मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६६

खंड २ - अध्याय ६६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । अगस्त्यमुनी राजांसहित । तैसाचि ब्राह्मण समवेत । वातापीच्या प्रांतांत । रमणीय ऐशा झणीं गेला ॥१॥
त्याचें कळता आगमन । वातापी अत्यंत हषित मन । करी तयासी अभिवादन । विनायान्वित प्रार्थी तया ॥२॥
वातापी म्हणे सुस्वागत । स्वामी तुमचें मी करित । माझें भाग्य झालें सुफलित । तुम्हां सर्वांच्या आगमनें ॥३॥
माझ्या पित्याचें श्राद्ध असत । आजची योगायोग अद्‌भुत । तुम्हां सर्वां निमंत्रण देत । श्राद्धान्न सेवन करण्यासी ॥४॥
अगस्त्य तें मान्य करित । वातापी प्रमुदित मनांत । इल्वला पशुरुप देत । मारुन तया पाकसिद्धि ॥५॥
विधिवत्‍ सवयीनुसार शिजवित । ब्राह्मणांसाठी भोजन त्वरित । अगस्त्याची पूजा करित । अनुयायांसह त्या वेळीं ॥६॥
त्या वेळीं अंगुष्ठानें भूमि खोदून । त्यांत एक खड्डा करुन । भरलें सर्व त्यांत अन्न । शिजविलें इल्वदेहापासून जें ॥७॥
तें पाहून दत्य विस्मित । कांहींच त्यास न बोलत । अन्य सर्वांसी वाढित । उत्तम सुग्रास भोजन ॥८॥
अगस्त्यें इल्वलशरीरान्न । सकल तेव्हां खाऊन । वैदिक मंत्र जपून । आपुलें उदर शुद्ध केलें ॥९॥
त्याच्या मंत्रप्रभावें चूर्ण होत । दैत्य पचविला क्षणार्धांत । तेव्हां अपानवायू सरत । धूळ उडे त्याच्या गतीनें ॥१०॥
मोठा आवाजही होत । सर्वही झाले विस्मित । मुखप्रक्षालना उठत । अगस्त्यमुनी तदनंतर ॥११॥
तेव्हां वातापी हाक मारित । पूर्ववत्‍ अनुजाप्रत । मुनिशार्दूल त्यास म्हणत । दैत्यपुंगवा तो मी पचविला ॥१२॥
माझ्या मंत्रप्रभावें जठरांत । जीर्णशीर्ण झाला क्षणांत । आता दुष्टा तुज वधीन त्वरित । ब्राह्मणहिंसका दैत्याधमा ॥१३॥
तें अगस्त्याचें वचन गंभीर । ऐकून पळाला वातापी असुर । भयभीत तो धावत दूर । अगस्त्य त्याचें राज्य घेई ॥१४॥
तेथ राजांसहित विप्रां स्थापून । स्वतः दैत्यनायिका मागून । पाठलाग करित जात उन्मन । वातापी शिरला समुद्रांत ॥१५॥
समुद्रासी शरण जात । त्या दैत्येंद्रा स्वजळांत । लपवून ठेवितां तयाप्रत । अगस्त्य बोलें रागानें ॥१६॥
म्हणे जलधे दैत्यास बाहेर । सोड अन्यथा शापजर्जर । करीन तुज तें भयातुर । समुद्र प्रार्थी तयासी ॥१७॥
हा स्वभाव माझा असत । जो जो शरण मजला येत । तयासी मी आश्रम देत । अनेक दैत्य पूर्वीं ॥१८॥
देवभयानें माझ्यांत । लपती तैसे पर्वत । परी अद्यापी मी न देत । क्षमा करी मी असमर्थ असे ॥१९॥
दयानिधे दैत्या सोडून । ममोदरी मुनिश्रेष्ठा जा परतून । मी तुजला करतों वंदन । ऐकून क्षोभला अगस्त्यमुनी ॥२०॥
हा महोदधी गर्व करीत । हयाचा मद मी हरीन निश्चित । ऐसा विचार करुनी जात । मुनी तो शरण विधात्यासी ॥२१॥
लोकनाथा त्या प्रणाम करित । त्या जगद्‌गुरुस विचारित । स्वामी वातापी द्विजहिंसारत । सांप्रत दडला सागरीं ॥२२॥
त्यासाठीं जलधी मदान्वित । शुष्क करावें हें इच्छित । त्याचा उपाय मजप्रत । सांगाव हो ब्रह्मदेवा ॥२३॥
तो मी यत्नें करीन । तूं सर्वज्ञ तुज सर्वज्ञान । सर्वांचा पितामह महान । ऐकून विधि त्यास म्हणे ॥२४॥
महाभागा हा सागर असत । गर्विष्ठ अधर्मरत निश्चित । अनेक दैत्यां रक्षण देत । तरी शरण जा गणपतीसी ॥२५॥
त्याचें शोषण करण्यास । तूं भजावें विघ्नेशास । तेव्हां अगस्त्य विचारी विधीस । देवां सोडून गणपा स्तवितां ॥२६॥
हें कैसें अघटित । गणेशाची कां प्रशंसा करित । तेव्हां ब्रह्मा प्रजापति तयास । कथा सांगे पापहारिणी ॥२७॥
विध्नकर्ता तथा विघ्नहर्ता । गणेश हाचि तत्त्वता । म्हणोनी विघ्नेश्वर नामें जगतां । विज्ञात असे हा जगदीश ॥२८॥
विघ्नें सत्तात्मक असत । त्यांचा स्वामी गणेश्वर जगांत । सर्व सत्ताधर पूर्ण वर्तत । म्हणोनि त्यास शरण जाई ॥२९॥
दुसरी गोष्त ऐक सुता । विनायकही श्रुतिवार्ता । नायकही सेविती त्या तत्त्वतां । स्वस्वकार्य सिद्धयर्थ ॥३०॥
नायक याचा कोणी नसत । म्हणोनी हा स्वाधीन जगांत । सकल अभीष्ट हा निर्मित । कलांशानें महामुने ॥३१॥
आपुल्या अधिकारसंयुक्त । कलांशज विभूती असत । समुद्र त्यांतला एक वर्तत । त्यास शोषण्या असमर्थ मीं ॥३२॥
हया विषयीं इतिहास पुरातन । सांगेन तुज जो संशयनाशन । गोलोकांत राधासहित भगवान । श्रीकृष्ण देवेश रहात होता ॥३३॥
देवेश सर्ववंद्य प्रतापवंत । सर्वांचा मदहंता अद्‌भुत । आमुचा पालक होऊन भगवंत । विघ्नहीन जीवित त्याचें ॥३४॥
तैसी राधा करी मदहरण । देवींचा ती मोहवी कृष्ण । स्वयं वंदनीय होऊन । विघ्नविवर्जित राहातसे ॥३५॥
त्रिपुरादी उग्र असुर । विघ्नें आणिती शिवादींस भयंकर । तेव्हां श्रीकृष्णाचा आश्रय आश्रय उदार । घेऊन रक्षण त्यांचें झालें ॥३६॥
अन्यां शरण देत म्हणून । श्रीकृष्ण करी गर्व महान । सतत मदयुक्त त्याचें मन । मीच ब्रह्म ऐसें म्हणे ॥३७॥
माझ्या आधारें जग चालत । माझ्यासम कोणी नसत । माझ्या अनुग्रहें सुरक्षित । शंभु प्रमुख देव सर्व ॥३८॥
देवांचे सर्व व्यवहार चालत । माझ्या कृपेनें अखंडित । म्हणोनी माझ्यासम अन्य नसत । त्रिभुवनांत कोणीही ॥३९॥
ऐसा गर्व मनीं धरुन । मदानें आकुल होऊन । राधाही मदवती महान । मुनिसत्तमा तें झाली ॥४०॥
तेव्हां विघ्नकर देव करित । विघ्न एक परम अद्‌भुत । स्वभक्ति दान करण्या प्रयत । शांति योगार्थ आदरानें ॥४१॥
एकदां श्रीकृष्ण आराम करित । राधेसहित वनमंडळांत । रतिक्रीडासमायुक्त । काम व्याकुळ जाहला तो ॥४२॥
तेथ त्याची नायिका स्मरत । विरजानामें प्रीतिप्रदा मनांत । तिची प्रार्थना ऐकता त्वरित । राधेस सोडून गेला झणीं ॥४३॥
विरजेसह क्रीडासक्त । इकडे राधा अत्यंत कुपित । रतिभंगानें ती जळत । समीपस्थ गोपींस म्हणतसे ॥४४॥
पाहिलात का महामानी । कृष्ण तो स्त्रीलंपटाग्रणी । सांगा त्याचा ठाव झणीं । त्यजीन मनें पतीसी मी ॥४५॥
तेव्हां गोपिका एक म्हणत । राधेसी तें विनयान्वित । विरजेच्या आश्रमांत । कृष्णासी मीं पाहिला ॥४६॥
ऐकता हा वृत्तान्त । क्रोधताम्राक्षी बैसून रथांत । बिरजेच्या आश्रमांत । गेली अन्य गोपींसह ॥४७॥
तिचें आगमन जाणून । श्रीकृष्ण अन्तर्धान । विरजा जलरुप घेऊन । भयभीत दडून राहिली ॥४८॥
राधा तेथ सर्वत्र शोधित । परी तिज पति ना दिसत । विरजेसह ना क्रीडा रत । म्हणोनि परतली स्वमंदिरीं ॥४९॥
राग तिचा अनिवार होत । तिकडे विरजा होती जलरुपांत । कृष्णही पुन्हां प्रकट होत । जलरुपांत खेळे तिच्यासंगे ॥५०॥
विरजेसह रतिक्रीडा करुन । चित्त तिचें तोषवून । घरीं जात परतून । दारांत राधा दिसली तया ॥५१॥
राधा करी निर्भर्त्सना । म्हणे स्त्रीलंपटा काय कामना । नाहीं मिळाली कां अन्य ललना । म्हणोनि येसी मजसमीप ॥५२॥
आतां जा त्या विरजेप्रत । मी तुज ना स्पर्शू इच्छित । माझ्या सत्तेनें हा लोक रचित । सोडून जाई गोलोक ॥५३॥
जेथ तुज रुचि असेल । तेथ जाई तूं खल । ऐश्या विविध वाक्यें अमंगल । राधिका बोले स्वपतीसी ॥५४॥
शाप देई क्रोधसंयुक्त । मृत्युलोकीं हो पतित । त्यास शाप मिळे हें ज्ञात । गोपनायका श्रीदाम्यासी ॥५५॥
श्रीदामा निर्भर्त्सना करित । राधेची तो कृष्णाश्रित । कृष्णामित्र प्रतापयुक्त । तीही त्यास शाप देई ॥५६॥
अरे तूं असुर होशील । माझा शाप तुझ बाधेल । शाप ऐकून श्रीदामाविमल । क्रोधें शापी राधेला ॥५७॥
राधें तूं मर्त्यनारी होशील । कृष्णवियोगे पावशील । शंभर वर्षे भोगशील । विरहदुःख निःसंशय ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते कृष्णराधाशावर्णनं नाम षट्‌षष्टि तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP