TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
८४१.
आकाराचे सुख निराकारी नये । निराकारी काय पाहसील ॥१॥
पाहसील सुख सुखामागे दुःख । शोक आवश्यक आंगी वाजे ॥२॥
आंगी वाजे शोक एकादिये वेळे । सुख सर्वकाळ सगुणाचे ॥३॥
सगुणाचे सुख नासोनी जाईल । सगुण होईल नाही ऐसे ॥४॥
नाही एक ऐसे निर्गुण दिसते । रोकडेचि तेथे काही नाही ॥५॥
कांही नाही ऐसे आहे घनदाट । सर्वांचा शेवट परब्रह्म ॥६॥
परब्रह्म येरी पाहतां दिसेना । ये ना अनुमाना कांही केल्या ॥७॥
कांही केल्या नव्हे पाषाणाचे सोने । तैसे हे अज्ञाने जाणिजेना ॥८॥
जाणिजेना जंव निज परब्रह्म । तंव कैसा भ्रम जाऊं पाहे ॥९॥
जाऊं पाहे ब्मन ब्रह्मासी पहाया । तंव तेथे माया दिसतसे ॥१०॥
दिसतसे माया तया निगुरियासी । येरव्ही मायेसी ठाव कैंचा ॥११॥
कैंचा ठाव माया तया ज्ञानियासी । रामीरामदासी संतसंगे ॥१२॥

८४२.
देहबुद्धि बहु काळाची जुनाट । नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥
सार्थकाची वाट भ्रांतीने लोपली । जवळी चुकली असोनीयां ॥२॥
असोनियां देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळे ॥३॥
मायाजाळ दृश्य सुटे एकसरे । जरी मनी धरे सस्वरुप ॥४॥
स्वरुपनिश्चये समाधान होय । रामदासी सोय स्वरुपाची ॥५॥

८४३.
शौच्य केला तेणे शुचिर्भूत जाला । जळस्नाने केला मळ त्याग ॥१॥
मळत्यागे जाले शरीर निर्मळ । अंतरीचा मळ कैसा जातो ॥२॥
कैसा जातो काम लोभ आणि दंभ । नांदती स्वयंभ अंतर्यामी ॥३॥
अंतर्यामी आधी होईजे निर्मळ । तेणे तुटे मूळ संसारीचे ॥४॥
संसारीचे मूळ सूक्ष्मी गुंतले । मन विगुंतले विभ्रमासी ॥५॥
विभ्रमासी बरे शोधुनी पहावे । अंतरी राहावे निष्ठावंत ॥६॥
निष्ठावंत ज्ञान पूर्ण समाधान । मग संध्यास्नान सफळित ॥७॥
सफळित संध्या संदेह नसतां । निःसंदेह होतां समाधान जाले ॥८॥
समाधान नाही स्नानसंध्या काई । लौकिकाचे ठायी लोककाज ॥९॥
लोकलाज सर्व लौकिकचि केला । देव दुरावला वरपंगे ॥१०॥
वरपंगे देव कदां सांपडेना । निष्ठेचा घडेना भक्तिभाव ॥११॥
भक्ति ते मावेची भाव तो जायाचा । कर्म लौकिकाचा खटाटोप ॥१२॥
खटाटोपे कदां देव पाविजेना । निश्चयो घडेना शाश्वताचा ॥१३॥
शाश्वताचा शोध अंतरी असतां । सर्वहि पाहातां निरर्थक ॥१४॥
निरर्थक तीर्थे निरर्थक व्रते । दास म्हणे जेथे ज्ञान नाही ॥१५॥

८४४.
पिंपळाची भक्ति केल्या नव्हे मुक्ति । उगेचि फिरती दुराशेने ॥१॥
दुराशेची फेरी घेती नानापरी । कामना अंतरी धरुनियां ॥२॥
धरुनियां भाव मायिकाची माव । तेणे मुख्य देव अंतरला ॥३॥
अंतरला देव असोनी अंतरी । दंभ लोकाचारी लोकलाज ॥४॥
लोकलाज कांही शेवट करीना । जन्म चुकवीना दास म्हणे ॥५॥

८४५.
संशयाचे कर्म संशयी पडिला । तो कोणे सोडिला ज्ञानेविण ॥१॥
ज्ञानेविण देव कैंचा ठायी पडे । अज्ञाने बापुडे गुंडाळले ॥२॥
गुंडाळले सर्व लौकिक करितां । लौकिक पाहतां उद्धरेना ॥३॥
उद्धरीना लोक हा कोणी कोणासी । व्यर्थचि देवासी अंतरावे ॥४॥
अंतरावे व्हावे बहुतां आधीन । बहुतांचे मन राखवेना ॥५॥
राखवेना मन या बहु जनांचे । आणि सज्जनाचे वर्म चुके ॥६॥
वर्म चुके कर्म आडवेंचि आले । नाही ओळखिले आत्मयासी ॥७॥
आत्मयासि जाणे तोचि एक भला । संसारी सुटला विवेकाने ॥८॥
विवेकाने लाभ पावावा आपुला । लौकिके देवाला सोडूं नये ॥९॥
सोडूं नये ज्ञान सगुणभजन । भक्ति निवेदन वोळखावी ॥१०॥
वोळखावी भक्ति सायुज्यता मुक्ति । येणे होय गति दास म्हणे ॥११॥

८४६.
नाम घेतां रामरुप ठायी पडे । गुज ते सांपडे योगियांचे ॥१॥
योगियांचे गुज सर्वांठायी असे । परी ते न दिसे ज्ञानेविण ॥२॥
ज्ञानेविण योग ज्ञानेविण याग । ज्ञानेविण त्याग वाउगाचि ॥३॥
वाउगाचि धर्म वाउगेचि कर्म । गर्बगीत वर्म बोलीयेली ॥४॥
बोलियेली वर्म ज्ञान हे सार्थक । येर निरर्थक सर्व धर्म ॥५॥
सर्व धर्म त्यागी मज शरण येईं । अष्टादशध्यायी बोलियेले ॥६॥
बोलियेले ज्ञान आगमी निगमी । ज्ञानेविण ऊर्मि निरसेना ॥७॥
निरसेना ऊर्मि आत्मज्ञानेविण । ज्ञानाचे लक्षण निरुपण ॥८॥
निरुपणी ज्ञान अंतरी प्रकाशे । विवेके निरासे मायाजाळ ॥९॥
मायाजाळी जन आत्मज्ञानी जाले दास म्हणे गेले सुटोनीयां ॥१०॥

८४७.
सरस्वती विद्या लक्ष्मी अविद्या । द्याह्यातीत आद्या सस्वरुप ॥१॥
स्वरुपी लक्ष्मी नाही सरस्वती । संपत्ति विपत्ति दोन्ही नाही ॥२॥
नाही शिवशक्ति नाही नरनारी । अंतरीचा हरी दास म्हणे ॥३॥

८४८.
हिरीयाचे पोटी मांदुसाच्या कोटी । सुवर्णाचे ताटी कांचखंडे ॥१॥
कांचखंडे हेमी तैसे दृश्य रामी । स्वरुप विश्रामी श्रम माया ॥२॥
माया हे असार वस्तु आहे सार । पाहिला निर्धार रामदासी ॥३॥

८४९.
माया हे असार वस्तु आहे सार । कळे हा विचार साधुसंगे ॥१॥
साधुसंगे संग भंगे साधकांचा । सिद्ध साधकांचा होत आहे ॥२॥
होतसे साधक बरे विवरितां । विवेके थिरतां परब्रह्मी ॥३॥
परब्रह्मी माया पाहतां दिसेना । येर निरसेना कांही केल्या ॥४॥
कांही केल्या तरी कांही होत नाही । आत्मज्ञाने पाही दास म्हणे ॥५॥

८५०.
नमूं वागेश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्न करी वक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचे लक्षण सांगा स्वामी ॥२॥
सांगा स्वामी आत्म कैसा तो परमात्मा । बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणे केला संच । मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या । कैसे आहे आद्याचे स्वरुप ॥५॥
स्वरुप ते माया कैसी मूळमाया । ईस चाळवाया कोण आहे ॥६॥
आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य । समाधान अन्य ते कवण ॥७॥
कवण जन्मला कोणा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तो कवण ॥८॥
कवण जाणता कोणाची हे सत्ता । मोक्ष हा तत्त्वतां कोण सांग ॥९॥
सांग ब्रह्मखूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्न केले ऐसे ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:29:31.1930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

car-type chain conveyor

  • गाडी शृंखला वाही 
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.