मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|
अध्याय ६८

खंड २ - अध्याय ६८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ऐशी रम्य कथा ऐकून । ब्रह्मदेवा अभिवादन करुन । म्हणे सर्वतत्त्वज्ञां संतुष्ट मन । जाहलें रहस्य ऐकून ॥१॥
ऐसा हा जो गणेश असत । त्याचें ज्ञान कैसें प्राप्त । तें दयासिंघो मजप्रत । सांगा जेणें दुःखनाश ॥२॥
तेव्हां पितामह त्यास सांगत । गणेश उपासना विधियुक्त । भक्तिपूर्ण परम अद्‌भुत । ऐक योगात्मकज्ञान ॥३॥
जें ऐकतां होशील । गाणपत्य तूं विमल । देह देहिमय ब्रह्म अमल । स्वतः उत्थानवाचक जें ॥४॥
बोधरुप त्यासी जाण उत्तम । सांख्य ज्यासी म्हणती ब्रह्म । बोधहीन स्वभावें परम । स्वसुखस्थित लाभशील ॥५॥
बोधयुक्त बोधहीन । त्यांच्या योगें स्वसंवेद्य होऊन । सर्व संयोगकारक जाणून । योग सेवेनें सर्वदा ॥६॥
त्याचे पांच भेद ख्यात । ते ऐक महामते तू विनीत । भेदरुप असत्य शक्तिवाचक वर्तत । सत्यरुप भानुमय ॥७॥
आत्माकार तो ज्ञात । जाण तो भेदादिवर्जित । त्यांचा संयोग जो करित । तो विष्णु आनंद नामा ॥८॥
समात्मक ब्रह्म सुखद परम । तिघांचा नेति कर्ता शंकर अभिराम । अव्यक्त ब्रह्म परम । मोहवर्जित तो जाण ॥९॥
त्रिविध भेद मोहयुक्त । चतुर्थ तुरीय मोहवर्जित । त्यांचा संयोग लाभत । पाचवा तें स्वानंद ॥१०॥
स्वसंवेद्याहून पर नसत । ब्रह्म संयोगधारक जगांत । सर्वत्र तो निजानंद असत । स्वानंदांत सकल तो ॥११॥
अयोगवाचक ब्रह्म परम । निजानंदाहून उत्तम । संयोगहीन भावें अनुत्तम । लाभतो यांत ना संशय ॥१२॥
संयोग अयोग उभयतांचा नाश होत । तेव्हां शांतियोग प्रस्थापित । तो शांतियोग मूर्तिमंत । गणनाथ हा ब्रह्मनायक ॥१३॥
गकार संयोग ख्यात । णकारा योग असत । त्यांचा स्वामी वेदांत । वर्णिला असे ब्रह्मपति ॥१४॥
त्याची आराधना करी । सौख्य तेणें प्राप्त करी । कृष्ण चतुर्थीस तूं आचरी । संकष्टीचतुर्थी व्रत ॥१५॥
गजाननाचें हृदयीं ध्यान । करितां होईल चित्त पावन । समुद्राचा गर्व हरुन । मन शांत होईल ॥१६॥
आता ताता तपोवनांत । तू जाई तपास त्वरित । मीं आपुला व्यवसाय करित । ऐसें ब्रह्मा सांगत ॥१७॥
ब्रह्मास नमस्कार करुन । अगस्त्य तपोवनीं जाऊन । षडक्षर मंत्राचा जप करुन । विघ्नेशा त्यानें तोषविले ॥१८॥
सदा ध्यानरत तप आचरित । संकष्टी चतुर्थी व्रत करित । तीन मास ऐसें जाता एकदंत । तुष्ट जाहला भक्तीनें ॥१९॥
कृष्ण पंचमीस अगस्त्य ऐकत । आकशवाणी सुखप्रद नितान्त । अगस्त्या जाई तूं त्वरित । विघ्नेशा स्मरुन सागर प्यावा ॥२०॥
समुद्रांत लपला वातापी असुर । त्यास तूं मारावें ठार । तपाचें तेज तुझ्या उग्र । विघेश्वर मीं प्रसन्न असें ॥२१॥
ती आकाशवाणी ऐकत । अगस्त्य झाला हर्षभरित । जाऊन तत्क्षणीं सागराप्रत । गणेशासी मनीं घ्याई ॥२२॥
शोषून सर्व सागरजळा । वातापीस दाखवी आपुल्या बळा । जाळून टाकी त्या दुष्टा खळा । विप्रघाती वंचकासी ॥२३॥
तेव्हां देवगण सारे स्तवित । दैत्य अन्य जे तेथ असत । लपलेले सागरकुक्षीत । त्यांसी मारिती आयुधांनी ॥२४॥
पुन्हां गंगाप्रवाह आणून । सागर भरिला जळें पुष्कळ द्रव्य घेऊन परतत । आपुल्या घरीं आनंदानें ॥२५॥
तदनंतर वातापीच्या नगरांत । राजांसह अगस्त्य जात । पुष्कळ द्रव्य घेऊन परतत । आपुल्या घरीं आनंदानें ॥२६॥
लोपामुद्रेस तोषवित । धन देऊन काम पुरवीत । नंतर मग्न झाला तपांत । गणेश मंत्राचा जप करी ॥२७॥
पंचविध चित्त जिंकून । योगींद्र तो योगसेवेंत मग्न । महायशा त्या शांतिलाभ होऊन । मयुर क्षेत्रांत प्रवेश करी ॥२८॥
त्या मयूरक्षेत्रांत । गणेशा पूजित हर्षसमन्वित । ऐसा हा पुष्टिपतीचा महिमा तुजप्रत । संक्षेपानें सांगितला ॥२९॥
ही पुष्टिपतीची कथा वाचील । अथवा जो ही ऐकेल । त्याच्या हस्तगत होईल । इच्छित समस्त सर्वदा ॥३०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदन्तचरिते पुष्टिपतिचरितं नामाष्टाषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP