मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय १४

खंड २ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ध्रुवाहून महर्लोक वरती । कोटि योजनें दूर वसती । कल्याधिकारी सुख भोगिती । तेथून वरती जनलोक ॥१॥
कोटि योचनें दूर जनलोक असत । सनकादी तेथ राहत । ते विमानातून संचार करित । जनलोकावरी तपोलोक ॥२॥
जनलोका हून कोटियोजनें दूर । तपोलोक तो सुंदर । वैराज देव भयरहित थोर । वसती तेथ श्रेष्ठ ते ॥३॥
सत्यलोक तपोलोकापासून । दूर असे कोटियोजन । अनुनर्भरुप ब्राह्मण । तेथ निवास करताती ॥४॥
तेथ लोकगुरुब्रह्मा । विश्वभाषण विश्वात्मा । योगामृतपान करी अभिरामा । योग्यांसहित सर्वदा ॥५॥
यती नैष्ठिक ब्रह्मचारी राहती । तेथ वृत्ति तापस असती । सिद्धयानक परमेष्ठी । योगिजनांचे द्वार ॥६॥
गणप श्रेष्ठाच्या लोकीं जाती । ते सत्यलोकातून प्रवेशती । ज्वालामाला समाकुल अती । वर्णन करण्या अशक्य ॥७॥
त्यांहून वरती निरालंब असत । विश्वरुप विवर्जित । सत्य लोकाच्या अंती व्यक्त । वैराटरुप उत्तम ॥८॥
पंचकोटियुत पूर्ण असत । त्याहून दशगुण मही वर्तन । ब्रह्माकारा ती ख्यात । पन्नास कोटी विस्तार युता ॥९॥
विधि लोकाहून दूर । दोन कोटी योजने निराधार । शक्तिलोक ज्योतिर्मय अपार । विराजतो शोभन ॥१०॥
तेजःपुंजमय त्या स्थानांत । महामाया समाश्रित । निष्काम शक्तिभक्त जात । योगीजन आनंदे ॥११॥
दहा हजार योजनें विस्तारात । जन संकुल आसमंत । महाभागा शक्ति तेथ संस्थित । स्वज्ञेनें पुरुष निर्मिति ॥१२॥
समरुपिणी त्या स्त्रीभावानें खेळती । जगन्मया पुरुष प्रीतीं । त्या स्थानाहून पुढती । चारकोटी योजनांवर ॥१३॥
सूर्यलोक पुरातन । तेजःपुंज रुप महान । निराधार त्या जागीं कामहीन । तेथ जाती निष्काम ते ॥१४॥
शुक्लकतीने महाभाग जात । अन्यही जे सूर्यभक्त । निष्काम भजनीरत । भानुतेज समप्रभ ॥१५॥
तेथ ते जाती सूर्यलोकांत । विस्तार शक्ति लोकसम असत । तेथ खेळे पुरुषाकार संस्थित । भानू तो प्रकाशमान ॥१६॥
आपुल्या वामांगातून निर्मिली । कर्ममयी माया प्रभूने भली । (संज्ञा) नाम ती लाभली । तिच्यासह रमला ब्रह्मपुरुष ॥१७॥
त्या सूर्यलोकाहून दूर स्थित । योजनकोटी अनंत असत । विष्णुलोक जो अनंदमयमूर्त । वैकुंठ परम विस्तर ॥१८॥
अयुत योजन विस्तार । ज्योतिरुपमय निराधार । तेथ जाती वैष्णव भक्तितत्पर । निष्कामं ते वैकुंठलोकीं ॥१९॥
सदा आनंद समायुक्त । नित्य सुखांत जनरत । नरनारी स्वेच्छागति विहरत । विष्णुलोकांत वैकुंठी ॥२०॥
वाम भागापासून । भोगलक्ष्मी निर्मून । दक्षिणांगापासून । मुक्तिलक्ष्मी निर्मिली ॥२१॥
त्या दोघींसह क्रीडा करित । सदानंदमय विष्णु साक्षात । परमधर्मवेत्ता स्वेच्छया खेळत । द्विविध माया निर्मूनी ॥२२॥
विष्णुलोकाहून सोळा कोटी योजनांवर । शंकरलोक कैलास दूर । परम अद्‌भुत जो निराधार । मोहहीन सुखप्रद ॥२३॥
निष्काम शिवभक्त तेथ जात । ज्योतिर्मय कल्याणदायक असत । ऐश्या त्या लोकांत । स्वयं शंभू निवास करी ॥२४॥
अयुत योजनांचा विस्तार । योगज्ञ तेथे क्रीडापर शंकर । वामांग त्याचें प्रकृति आकार । दक्षिणांग पुरुषाचें ॥२५॥
त्या दोघांच्या संयोगे जन्मत । दक्षा आनंद तो परि कीर्तित । नारायणमयी शक्ति असत । अर्धनारी नर शिव ॥२६॥
त्या देवाची ती शक्ति । त्रिधा केली शंकरें युक्ति । जगता आनंददायिनी ती । तिच्यासह खेळे महादेव ॥२७॥
मायाधार स्वलोकग मोहहीन । क्रीडारत तो शंकर पावन । पुढें त्या शिवलोकाहून । ब्रह्म स्वानंदसंज्ञ असे ॥२८॥
त्या ब्रह्म पदाहून पर । कांही नसे ह्या विश्वांत थोर । वेदादींत ख्यात अपार । स्वसंवेद्य तें ब्रह्म ॥२९॥
ते चार विश्व झालें । संयोग मात्रें तन्मयत्व पावलें । अव्यक्त शिव ब्रह्म निर्मोह कथिलें । त्याच्या सम वैष्णव ब्रह्म ॥३०॥
त्यापासून जें आत्मस्वरुप अमृत । तें सूर्याकार ख्यात । त्यापासून सन्मय होत । शक्तिरुपें संस्थित ॥३१॥
त्यांची अभेद संप्राप्ति । त्याची स्वानंद ऐसी कीर्ति । ऐशिया परी सर्व तत्त्वांती । स्व स्व आनंद वर्णिती ॥३२॥
ब्रह्मनानाविध वर्णितो । आकाशादी भेदें ख्याती । तेथ क्रमार्थ स्वमहिम्यांत स्थिति । आनंदाची जाहली ॥३३॥
अंती पूर्णत्व संपन्न । साक्षात गणपति महान । स्वानंद सर्व संयोग पावून । समाधीपूर्वी म्हणतात ॥३४॥
स्थानीं स्थानीं निजानंदांत । गणेश असे संस्थित । कलांशानें विहारार्थ वसत । सर्वांच्या सिद्धीसाठीं ॥३५॥
ऐसे जे ऊर्ध्वलोक कथिले । अति संक्षेपमात्रें तुज भले । ते ऐकता पावतील सगळे । इच्छित काम जगतांत ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते ऊर्ध्वस्थलोकवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP