TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


भक्तिपर अभंग

५०२ .

ऐसे आत्मज्ञान उद्धरी जगासी । पाहेना तयासी काय करुं ॥१॥

काय करुं जन विवरेना । नेणतां सरेना जन्ममृत्यु ॥२॥

जन्ममृत्यु बाधी मानीना तयासी । कल्पतरु ज्यासी तुच्छ वाटे ॥३॥

तुच्छ वाटे देव तोंचि तो निर्दैव । तयासी सदैव कोण करी ॥४॥

कोण करी एका राघवावांचूनी । राम धरा मनी सर्वकाळ ॥५॥

सर्वकाळ गेला दरिद्र भोगितां । वैराग्य पाहतां तेथे नाही ॥६॥

नाही भक्ति ज्ञान परमार्थाचे सुख । संसारिही दुःख दरिद्राचे ॥७॥

दरिद्राचे दुःख केले देशधडी । रामराज्यगुढी उभविली ॥८॥

उभविली गुढी भक्तिपंथे जावे । शीघ्रचि पावावे समाधान ॥९॥

समाधान रामीरामदास जाले । सार्थकाने केले सार्थकचि ॥१०॥

५०३ .

ॐ नमो अनंता तूंचि मातापिता । तुझी गर्व सत्ता तूंचि एक ॥१॥

तूंचि एक निश्चय मानसी । जालिया मुक्तिसी काय उणे ॥२॥

काय उणे मुक्ति जया घडे भक्ति । संसारी विरक्ति सर्वकाळ ॥३॥

सर्वकाळ जया श्रवणी आवडी । साधका तांतडी तुझी देवा ॥४॥

तुझी देवा चाड त्यासी नाम गोड । पुरे सर्व कोड रामदासी ॥५॥

५०४ .

माझे मनी सर्व सुख व्हावे तुज । म्हणोनियां गुज सांगतसे ॥१॥

सांगतसे हीत त्वां जीवी धरावे । भजन करावे राघवाचे ॥२॥

राघवाचे प्रेम ते करी विश्राम । येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥

जाण बा वचन हे माझे प्रमाण । असो द्यावी चित्ती दास म्हणे ॥४॥

५०५ .

कौल जाला रघुनाथाचा । मेळा मिळाला संतांचा ॥ध्रु०॥

अहंभाव वरपेकरी । बळे घातला बाहेरी ॥१॥

क्षेत्री मंत्री विवेक जाला । क्रोध देशोधडी केला ॥२॥

काम देहींच कोंडिला । लोभ दंभ नागविला ॥३॥

मदमत्सर पीडिला । अहंकार बुडविला ॥४॥

कृत्रिमपण पळाले । उभेंचि अज्ञान गळाले ॥५॥

फितवेकर होता भेद । त्याचा केला शिरच्छेद ॥६॥

तिरस्कार दावेदार । त्यास बोधे केला मार ॥७॥

मन चोरटे धरिले । नित्यनेमे जंजिरले ॥८॥

आळस साक्षेपे घेतला । पायी धरुनि आपटिला ॥९॥

दुश्चितपण अकस्मात । त्याचा निरुपणे केला घात ॥१०॥

कपट मैद सांपडले । उभे सर्वांगी तोडिले ॥११॥

बंड पाषांड लुटिले । बळेंचि धरोनि कुटिले ॥१२॥

द्वेष बांधोनि पाडिला । खेद खणोनि ताडिला ॥१३॥

गर्व ताठा विटंविला । वाद विवेके झोडिला ॥१४॥

जेणे भावार्थ उडविला । धरुनि भावार्थ बुडविला ॥१५॥

करुनि अभावाचा नाश । राहे रामीरामदास ॥१६॥

५०६ .

विचारे संसार होतो देशधडी । सोनियाची घडी जात आहे ॥१॥

डावा तास गेला मोक्षपंथे जातां । विवेक तत्त्वत याचे नांव ॥२॥

सदा श्रीरामाचे भजन करितां । दास म्हणे चिंता दुरी होय ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-24T09:43:18.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शह राखणें

  • दाबांत ठेवणें. ‘ बरकड अवघे एकत्र होऊन गनिमाचा शह राखोन स्वामीस संतोषानें पाववणें.’ -शारो. ७. 
RANDOM WORD

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.