मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६४

खंड २ - अध्याय ६४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । प्रल्हाद म्हणे गृत्समदाप्रत । शनिदेव कां होता दुःखित । रविपुत्राचें त्या चरित्र समस्त । सांगा सविस्तर मजलागीं ॥१॥
गृत्समद म्हणे सर्व वृत्तान्त । सांगता संदेह दूर होत । शनि म्हणे शक्तीप्रत । ऐक महामाये माझी व्यथा ॥२॥
एकदा मीं गृहांत । सूर्यपूजनीं ध्यानीं स्थित । रात्रीं माझी पत्नी येत । मजजवळीं शृंगार करुनी ॥३॥
सुंदर वस्त्रें लेऊन । भूषणें अनुपम घालून । सुविव्हला म्हणे वचन । ऋतुदान देई पतिराजा ॥४॥
पहा मी सर्व शृंगार करुन । पतिदेवा आलें आशा धरुन । उपभोग देऊन तोषवी मन । रतिसुखासम अन्य नसे ॥५॥
परी मी होतों ध्यानयुक्त । माझ्या प्रियेसी न पाहत । वाट पाहून दोन मुहूर्त । शापिलें तिनें मज रागानें ॥६॥
मी जाहलें कामासक्त अत्यंत । विफल केलास ऋतु समस्त । म्हणोनी तूं ज्यावरी दृष्टि टाकित । नष्ट तें होईल ऐसा शाप ॥७॥
तदनंतर परत जात । माझी पत्नी स्वकक्षांत । तेव्हांपासून पाहण्या न धजत । मनापासून मी कोठे ॥८॥
त्याचें तें दोन वचन ऐकून । जगदंबा शनिदेवा हो प्रसन्न । ढुंढीस पाहे तूं भक्तियुक्तमन । तेणें सर्व शुभ होईल ॥९॥
शक्तीचे वचन मानून । गणेशाचे केलें अवलोकन । पत्नीसहित होता गजानन । सर्वांग सुंदर रमणीय ॥१०॥
शनीच्या दुष्टीने आश्चर्य घडत । गणेशाचे मस्तक होत । अन्तर्धान अकस्मात । हाहाकार माजला ॥११॥
परी मुहूर्त मात्र उलटत । तें पुनरपि मस्तकयुक्त । सर्वावयव सुंदर विराजत । पूर्वींसम श्रीगजानन ॥१२॥
हर्षयुक्त सर्व करिती स्तवन । शनिग्रहही करी भजन । म्हणे गणनाथा तुला नमन । पुष्टिकांता विश्वंभरा ॥१३॥
सर्वादिपूज्या तूं पुष्टिदाता । सत्तारुपेण दिससी जगता । पुष्टी ही सर्वांची माता । पुष्टिकारिणी सर्वदा ॥१४॥
गणनायका अपराध केला । म्हणोनि मागत क्षमा या वेळां । मी पुत्रासम आपणाला । प्रार्थितों द्विरदानना तुला ॥१५॥
तूं योगरुप सनातन । किती करुं मीं तुझें वर्णन । वेदादींस योग्यांसीही स्तवन । अशक्य जाहलें आपुलें ॥१६॥
परी बुद्धीप्रामाण्यें स्तविती । महेश्वर तुज जगतीं । मीही स्तवितो भावभक्तीं । बुद्धिकांता सिद्धिनाथा ॥१७॥
ब्रह्मपतें हेरंबा तुज नमन । सगुणा सरुपा अभिवादन । निर्गुणा गजरुपा वंदन । उभय योगा शांतिरुपा ॥१८॥
पुन्नामनरकांतून त्राता । म्हणोनि शिवपुत्र तूं तत्त्वतां । गणेशा गुज एकदंता । नमन माझें वारंवार ॥१९॥
सिद्धि माया वामांगांत । धी निवसते दक्षिणांगांत । त्यांच्या संयोगें अभेदहोत । तो प्रत्यक्ष तुझ्या स्वरुपीं ॥२०॥
ऐसी स्तुति करित । शनिदेव होत रोमांचित । साष्टांग करी प्रणिपात । भक्तिभावें संपूर्ण ॥२१॥
त्यास वरती उठवीत । गणाधीस शनैश्चरा म्हणत । वर माग जो चित्तीं वर्तत । पुरवीन त्वरित रविपुत्रा ॥२२॥
तूं रचिलेलें स्तोत्र पावन । वाचेल वा ऐकेल जो नर प्रसन्न । त्यासी सर्व इच्छित लाभून । अन्तीं मिळे दृढ भक्ति माझी ॥२३॥
तेव्हां त्या गणनाथा म्हणत । रविनंदन तो विनत । तुझी भक्ति दृढ व्हावी मनांत । पत्नीचा शाप दूर करी ॥२४॥
असुरेश्वरा प्रल्हादा गणराज सांगत । सूर्यनंदना तुझ्या चित्तांत । माझी भक्ति सदैव नांदत । ऐसें वरदान देत असें ॥२५॥
शापमुक्त तूं होशील । क्रूर दृष्टीनें पाहता विलय । अन्यथा सामान्य दृष्टीचें भय । कोणासही न बाधेल ॥२६॥
नंतर विष्णूसमीप जात । प्रणाम करुन विनवीत । भानुपत्र तो शनिदेव विनत । गणेशउपासना देई मजला ॥२७॥
विष्णु तया रविपुत्रा सांगत । गणेश कवचादिक समस्त । गणेशगीतासार कथित । एकाक्षर मंत्र गणेशाचा ॥२८॥
विष्णूस वंदन करुन परतत । शनैश्चर गणेशयोग आचरित । गाणपत्य जाहला अद्‌भुत । ऐसा बहुत काळ लोटला ॥२९॥
एकदा गणेश भावयुक्त । शिवशंकरा प्रश्न करित । ताता देवदेवेशांसहित । मुनींसह वनवास कां तुमचा? ॥३०॥
शंकर आनंदून उत्तर देत । दुर्मती नामा असुर असत । त्यानें जिंकिलें जग समस्त । ब्रह्मांडाधिपती तो झाला ॥३१॥
शक्तीच्या वरदानें लाभत । सकल ऐश्वर्य तयाप्रत । आमुचें वैभव हरण करित । दीन झालों देव मुनी ॥३२॥
शिवाचें वचन ऐकून । गजानन क्रोधें बोले वचन । हितकारक आशाजनन । मी तुमचा पुत्र झालों ॥३३॥
आतां दुर्लभ काय तुम्हांप्रत । त्या महादैत्या मारीन त्वरित । पहा माझें पौरुष अद्‌भुत । ऐसें आश्वासन देऊन ॥३४॥
गजानन सज्ज झाला । मूषकावरी आरुढला । दैत्यनायका जिंकण्या निघाला । देव मुनी त्या अनुसरती ॥३५॥
नगर प्रांतभागीं जात । तेथ आपुला तंबू ठोकित । विष्णूसी दैत्यांकडे पाठवित । दूत योग्य जाणोनि तया ॥३६॥
तो दुर्मतीस जाऊन भेटत । युक्तीनें त्यांस संबोधित । स्वानंदवासी गणेश जगांत । अवतरला आहे सांप्रत ॥३७॥
शिवें तप केलें घोर । ब्रह्मनायक घेई अवतार । जाहला शक्तिशिवांचा पुत्र । पुष्टीपति तो जगदीश्वर ॥३८॥
तुज बोध करण्या पाठवित । दुर्मते तोचि मला तुजप्रत । देवांचा द्वेष सोडून त्वरित । जावें तूं पाताळ लोकीं ॥३९॥
स्वस्वधर्मरत लोक होवोत । भयभीतीनें सर्व मुक्त । ऐसें ऐकता जनार्दना वदत । दूत तूं म्हणोनी न मारीन तुला ॥४०॥
कोण हा स्वानंदपति सांप्रत । देवांचा करी पक्षपात । त्यास ठार मारीन अविलंबित । सांग ऐसें त्या गजानना ॥४१॥
नंतर विष्णु परत येत । दुर्मतीचा संदेश सांगत । तो ऐकून अत्यंत । क्रोधयुक्त विघ्नेश्वर ॥४२॥
मूषकारुढ होऊन । करीं शस्त्रें तीक्ष्ण घेऊन । चालला करण्या हनन । तत्क्षणीं दुर्मती दैत्याचें ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते विष्णुदौत्यवर्णनं नाम चतुषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP