TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
७६६.
जे जे कांही दिसे ते ते सर्व नासे । सर्वातीत असे परब्रह्म ॥१॥
परब्रह्म आहे सर्व विस्तारले । आकारासी आले तेंचि एक ॥२॥
तेंचि एक कैसे आकारा येईल । कल्पांती नासेल सर्व कांही ॥३॥
सर्व कांही जीव आणि किडा मुंगी । ब्रह्म राजयोगी बोलताती ॥४॥
बोलताती ब्रह्म कल्पनेवेगळे । श्रुतीसी नाकळे पार ज्याचा ॥५॥
पार ज्याचा कळे सज्जनसंगती । सर्व ब्रह्म श्रुति बोलतसे ॥६॥
बोलतसे श्रुति दृश्य नाशिवंत । स्वरुप ते संत सर्वकाळ ॥७॥
सर्वकाळ गेला संदेही पडतां । दृश्य सांडूं जातां सांडवेना ॥८॥
सांडवेना कदा द्वैताच्या संबंधे । अद्वैताच्या बोधे सर्व मिथ्या ॥९॥
सर्व मिथ्या नव्हे ब्रह्मचि साचार । ब्रह्म चराचर नांदतसे ॥१०॥
नांदतसे तया काळ संहारील। नाहीसे होईल चराचर ॥११॥
चराचर ऐक्यरुपा आले जेथे । काळ कैंचा तेथे भिन्नपणे ॥१२॥
भिन्नपणे भिन्न नांदे सर्व लोक । तया कैंसे एक म्हणतोसी ॥१३॥
म्हणतोसी भिन्न परी तो अभिन्न । सर्वब्रह्म ज्ञान तुज नाही ॥१४॥
तुज नाही जाले ज्ञान शाश्वताचे । ध्यान या भूतांचे करितोसी ॥१५॥
करितोसी वाद वाउगा विवाद । सांडवेना भेद अंतरीचा ॥१६॥
अंतरीचा भेद नाहीसा होईल । जरि तो जाईल भास भ्रम ॥१७॥
भास भ्रम नव्हे वस्तुचि केवळ । जीव हे सकळ ब्रह्मरुप ॥१८॥
ब्रह्मरुप नव्हे अरुप ठायींचे । रुप तेथे कैंसे लावितोसी ॥१९॥
लावितोसी वायां कासया वाचाळी । पडावे सुकाळी सर्व ब्रह्मी ॥२०॥
सर्वब्रह्मी बुद्धि तया कैंची शुद्धि । कुबुद्धि सुबुद्धि सारिखीच ॥२१॥
सारिखीच बुद्धि जालिया अंतरी । मग लोकाचारी काय काज ॥२२॥
काय काज ऐसे म्हणतोसी आतां । माता आणि कांता एक होती ॥२३॥
एक होती काय पूर्वीच आहेती । भेद तयांप्रती काय आहे ॥२४॥
काय आहे भेद ऐसे बोलो जातां । दोषचि तत्त्वतां वाढतसे ॥२५॥
वाढतसे दोष सुंदरी ते माता । एक पुत्र होतां वेद बोले ॥२६॥
वेद बोले ज्ञान ते कांही पहावे । देहाचेनि व्हावे कासावीस ॥२७॥
कासावेस कैंचे देह ब्रह्म साचे । ब्रह्मेविण कैंचे दुजेपण ॥२८॥
दुजेपणे माया आकारासि आले । ते हे विस्तारले पाहतोसी ॥२९॥
पाहतोसी माया ते तुज दिसते । येरवी हे सत्य सर्व ब्रह्म ॥३०॥
सर्व ब्रह्म कैचे रुप हे मायेचे । दिसे तया साचे कोण मानी ॥३१॥
कोण मानी तुझे ज्ञान एकदेशी । दिसेना तयासी काय पाहो ॥३२॥
काय पाहो ऐसे वाउगे बोलणे । दृष्टीचे देखणे नाशिवंत ॥३३॥
नाशिवंत आहे कल्पना आपुली । ते हे सांपडली सर्व ब्रह्मी ॥३४॥
सर्व ब्रह्मी मन कैसे विश्वासले । अंतवंत गेले हारपोनी ॥३५॥
हारपोनि गेले तूप हे थिजले । जरी विघुरले तरी तूप ॥३६॥
तूप हे चळोन जाहले पातळ । ब्रह्म हे अचळ चळेना की ॥३७॥
चळेना की तूपपण त्या तुपाचे । तैसे जाण साचे सर्वब्रह्म ॥३८॥
सर्व नाशिवंत बोलिला वेदांत । तेथे हा दृष्टांत कोणेकडे ॥३९॥
कोणेकडे गेले सांग सोनेपण । आटितां कंकण सोने आहे ॥४०॥
सोने आहे जड आणि एकदेशी । वस्तूसी कायसी उपमा हे ॥४१॥
उपमा हे सर्व ब्रह्मचि तत्त्वतां । आटितां नाटितां सोने जैसे ॥४२॥
हेम हेंचि आहे मुळी नाशिवंत । पीतवर्ण जात निघोनीयां ॥४३॥
निघोनीयां भ्रांति एकीकडे गेली । मृत्तिका संचली पालटेना ॥४४॥
पालटेना तुजे मातीसे बोलणे । माती मिथ्या कोणे जाणिजेना ॥४५॥
जाणिजेना तरी होई सावधान । गारेचे जीवन गार जाली ॥४६॥
गार जाली तुझी माती हे सकळ । अचळासी चळ भावितोसी ॥४७॥
भावितां तरंग कोणेकडे गेला । सागरु संचला जैसा तैसा ॥४८॥
तैसा हा विस्तार तरंगाचे परी । साच हा चतुरी मानिजेना ॥४९॥
मानिजेना परी एकचि साचार । वृक्षाचा विस्तार मूळ एक ॥५०॥
मूळ एक ब्रह्म नित्य निराकार । वृक्षाचा विस्तार तेथे कैंचा ॥५१॥
कैंचा हा म्हणसी तोचि आकारला । सविता बिंबला तेथे जळी जेंवि ॥५२॥
जळी जेवि दिसे जळी प्रतिबिंब । तैसे नाही बिंब सस्वरुपी ॥५३॥
सस्वरुपी आहे सर्वही साकार । असेना आकार तयावीण ॥५४॥
तयावीण बापा सर्वही माईक । जाण हा विवेक योगियांचा ॥५५॥
योगियांचा योगीच जाणती । सर्वही देखती ब्रह्मरुप ॥५६॥
ब्रह्मरुप होतां भावचि मोडला । आत्मा हा जोडला आत्मरुपे ॥५७॥
रुपे ब्रह्म जाला तया सर्व ब्रह्म । भ्रमिष्टासी भ्रम भासतसे ॥५८॥
भासतसे भास तया आहे नाश । धरी हा विश्वास शास्त्रमते ॥५९॥
शास्त्रमते सर्व ब्रह्मचि बोलीले । दृष्टीसी पडिले जे जे कांही ॥६०॥
जे जे कांही आहे दृष्टीचे देखणे । ते ते मिथ्या कोणे जाणिजेना ॥६१॥
जाणिजेना सर्व ब्रह्म ऐसी खूण । तयासी संपूर्ण ज्ञान कैंचे ॥६२॥
ज्ञान कैंचे आतां सर्व ब्रह्म जाले । साधन बुडाले साधकाचे ॥६३॥
साधक साधन कैचे दुजेपण । ऐक्यरुप जाण सर्व कांही ॥६४॥
सर्व कांही भिन्न भिन्न आकारले । ऐक्यरुप जाले कोणेपरी ॥६५॥
कोणेपरी कार्य कारण भिन्नत्व । सिद्धचि एकत्व भिन्नपणे ॥६६॥
भिन्नपणे एक हे कई घडावे । संदेही पडावे वाउगेचि ॥६७॥
वाउगा संदेह कासया धरावा । कांसवा अवेवा भेद नाही ॥६८॥
भेद नाही जया तेंचि नाशिवंत । दृढत्वाचा हेत लागो नेदी ॥६९॥
लागेना विवेक पूर्ण ब्रह्मस्थिति । एकदेशी किती सांगशील ॥७०॥
सांगशील सदा सर्व ब्रह्म ऐसा । स्वर्गनर्क कैसा ऐक्यरुप ॥७१॥
ऐक्यरुपे जया बाणिला विश्वास । तया भेदभास आडळेना ॥७२॥
आडळेना भास तेथे सर्व कैचे । वाउगे केव्हांचे बोलतोसी ॥७३॥
बोलतोसी परी नाही समाधान । तुज हे अज्ञान मागे पुढे ॥७४॥
मागे पुढे मज ब्रह्मचि आघवे । भासाचिया नांवे शून्याकार ॥७५॥
शून्याकार जाले तुझे अभ्यंतर । नव्हे ते साचार पूर्णब्रह्म ॥७६॥
पूर्णब्रह्म दृश्य पदार्थ जाणसी । वायां वोसणसी जाणपणे ॥७७॥
जाणपणे सर्व मायिक म्हणावे । दृश्य हे जाणावे कोणेपरी ॥७८॥
कोणेपरी तुझे जाले समाधान । मिथ्या सावपण लावितोसी ॥७९॥
लावितोसी कैसी अद्वैती कल्पना । द्वैत हे तुटेना जन्मवरी ॥८०॥
जन्मवरी सर्व अभेद म्हणसी । भेद चि लाविसी सर्वकाळ ॥८१॥
सर्वकाळ गेला मिथ्या म्हणतांचि । दृश्य असतांचि जैसे तैसे ॥८२॥
जैसे तैसे आहे विवेक जाणसी । वायांचि  म्हणसी सर्व ब्रह्म ॥८३॥
सर्व ब्रह्म ऐसे वेद बोलियेला । नेणसी कां तुला ठावे नाही ॥८४॥
ठावे नाही तुज वेदाचे वचन । सर्व मिथ्या भान नेति नेति ॥८५॥
नेति नेति श्रुती वेदां अगोचर । ते हे विश्वाकार विस्तारले ॥८६॥
विस्तारले सर्व मायेचे स्वरुप । माय मिथ्यारुप जाण बापा ॥८७॥
जाण बापा सर्व ब्रह्माचे स्वरुप । माया मिथ्यारुप कल्पना हे ॥८८॥
कल्पनेची सृष्टि दिसताहे दृष्टि । सांडी माझी गोष्टी वायकोळ ॥८९॥
वायकोळ नव्हे सर्व तेचि पाहे । दुजे कोणे आहे तयावीण ॥९०॥
तयावीण नाही ते दिसो लागले । तेंचि ब्रह्म जाले मंदमती ॥९१॥
मंदमती नव्हे सर्वां भूती भाव । भुते आणि देव भिन्न नाही ॥९२॥
भिन्न नाही जरी भूते आणि देव । तरी भावाभाव कासयासी ॥९३॥
कासयासी माया मिथ्या हे म्हणावी । ब्रह्मचि जाणावी सर्व कांही ॥९४॥
सर्व कांही मिथ्या मग सर्व ब्रह्म । दृश्यातीत वर्म अनुर्वाच्य ॥९५॥
अनुर्वाच्य ब्रह्म व्यतिरेक जाण । अन्वयाची खूण सर्व ब्रह्म ॥९६॥
सर्व ब्रह्म पूर्वपक्षाचे बोलणे । सिद्धांतासी येणे चाड नाही ॥९७॥
चाड नाही तेथे सिध्दांत अलक्ष । तेथे दोन्ही पक्ष आटतील ॥९८॥
आटतील परी सारासार आहे । दृश्य हे न साहे निर्मळासी ॥९९॥
निर्मळासी तेथे कांहीच न लागे । शब्द तोही भंगे निःशब्देसी ॥१००॥
निःशब्देसी शब्द जे ठायी आटला । सर्वब्रह्म बोला कोण पुसे आधी ॥१०१॥
कोण पुसे तेथे तुझ्या निर्मळासी । कैंचा मा शब्दासी ठाव आधी ॥१०२॥
आधी सर्व मिथ्या होउनीयां गेले । मग पुढे जाले अनुर्वाच्य ॥१०३॥
अनुर्वाच्य जाले ब्रह्म बोलो नये । न्यून पूर्ण काय पाहशील ॥१०४॥
पाहणे खुंटले बोलणे तुटले । सस्वरुपी जाले ऐक्यरुप ॥१०५॥
ऐक्यरुप रामीरामदास जाले । बोलणे खुंटले तेथुनीयां ॥१०६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:21:48.9630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुसमो

  • पु. ( गो .) बारीक केर . ( कुस ) 
RANDOM WORD

Did you know?

What are the names for Ekadashi (11th day in fortnight)?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site