मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ४९

खंड २ - अध्याय ४९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । गृत्समद पुढे सांगत । विष्णूसहित शंभू जात । सर्व देवगणही रणस्थलाप्रत । तारकासुरासी शमवाया ॥१॥
शिवास पाहून क्रोधसंयुक्त । तारक बोलला गर्वयुक्त । अरे सदाशिवा रणांगणांत । कशास तूं आलास? ॥२॥
सिंहासह ससा लढेल हें कैसें शक्य होईल? । मदासुराचा दास मारील । महासंहारका तुज झणीं ॥३॥
तारकासुराचे तें वचन । ऐकतां शंभू क्रोधायमान । त्रिशूलें करी तारकाचें हनन । भग्नवृक्षापरीं पडला तो ॥४॥
नंतर सुदर्शन चक्र सोडून । केशव मारी दैत्य महान । दैत्य पळाले भयभीत मन । हाहाकार सारे करिती ॥५॥
देवांचा पराक्रम पाहत । बाण त्रिपुर शंख ससैन्य येत । शंख वाजवून कोलाहल करित । युद्धभूमीवरी तदा ॥६॥
जैसे वर्षाकाळीं घन वर्षती । तैसे ते शस्त्रें सोडितो । देव दैत्यांचे विनाशकार अती । अद्‌भुत युद्ध जुंपलें ॥७॥
बाण सूर्यास शंख विष्णूसी । त्रिपुर ललकारी रुद्रासे । अन्य शेकडों परस्परांसी । आव्हान देती दैत्य देव ॥८॥
अद्‌भुत युद्ध पुनरपी झालें । देवमुख्य रणीं पडले । दानवांनी देवांवरी टाकले । वृक्ष तैसे पर्वतही ॥९॥
दैत्यांचे बल उत्कृष्ट जाणून देव करिती परम यत्न । तीन दिवस युद्ध दारुण । देवसैन्याचा नाश बहुत ॥१०॥
शंभू त्रिपुरासुर लढत । गदायुद्ध त्यांचें रंगत । पराक्रमी ते परस्परासी हाणित । भयानक होतें दृश्य तें ॥११॥
अंतीं त्रिशूलघात करित । शंभू तें दैत्य मूर्च्छित । ज्वालेनें रवी बाणासी पाडित । निश्चेष्ट तें रणभूवरी ॥१२॥
चक्रानें विष्णू संमर्दित । शंकासुरासी युद्धांत । त्या दैत्यमुख्यांस धरुन टाकता । अमर तेव्हां विवरांत ॥१३॥
पाशांनी तयां बांधून टाकितो । पुन्हा उत्पातभीती हरिती । कितेक असुर रणभूमीवरती । मरुन पडले असंख्यात ॥१४॥
तेव्हां जे दैत्य उरले । ते देवांसी शरण आले । विजय मिळतां हर्षित झाले । देवेंद्र जयजयकार करिती ॥१५॥
तेव्हां मदासुर जणून वृत्तान्त । संरक्तनयन रणांगणाप्रत । शुक्रासह लढण्या जात । आपुल्या तीन तनयांसह ॥१६॥
धनप्रिय पुत्र संग्रामांत । सूर्यास बाणांनी विद्ध करित । त्रैलोक्यप्रकाशका रवीस म्हणत । गर्वसहित त्या वेळीं ॥१७॥
अरे दुष्ट सूर्या वचन । माझें हितकारक ऐकून । युद्धांतून करी तूं पलायन । अन्यथा वृथा मरशील ॥१८॥
पूर्वीं तूं दैत्य वधिले बहुत । त्याचें फळ भोग आता त्वरित । अरे काश्यपा शरण ये मजप्रत । महादुष्टा अन्यथा न जगशील ॥१९॥
तेव्हां खड्‌ग उगारुन । सूर्ये धनप्रियाचें केलें ताडन । मूर्च्छित क्षणभर पडून । पुन्हां सावध तो झाला ॥२०॥
तो दैत्यपुत्र वेगसमन्वित । सूर्यावरी खड्‌ग आघात करित । त्या दृढाघातें पतित । मूर्च्छा येऊन सूर्यदेव ॥२१॥
त्यास धरुन विजयी परतत । धनप्रिय आपुल्या गृहाप्रत । पित्यास प्रणाम करुन टाकित । पाशबद्ध सूर्या विवरांत ॥२२॥
अन्य जो मदासुराचा सुत । विलासी नामें प्रख्यात । तो विष्णूवरी बाण सोडित । घेरुन दारुण वचन बोले ॥२३॥
अरे विष्णू माझी सेना । तिची केलीस तू दैना । दैत्यवर पकडिले नाना । त्यासमयीं मी नव्हतों तिथे ॥२४॥
आतां शस्त्रघातें तुज वधीन । मृत्युभुवनासी तुज पाठविन । विष्णु ते ऐकतां क्रोधयुक्त मन । चक्र सोडी तयावरी ॥२५॥
चक्राघातें मूर्च्छित । क्षणभरी पडला रणांत । परी पुनरपी सावध होत । विलासी तो पराक्रमी ॥२६॥
विष्णूस गदेनें मारित । तेव्हां गरुडावरुनी पडत । हरी जेव्हा युद्धांत । त्यास पकडून परते तो ॥२७॥
स्वगृहा परतून पित्यास वंदित । पाशांनी विष्णूस बांधित । विवरांत टाकून देत । दैत्य गर्जना घोर करिती ॥२८॥
लोलुप नामक तिसरा सुत । तो शंकरासह लढत । वृषभध्वजा ललकारित । म्हणे ऐक तूं नीललोहिता ॥२९॥
पूर्वी माझी अतुल सेना । युद्धांत पाडिली करुन हनना । त्याचें फळ देऊन कामना । पुरवीन आता तुझी मीं ॥३०॥
ऐसें लोलुप बरळत । तेव्हां शंकर त्रिशूल मारित । त्या आघातें पडत । क्षणभरी लोलुप मूर्च्छित ॥३१॥
शुक्र वेगे तेथ धावत । सावध करी त्यास क्षणांत । सर्व देव मोहक माया निर्मित । लोलुप तेव्हां रणभूवरी ॥३२॥
अकस्मात सर्वत्र अग्नी पसरला । तो सर्वांस जाळूं लागला । नानाशस्त्रधर देवगण पावला । नग्नता तैसाची शूलपाणी ॥३३॥
शंकर विस्मित होत । देवांचा संहार पहात । मानसीं होऊन भयभीत । मायामोहित जाहला ॥३४॥
सर्वत्र पसरला जलधी होता । त्यांत शंकरही मारिता । कर्मे तपोरुपें हे तत्त्वता । घडता लोलुप परतला ॥३५॥
शंकर बुडाला माया समुद्रांत । हा वृत्तान्त पित्यासी सांगत । मदासुर प्रेमयुक्त । पाशें बांधिलें सदाशिवासी ॥३६॥
टाकून दिलें विवरांत । तेव्हां सर्वलोलुप  लोलुप प्रमुदित । हाहाकार करुन जात । जगदंबेसी देव शरण ॥३७॥
दैत्येंद्र मेघासम गर्जती । अनेक जयवाद्यें वाजविती । जयजयकाराची घुमती । गीतें तेव्हां असुरसदनीं ॥३८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते शिवादिदेवपराजयो नामैकोनपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP