TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


उपदेशपर
६११.
संसाराची कथा आतां सांगईन । सुखासाठी लग्न आरंभीले ॥१॥
आरंभीले लग्न आणिली नोवरी । रिणे घरोघरी मागतसे ॥२॥
मागतसे त्यासी कोणीच देईना । अन्नही मिळेना खावयासी ॥३॥
खावयासी नाही लेवायासी नाही । अन्न वस्त्र नाही सर्व काळ ॥४॥
सर्वकाळ गेला चिंताचि करितां । अखंड दुश्चीता श्वास सांडी ॥५॥
सांडी स्नान संध्या सांडी नित्यनेम । रात्रंदिवस काम संसाराचे ॥६॥
संसाराचे काम पुरेना उदंड । दीसेंदिस भंड आरंभले ॥७॥
आरंभी नोवरी म्हणे आणा आणा । रात्रंदिस आणा आरंभील्या ॥८॥
आरंभले घर मांडला संसार । नित्य करकर भांडणाची ॥९॥
तेल मीठ आणा भाजीपाले आणा । धान्य घरा आणा कांहीतरी ॥१०॥
कांही तरी सेणी सर्पण जळण । पात्र सांठवण करावया ॥११॥
करावया स्वैंपाक सांठवणी । गाडगी वेळणी परियेळ ॥१२॥
घालावया धुण पाहिजे मांधण । फुटके रांझण धड आणा ॥१३॥
धड आणा डेरे भाचरी मडकी । कुंडाले आणिखी घागरी त्या ॥१४॥
घागरी दुधाणी सेंदावया पाणी । आणि चिंचवणी घालावया ॥१५॥
घालावया सुंठी हिंग जिरे मिरे । सेणेरे पोतेरे पाहिजे की ॥१६॥
गोठे दारवंटे चौकटी अर्गळा । कड्या कोंड्या खिळा ठाई ठाई ॥१७॥
ठाई पडे अन्न तरी हा भाग्याचा । धोका संसाराचा रात्रंदीस ॥१८॥
दिसा धोका करी रात्री चिंता करी । दुःख परोपरी संसारीचे ॥१९॥
संसारीचे दुःख कांही एक सुख । सर्व काळ धाक वाहतसे ॥२०॥
वाहतसे धाका धाकतसे लोकां । तोंडावरी थुंका पडेना की ॥२१॥
पडेना की घर मोडलेसे आढे । रोडकेंसे घोडे हारपले ॥२२॥
हारपले आतां पाहो कोणे वाटे । मोडताती कांटे आणि ठेंचा ॥२३॥
ठेंचा तिडका द्याव्या मुमळी सोसाव्या । रात्रंदिस सीव्या देती लोक ॥२४॥
लोक लाता देती चुकतां मारिती । रिणकरी घेती वेंटाळूनि ॥२५॥
वेंटाळुनी घेती मुले घरभरी । अन्न पोटभरी मिळेना की ॥२६॥
मिळेना की अन्न कोरडे भोजन । पोरे वणवण करीताती ॥२७॥
करिताती चिंता ते अस्त्रीपुरुषे । आहा जगदीशे काय केले ॥२८॥
केले थोर पाप सीणावरी सीण । संसार कठीण कळो आला ॥२९॥
आला गेला लोक पाहेना विचार । पाहुण्यांनी घर बुडविले ॥३०॥
बुडविले घर ते आणा घालती । येती काकुळती दोघेजण ॥३१॥
दोघेजणे होती बहुजणे जाली । भिकेसी लागली दारोदारी ॥३२॥
दारोदारी दोघे मागती उसने । रिण केले दुणे देया नाही ॥३३॥
नाही सुप पाटी पाळी काथवटी । कांही हाटवटी मागतसे ॥३४॥
मागतसे माले नागवणेसाठी । म्हणे देशांकाठी घेऊनी जावे ॥३५॥
जावे आतां देशी कामा नये कदा । भोगाव्या आपदा किती म्हणूं ॥३६॥
किती म्हणूं सीण करावा हव्यास । चित्त कासावीस रात्रंदिस ॥३७॥
करीतसे यत्न होउनी येईना । आहारे प्राक्तना काय करुं ॥३८॥
काय करुं आता कर्म बळीवंत । आम्हां भगवंत कोठे गेला ॥३९॥
गेला हा लौकिक आतां राहे कैसा । ऐसा दाही दिशा येकवटी ॥४०॥
येकवटी सेण गोवर्‍या कराया । आणि पेटवाया सेणकाड्या ॥४१॥
सेणकाड्या तृण पाने पत्रावळी । कोणी नाही वळी गुरे खासा ॥४२॥
खासा वेगा ताणी खासा आणि पाणी । मागुती आईणी बोलतसे ॥४३॥
बोलतसे येक चालतसे येक । मागे पुढे लोक हांसताती ॥४४॥
हांसताती त्यासी भांडावया उठतो । भांडतां तुटतो ठायी ठायी ॥४५॥
ठायी ठायी पोरे हागती मुतती । खोकिती ओकिती चहूंकडे ॥४६॥
चहुंकडे केर दाटला उकीर । नित्य करकर भांडणाची ॥४७॥
भांडता भांडता निघोनियां गेला । जाउनियां आला किती वेळ ॥४८॥
किती वेळ व्यथा वांचला मागुता । व्यथेवरे व्यथा उद्भवल्या ॥४९॥
उद्भवल्या व्यथा रोग परोपरी । तेथेंचि बाहेरी बैसतसे ॥५०॥
बैसतसे चोर पोर जाला थोर । मारमारुं बुर काढीतसे ॥५१॥
काढीतसे बुर त्या दोघाजणांचा । पाळिला पोरांचा पोरवडा ॥५२॥
पोरवडा जाला कामा नाही आला । अदृष्ट पोराला काय बोल ॥५३॥
बोलतां बोलतां लाविला गळफांस । अस्त्री कासावीस होतसे ॥५४॥
होत असे भंड त्या दोघांजणांचे । सुख संसाराचे बरे पहा ॥५५॥
बरे पाहा मनी जाणते लोकहो । वायांवीण मोहो धरीतसे ॥५६॥
धरीतसां मोहो देवेवीण वायां । अंती आयाबाया चावळतां ॥५७॥
चावळताम का रे देव ओळखाना । धुंडूनि काढाना कोठे तरी ॥५८॥
कोठे तरे देव पावेल निर्वाणी । नित्य निरुपणी संतसंगे ॥५९॥
संतसंगे दोष नासती विशेष । आणि जगदीश ठायी पडे ॥६०॥
ठायी पडे तेव्हां जिणे धन्य जाले । सार्थक चि केले संसाराचे ॥६१॥
संसाराचे कोण शाश्वत मानावे । म्हणोनि जाणावे परब्रह्म ॥६२॥
निरंजनी जन जनी निरंजन । जाणती सज्जन विवेकाचे ॥६३॥
विवेकाचे जन मिळतां संकट । व्यर्थ खटपट ठायी ठायी ॥६४॥
ठायी ठायी बंडे मांडली पाषांडे । सांगती उदंडे पोटासाठी ॥६५॥
पोटासाठी रडे कष्टती बापुडे । त्यांसी कोणेकडे परलोक ॥६६॥
परलोक घडे बहुत सायासे । तेथे ऐसे कैसे बाह्याकारे ॥६७॥
बाह्याकारे वायां व्यर्थ चि सिणावे । म्हणोनि जाणावे परब्रह्म ॥६८॥
परब्रह्म एक ते नव्हे अनेक । पाहातां विवेक नित्यानित्य ॥६९॥
नित्यानित्य जाणे तो साधु जाणावा । उगवील गोवा बहुतांचा ॥७०॥
बहुतांचा बंद सोडी निरुपणे । उत्तमे लक्षणे विवेकाची ॥७१॥
विवेकाचे वाक्य विवेक जाणती । ज्ञानी ओळखती पूर्णब्रह्म ॥७२॥
पूर्णब्रह्म एक निर्मळ निश्चळ । भ्रांतीचे आभाळ तेथे नाही ॥७३॥
तेथे नाही जन्म मरण यातना । पूर्ण सनातना ओळखतां ॥७४॥
ओळखतां देव ओळखतां भक्त । ओळखता मुक्त होत असे ॥७५॥
होत असे मुक्त संसारापासुनी । देह विवरुनि तत्त्वज्ञानी ॥७६॥
तत्त्वज्ञानी जरी तत्त्वे तत्त्व झडे । तरी ठायी पडे परब्रह्म ॥७७॥
परब्रह्म एक नित्य निराकार । धरिते जोजार मूळमाया ॥७८॥
मूळमाया देव चंचळ ईश्वर । विधी हरहर तेथुनियां ॥७९॥
तेथुनीयां पंचभूते ही निर्माण । उत्पत्ति लक्षण इच्छारुप ॥८०॥
इच्छारुप वृत्ती कल्पना कामना । जया पुनःपुन्हा गर्भवास ॥८१॥
गर्भवास जाण विवेके नासती । विवेकी असती जन्म नाही ॥८२॥
जन्म नाही ऐसे कैसेनि जाणावे । विवेके बाणावे समाधान ॥८३॥
समाधान जाले मीपण शोधितां । वस्तुसी बोधीतां वस्तुरुप ॥८४॥
वस्तुरुप नाही वस्तु नाम नाही । आकारचि नाही विवंचता ॥८५॥
विवंचावे महावाक्याचे अंतर । नित्य निरंतर जैसे तैसे ॥८६॥
तैसेंचि असावे मीपण सांडूनि । पाहो जातां मनी मन नाही ॥८७॥
मन नाही तेथे उन्मन हि नाही । आतां कांही कांही उमजले ॥८८॥
उमजले मज मीच आडळेना । मीपणे कळेना सर्व कांही ॥८९॥
सर्व कांही मिथ्या मीपणही गेले । आपण राहिले पूर्णपणे ॥९०॥
पूर्णबोध जाला संदेह तुटला । संसारी सुटला येणे रीती ॥९१॥
येणे रीती आतां समाधान जाले । शरीर लागले भजनासी ॥९२॥
भजन रामाचे त्रैलोक्यपावन । करितो चिंतन शूळपाणी ॥९३॥
शूळपाणी चिंती ते करा चिंतन । माझे तन मन दाशरथी ॥९४॥
दाशरथी देव देवांचा कैपक्षी । सर्व काळ रक्षी भक्तजनां ॥९५॥
भक्तजन लीन जाले रामपदी । सज्जनसंवादी विवरतां ॥९६॥
विवरतां जड चंचळ निश्चळ । तुटे खळखळ मीपणाची ॥९७॥
मीपण हे रामपदी निवेदीले । समाधान जाले रामदासी ॥९८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-26T07:48:53.7530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

natural right

  • पु. नैसर्गिक अधिकार 
  • पु. निसर्गसिद्ध अधिकार 
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.