मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ८

खंड २ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ऐशा प्रकारें योगभूमींत । दत्त नाना चेष्टायुत । दक्षा अवधूत नामें ख्यात । ऐसें मुद्‌गल सांगती ॥१॥
कधी गाईसम खाती । कधी पक्षांसम आहार करिती । मलमूत्रादि विसर्जिती । सहजावस्थेंत अत्रिसुत ॥२॥
व्यक्ताव्यक्तादीं नाना ब्रह्मसंस्थित । योगानेंही न जाहला शांत । तेव्हां आपुल्या पितरांसी भेटत । प्रणाम करुनी उभा राहे ॥३॥
अत्रिमुनी योगीजन वृंदांत । साक्षात्‍ ब्रह्ममय विलसित । कर जोडोनि त्यांना प्रार्थित । भक्तिभावें दत्तयोगी ॥४॥
अत्रीनें त्यांचा सत्कार केला । योग्य आसनीं बैसविला । तेव्हा विनयानें बोलला । आपुल्या जनका ब्रह्मपुत्रासी ॥५॥
स्वामी नानाविध ब्रह्म साधलें । उपाधीरहित झालों योग बळें । उपाधि निरुपाधी सोडून भावबळें । साम्यांत स्थित मीं जाहलों ॥६॥
तें सोडून तुर्यावस्थेत । सहजची मी झालों स्थित । तेथ स्वाधीनत्व पाहत । परि शांतिविहीन मीं जाहलो ॥७॥
सहज स्थितीहून जें अतीत । तें ब्रह्म योगानें न लाभत । म्हणोनी शांतियोग मजप्रत । महामुने सांगावा ॥८॥
दत्ताचें वचन ऐकून । महातपस्वी अत्रि प्रसन्न । शांतीचें रहस्य करी कथन । आपुल्या पुत्रासी आदरें ॥९॥
ऐक पुत्रा सांगेन । शांतियोग तुज सनातन । ब्रह्मदेवें केला कथन । मजसीं जेणें शांत झालों ॥१०॥
गणपति आमुचा कुलदेव । शिवादि देवांचाही तो कुलदेव । शांतियोग स्वरुप अपूर्व । त्यास जाण तू महामते ॥११॥
प्रयत्नपूर्वक त्याचें भजन । करशील जरी मन लावून । तरी शांती तुज लाभून । गणेशकृपा होईल ॥१२॥
गणेशापासून सर्व उत्पन्न । त्यानेंच केलें संस्थापन । त्याच्या आराधनमात्रें करुन । कृतकृत्य शिवादी देव ॥१३॥
नाम रुपात्मक जें असत । तें सर्व जगत्‍ ब्रह्म ख्यात । जें शक्ति रुपाख्य असत । तें ब्रह्म असत्‍ रुपक ॥१४॥
अमृतमय सौर ब्रह्म संस्थित । आत्माकारें तें सद्‌रुप होत । ऐसें वेदांत असे प्रकीर्तित । ब्रह्म द्विविध जाण तूं ॥१५॥
त्यांच्या अभेदें सर्वत्र संस्थित । ब्रह्म समभावें जगतांत । सत्‌ असत्‌मय विष्णु असत । ऐसे वेद सांगती ॥१६॥
त्याहून विलक्षण तुर्य रुप । नेति ऐसे त्याचें स्वरुप । निर्मोह शिवसंज्ञ निष्पाप । स्वाधीन ब्रह्म त्या म्हणती ॥१७॥
चार ब्रह्मांचा योग होत । त्यास बुधजन स्वानंद म्हणत । तोच मायामय साक्षात‍ । गणेश ऐसें वेदज्ञ म्हणती ॥१८॥
अंतर्बाह्य सर्व क्रिया होत । ब्रह्माकार ती दिसत । कर्मयोग त्यांसी म्हणत । कर्माचा संयोग होतां ॥१९॥
ज्ञानात्म चक्षूनें ज्ञान । योगीयांसी जें लाभें पावन । त्यांचा अभेद होता योग उत्पन्न । ज्ञानयोग नाम त्याचें ॥२०॥
ज्ञान कर्मांचा अभेद । तोच जाणावा योग अभेद । आनंदात्मक रुप विशद । द्वैध नाश होतां लाभे ॥२१॥
स्वेच्छेनें कर्मयोग आचरित । अथवा ज्ञानयोग तैसा आनंदयोगरत । ह्या तिघांसही त्यागित । तेव्हां सहज स्थिति म्हणती ॥२२॥
सदा स्वाधीन रुप असत । स्वेच्छेनें स्वतः खेळत । ब्रह्म भूतात्मक योग ज्ञात । स्वानंद ऐसें नाव त्याचें ॥२३॥
तेथ लाभे स्वाधीनता । नसे पराधीनतेची वार्ता । ब्रह्मांत ब्रह्मभूत होतां । उत्थान नसे स्वरुपांत ॥२४॥
स्वानंदांत संयोग होत । जगतांचा ब्रह्मांचा अभेदयुक्त । म्हणोनि माया समन्वित । ऐसा हा योग असे ॥२५॥
परे अयोगात्मक जो योग । त्यांत नसे असला संयोग । जग ब्रह्मांचा प्रवेश मग । त्यांत कैसा होईल ॥२६॥
सदा मायारहित योग । भेदहीन स्वसंवेद्य विवर्जित निरंग । ऐसा हा निवृत्ति योग । योगीजन धारण करिती ॥२७॥
ब्रह्म ब्रह्मांत संस्थित । तेचि करी गतागत । स्वानंद नाश होता लाभत । ब्रह्मभूय अयोग ॥२८॥
ब्रह्मस्वानंदवासी । ज्ञानी वणिती गणेशासी । परी स्वानंदात्मक त्यासी । वेदज्ञांनी व वर्णिला ॥२९॥
घराचा मालक घरांत राहतो । परी तो स्वतः घर न होतो । तैसा गणेश स्वानंदी राहतो । परी तो स्वानंदाहून भिन्न ॥३०॥
क्रीडात्मक गणेश ख्यात । स्वानंद ऐसा जगतांत । संयोगात्मक रुपें वसत । स्वस्वरुपीं देव तो ॥३१॥
क्रीडाहीन गणेश । योगरुप तो ईश । निरानंद तो परमेश । सदा ब्रह्मांत संस्थित ॥३२॥
संयोग अयोग नाश पावत । तेव्हां त्यासी गणेश्वर म्हणत । शांति योगात्मक प्रख्यात । योगी त्यासी सेविती ॥३३॥
पूर्ण योगात्मक गणेश असत । मायाविहीन भरांतिवर्जित । पंचचित्त स्वरुपा बुद्धि असत । ऐसें जाण पुत्रा तूं ॥३४॥
सिद्धि भ्रांतिदा मोहकरी असत । मोहरुपिणी भिन्न दिसत । धर्मार्थ काम मोक्षांत । ब्रह्मभूयमयी सिद्धि ॥३५॥
पंचधा चित्तवृत्ति जी असत । तेथ झालें जें बिंबित । तेंच गजराजाचें रुप विलसत । बिंबात्मक परम रुप ॥३६॥
धर्म अर्थ काम मोक्षांत । ब्रह्मभूतांत जें स्मृत । ऐसें पंचविध ऐश्वर्य असत । प्राणी लालसी जेथ भुलती ॥३७॥
पंव ऐश्वर्यांत जें बिंब विलसत । तेंच गणेशाचें जीवरुप होत । शांतियोग सेवनें जगांत । जाणावें त्यां पुत्रा तूं ॥३८॥
पंचचित्तें नष्ट होत । पंचऐश्वर्ये लय पावत । तेव्हां गणराज तूंच निश्चित । होशील यांत न संदेह ॥३९॥
म्हणोनि अवधूत मार्ग त्यागावा । मुख्य अवधूत सत्यार्थे बरवा । चित्त ऐश्वर्य त्याग करावा । शांती लाभार्थ दत्ता तूं ॥४०॥
गणेशाचा महामंत्र देत । अत्र तेव्हां दत्ताप्रत । एकाक्षर मंत्र तो पुनीत । दत्त करी जप त्याचा ॥४१॥
साक्षात विष्णू स्वरुप जो असत । योगिश्रेष्ठ श्रीदत्त । गंगेच्या दक्षिणतीरीं पूजित । विघ्नहर्त्या गजाननासी ॥४२॥
भूमि स्वरुप सोडून । शांतीचा आश्रय घेऊन । भावबळें करी पूजन । हृदयांत चिंतन गणेशाचें ॥४३॥
शौनका एक वर्ष पूजन केलें । दत्तानें गणेश तप आचरिलें । शांतीचे निधान तें लाभलें । गाणपत्य तो जाहला ॥४४॥
आपुल्या भक्तासी भेटण्या जात । गणपति तेव्हां प्रसन्न चित्त । भक्तवात्सल्यें तो युक्त । सुख शांतिपूर्ण आश्रमीं ॥४५॥
त्यांसीं पाहुनी त्वरित उठत । ओंजळ जोडून प्रणाम करित । सुस्थिर होऊन स्तवन करित । कुलदैवत विघ्नेशाचें ॥४६॥
गणपतीसी योगस्वरुपासी । योग्यांसी योगदात्यासी । शांतियोगात्मकासी । गणेशासी नमन असो ॥४७॥
सिद्धिबुद्धिपतीसी । पंचचित्त धारकासी । नाना विहारशीलासी । सिद्धिदात्यासी नमन असो ॥४८॥
नाना ऐश्वर्य दायकासी । मोहकर्त्यासी मोहहर्त्यासी । स्वानंदवासे हेरंबासी । नमन असो पुनः पुनः ॥४९॥
संयोग अभेद धारकासी । नाना मायाविहारासी । विघ्नेशासी सांख्यासी । ब्रह्मनिष्ठासी नमन असो ॥५०॥
बोधहीनासी बुद्धिमंतासी । सर्वरुपासी देहदेहमयासी । बोधासा स्वतः उत्थानरुपासी । प्रकृतिप्रलयासी नमन असो ॥५१॥
साहंकारासी देवासी । जगदीशासी बिंदुरुपासी । जगत्‍ रुपासी नादात्मकासी । गुणेशा तुला नमन असो ॥५२॥
महतासी नानावेष धारकासी । सृष्टिकर्त्या ब्रह्मयासी । पालनकर्त्या हरीसी । नाना देहधारका नमन ॥५३॥
संहारकर्त्या शंकरासी । कर्माकारा भानूसी । क्रिया मूर्ति शक्तीसी । देव मानवरुपा नमन ॥५४॥
नागासुर मयासी । ढुंढिराजासी स्थावरासी । जंगमासी जगत्‍ रुपासी । ब्रह्मरुपा नमन तुला ॥५५॥
गणाधीशा तूं योगाकारें स्थित । वेदादीही समर्थ नसत । तुझी स्तुति करण्या जगांत । तरी काय बळ माझें ॥५६॥
तुझ्या चरणकमलांचे दर्शन झाले । धन्य माझें कुळ झालें । धन्य विद्या तप आगळें । माता पितरें धन्य झालीं ॥५७॥
ऐसें बोलून करी नर्तन । भक्तिभावें भरलें मन । रोमांचशरीरीं फुलून । आनंदाश्रू ओघळले ॥५८॥
तेव्हां निजकरीं त्यास धरुन । गणनाथ देई आलिंगन । परम अद्‌भुत बोले वचन । महायोग्यासी त्या वेळीं ॥५९॥
दत्ता धन्य तूं झालासी । योगींद्र ऐसी पदवी तुजसी । माझ्या अनुग्रहें पावसी । पूर्ण अचल शांति सदा ॥६०॥
महामुने तुझ्या चित्तांत । कदापि भेद उत्पन्न न होत । तुझ्या प्रीतीच्या संवर्धनांत । येथ निश्चल मी राहीन ॥६१॥
गणेशज्ञानाचा महिमा ऐकिला । अत्रिमुखांतून तूं मला । साक्षात्‍कार कर या क्षेत्राला । विज्ञानक्षेत्र हें नाम लाभो ॥६२॥
विज्ञान गणपती नामें ख्यात । दत्ता मीं होईन जगांत । दर्शनें शांतिप्रदाता निश्चित । होईन माननीया इथे ॥६३॥
येथें जे निवास करतील । माझ्या भक्तिभावें अचल । ते शांतियोग पावतील । माझ्या मृपाप्रसादें ॥६४॥
पूर्वी शंकरे तप केलें । साक्षात्‍ ज्ञान तयासी झालें । विज्ञानेश्वर नाम दिधलें । शंकरासी मींच येथें ॥६५॥
त्याच्या सन्निध राहून । केलेंसी ज्ञान प्रसाधन । शंकराचें मित्रत्व लाभून । धन्य झालासी अनुग्रहें ॥६६॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र होईल । योग शांतिप्रद सफल । वाचितां ऐकतां ब्रह्मभूय विमल । सर्वसिद्धिप्रदायक ॥६७॥
धर्म अर्थ काम मोक्ष मिळेल । सर्वांसी ज्ञानही विमल । जो हें स्तोत्र नित्य वाचील । कल्याण त्याचें होईल ॥६८॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले भक्तवत्सल गजानन । दत्त खिन्न होऊन । विमनस्कपणें ध्यान करी ॥६९॥
तेव्हां गणपति कृपा करीत । आपुला आत्मा तेथ समर्पित । योग अभेदानें होत । आत्म निवेदक त्या वेळीं ॥७०॥
गणेश स्वामी, दत्त भक्त । हा संबंध होत नष्ट । स्वामी तोचि सेवक होत । सेवक स्वामी जाहला ॥७१॥
ऐसी आत्मनिवेदन भक्ती । गणेशाची साधिली जगतीं । शांतियोग प्रयत्नें चित्तीं । दत्तात्रेय प्रभूनें ॥७२॥
इतुक्यांत तेथ प्रकटत । विज्ञानेश्वर शंकर अकस्मात । दत्तासी आलिंगन देत । म्हणे महाभागा तूं मित्र माझा ॥७३॥
येथें गणेशासी तूं आराधिले । योगसेवेनें तोषविलें । एकाक्षर मंत्रें ध्यान केलें । म्हणोनी मज प्रिय वाटतोसी ॥७४॥
नंतर दत्तासी पुढें करुन । अन्य ब्राह्मणांसहित जाऊन । गंगेच्या दक्षिण तटींपावन । शंकर स्थापी गणेशमूर्ती ॥७५॥
विज्ञान गणराज ऐसें नाम । महर्षि द्ती त्यासी अनुपम । क्षेत्र तें त्यावेळेपासून । प्रसिद्ध झालें गणेशाचें ॥७६॥
विज्ञानक्षेत्र तें ख्यात । सर्वसिद्धिकर जगांत । यात्रा करिता पुण्यवंत । इच्छित फल लाभती ॥७७॥
ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीस । शंकर स्थापितो तेथें गणनायकास । म्हणोनि त्या दिवशीं महोत्सव विशेष । गणेशभक्त तेथ करिती ॥७८॥
त्या क्षेत्रीं योगीजन । देव गंधर्व सिद्ध नाग महान । सेविती तें क्षेत्र पावन । भक्तिभावें प्रतिवर्षी ॥७९॥
हें दत्ताचें माहात्म्य ऐकती । किंवा भक्तिभावें जे वाचिती । त्यांसी सर्वसिद्धि प्राप्त होती । निःसंशय जगतांत ॥८०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते दत्तचरितं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP