TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
८७३.
संतसंगे मज काय प्राप्त जाले । सांगतो वहिले तुजपाशी ॥१॥
मंत्र हा तारक रामनाम एक । गुज हरादिक चिंतिताती ॥२॥
ज्ञाने समाधान सगुणाचे ध्यान । निर्गुण अभिन्न आपणचि ॥३॥
दृश्य-आवाहन दृश्य-विसर्जन । तेथे पिंडज्ञान आढळेना ॥४॥
उपासना हरी मुद्रा अगोचरी । सिद्धासनावरी समाधान ॥५॥
पंचीकर्ण पिंडब्रह्मांड आवर्ण । साक्ष तो आपण वेगळाचि ॥६॥
जीवशिवऐक्य जाले येणे रीती । प्रकृतीच्या प्रांती द्वैत कैचे ॥७॥
अष्ट देह स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह जाण महाकारण ॥८॥
विराट हिरण्य आणि अव्याकृती । आठवा प्रकृती मूळमाया ॥९॥
एक तत्त्व जाणा त्याचे नांव भक्ति । जाणावी विरक्ती संतसंगे ॥१०॥
सायुज्यता मुक्ति तेचि ते अचळ । साधकाचे मूळ गुरुदास्य ॥११॥
गुरुदास्ये चुके संसारयातना । अनुभवी खुणा जाणतील ॥१२॥
अनुभवेंविण जाण सर्व सीण । निरसले प्रश्न दास म्हणे ॥१३॥

८७४.
संताचे संगती काय प्राप्त होते । ते आतां निरुते सांगईन ॥१॥
सांगईन परी मानसी धरावे । मग उद्धरावे संवसारी ॥२॥
संवसारी सार जया नाश नाही । तेंचि पडे ठायी संतसंगे ॥३॥
संगे तुटे जननीजठर । दुस्तर संसार मायाजाळ ॥४॥
मायाजाळ तुटे तरी देव भेटे । संतसंगे आटे भवसिंधु ॥५॥
भव भयानक बुडवी सकळां । त्याहुनी वेगळा संतसंग ॥६॥
संतसंगे साधे असाध्य वस्तूसी । जेथे अहंतेसी ठाव नाही ॥७॥
ठाव नाही जेथे जावया इतरां । अभाविका नरा पापबुद्धि ॥८॥
पापबुद्धि झडे संतांचे संगती । नाही अधोगती गर्भवास ॥९॥
गर्भवास संतसंगे मुक्त होय । वेगी धरी सोय आलया रे ॥१०॥
आलया संसारी स्वहित विचारी । येक भावे धरी संतसंग ॥११॥
संतसंग धरी धन्य तो संसारी । बोलिले श्रीहरी भगवती ॥१२॥
भागवत गीता सार निरुपण । त्याचे विवरण संतसंगे ॥१३॥
संतसंगे कळे सर्व शास्त्रभाग । आणि ज्ञानयोग अप्रयासे ॥१४॥
प्रयासे साधीतां कदां नये हातां । ते लाभे तत्वता साधुसंगे ॥१५॥
साधुचेनि संगे अलभ्याचा लाभ । मुक्ती हे सुल्लभ होत आहे ॥१६॥
आहे एक देव परी तो कळेना । जयासी मिळेना संतसंग ॥१७॥
संतसंग नाही जयालागी जनी । तया कां जननी प्रसवली ॥१८॥
प्रसवली माता सीणचि उरला । पुत्र नाही जाला हरिभक्त ॥१९॥
हरीभक्त नर वंशाचे मंडण । दोषाचे खंडण करीतसे ॥२०॥
करितसे भक्ती संताचे संगती । सायोज्यता मुक्ती पावावया ॥२१॥
पावावया मुक्ती हरीचे भजन । श्रवण मनन सर्वकाळ ॥२२॥
सर्वकाळ होय सार्थक श्रवणे । ब्रह्मनिरुपणे संतसंगे ॥२३॥
संतसंगे ब्रह्मपद ओळखावे । विवेके पावावे निरंजना ॥२४॥
निरंजना जातां नाही जनवन । अंत्राळी गमन एकाएकीं ॥२५॥
एकाएकीं देव निर्मळ निश्चळ । आतुडे प्रांजळ दुजेवीण ॥२६॥
दुजेवीण देव एकला एकटा । उभा घनदाट मागे पुढे ॥२७॥
मागे पुढे सर्व देवांचा नायक । सांपडे विवेक जालीयाने ॥२८॥
जालीयाने कृपा संतसज्जनांची । मग विवेकाची वाट फुटे ॥२९॥
वाट अवघड पाहतां दिसेना । जेथे नाही मना समागम ॥३०॥
समागमे जातां वाटचि फुटेना । संशयो तुटेना बहुविध ॥३१॥
बहुविध पंथ कोण तो धरावा । दुजेपणे देवा पाविजेना ॥३२॥
पाविजेना देव संतसंगेवीण । मार्ग हा कठीण विवेकाचा ॥३३॥
विवेकाचा मार्ग विवेके चालावा । मनाचा त्यागावा सर्व संग ॥३४॥
संग याग करी पावसी श्रीहरी । परी एक धरी संतसंग ॥३५॥
संतसंगेवीण त्याग हा घडेना । श्रीहरी पडेना कदा ठायी ॥३६॥
ठाव सज्जनांचा सज्जन जाणती । तेथे नाही गती मीपणाची ॥३७॥
मीपणाची गती संगाचे लक्षण । ठाउकी हे खूण सज्जनासी ॥३८॥
सज्जनाचे वर्म सज्जना आतुडे । इतरां कुवाडे मायाजाळ ॥३९॥
मायाजाळ पाहो जातां आडळेना । सर्वथा कळेना न पाहातां ॥४०॥
पाहातां संसार माईक वेव्हार । परी निरंतर लागलासे ॥४१॥
लागला दिसेना परी निरसेना । माईक वासना साच जाली ॥४२॥
साच जाली असे विवेके निरसे । निरसोनि वसे जवळीच ॥४३॥
जवळीच आहे अंतरी चोरटा । आतां कोणे वाटा धांवसील ॥४४॥
धांवसील परी वासना सरेना । सर्वथा मरेना साधुवीण ॥४५॥
साधुविणे प्राणी पडती आटणी । तपी तीर्थाटणी नाना कर्मी ॥४६॥
नाना कर्मी देव चुकोनी राहीला । सज्जनी पाहिला अनुभवे ॥४७॥
अनुभव सर्व देही वेगळाले । कोण जाणे भले संतजन ॥४८॥
संतजन कोणेपरी ओळखावे । कैसे ते जाणावे संतजन ॥४९॥
संतांची वोळखी साधु वोळखेल । येर भांबावेल मायाधारी ॥५०॥
मायाधारी प्राणी जवळी चुकले । नाही ओळखीले संतजन ॥५१॥
संतजन कोण कैसी ओळखण । तेंचि निरुपण सांगीतले ॥५२॥
सांगितले आहे मागे थोरथोरी । तेंचि अवधारी आलया रे ॥५३॥
आलया रे साधु जाणावा कवणे । तयाची लक्षणे असंख्याते ॥५४॥
असंख्याते परी ओळखीकारणे । साधु धूर्तपणे सारिखाचि ॥५५॥
सारिखाचि दिसे जनाचिये परी । परी तो अंतरी वेगळाचि ॥५६॥
वेगळाचि ज्ञाने पूर्ण समाधाने । सस्वरुपी मने वस्ती केली ॥५७॥
वस्ती केली मने निर्गुणी सर्वदा । मीपणे आपदा तयां नाही ॥५८॥
तयां नाही काम तयां नाहीं क्रोध । जया नाही खेद स्वार्थबुद्धि ॥५९॥
बुद्धि निश्चयाची स्वरुपी जयाची । कल्पना ठायींची निर्विकल्प ॥६०॥
निर्विकल्प मद मत्सर सारिलां । आणि संव्हारिला लोभ दंभ ॥६१॥
दंभ हा लोकिकी विवेके सारीला । दुरी ओसंडीला अहंकार ॥६२॥
अहंकार नाही दुराशा अंतरी । ममता हे दुरी मोकलीली ॥६३॥
मोकलीली भ्रांती शरीर संपत्ती । वैभवी संतती लोलंगता ॥६४॥
लोलंगता नसे ज्ञाने धालेपण । ऐसी हे लक्षणे सज्जनांची ॥६५॥
सज्जनलक्षणे सांगेन पुढती । अर्थी चित्तवृत्ती लांचावली ॥६६॥
लांचावली वृत्ती सज्जनसांगता । होय सार्थकता जयांचेनि ॥६७॥
जयांचेनी ज्ञाने तरती अज्ञाने । साधु समाधाने समाधानी ॥६८॥
समाधान शांती क्षमा आणि दया । रंका आणि राया सारिखाची ॥६९॥
सारिखाचि बोध तेथे नाही खेद । सर्वांसी अभेद सर्व काळ ॥७०॥
सर्वकाळ गेला श्रवणमनने । सत्क्रिया भजने हरिभक्ति ॥७१॥
हरिभक्ती करी जन तरावया । स्वधर्म विलया जाऊं नेदी ॥७२॥
जाऊं नेदी भक्ती जाऊं नेदी ज्ञान । अनुतापी मन निरंतर ॥७३॥
निरंतर भाव सगुणभजन । येणे बहुजन उद्धरती ॥७४॥
उद्धरती जन करितां साधन । क्रियेचे बंधन आचरतां ॥७५॥
आचरतां साधु जनां होय बोधु । लागतसे वेधु भक्तिभावे ॥७६॥
भक्तिभावे देवप्रतिष्ठापूजन । कथा निरुपण महोत्साव ॥७७॥
महोत्साव साधु भक्तिचे लक्षण । करी तीर्थाटण आदरेसी ॥७८॥
आदरेसी विधी करणे उपाधी । लोकिकी सुबुद्धी लागावया ॥७९॥
लागावया भावे सत्क्रियाभजन । करी तो सज्जन मुक्तिदाता ॥८०॥
मुक्तिदाता साधु तोचि तो जाणावा । जेणे संपादावा लोकाचार ॥८१॥
लोकाचार करी तो जनां उद्धरी । ज्ञाता अनाचारी कामा नये ॥८२॥
नये नये निंदूं जनी जनार्दन । म्हणोनि सज्जन क्रियावंत ॥८३॥
क्रियावंत साधु विरक्त विवेकी । तोचि तो लोकिकी मान्य आहे ॥८४॥
मान्यता सत्क्रिया लौकिकी सोडील । तोचि उद्धरेल जन नाही ॥८५॥
जना नाही मान्य तो सर्व अमान्य । म्हणोनियां धन्य क्रियावंत ॥८६॥
क्रियाभ्रष्ट तेणे लोकिकां सोडावे । आणि बसवावे ब्रह्मारण्य ॥८७॥
ब्रह्मारण्य सेवी तो साधु एकला । जनां नाही आला उपेगासी ॥८८॥
उपेगासी येणे जनां पूर्णपणे । तयाची लक्षणे निरोपिली ॥८९॥
निरोपिली येणे लक्षणे जाणावा । साधु ओळखावा मुमुक्षाने ॥९०॥
मुमुक्षाने गुरु क्रियाभ्रष्ट केला । तरी अंतरला दोही पक्षी ॥९१॥
दोही पक्षी शुद्ध तया ज्ञानबोध । येर ते अबद्ध अनाचारी ॥९२॥
अनाचार करी कोण आहे जनी । परी निरुपणी बोलिजे ते ॥९३॥
बोलिजे साचार सत्य निरुपणी । घडे ते करणी सुखे करुं ॥९४॥
करुं नये कदां मिथ्या निरुपण । करितां दूषण लागो पाहे ॥९५॥
पाहे पाहे बापा सत्य ते शोधूनी । ठाकेना म्हणोनि निंदूं नको ॥९६॥
निंदूं नको शास्त्र निंदूं नको वेद । तरीच स्वानंद पावसील ॥९७॥
पावसील राम जिवाचा विश्राम । अहंतेचा श्रम सांडितांचि ॥९८॥
सांडितां विवेके मिथ्या अभिमान । तरी समाधान पावसील ॥९९॥
पावसील गती शुद्ध निरुपणे । रामदास म्हणे क्षमा करी ॥१००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:33:32.0930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे

  • अंधळ्यापुढें पुष्कळ रडलें तरी त्यास दिसत नसल्यामुळें तें व्यर्थच. आपल्या डोळ्यास मात्र इजा व्हावयाची. तेव्हां ज्या परिश्रमांचें फल मिळावयाचें नाहीं किंवा जेथें याचना करुन कांहीं प्राप्ति व्हावयाची नाहीं तेथें निष्फळ श्रम करण्यांत कांहीं अर्थ नाहीं. 
RANDOM WORD

Did you know?

How do I contact you?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site