TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
७८८.
मुक्त निःसंदेह बद्ध तो संदेह । संदेहाचा देह कामा नये ॥१॥
कामा नये चित्त दुश्चित्त सर्वदा । लागली आपदा संशयाची ॥२॥
संशयाच्या संगे समाधान भंगे । खेद आंगी लागे अकस्मात ॥३॥
अकस्मात सुख दुःख कालवले । साधकासी केले संदेहाने ॥४॥
संदेहाचा घात करी एकसरा । दास म्हणे करा निरुपण ॥५॥

७८९.
ज्ञानेंविण जे जे कला । ते ते जाणावी अवकळा ॥१॥
ऐसे भगवंत बोलिला । चित्त द्यावे त्याच्या बोला ॥२॥
एक ज्ञानचि सार्थक । सर्व कर्म निरर्थक ॥३॥
दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण ॥४॥

७९०.
आम्ही सावधान गावे । तुम्ही सावध ऐकावे ॥१॥
सकळ सृष्टीचा गोसावी । त्याची ओळखी पुसावी ॥२॥
स्वये बोलिला सर्वेशु । ज्ञानेविण अवघे पशु ॥३॥
दास म्हणे नाही ज्ञान । तया नरकी पातन ॥४॥

७९१.
जेणे ज्ञान हे नेणवे । पशु तयासी म्हणावे ॥१॥
जेणे केले सचराचर । कोण सृष्टीस आधार ॥२॥
कोणे प्रारब्ध निर्मिले । कोणे संसारी घातले ॥३॥
ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्यापरता ॥४॥
अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा ॥५॥
रामदासाचा विवेक । सर्वां घटी देव एक ॥६॥

७९२.
पावन असतां पतित जालासि । सोय चुकलासी पावनाची ॥१॥
पावनाची सोय धरितां अंतरी । स्वरुप विचारी समाधान ॥२॥
समाधान जाले पावनाने केले । आत्म निवेदिले दास म्हणे ॥३॥

७९३.
समर्थाचा दरिद्री सुत । याचे न करावे विपरीत ॥१॥
परी समर्थलक्षण । सर्वकाळ समाधान ॥२॥
श्रीमंताचे विद्येलागी । माधुकरी मागे जगी ॥३॥
तैसे रामीरामदासी । ब्रह्मविद्येच्या सायासी ॥४॥

७९४.
पतित म्हणजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप ॥१॥
एकरुप देव अरुप ठायींचा । तेथे दुजा कैंचा कोण आहे ॥२॥
कोण आहे दुजा स्वरुपी पाहतां । विचारे राहतां सुख आहे ॥३॥
सुख आहे मूळ आपुले शोधितां । मनासी बोधितां रामदास ॥४॥

७९५.
मायिकाची भक्ति उधाराची मुक्ति । तैसी नाही स्थिती राघवाची ॥१॥
राघवाची कृपा सद्य मोक्षफळ । तुटे तळमळ चमत्कारे ॥२॥
चमत्कार आतां जो कोण्ही पाहेना । त्याचा पंथ उणा कोटिगुणे ॥३॥
कोटिगुणे उणे जिणे त्या नराचे । जेथे विचाराचे ओस घर ॥४॥
ओस घरी वाण कासयासी द्यावे । व्यर्थ चि शिणावे कामेंविण ॥५॥
कामेंविण काम तो हा आत्माराम । तेथेचि विश्राम पाविजेल ॥६॥
पाविजेल परी विवरत जावे । सर्वहि सांडावे ओसरोनी ॥७॥
ओळखतां त्याग सर्वांचा घडेल । मार्ग सांपडेल योगियांचा ॥८॥
योगियांचा पंथ योगीच जाणती । तिन्ही ही प्रचीती ऐक्यरुप ॥९॥
ऐक्यरुप आत्मशास्त्रगुरुवाक्य । हेंचि महावाक्य विवरोनी ॥१०॥

७९६.
जयाचा आहार त्यानेचि तो खावा । विपरीत देवा कामा नये ॥१॥
कामा नये विधिवेगळे करणे । विवेके धरणे कोणीएक ॥२॥
कोणीएक विद्या ब्रह्मज्ञानावीण । दास म्हणे सीण वाउगाचि ॥३॥

७९७.
भयानक स्वप्ने जया वाटे भय । तेणे निजो नये सर्व काळ ॥१॥
सर्वकाळ जागा विवेकसंगती । तयासी कल्पांती भय नाही ॥२॥
भय वाटे देही तूं तंव विदेही । देहातीत पाही आपणासी ॥३॥
आपणासी नेणतां वाटे नाना चिंता । म्हणोनी दुश्चिता राहो नको ॥४॥
राहो नको कदा या देहसंमंधी । मनी धरी शुद्धि स्वरुपाची ॥५॥

७९८.
देव तो कळेना राहिला चुकोनी । संसारा येउनी काय केले ॥१॥
काय केले बापा आपुले अनहित । देखत देखत चुकलासी ॥२॥
चुकलासी धणी या भूमंडळाचा । सर्वहि देवांचा मुख्य देव ॥३॥
मुख्य देव आहे तो तुज कळेना । शाहणा आपणा म्हणवीसी ॥४॥
म्हणवीसी परी दसर्‍याचे सोने । उणे कोटिगुणे दास म्हणे ॥५॥

७९९.
शोधुनी पहावे देवऋषिमूळ । निर्माण सकळ कोठुनीयां ॥१॥
कोठुनियां जाली सर्वहि उपाधि । बरी घ्यावी शुद्धि शाश्वताची ॥२॥
शाश्वताची शुद्धि घेता दृढबुद्धि । घेउनि समाधी हातां चढे ॥३॥
हातां चढे सर्व वेदशास्त्रबीज । मुख्य गुह्य गुज योगियांचे ॥४॥
योगियांचे गुज सहज सहज । दास म्हणे निज ठायी पाडी ॥५॥

८००.
दर्पणी पाहतां दिसते सर्वांग । परि पृष्ठिभाग आढळेना ॥१॥
आपुलीच पाठी पाहतां न दिसे । ऐसे बोलतसे सर्व जन ॥२॥
आपशुद्धि नेणे त्या काय परावे । म्हणोनि जाणावे आपणासी ॥३॥
आपणासी जाणे संताचे संगती । तया अधोगति जन्म नाही ॥४॥
नाही जन्ममृत्यु नाही येणे जाणे । स्वरुपी राहणे दास म्हणे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:25:01.9630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

natural right

  • पु. नैसर्गिक अधिकार 
  • पु. निसर्गसिद्ध अधिकार 
RANDOM WORD

Did you know?

नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.