मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६३

खंड २ - अध्याय ६३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा अन्य सांगत । प्रल्हाद असुर प्रेमें ऐकत । पुष्टिपतीचें भक्तिमुक्तीप्रद चरित । सर्व पापहर ऐक आतां ॥१॥
शकुनीचा पुत्र दुर्मती । दैत्य राजाचा महामानी अती । होता महापर्वतासमान कीर्ती । तेजःपुंज अत्यंत ॥२॥
शक्तीचें उग्र तप तो आचरित । नवाक्षर मंत्र प्रतापवंत । शुक्रप्रिय शिष्य जपत अविरत । एक सहस्त्र वर्षे तें ॥३॥
तेव्हां शक्ति झाली प्रसन्न । प्रकटली देण्या वरदान । भक्तमुख्यास म्हणे वचन । वर माग जो वांछित ॥४॥
त्यानें देवीची पूजा केली । आपुल्या माहात्म्ये जी विनटली । त्या पूजेनें प्रसन्न झाली । सर्वांपासून अभय देई तया ॥५॥
त्रैलोक्याचें राज्य देत । संग्रामीं विजय सतत । आरोग्य लाभेल उचित । वर दिला ऐसी देवीनें ॥६॥
नंतर ती सिंहवाहिनी जात । परत आपुल्या शक्तिलोकांत । इकडे तो दुर्मती दैत्य जिंकित । क्रमें सर्व चराचर ॥७॥
विष्णुमुख्य देव वनवासांत । राहूं लागले भीतिग्रस्त । शिवाच्या सन्निध शक्ति असत । महाखल तिजला त्रास देई ॥८॥
तो दैत्याधिप देवीस म्हणत । शिवास सोडून ये मज प्रत । माझी पत्नी होऊन सुखांत । रहा म्हणे तो महादुष्ट ॥९॥
शक्ति तेव्हा स्वलोक त्यजित । शिवासह अंतर्धान पावत । राहूं लागली वनवासांत । ऐसा काहीं काल गेला ॥१०॥
एकदां देवांच्या गुप्त स्थानांत । नारदमुनी येत हिंडत । शिवशक्तीस उपदेश करित । विघ्नराजाची उपासना ॥११॥
ही शुभ उपासना कराल । तरी गणेश्वर तुमचा पुत्र होईल । त्याचा आराधना विमल । करितां तारील दुर्मतीसी ॥१२॥
ऐसें सांगून नारद जात । शिवशक्ती उग्र तप करित । षोडशाक्षर मंत्र जपत । गणपतीचा वर्ष एक ॥१३॥
तेव्हां गणेश झाला प्रसन्न । वर देण्या करी आगमन । त्यास पुढती पाहून । नमिती चरणांबुज त्याचे ॥१४॥
हात जोडून त्यास स्तविती । गणनाथा तुजही प्रणती । गणांच्या पते तुज प्रीती । भक्तिप्रिया वंदन असो ॥१५॥
देवेशा भक्तांसी सुखकारका । स्वानंदनिवासा मोदकारका । सिद्धिबुद्धिवरा मोक्षकारका । नाभिशेषा ढुंढिराजा ॥१६॥
देवा वरद अभयहस्ता । परशुधरा अनामया सर्वपूज्या आतां । सगुणा विष्णु निर्गुणा तत्त्वतां । गजानना नमन तुला ॥१७॥
ब्रह्मवेत्त्यासी ब्रह्मदासी । ज्येष्ठा आदिपूज्य तुजसी । ज्येष्ठराजा नमन तुम्हांसी । हेरंबा तूंची तूंची अनादी ॥१८॥
जगताचा तूं माता पिता । विघ्नेश तैसा विघ्नकर्ता । स्वभक्तांसी विघ्नहर्ता । लंबोदरा नमन तुला ॥१९॥
तुझ्या भक्तियोगें योगीशा लाभत । परम शांती या विश्वांत । योगरुपा तुझें स्तवन वाटत । वर्णनातीत आम्हांसी ॥२०॥
आम्ही शिवशक्ती लीन । भावभक्तीनें करु अभिवादन । हया भक्तीनें हो प्रसन्न । ऐसें म्हणून प्रणाम करिती ॥२१॥
त्यास पाठवून प्रेमें वरती । महेश्वरा त्या म्हणे गणपति । आपण रचिलेलें स्तोत्र अती । भक्तिविवर्धक माझें हें ॥२२॥
वाचका श्रोत्यास सुखप्रद । पुत्रपौत्रादि भुक्ति मुक्तिप्रद । धनधान्यादी देई मोदप्रद । सर्व ईप्सित लाभ हयानें ॥२३॥
मी विभु झालों तोषित । तुमच्या भक्तिभावें चित्तांत । प्रसन्न झालों तुम्हांस देत । वरदान मनोवांछित जें ॥२४॥
शक्ति शिव त्यास प्रार्थित । प्रसन्न तूं आम्हांवर देत । तरी आमुचा होई सुत । तेणें कृतकृत्यता आम्हां ॥२५॥
तुझ्या पादपंकजीं दृढ भक्ति । देवा देई आम्हांप्रती । दुर्मतीस मारुन जगतीं । सुख पसरावें विघ्नेशा ॥२६॥
त्यांची प्रार्थना ऐकत । तथाऽस्तु ऐसें गणेश म्हणत । नंतर अंतर्धान पावत । शक्तिशिव संतुष्ट झाले ॥२७॥
एकदा पार्वती शंभू करित । वैशाख स्नानाचें व्रत पुनीत । हिमालयावर प्रिय जें असत । गणनाथासी अत्यंत ॥२८॥
भागीरथींत नित्य स्नान । नंतर दूर्वांदींनी पूजन । मृन्मय करुन । गणनाथा पूजिती भक्तीनें ॥२९॥
वैशाख पूर्णिमा शुभदिन । उषःकालीं करिती स्नान । मूर्ति मृन्मय बनवून । ध्यान करिती परमादरें ॥३०॥
हृदयीं ध्यान करुन । त्यांनी करिता आवाहन । गणाधीश स्वयं प्रवेशून । सजीव करी मृन्मय मूर्ति ॥३१॥
अचल मूर्ति चैतन्ययुत । चतुर्भुजधर गणराज प्रकटत । मातापितरांसी सांगत । पुत्र मी तुमचा निःसंशय ॥३२॥
वरदान प्रभावें तुमच्या तपानें । प्रसन्न झालों वैशाखस्नानानें । आतां संरक्षावें मज प्रेमानें । तुम्हीच माझी मातापिता ॥३३॥
नंतर प्रणाम करुन शक्तिसंयुत । शंकर अथर्वशीर्षे स्तवित । गणपति तेव्हां सुप्रीत । मायेनें मोहवी शक्तिशिवासी ॥३४॥
तीं उभयता संस्कार करिती । ब्राह्मणहस्तें जातकर्मादी करिती । झाली दोघे हर्षित चित्तीं । पुष्टी अर्पिती लक्ष्मीसुता ॥३५॥
विष्णु परम हर्षित । ज्याच्या घरीं पुष्टी अवतरत । लक्ष्मीची सुता म्हणोनि ख्यात । जाहली पत्नी गणेशाची ॥३६॥
एकदां तेथ आगमन करित । ग्रहोत्तम शनिदेव अकस्मात । गणेशासी त्या भार्येसहित । पहावया तो आला तें ॥३७॥
प्रल्हादा दैत्यनायका, करी अभिवादन । सस्त्रीका गणेशासी प्रसन्न । भक्तियुक्त तो म्हणे वचन । सर्वांसमक्ष मुक्त कंठें ॥३८॥
धन्य माझा जन्म विद्या । धन्य तपशक्ति जी आद्या । पत्नीसहित गजानना सर्वाद्या । दर्शन तुझें लाभलें ॥३९॥
तूं साक्षात्‍ योगरुप असत । पुष्टी पोषणकारिणी जगांत । विश्वंभरा महाशक्ति तुम्हांप्रत । पुनः पुन्हां नमन माझे ॥४०॥
एवढयांत स्वतः शक्ति येत । म्हणे त्या रविपुत्रासी प्रेमयुक्त । अरे गृहश्रेष्ठा शनिदेवा जगांत । सर्वत्र पहा तूं सम्यक्‌भावें ॥४१॥
तेव्हां तीस शनिदेव म्हणत । मानसीं जो अतिदुःखित । काय होतें त्याच्या मनांत । पुढिले अध्यायीं वर्णन तें ॥४२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‍मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते शनिसमागमो नाम त्रिषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP