या हांतून येता मरण । ब्रह्मभूत मी होईन ॥२९॥
ऐसी प्रार्थना करित । तेव्हां अंकुशें त्यास मारित । महादैत्या तेव्हां सायुज्य लाभत । गणेशाच्या कृपेनें ॥३०॥
शंकरादी देव मोहसंयुत । मुनीसीही न कळत । अद्‍भुत ऐसें तें वृत्त । भ्रांत झाले ते सर्व ॥३१॥
परी दैत्यासी मृत पाहून । हर्षित झाले ते देवगण । गणेशही मूळ रुप घेऊन । प्रकटला त्यांच्या पुढें ॥३२॥
पूर्वाकार त्यास पाहती । बहुविध स्तुति त्याची करिती । सुरर्षि भक्तियुत पूजिती । प्रणाम करिती पुनःपुन्हा ॥३३॥
गजवक्त्रासी पराशरसुतासी । गजानन सुरुपासी । वत्सलासुतासी व्यासभ्रात्यासी । शुकपितृव्यासी नमन ॥३४॥
अनादि गणनाथासी । स्वानंदवासी देवासी । रजोगुणें सृष्टिकर्त्यासी । सत्वगुणें पालका नमन असो ॥३५॥
तमोगुणें संहारकर्त्यासी । गणेशा तुज परमात्म्यासी । प्रकृति पुरुषरुपासी । बोधाकारा तुज नमन ॥३६॥
केवलासी स्वसंवेद्यासी । योगासी गणपदेवासी । शांतिरुपासी ब्रह्मनायकासी । विनायका नमन तुला ॥३७॥
वीरासी गजदैत्यशत्रूसी । मुनिमानस निष्ठासी । मुनिपालकासी देवरक्षकासी । विघ्नेशा तुज नमन असो ॥३८॥
वक्रतुंडासी धीरासी । एकदंतासी प्रभूसी । गजदैत्य संहारकर्त्यासी । प्रणाम आमुचा पुनः पुन्हा ॥३९॥
ब्रह्मांडी मृत्यभयरहित । होता जो गजासुर बलयुक्त । त्यातें मारुन जगांत । महा आश्चर्य दाखविलें ॥४०॥
दैत्याचा संहार करुन । आपण संतोषविलें जग संपूर्ण । स्वाहा स्वधायुत महान । स्वधर्म आता नांदेल ॥४१॥
ऐसें प्रार्थून गणाधीशास । देवर्षी सर्व प्रणामास । करुनिया शांतिभावास । विगज्वर ते धारण करिती ॥४२॥
कान धरुन हस्तांत । गणेश चरणीं शिर नमवित । त्याचा मधु ध्वनि होत । तेणें संतुष्ट गजानन ॥४३॥
त्यांसी म्हणे गजानन । माझे भक्त जे भावपूर्ण । त्यांनी करावें ऐसेंच नमन । यांत संशय न धरावा ॥४४॥
परम प्रीतीनें मी देईन । त्यांना मनोवांछित संपूर्ण । ऐसे बोलोनियां वचन । आनंदविलें त्या सर्वांसी ॥४५॥
नंतर सिद्धिबुद्धि संयुत । अंतर्धान पावला गणेश त्वरित । मुनीही जाती स्वस्थानाप्रत । परी गणेशपितरें दुःखमग्न ॥४६॥
पराशर पिता वत्सला माता । जेव्हां ऐकती ती वार्ता । स्वपुत्र अंतर्धान झाला असतां । शोकसागरीं बुडाले ॥४७॥
तेव्हां करुणामय गजानन । त्यांच्या चित्ताची व्यथा जाणून । योगशांतिमय ब्रह्मज्ञान । शाश्वत त्यांना उपदेशित ॥४८॥
माता पितरांसी गजानन । म्हणे माझी मूर्ति बनवून । ब्राह्मणांसह मंत्र जपून । स्थापना करा भक्तिभावें ॥४९॥
त्या मूर्तीची पूजा करावी । आदरें भक्तिभावें स्तुति गावी । देहभाव कल्पून ठसवावी । मूर्ति शांतिप्रद हृदयांत ॥५०॥
ऐसी मूर्ती पूजित । योगरुपधरा ती जगांत । वेळ घालवा तीस पाहत । सदा सुख जेणें होय ॥५१॥
ऐसें बोलून हृदयांत स्थित । गणेश अंतर्धान पावत । त्यानें सांगितलें तैसें करित । दक्षा, पराशर वत्सला ॥५२॥
अचला मूर्ति स्थापुली । सिद्धिदा जी जाहली । दर्शनमात्रे देती झाली । धर्मार्थ काम सर्वांसी ॥५३॥
दक्षा जें तुज सांगितलें । गजासुरवधाचें कथानक सगळें । गणनाथाचें माहात्म्य भलें । सुखप्रद सर्वपापहर ॥५४॥
जो नर हें कथानक वाचील । अथवा भक्तीनें ऐकेल । प्रजापते दक्षा त्यास लाभेल । भुक्तिमुक्ति निःसंशय ॥५५॥
ओमिति श्रीमन्दान्ये पुराणोनिषदि श्रीन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते गजासुरवधाख्यानं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP