मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
सत्याग्रही या नावाचे एक ख...

खंडकाव्य - सत्याग्रही या नावाचे एक ख...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


सत्याग्रही या नावाचे एक खंडकाव्य गुरुजींनी १९३० मध्ये त्रिचनापल्लीस असताना लिहिले होते. त्यातील जो भाग मबळ आवृत्तीमध्ये होतो तो येथे देत आहे.

थोडा संदर्भ : श्रीमंत आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वय अठरा वर्षांचे होते. त्याचं आठ-नऊ वर्षांच्या एका मुलीशी लग्न लागलेले होते. तो सत्याग्रहात स्वयंसेवक झाला होता. तो तुरुंगात अतिसाराने मरण पावला. त्याच्या आजारपणाची तारही खेड्यात वेळेवर पोहचली नाही. मरणाचीच तार एकदम घरी गेली. आईबापांना जबर धक्का बसला. तो मृतपुत्र रात्रीच्या वेळी दिव्य वेष धारण करुन आईबापांची समजूत काढण्यास येतो. रात्रभर विचारवार्ता करुन त्यांचे समाधान करुन प्रभात होताच परत जातो.

मातेचा शोक

कैसा बाळ निमाला
न दया भगवंताला॥ कैसा....॥

‘लडिवाळा बाळा
बाळा वेल्हाळा
ये भेटायाला॥
तुजविण कोणि न मजला॥ कैसा....॥

येशिल माघारा
माझ्या पाखरा
राजस राजकुमारा
धीर असा रे धरिला॥ कैसा....॥

येशिल भेटाया
आशा ही सखया
होती मम हृदया
काळ कसा परि फिरला॥ कैसा....॥

बाळा काय करू
प्राणा केवि धरू
शोका केवि करू
शोक सखा मम ठरला॥ कैसा....॥

हे क्रूरा काळा
कैसा रे नेला
पाझर ना फुटला
घालिशि घोर घाला॥ कैसा....॥

एकुलता बाळ
माणिक बिनमोल
मोती तेजाळ
दुर्दैवी मी अबला॥ कैसा....॥

शून्य दिसे सृष्टी
माता मी कष्टी
भरते ही दृष्टि
अंत न पार न दु:खाला॥ कैसा....॥

घेउ कुणा जवळ
देउ कुणा कवळ
बोलु कुणा जवळ
तव मुखचंद्र अंतरला॥ कैसा....॥

मुख शशि न हसेल
हृदय न सुखवील
बोल ना रिझावील
राम न जीवनि उरला॥ कैसा....॥

वत्साविण गाय
मोकलिते धाय
तळमळते गाय
प्राण जावया सजला॥ कैसा....॥

सुख सगळे आटे
कंठ तिचा दाटे
हृदय तिचे फाटे
शरणागत ती मरणाला॥ कैसा....॥

हंबरडा फोडी
सुस्कारे सोडी
बुडते हो होडी
करुणासागर भरला॥ कैसा....॥

डोळे डबडबले
मानस गजबजले
अंतर गहिवरले
माता पडली धरणीला॥ कैसा....॥

(माता शोकाने धरणीवर पडते. जवळच पिता असतो, त्याची स्थिती)
==
पित्याची स्थिती

पिता बैसलाहे शोकमग्न खिन्न
पुशीत नयन वारंवार
कालवाकालव हृदयी होतसे
सर्प जणू डसे अंतरंगी
धीर धरी परी पुन्हा येई नीर
डोळ्या लागे धार अनिवार
‘ध्यानी मनी बाळा नव्हते मरण
लौकर सुटून भेटशील
मरावयासाठी बाळ हा चालला
विचार न आला कधी मनी
मेघाची चातक चंद्राची चकोर
घनाची मयूर वाट पाहे
तृषार्तास जल क्षुधार्थास अन्न
तैसे होते मन तुझ्याकडे
तुझ्या वाटेकडे होते सदा डोळे
शतवार आले झाले बाळा
हाती रे माउली दिन ते मोजीत
घास नसे घेत अश्रुवीण
आठवण तिला क्षणाक्षणा यावी
सदगदित व्हावी वृत्ति बाळा
आशावेलीवरी वज्र रे कोसळे
हृदय हे जळे काय करु
कोणाचा आधार संसारी आम्हाला
तुझ्या या मातेला केण बाळा
कोणाला ती प्रेमे हाक मारील
हात फिरविल कोणावरुनी
बाळा कैसा काय गेलास टाकून
दोघांस लोटून दु:खपूरी
तुरुंगात माझ्या नको जाऊ बाळा
सांगितले तुला वारंवार
अश्रु मी ढाळिले पदर पसरीला
दृढनिश्चयाला वरिले तुवा
नाही तू ऐकीले तुरुंगी गेलास
होती परी आस भेटशील
भेटशील आम्हां सुखाचा सोहळा
पाहू आम्ही डोळा होती आशा
आता कसची आशा आकाश फाटले
हृदय दाटले माझ्या बाळा
आशेचे जळून झाले कोळसे
जळावीण मासे तैसे आम्ही
एक माझा बाळ तोही देव नेत
आम्हाला ठेवीत रडावया
आणि लग्न केले नुकते रे थाटाने
अभागी पित्याने बाळा तुझे
मांडोनी सोहळा मानिला आनंद
अभागी मतिमंद ठरलो परी
आठ वरुषांची लहानशी बाळा
जाणे ना मरणाला अजून जी
लग्न म्हणजे वाटे जिला एक खेळ
तोच आली वेळ वैधव्याची
वैधव्य ते काय मरण ते काय
संसार तो काय ना कल्पना
हसावे खेळावे सुखे खावे प्यावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
मांडीवर जिने प्रेमाने लोळावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली माती
कल्पना परी ती नाही तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली राख
नाही ते ठाऊक परी तिला
मांडीवरी मान तिने ठेवियेली
आम्ही मुरगळिली रुढीदासी
रडताना आम्हा पाहुनी रडेल
परी न समजेल गंभीरता
मोडिली हो मान गोड या मैनेची
हृदयास जाची शल्य तीव्र
करोनीया आम्ही विवाहसोहळा
दाबियेला गळा कोकिळेचा
फुटेल जे कंठ गावया स्फुरेल
मैना ना काढील गोड शब्द
बाळ-कोकिळा ही मोठी जै होईल
मनात झुरेल अपरंपार
शोक-गीते सदा बाळा आळवील
टिपे ती गाळील टपटप
घळघळ अश्रुधार ती सोडील
हातांना जोडील जगन्नाथा
जळेल अंतरी जेव्हा का कळेल
मरणाचा खोल अर्थ तिला
जळेल अंतरी जेव्हा तो कळेल
विवाहाचा खोल अर्थ तिला
आग लागो आम्हा आग त्या रूढीला
बळी हो दिधला बाळिकेचा
काय आईबाप तिचे ते करतील
द:खाने जळतील क्षणाक्षणा
नयनांसमोर बाळेला पाहोनी
जातील जळोनी अंतरंगी
घेतील पोटाशी कन्या ती अजाण
अश्रूभरे स्नान घालितील
काय करि देवा कोठे तरी जाऊ
कोठे बाळा पाहू राजसाला
कशाला हा पैसा कशाला व्यापार
एक जो आधार तोही गेला
ज्याच्यासाठी केली आटाआटी
त्याशी ताटातुटी केली देवा
शोक-वन्हि आता जिवंत जाळील
प्राण न घेईल परी माझा
दाही दिशा ओस भरला अंधार
डोळ्यांना ही धार आता सदा
हिचे तरी केवी करु समाधान
देईल ही प्राण शोकवेडी
आम्ही दोघे आता कोणाकडे पाहू
एकमेकां दाउ दीन अश्रु
हाय काय झाले केवढा आकांत
केवढा आघात आम्हावरी’
मनी हे विचार मनी हे उदगार
मनावरी भार फार पडे
असह्य तो झाला वृक्ष उन्मळला
भार फार झाला पिता पडे
माय धरणीला पिता धरणीला
तेथ उचंबळला शोकसिंधु
 ==
(त्या उभयतांचे सांत्वन करण्यास शेजारी येतात.)

जमुनिया जन ते समजाविती
रडू नका रडणार तरी किती
जशी असेल तया प्रभुची मती
मिळतसे सकळांस तशी गती॥

रडुनि काय, विवेक मनी धरा
उपजणे मरणे न चुके नरा
अजि स्वदेशहितार्थ मरे सुत
सुकृति तो करि वंश समुन्नत॥

जरि जगी मरणे, मरणे तरी
करुनिया कृति, जी जन उद्धरी
वदति संत असे वच सतत
करुनि तेच कृतार्थ भवत्सुत॥

रडु नका मुळी, ना मळवा मुख
गिळुनि दु:ख मनी धरणे सुख
अमरता मिळवी मिरवी यश
धवळितो सुत आज दिशा दश॥

रडु नका मुळी धीर मनी धरा
अमरता न जगात कुणा नरा
सुत गुणी रुचला परमेश्वरा
धरिल तो हृदयी प्रिय लेकरा॥

करु नका हृदयी मुळी खंत ती
नुरलि की आपणाप्रति संतती
भरतभूमिमधे किति बाळक
तुम्हि बना करुणाघन पाळक॥

रडु नका मुळि अश्रु न ढाळणे
भरत-माय-मुले तुम्हि पाळणे
निजसुतानन तेथच पाहणे
मति धरुन अशी जगि राहणे॥

(लोक जातात. अंधार पडू लागतो. मातापितरे खिन्न बसतात.)

ते माय-बाप पुशिती निज लोचनांते
अश्रूच ते न उरले मुळि मोचनाते
ते बसले वरुनि शांत मनी सचिंत
ना दु:ख पुत्रनिधनासम ह्या महीत॥

राहे कुणी, सकल ते बहुतेक गेले
येतीच अश्रु फिरुनी भरतीच डोळे
आकांत ना परि अता रडणे मुक्याने
ये हुंदका मधुनि ऐकु कुणास काने॥

अंधार आज भरला भरल्या घरात
त्याहून दाट भरला भरल्या मनात
लावी कुणी तरि तदा सदनात दीप
आशा नसे तिळ परी हृदयासमीप॥

ती बैसली उभयतां पुतळेच खिन्न
आधारहीन सुमने जणु वृतहीन
भूमीवरी उभय ती पडली अशांत
डोळा क्षणैकभऱ लागतसे तशात॥

(बाहेर रात्र बरीच होते. जगात शांतता असते.)

रात्रीचे बाहेरचे स्वरूप

अंधार। निबिड पसरला बाहेर
आकाशी। मावळला उगवून शशी
अश्रु जसे। तारे चमकति नभी तसे
गार सुटे। वारा, पर्णध्वनि उमटे
सळसळती। पाने जणू ती तडफडती
रातकिडे। त्यांचा कानी ध्वनी पडे
फांद्यांत। वडवाघुळ ते फडफडत
वरि फिरत। पुंज तमाचा जणु उडत
शांत परी। सृष्टी होती ही सारी
जग हमले। दमुनी झोपी ते गेले
एक घरी। जागे मधुनी कुणी तरी
अश्रुसरी। पडती त्थ् धरेवरी

(अशा त्या रात्री मृतबालक दिव्य वेष धरुन आईबापांचे सांत्वन करण्यास येतो. तुळशी वृंदावनाजवळ उभा राहून तो आई, बाबा अशी मंजुळ हात मारतो. माता दचकून उठून बाहेर येते. वगैरे.)

रात्रीच्या त्या समयि निजली शांतशी सृष्टी सारी
‘आई, बाबा’ कुणितरि अशी हाक मंजुळ मारी
झाले शांत क्षणि परि, जशी लाट मंदा उठोनी
शांतांभोधीवर पुनरपि जावि तेथे विरोनी॥

वृक्षच्छाखातति तुळशिच्या हालती अंगणात
अंधाराला जणु निजविण्या वृक्ष ते आंदुळीत
झाला होता जणु की अखिल प्रांत तो स्तब्धतेचा
‘आई, बाबा’ मृदू करुणशी ये पुन्हा ऐकु वाचा॥

“आईबाबा, पुनरपि तुम्हा बाळ भेटावयाला
वात्सल्याने विरुन तुमच्या येथ बाहेर आला
आई, बाबा! तुम्हि तुळशिच्या अंगणामाजि याना
द्यावा प्रेमे मजसि तुमचा अंतिम प्रेमपान्हा”॥

‘आईबाबा’ पुनरपि उठे शब्द माधुर्य-राशी
“मारी का हो” दचकुनि वदे “बाळ हाका अम्हासी?”
‘आईबाबा’ पुनरपि असे शब्द ती म्लान माता
ऐके, धावे, भ्रम जणु तिला दु:खदग्धा अनाथा॥

“आला आला फिरुनि अपुला बाळ आला घराला
हाका मारी, झणि तुम्हि उठा बाळ बाहेर आला”
धावे वेगे, पदर अथवा केशही सावरी न
“आले बाळा” करुण नदली गायशी माय दीन॥

“आई” ‘आली, बघ बघ तुझी पाडसा माय आली’
शोकावेगे हलत वदली, मागचे दार खोली
“कोठे आहे? दिसत नयना ना कसा बाळ माझा
झाला भास क्षणिक? न दिसे राजस प्राणराजा”॥

“आई, पाही तव सुत इथे, येत कैसे न तात?”
श”आले, तेही बघ” “तुम्हि बसा शांत, ऐका निवांत”
माता धावे परि करितसे खूण तो दिव्य बाळ
बोले ‘श’आई, हृदयी धरणे तो न गे आज काळ”॥

देवाचा मी, परि तुमचिया भेटीलागून येत
युष्मच्छोके गहिवरुन मी जाहलो सदगदित
आले चित्ती समजउ जरा अपुले तात माय
आलो आई म्हणुनि दुरुनी वंदितो पूज्य पाय॥

आई, माझ्यावरि जरि तुझे प्रेम आहे अपार
संसारी या अमर असला देखला ना प्रकार
भूमातेच्या प्रिय जननि गे मोचनासाठि आज
लाखो जावे मरुनि, जरि ती राहिलीसेल लाज॥

माता तू मत्प्रिय खरी परी आज सर्वाजणांची
ही भूमाता रडत बसली दास्यदारिद्रय जाची
मातांची जी परम सदया मंगला थोर माता
त्राता नाही तिजसि उरला झालि लोकी अनाथा॥

यासाठी मी त्यजुनि सगळे आइ धावून गेलो
गेलो, देवे मज उचलिले, मी तुम्हांलागि मेलो
मोहत्यागे भरतजननीकारणी लागतील
सारे बंधू, मजसि मग तू धन्य गे मानिशील॥

झाले ना गे मुळी बघ तिथे आइ थोडेहि हाल
क्लेशांची ती अम्हि मिरवितो नित्य कंठात माळ
मृत्यूला ना मुळि भरत-भूपुत्र आता भिणार
हे त्वदबाळे सकल जगता दाविले थोर सार॥

होते माते जवळ किति ते थेर स्नेहार्द्र मित्र
भूमातेचे भजक सगळे दिव्य ज्यांचे चरित्र
काही माते पडु न ह्धले ते उणे त्या सख्यांनी
नाही होऊ स्मरण तुमचे ते दिले, सत्य मानी॥

माझ्या ओठावरि तुळशिचे ठेविले पूज्य पान
मद्देशाचे स्मरण करुनी सोडिले शांत प्राण
माते, माझ्यास्तव न रडणे, का म्हणोनी रडावे?
देशासाठी फिरफिरुनी हे प्राण माझे पडावे॥”
 ==
(त्या मातेला हे पटत नाही. शतस्मृति तिच्या हृदयात उचंबळतात. हृदय भरून येऊन ती पुढीलप्रमाणे बोलते.)

“काय बाळा हे बोलसी कठोर
भरुनि येतो मम शोकभरे ऊर
प्रेम करुन किती तुला वाढवीले
जाशि विसरुन का सर्व बाळ बोले॥

तुला हातांचा करुनि पाळणा रे
खेळवीले झेलिले किती बारे
जरा दुखले खुपले कि जपे बाळा
स्मरण तुज उरले काय न वेल्हाळा॥

तुझा पाहुनि मुखचंद्र बाळराजा
हृदयसिंधु उचंबळुन जाई माझा
जरी मूर्ति तुझी अंगणात खेळे
दुरुनि बघति तुला हे मदीय डोळे॥

जरी जाशी क्षण दूर, हुरहुर
सुरू होई मम चित्ति हळूवार
तुझा कानी पडताच गोड सूर
पुन्हा यावा मत्सौख्यरसा पूर॥

तुला लावावी दृष्टी तिन्ही सांजा
तुला जपले मी सांगु किती राजा
असे आम्हाला एक तुझी जोड
म्हणुनी झाला संसार सर्व गोड॥

जसा वणव्यामधि भाजतो कुरंग
तसा तुजला जाचील का तुरुंग
याच चिंतेने झोप मुळि न यावी
रामनामावळि उठुन म्या जपावी॥

रामराया बाळास सुखी ठेवी
हाल सोसाया शक्ति तया देई
बाळ माझा सुखरुप घरा आणी
असे विनवित मी नयनि येइ पाणी॥

रात्र व्हावी जग सर्व हे निजावे
परी निद्रासुख नाहि अम्हां ठावे
आळवावा भगवंत जिवेभावे
तुला बाळा हृदयात आठवावे॥

दिवस होत्ये मी मोजित रे बाळा
मला ठाउक कंठिले कसे काळा
पोटि प्रेमाचा भरुनि ये उमाळा
गळति गालांवर अश्रु ते घळाळा॥

परी रडणे हे अशुभ मनी येई
पुसुनि नयना विनवित प्रभूपायी
मातृहृदय तुला ज्ञात असे रामा
ठेवशील कसा दु:खि सदा आम्हा॥

जीव माझा धरि आस, जरी झुरला
एक महिना चो फक्त अता उरला
बाळ माझा येईल धरिन पोटी
अश्रु वदतिल, वदवेल जरि न ओठी॥

सुखाचा तो पाहीन सोहळा मी
बाळ माझा येईल पुन्हा धामी
अशी आशा हृदयात खेळवीत
बाळ होत्ये रे दिवस रात्रि नेत॥

अकस्मात परी मरण आयकेन
रडत बाळा मी धाय मोकलून
कसा गेलासी टाकुनिया बाळा
कसा काळ तुला ओढित वेल्हाळा॥

किती आले हृदयात रे विचार
हृदयहादक जे शोक देति फार
कशी बाळाची जाहली असेल
स्थिती तेथे, तो कोमल जणु फूल॥

तुरुंगात तिथे एकला असेल
जवळ त्यच्या कुणि तेथ ना बसेल
कोण मातेसम दयाक्षमा दावी
आईनेच जगी शुश्रुषा करावी॥

दिली असती मृदु मांडि मी उशीला
तुला असते निजविले रे कुशीला
तुला मृदु गादी दिली असति बाळा
तुझे असते चेपले मी कापळ॥

सदोदित मी राहून उशापाशी
तुझी बाळा रे बनुन एक दासी
तुझी सेवा प्रेमार्द्र असति केली
परि काय पहा दैवगती झाली॥

जरी असते मी जवळ तुझ्या बाळा
धैर्य होते ना न्यावयास काळा
तुझे असते मी प्राण वाचवीले
परी बाळा हे काय बरे झाले।

कोण होते रे औषधास द्याया
कोण होते तव चरण चुराया
कोण होते पडताच हात द्याया
कुणी दाविल का तुरुंगात माया॥

शब्द तेथे मधु ऐकण्या न येई
कुणि न कोणाची वास्तपुस्त घेई
दुधाताकाचा थेंब नसे कोणा
जरी पडला आजारि दीनवाणा॥
 ==
सुखामाजी तू बाळ वाढलास
दहिदुधाविण तव जात नसे घास॥
जरा येइ जरि वास तो तुपास
रुसुन जाशी तू करिशि रे उपास॥

केवि कारागृह सौख्य तुला देई
बाळ जाणे रे सर्व तुझी आई
तुझा घुटमळला जीव रे असेल
घोट न दुधाचा लाभला असेल॥

कशासाठी गेलास रे तुरुंगी
सुखे असतासी मातृमृदूत्संगी
कशालागी आगीत बाळ गेला
पुन्हा भेटाया नाहि जगी उरला॥

तुझ्या आजारीपणाची कथा ती
दगड परिसुन होतील विरुन माती
बाळ कैसे मम अश्रु थांबतील
हृदय फुटते रे तुटत तीळ तीळ॥

मरण चुकले जरि नाहि जगी कोणा
मृत्यु यावा ना असा दीनवाणा
निज-प्रियजन-मधुसंगतीत यावा
मृत्यु होइल तो सह्य तरी जीवा॥

तुझी बाळा ती दूर मायबापे
तुला भेटू शकली न पूर्वपापे
तुझे दर्शन घडले न शेवटील
कसे अश्रू हे बाळ थांबवील॥

तुझे गेले असतील गाल खोल
तसे नयन तुझे तारका-विलोल
शक्ति उठण्याची उरलि ती नसेल
कसे अश्रू हे बाळ थांबतील॥

जरी उघडे ग्लानीत पडे अंग
हळुच पांघरुणा कोण घालि सांग
जरी तुजलागि लागली तहान
दिले अविलंबे जळ कुणी उठून॥

कोण केसांवरुनिया हात फिरवी
कोण मृदु बोले हृदय तुझे रिझवी
कोण प्रेमभरे मुके तिथे घेई
कोण प्रेमाने स्निग्ध तुला पाही॥

अनास्थेने मदबाळ मला मुकला
अनास्थेने मदबाळ अहा सुकला
बाळ आम्ही उभयता रे अभागी
काहि करु शकलो ते न तुझ्यालागी॥

घरी गायिगुरे केवढे खिलार
किती संपत्ती तव पिता कुबेर
घरी होती ती कशाची न वाण
परी कारागृहि जाइ तुझा प्राण॥

आम्ही घरि होतो बाळ रे सुखात
तूपसाखर जरि रडत तरी खात
तुला नव्हता सुग्रास त्याच वेळी
कसे अश्रु न गळतील बाळ गाली॥

तुझा बाळा श्रीमंत किती बाप
परी ओढवले पहा पूर्व पाप
एक पैहि न खर्चता बाळ आली
कसे अश्रु न गळतील बाळ गाली॥

कोण कुरवाळी तेथ तुझ्या अंगा
कोण दावि तिथे प्रेम-हृतरंगा
कुणी मांडी का दिली प्रेमरंगा
कुणी घातली का सांग मुखी गंगा॥

बाळ जाते फाटून चित्त माझे
कसे कुसकुरले फूल मधुर ताजे
बाळ माझा ना वाचविला कोणी
मृत्युवार्ता ती फक्त पडे कानी॥

फत्तरासहि फुटतील झरे राजा
किती पडतिल हृदयास घरे माझ्या
काय समाजाविशि? बोलशी कशाला
जगी समजावी कोण माउलीला॥

भेट होउ न दिलि गायवासराची
काय पूर्विल ते पाप बाळ जाची
पुत्रनिधनासम अन्य न हृद्रोग
बाळ साहे ना क्षण तुझा वियोग॥

तुला बिलगू दे धरिन तुला पोटी
मुके अगणित घेईन देइ भेटी
निकट राही तू सदा पाखरा रे
खेळ बागड मधुरा न दूर जा रे॥”
 ==
(असे बोलून माता मुलास पोटाशी धरण्यास धावते. परंतु तो देवाघरचा सोवळा बाळ दूर होतो व आईला दूर होण्यास खूण करतो. आईचा विलाप चालला असता पित्याची मन:स्थिती कशी होती ती पहा-)

पिता परी खिन्न उगीच राहे
मधेच नेत्रांतुन नीर वाहे
उदास ऐके हृदयार्द्र बोल
रुतोनि चित्ती बसती सखोल॥

संचित राही मिटि लोचनाते
तुटोनी जाई अजि पुत्रनाते
विचारकाहूर उठे मनात
निवांत राहे हृदयी अशांत॥

न दु:ख जे शब्दविभाव्य होई
मनास अत्यंत असीम दाही
तसा न अंगार तनूस जाळी
उफाळ जैसा तनुलागि पोळी॥

समुद्र जसा वडवानळाने
पिता जळे आत तसा मनाने
न बोलला शब्द-वदेल कायी
फुटे तदीयांतर जेवि लाही॥

मूकेपणा दावि तदीय शोक
गमे तया शून्य समस्त लोक
मुखावरी खिन्न दिसे निराशा
शिरे मनीही करण्या निवासा॥

मनावरी तो जरि दु:खभार
करीत होता स्वमनी विचार
विचार ते ऐकुन बाळकाचे
तरंग येती हृदयी तयाचे॥

मनात होता जरि दु:खभग्न
पिता दिसे खोल विचारमग्न
दिसावया लागत त्या स्वदेश
यदर्थ तत्पुत्र वरी मृतीस॥

(बाप मुका व खिन्न आहे असे बघून मातेला पुन्हा उमाळा येतो. ती मुलाला ‘ये रे’ म्हणते व ‘मुलाला काही सांगा’ असे पतीला विनविते)

“येई येई रे
मनोहरा
सुकुमारा सुंदरा
राजस पाडसा
स्नेहाळा
बाळा गुणगंभीरा॥ येई....॥

सांगा हो तुम्ही
लवलाही
बाळ कसा तरि राही
येथे ज्या योगे
नच जाई
सुखविल दु:खी आई॥ येई....॥

तुम्ही मूक कसे
पुत्रला
चार शब्द तरि बोला
मातृप्रेमाचा
ओलावा
आणा तदहृदयाला॥ येई....॥

प्रेमाचा पान्हा
पाजु कुणा
येइ न कोणा करुणा
हे करुणावंता
दयाघना
दे मज मम बाळ पुन्हा॥ येई....॥
==
(ती माता पुन्हा पुत्राला कवटाळावयास धावते. तो स्वर्गीय पुत्र खुणावतो व दूर होतो. तो तिची पुन्हा समजूत घालतो.)

“आई नाही हृदय मम हे जाहले गे कठोर
आहे माते परि निशिदिनी अंतरी एक घोर
त्वत्प्रेमाची स्मृति विमल ती कैशि जाईल आई
पूज्या मूर्ती तव सतत ह्या अंतरंगात राही॥

आई वाटे तुजसि करुणा फक्त त्वदबाळकाची
दु:खी सारी खितपत परी लेकरे भारताची
वाटे पुत्रे तव कितितली सोशिले हाल कारी
पाही डोळे उघडुन परी बाळके दीन सारी॥

ना खायाला मिळत कळही ना करी पाव आणा
आपदग्रस्ता सकल जनता ना मिळे एक दाणा
राहायाला घर न उरले वस्त्र ना नेसण्याला
आई नाही उरलि मिति गे भारती आज हाल॥

कित्येकांना घरि न मिळते देतसे जे तुरुंग
होती गादी मजसि जननी तेथ लाभे पलंग
होते तेथे नियमित भिषग् औषधे द्यावयाते
केव्हा केव्हा मिळत जननी दूधही प्यावयाते॥

लाभे कोणाप्रति जननि गे तेथे ती पावरोटी
सायंकाळी कधि कधि मिळे ताकही अर्धलोटी
राहे कोणी कधिहि न तिथे एकही तो उपाशी
राहे अन्नाविण जरि कुणी येति ते चौकशीसी॥

बाहेरी ह्या परम जपता, पुत्र कोटी उपाशी
माते देता घृत मधु हधी, ना पुशी कोणि त्यांसी
हिंदुस्थानी हरहर किती जाहलीसे हलाखी
कोणा ये ना हृदयि करुणा, सर्व आई उदासी॥

श्रीमंतांचे सजति उठती बंगले ते महाल
मोटारीही उडति, बघतो बंधुचे कोण हाल
पाषाणाचेहुन अदय हे गांजिती सावकार
हाहा:कार ध्वनि उठतसे, ना दया, ना विचार॥

माझे रात्रंदिन तळमळे चित्त बंध्वापदेने
धुव्वा जावे उडवित गमे भीमसेनी गदेने
सौख्यी नांदे पतसमुख तो नित्य श्रीमंत एक
दारिद्रयी हा मरत दुसरा ना जगी या विवेक॥

एके सौख्यी सतत असणे अन्य लाखो मरावे
एकासाठी झिजुनि झिजुनि बाकीचे दीन व्हावे
श्रीमंताचे घरि झडतसे रोज ती मेजवानी
लाखो अन्नाविण मरति हे बंधु गे दीनवाणी॥

माझ्या नेत्री अविरल जळा घोर वैषम्य आणी
मच्चित्ताने विरघळुनिया आइ हे होइ पाणी
ऐके आर्तस्वर उठतसे अंबरी जाय हाय
आई नाही ह-दय सधना शुद्ध पाणाण काय?॥

आलस्याला मिळती सगळे भोग सारे विलास
कष्टे रात्रंदिन परि तया ना पुरे दोन घास
अन्याया या सहन करिती वेदवेदांतवाले
गीता ओठी परि विषमता घोर ही त्यांस चाले॥

अन्नभावे मरत असता बंधु, जाई घशात
लाडु जिल्बी, हरहर कसे चित्त लागे अशांत
कैसे झाले स्वजन कठीण-स्वांत कारुण्यहीन
बंधू लाखो तळमळती हे मीनसे वारिवीण॥

चित्ती आई लव तुम्हि विवेका करा धर्म काय
मानव्याचे निज मनि बघा उज्ज्वल ध्येय काय
विश्वामाजी किती विषमता दु:खद प्राणघेणी
झाला येथे नरक दुसरा लक्ष देई न कोणी॥

श्रीमंताच्या सदनि भरल्या रम्य गाद्या पलंग
रस्त्यामध्ये श्रमुन पडतो दीन टाकून अंग
श्रीमंताचे घरि झळकती दिव्य विद्युत्प्रदीप
अंधारी तो मजुर मरतो सर्प विंचू समीप॥

श्रीमंताचे ललितभवनी नृत्यसंगीत होत
होत प्राणांतिक कहर त्या चंद्रमौळी घरात
श्रीमंताने किति सुखि शुक श्वान मार्जार मैना
मदबंधूंची हरहर परी काय ही हाय दैना॥

श्रीमंतार्थ श्रमत असता घर्मधारा सुटाव्या
पर्जन्यी त्या जमिनित जशा उपळा हो फुटाव्या
सारा जावा दिन परि घरी काहि ना खावयाते
नाही त्याला मिळत तुकडा ना पुरे ल्यावयाते॥

थंडीवा-यामधि चिमुकली लक्ष बाळे मरावी
आईबाप व्यथितमती तदवृत्ति वेडीच व्हावी
हिंदुस्थानी गरिब विपदे अंत ना पार देखा
श्रीमंताचा तरिहि पुरवी दानवी देव हेका॥

‘गंगे गोदे’ वदुनि जननी अर्पिती बाळकांना
पोटामध्ये तटिनि धरिती दीन त्या अर्भकांना
खाया नाही म्हणुन किति ते आत्महत्या करीत
आई नाही मुळिच उरली भारती न्यायनीत॥

दारिद्रयाने मरत असता पोटाचे गोड गोळे
देवाला हे बघवत कसे त्यास ना काय डोळे
गेला गेला सदय तुमचा देव आई मरून
घ्यावा आम्ही झगडुन निजोद्धार आता करून॥

पाडायाते सकळ असती उद्धाराया न कोणी
मारायाते सकल उठती तारण्या नाहि कोण
साहाय्याला कुणि न, वदती शब्द ना सानुकंप
आई आता अम्हिच करणे स्वोद्धृती ती विकंप॥

राहे पायांवर निज उभा भाग्य त्यालाच लाभे
जो जो आई जगति वरितो स्वावलंबनास शोभे
ऐश्वर्याची कधी न घडते प्राप्ति आशाळभूता
होते प्राप्ति त्वरित परि ती उत्कटोत्साहयुक्तां॥
==
सूर्याचे ते विभव उसने घेतसे चंद्र मिंधा
अर्धा केव्हा कधि मुळिच ना डागही नित्य बंदा
तारे कैसे मिरवति परी नित्य तेजे स्वतंत्र
स्वोद्धाराते करुनि मिरवू घेउ स्वातंत्रमंत्र॥

अन्नभावे तडफडत हे जोवरी आइ बंधू
मदरक्ताचा पसरिन सडा सांडुनि बिंदु बिंदु
अन्नवस्त्राविण न भुवनी जीव कोणी रहावा
त्याच्यासाठी झिजुनी झिजुनी आई मज्जन्म जावा॥

माझे बंधू अधन अधमी सावकारी पिळावे
तैसे नानाविध कर किती लागती त्यांस द्यावे
बंधूंना ना लवणहि मिळे चाटिती भूमि खरी
आई, ऐशी सुकरुण कथा चित्त माझे विदारी॥

लोकांपाशी कण न उरला तो उरे शोकापूर
बोलायाचे बळ न उरले तो उरे शोकसूर
नाही धंदा उतर उरला मृत्युवाचून आता
त्राता नाही निजजनहि ना देति साहाय्य हाता॥

खेडोपाडी दिसत सगळे लोक बेरोजगार
दारुमध्ये बुडति विपदा वर्णवे ती न घोर
दारुमध्ये धुळिस मिळती खानदानी घराणी
आई ऐशी सुकरुण कथा लोचनी पाणि आणी॥”

(मुलगा भावनाभरात भारताची दैन्यदशा वर्णन करीत असतो. परंतु मातेला पटत नाही. ती एकदम पुढीलप्रमाणे बोलू लागते.)

“मला ना कळते बाळा समजावी तुझा पिता
म्हणती खोटि स्त्रीबुद्धि ऐकेन तुमच्या कथा॥

पित्याला पटवी बोल जरि त्या पटती तरी
मला त्यातच आनंद तन्मना तुष्ट तू करी॥

तुमचा हितसंवाद बसुनी येथ ऐकते
प्रकाश पडला चित्ती अल्पसाही बरेच ते॥

तुझ्या गोड मुखा बाळा बसते येथ पाहत
तुझ्या गोड कथा बाळा बसते येथे ऐकत॥

जरि ना कळले माते त्वदबोल मज अमृत
ऐकते लक्ष लावून मुक्याचे घेउनी व्रत॥”

(पिता मुलाजवळ बोलू लागतो.)

“बाळ मी ऐकले बोल तुझे जे खोल गंभिर
ऐकता कंठही दाटे शोकाने भरतो उर॥

देशाची स्थिती ही हीन लोक सर्वहि निर्धन
समस्त दिसती दीन येते हे भरुनी मन॥

उपाय ना परी बाळा आम्हाला एकही दिसे
बघून तुमचे यत्न सारेच जग हे हसे॥

ईश्वराच्या कृपेनेच येतील दिन चांगले
अंधारामागुनी जेवी प्रकाशकर ते भले॥”

(हा दैववाद ऐकून मुलगा त्वेषाने बोलू लागतो.)

“बाबा हे बोलता काय प्रयत्नदेव तो तरे
प्रयत्नास सदा आधी धरावे हृदयी नरे॥

नरका नंदनाचे ते यत्न तो रुप देतसे
प्रयत्न करिती राष्ट्रे पृथ्वीवर पहा कसे॥

यत्न जो करि त्या देव साहाय्य करितो सदा
संकटात पुढे जातो हरि देव तदापदा॥

गोवर्धनास ते काठ्या आधि गोपाळ लाविती
मग तो लावितो बोट श्रीकृष्ण वदु मी किती॥

बोलतो फक्त मदबंधू कृतीचा शंख तो परी
करील देव तो काय बघतो कोण अंतरी॥

भावनांचा अस्त झाला विचार उरला नसे
दिसती निजलि सारे मदबंधू पशु ते जसे॥

झाले सकल मदबंधू शिश्नोदरपरायण
नारायण कसे त्यांना करि मोक्षसमर्पण॥”
==
(लोकांच्या मनोवृत्तीचे तो तरुण पुत्र वर्णन करतो.)

“न केवळाहि भावना न केवळाहि वल्गना
विचार भावना कृती तरीच होइ उन्नती॥

उदार भावना नसे विचार ना मनी वसे
कृती म्हणाल शून्य ती कशी घडेल उन्नती॥

मनास टोचणी नसे मती सखोल ती नसे
खुशालचेंडु बैसती कशी घडेल उन्नती॥

जिवंत भाव ना तिळ तुटे न चित्त तिळतिळ
न मान-कीर्ती-चाड ती कशी घडेल उन्नती॥

पशूसमान जीवन पशूंतही किती गुण
न सत्यवस्तुची रती कशी घडेल उन्नती॥

स्वदेश न स्वधर्म न स्वकर्म न स्वशर्म न
उगीच व्यर्थ जल्पती कशी घडेल उन्नती॥

स्ववस्त्र न स्ववस्तु न स्वशस्त्र व स्वशास्त्र न
उगीच नंदि डोलती कशी घडेल उन्नती॥

मत स्व न मति स्व न कुठेच काहि राम न
अजागळापरी गती कशी घडेल उन्नती॥

समस्त हे परभृत खरा न एक पंडित
करील आत्म-आरती कशी घडेल उन्नती॥

मदांध ग्रस्त मत्सरे प्रमत्त देत उत्तरे
घमेंड की अम्हा मती कशी घडेल उन्नती॥

सदैव वृत्ति उर्मट सदैव एक तर्कट
करी टवाळि दुर्मति कशी घडेल उन्नती॥

गंभीरता विशुद्धता न ठाउकीच उद्धटा
सदैव छद्म दाविती कशी घडेल उन्नती॥

स्ववर्तनात वक्रता स्वभाषणात आढ्यता
जगास तुच्छ लेखिती कशी घडेल उन्नती॥

जगात आम्हि शाहणे नसे जणू अणू उणे
पदोपदी परि च्युति कशी घडेल उन्नती॥

हुशार राजकारण अम्हिच जाणतो खुण
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती॥

अम्हीच डाव जाणतो अम्हास कोण सांगतो
अशी करुन स्वस्तुती कशी घडेल उन्नती॥

सदुक्ति ती पटेच ना सुबुद्धि ती असेच ना
वदे तशी नसे कृती कशी घडेल उन्नती॥

समीप बुद्धि ती नसे दिली तरी न घेतसे
मनी सदा अहंकृती कशी घडेल उन्नती॥

दिवाळखोर हा असे हसे जगात होतसे
मनी परी न लाज ती कशी घडेल उन्नती॥

स्वतास मार्ग ना दिसे परास नित्य जो हसे
न यत्न ना पुढे गती कशी घडेल उन्नती॥

टपे सदे बकापरी स्वरुप साजिरे वरी
मध्येच चोच मारिती कशी घडेल उन्नती॥

महान खरे जगदगुरु सदैव यत्पदा धरु
करी न त्या नमस्कृती कशी घडेल उन्नती॥

जगात काय चालले स्वभूत केय चालले
न हे कुणीही पाहती कशी घडेल उन्नती॥

पलंगपंडिता-करी घडेल केवि चाकरी
न जोवरी खरे व्रती कशी घडेल उन्नती॥

असावि एकतानता असावि भाव-तीव्रता
तरीच होतसे कृती कृतीविणे न उन्नती॥

परंतु काय ही दशा बघुन दु:ख मानसा
न देशभक्ति ती दिसे खुशाल खातपीतसे॥

बघून देशदुर्गती खुशाल खेळ खेळती
क्षुधार्त बंधु पाहुन सुचे तयांस भोजन॥

खुशाल नाच चालती अनंत द्रव्य ओतिती
विचार येइ ना मनी दरिद्रता किती जनी॥

सहानुभूति-बिंदु न सुखी समस्त निंदुन
न चिंधि एक देतिल परस्व मात्र घेतिल॥
==
न सत्य ते मुळी उरे कसा समाज हा तरे
असत्यदेव पूजिती असत्य नित्य वागती॥

न बंधुभाव अल्पही दया क्षमा न नावही
न ऐक्य ते कुठे दिसे सदैव भांडखोरसे॥

घरात रोज भामडती पथात नित्य भांडती
मनी सदैव भांडती जनी समस्त भांडती॥

मजेत खेळ मांडिती तिथेही भांडु लागती
गंभीर प्रश्न काढिती तिथेही भांडती किती॥

करंट लोक हे असे कशास भाग्य येतसे
विदीर्ण होइ मन्मन बघून आपुले जन॥

यदा सुबुद्धि येइल तदाच कार्य होइल
विचार भावना मनी कृती घडेल हातुनी॥

म्हणून म्हणतो बाबा विचारा पेटवू जरी
पेटवू जनचित्ताते कृति होईल ती खरी॥

तुरुंगी असताना मी होउनी भावनिर्भर
लिहिले गीत मी एक म्हणु का गोड सुंदर॥”

(एकदम प्रेमाने आई बोलू लागते)

“बाळ माझा कवी झाला केव्हापासून रे गड्या
लबाडा गीत तू केले सुराने म्हण रे खड्या॥

आवाज तव आकर्षी आधीच हृदया मम
त्यात स्वकृत गीतास वदता अमृतासम॥

केव्हापासून झालास कवि पंडित शहाणा
गाई ते गीत तू बाळा आनंदे भरि मन्मना॥

पहा हा थांबला वारा त्वदगीत परिसावया
सखया ते तुझे गाणे लाग रे लाग गावया॥”

(मुलगा गाणे म्हणतो)

दीनशरण्या शुभलावण्या धन्या तू माउली
होतिस तप्त जगा साउली॥

तुझ्या विचारे येते माझे गहिवरुन गे मन
येतो कंठ किती दाटुन
इतिहास तुझा क्षणैक बसता येतो नयनांपुढे
शोके पिळवटते आतडे
हृदय गजबजे दृष्टी भरते पडति अश्रुचे सडे
वाटे सकळ चराचर रडे
अनंत देखावे भरभर गे चलच्चित्रपटसम
दिसती हृदय निर्मिती तम
उदात्त वाङमय कुठे, कुठे त्या कला कुठे ज्ञान ते
वैभव माते! आहे कुठे?
किती तपस्या त्याग किती तव वैराग्य तुझे किती
सत्त्वा नव्हति तुझ्या गे मिति
झाला अंतर्बाह्य भिकारी पुत्र तुझा आज गे
गुलाम केवळ म्हणुनी जगे
अनुकरण करी दुस-यांमागुन मंद जातसे सदा
पूजी भक्तीने परपदा
कला असो सादित्य असो वा असो राजकारण
जाई जगताच्या मागुन
स्वयंस्फूर्तिचा झरा आटला स्वतंत्र मति ती नूरे
प्रतिभा दिव्य सर्व ती मरे
जुनी संस्कृती जिवंत नाही उरले केवळ मढे
तरि किती कवटाळिति बापुडे
नव संस्कृति ती कळली नाही विचार कुणी ना करी
दारे लावुन बसती घरी
नवीन-गंभीर-विचार-गगना उड्डाणा मारुनी
तारक येइ न कुणी घेउनी
जसा मारुती गगनि उडाला जन्मताच निर्भय
दिसता रक्तभास्करोदय
मृत्युसमीपहि नचिकेता तो ज्ञानास्तव जातसे
आजी त्वत्सुत कोठे तसे
विद्या नाही, सदगुण नाही, बसलो कर जोडुन
जाई भाग्य अम्हा सोडुन
दया नसे सद्धर्म नसे तो नुरला एकहि गुण
जाई भाग्य म्हणुन सोडुन
गुणांजवळ नांदते अखंडित लक्ष्मी चंचल नसे
चंचल जनमत माते! असे
अम्ही भांडलो म्हणुनि कष्टलो, कष्टतसो रडतसो
कृतकर्मफळे भोगीतसे
सदगुण येतिल तेव्हा होइल भाग्योदय आमुचा
तोवरि पाश राहि शत्रुचा
माते! अमुच्या दुष्कृत्यांनी रडत अहा असशिल
कसचे पुत्र मनी म्हणशिल
एक सिंह तो बरा नको हे पस्तिस कोटी किडे
जाती चिरडुन ते बापुडे
एक चंद्र तो बरा कशाला अनंत त्या तारका
==
ज्या ना अंधकारहारिका
विशालशाखा पसरुन उभा एक पुरे वटतरु
नलगे क्षुद्रवनस्पतिभरु
येत असे असतील तुझ्या का विचार मनि अंबिके!
विमले स्नेहाळे सात्त्विके
अम्ही करंटे दुर्गुणखाणी सुत न तुझे शोभत
बसलो श्वानासम भुंकत
परिस्थिती न आकळ कळेना सांगितले ना वळे
पडलो तरिहि गर्व ना गळे
सरपटणारे सरडे सकळहि गुरुत्मान् कुणी नसे
जो तो बिळात घुसुनी बसे
चिखलामध्ये खडे फेकितो तिथेच घेतो उड्या
घेई न कोणी सागरी बुड्या
कूपमंडुकापरि अद्यापी उगाळितो गे जुने
एकच वाजवितो तुणतुणे
जगी नगारे प्रचंड भेरी वाजत माते! किती
सुस्त त्वत्सुत परि बैसती
ध्येयवाद तो नुरला, परि जरी दिसला, करिती टर
झाले पशूच उदरंभर
हसू की रडू उदास होते निराश होते मन
येइ प्रकाश का कोठुन
चैतन्याची कळा आमिच्या अंतरंगि संचरो
दिव्य स्फूर्तीने मन भरो
उत्कटता उज्वलता येवो भव्य नव्य आवडो
ध्येयी विशाल दृष्टी जडो
अनंत तेजे ज्वलन्निव असे धगधगीत लोळसे
पेटुन करु रुढी-कोळसे
किती विषारी किती भिकारी रान गवत माजले
सगळे पाहिजेत जाळले
नव प्रकाशा पहावयाला होवो सुरु धडपड
करु दे जीवात्मा तडफड
बंदिवास हो सरो, विचारा विश्व असो मोकळे
पंखा फडफडवू दे बळे
सकळ बंधने जीवात्म्याची बुद्धीची स्फूर्तिची
तुटुनी जाउ देत आजची
विशाल सुंदर नवीन गंभिर प्रश्न किती जीवनी
जाऊ भेटाया त्या झणी
होवो विक्रम मृतवत् अस्मत् स्थिति आता पालटो
त्वन्मुखशशि नवतेजे नटो
जाउ दे जाउ दे देवा! अस्तास सर्व दुर्भाग्य
येउ दे येउ दे देवा! ते मंगल शुभ सौभाग्य
होउ दे होउ दे बंधू! त्वत्कार्य कराया योग्य
शोभो पुनरपि भारतमाता जशि पूर्वी शोभली
सत्या शिवा सुंदरा भली। दीनशरण्या....॥

(मुलाचे गाणे संपताच माता गहिवरून म्हणते)

“बाळा अतीव मधुरा कविता तुझा रे
कोणी तुला शिकविले मति ही भरे रे
गाणी परी कवण ऐकवि बाळ आता
जाशील सोडुन मला करुनी अनाथा॥

बाळा तुझी हृदयहारि रसाळ गाणी
साधी किती सरळ सुंदर रम्य वाणी
तू आणिशी अमुचिया नयनांत पाणी
जाशील रे करुनिया मज दीनवाणी॥

त्वत्काव्यगंध मुळि ना कळला जगाला
आला कसा तुजवरी घनघोर घाला
बाळा कळीसमच जीवन जो तुझे रे
येते तुला मरण, निघृण काळ तो रे॥”

(मुलगा आईची समजूत करावयासाठी बोलतो)

“स्वातंत्र्यसंगीत तो दिव्य भगवंत निर्मीतसे मायभूमीवर
ही जीवने आमुची त्यात होतील तानापरी आइ गे सुंदर
मज्जीवनाची तिथे गुंफिली जात सत्तान झालो अमर्त्यापरी
आई नसे स्वार्थ, या भारताची प्रभा फाकु दे रम्य विश्वांतरी॥

जरि ना लिहिले काव्य काव्याचा विषय स्वता
आइ मी जाहलो आज तू मान मनि धन्यता
स्वातंत्र्य-सत्कथा निर्मू तदर्थ मम जीवन
आइ ना दु:ख ते वाटो तू शांत करि गे मन॥

मोक्षाची पावन गंगा निर्माया भारतांतरी
मज्जीवन सदबिंदु मिळाला शोक न करी॥

बाबा तेथे तुरुंगात विचार मनि खेळत
पेटवावे जागवावे हे समग्रहि भारत॥

जेधवा तीव्र वृत्तीचे उत्कट-स्वांत ते नर
उठतील हजारांनी आपल्या भारतावर॥

तेधवा तेज ये ईल देव ना सुखलोलुपा
देव येईल मागूनी मरा आधी तुम्ही खपा॥
==
जेव्हा राष्ट्रामधि निपजति उन्नत ध्येयवादी
त्यागी तेजोमय तरुण ते सुव्रती सत्यवादी
खेडोपाडी करितिल जरी ते विचारप्रसार
देशोद्वारा मग तुम्हि वदा काय लागे उशीर॥

खेडोपाडी झणि उडवुनी कल्पनांचे फवारे
स्वातंत्र्याचे प्रबळ भरुनी भारती दिव्य वारे
‘कैसे तुम्ही मनुज असुनी राहता रे गुलाम
याच्यापेक्षा मरण बरवे या म्हणू सर्व राम॥

मेलेले ना पडुनि असणे मर्दसे हो उठावे
स्वीय स्थानाप्रति पुनरपि पौरुषे शीघ्र घ्यावे’
ऐसे लोकांप्रति कथुनिया पेटवू अंतरंग
पाशा तोडू करु उठुनिया शृंखलांचा विभंग॥

कोणी नाही धरणिवरि या आपणावीण दीन
तेजे तुर्क स्थिर मिरवतो तो उभा चंड चीन
पोलादाचे परि चिमुकला धन्य पोलंड देश
अफगाणाते नमुन असतो आंग्लभूचा नरेश॥

झाले जागे खडबडुन ते आज इजिप्त सुप्त
दावी तेज:प्रसर प्रगटी स्वीय सामर्थ्य गुप्त
ईशान्येला डुलत असतो वैभवाने जपान
छोटी मोठी कृति परि, तया अग्रराष्ट्रांत मान॥

आयर्लंड प्रथित भुवनी मेळवी स्वीय मोक्ष
भव्य क्रांती करित रशिया विस्मये पाहि विश्व
देशोदेशी सकळ जनता पेटलेली पहा ती
हिंदुस्थानी परि न उठती सर्व झोपाच घेती॥

स्वातंत्र्याने हसति खुलती राष्ट्रके सानसान
हिंदुस्थानाहुन शतपटीने जरी ती लहान
उत्कर्षाला करुन करिती चित्कलावाग्विलास
विश्वा देती, जरि लघु तरी, संस्कृतीचा प्रकाश॥

दु:खी पंगू पतित दुबळे राहिलो हो भिकारी
आता पृथ्वी दिपवु उठुनी तेज दावून भारी
शक्ती आहे जगति अतुला एक ती निश्चयाची
लक्ष्मी, ज्याला अविचल असे नित्य निर्धार, त्याची॥”

(बाप म्हणतो, “आपणात भांडणे किती धर्मही बुडत चालला. महारांना म्हणतात शिवा. आचार उरला नाही तर कसे होणार?”)

काय सांगाल लोकांस लोकांमध्ये नसे बळ
ऐक्य नाही धर्म नाही कोठे दाबाल रे कळ॥

स्पृश्यास्पृश्य तसे अन्य वाद माजून राहिले
भ्रष्टता माजली सारी हलकल्लोळ माजले॥

ब्राह्मणब्राह्मन्यांची खडाजंगी असे सदा
जागा न उरली कोठे बाळा टाकावया पदा॥

हिंदू आणि मुसलमान पाण्यात बघती जसे
विश्वास लव ना उरला बाळ होईल रे कसे॥

धर्मास लागतो डाग धर्म श्रेष्ठ सनातन
आचारा बुडवितात माझे हे करपे मन॥

धर्म हा प्राण जीवाचा धर्मार्थ सर्व पाहिजे
त्याच धर्मास टाकोनी बाळा चित्तांत लाजिजे॥”

(मुलगा बोलतो)

“बाबा होत किती मदीय हृदयी कालवाकालव
अस्पृश्यापरि मानुतो तरि कसे ते आपुले बांधव
श्रेष्ठाश्रेष्ठ समस्त ढोंग, न असे अस्पृश्य हा मानव
नाही थोर विचार तात दिसतो लोकांतरंगी लव॥

देवाचे घरि पाप घोर करितो अस्पृश्य या लेखुनी
आले नाही जगात खास समजा अस्पृश्य ते होउनी
आम्ही मानव हीन दीन तरितो त्या धर्म हो मानितो
ऐसा धर्म जळो मनुष्यहृदये जो भाजण्या सांगतो॥

कुत्री पोपट डास ढेकुण तशा मुंग्या तशी मांजरे
यांनी ती न विटाळती अपुलि हो स्वप्नांमध्येही घरे
येती पक्षिपशू खुशाल बसती देवालयी निर्भर
जाता ये परि मानवास न तिथे धिक् धिक् असा हा नय॥

कोल्ही ओरडती, स्मशान-वसती, तेथे तया राखुनी
धंदे सर्व गलिच्छ जे सकळ ते प्रेमे तया देवुनी
‘तुम्ही स्वच्छ बना, सुसंस्कृत बना, मालिन्य दूरी करा’
ऐसे हे वदणे गमे खुपसणे घोरव्रणी तो सुरा॥

बाबा एकही त्याजला न दिधला ज्ञानप्रकाशांशु तो
बाबा क्रूरपणा असीम बघुनी मज्जीव हा कापतो
वर्षे कैक हजार मानव परी केले तयांना पशू
नाही दाखविले कधीहि चुकुनी ते प्रेम वा ते असू॥

बाबा घोर कलंक हा अपुलिया ह्या थोर धर्मावरी
डागा मानितसो सुभूषण सदा हा! हा! कसे अंतरी
मानव्या अवमानितो मनुज तो धिक्कारितो प्रौढिने
पाषाणासम जाहलो जरि कशी ही आपुली हो मने॥

देवा मानितसा करी झणि उठा अस्पृश्यता ना उरो
त्यांचे क्लेश विपन्नता विकलता दुर्भाग्य सारे सरो
सारे बंधु बनू खरे निज मने प्रेमे अता रंगवू
मातेला कलहादिकी मुळि अता ना तात हो खंगवू॥”
==
(बाबा मुसलमानांस आपण सदा नावे ठेवतो परंतु ते सारेच वाईट नसतात. भलेबुरे सा-यांत आहेत.” अशी विचारसरणी मुलगा मांडतो.)

“हिंदु धर्म सामनतेस शिकवी आचार उल्टा परी
इस्लामी जन वागती अधिक ते एकत्र बंधूपरी
अन्या बंधुस आगगाडिमधि तो भेटे मुसलमान जरी
बोलू लागति, एक होति, मिळती, खातील एकत्रही॥

आम्हां संकुचितांतरांस गमते की तो मुसलमान अरी
दृष्टी नाहि विशाल, तीन शतके मागे विहारा करी
देऊ घालवुनी अम्हांस गमते येथून बाहेर त्या
ज्यांच्या येथ अनेक आजवरि त्या झाल्या पिढ्या नांदत्या॥

मातेचे परशत्रु ते विसरतो, आहे मुसलमान तो
ऐसे नित्य कथांतुनी अजुनही काव्यांतुनी दावितो
पोवाडे अजुनी म्हणू गरजती कापा मुसलमान जे
राष्ट्राचे नव प्रश्न खोल बघण्या धी आमुची ना धजे॥

इस्लामी म्हणजे कठोर ठरला दुर्वृत्त पापी ठक
नाही तद्-हृदयास पाप म्हणुनी वस्तू जणू ठाउक
हिंदूंच्या बळजोरिने पळवुनी न्याव्या स्त्रिया सतत
ऐसे नित्य अम्ही जना शिकवितो की हे मुसलमान-व्रत॥

ना हे सत्य मुळी, तयातहि पहा ते नांदती सदगुण
प्रामाणीकपणात नाहि कमती ते तात हिंदुहुन
इस्लामी गवळी न नीर मिसळी, हिंदु कसा तो असे
जो पूर्वग्रह-दूषितांतर नसे त्या सर्व काही दिसे॥

नाना गाव पहा, घरोघर तिथे ते भृत्य प्रामाणिक
इस्लामी दिसतील खेळविति जे प्रेमे मुले बाळक
जे श्रीमंत कुबेर तदभवनिही इस्लामि ते चाकर
निष्ठापूर्वक कामधाम करिती संपादिती भाकर॥

होतो घेत समस्त एकवटुनी अन्योन्य-सत्- संस्कृती
ती रामायणभारतोपनिषदे भाषांतरीली किती
इस्लामी कविंनी, सुकाव्य लिहिले येथील भाषांतुनी
प्रेमे वाढविले कलांस नमुने उत्कृष्ट ते निर्मुनी॥

केली जी रणकंदने विसरुनी हिंदुमुसलमान जनी
माता भारत एक ही सकळिकी वृत्ती मनी आणुनी
जो जो भारतभूमिला पदतळी ठेवील तो तो रिपू
मानोनी, करण्या स्वतंत्र निजभू या तात सारे खपू॥

मोठे संकट दूर आधि करु या बारीक राहो दूरी
मातेच्या हृदयात खोल घुसली ही दास्यरुपी सुरी
होऊ या झणि एक, एक हृदयी तो राष्ट्रधर्म स्मरू
इस्लामी जन तोहि बंधू समजू वृत्ती उदारा करू॥

धर्माचा जरि खोल पाहु तरि तो आत्मा असे एकच
आम्हालाच नको, पहा पडतसे रुढ्यादिकांचा खच
जे तुम्हां दिसतात भेद असती काळ स्थितीच्यामुळे
त्या भेदांसच मुख्य मानुन पहा हे भांडताती खुळे॥

का हा सनातन प्रथित हो, त्याचा कळे अर्थ का
रुढीच्या भजकांस तात मुळि तो नाहीच हो ठावुका
जे सतत्व कुठे दिसेल जगती जे सत्य कोठे दिसे
ते ते घेइ सनातनी जरि खरा, तददृष्टि कोती नसे॥

तत्त्वाची महती असे, न महती व्यक्तीस; सत्याप्रत
सांगो शंकर, बुद्ध, ख्रिस्त, मनु वा पैगंबर प्रेषित
ज्ञानोबा कथु वा कबीर कथु दे एका तुका नानक
जो जो धर्म सनातनी असत तो सतत्त्व-संग्राहक॥

देखा धर्मि सनातनी सगुणही आहे तसे निर्गुण
आहे यज्ञच फक्त देवहि नसे मीमांसकालागुन
बुद्धाला अवतार मानित असो, केला तया आपुला
ही संग्रहकता असे म्हणुन हो हा धर्म आहे भला॥

जैसे ते अवतार मानित असो श्रीरामकृष्णादिक
बुद्धख्रिस्तमहंमहासहि चला मानू जगत्तारक
होते सांगत सर्वदा शिकवित श्रीरामकृष्ण प्रभु
आलिंगील जगा सनातन जरी हा धर्म आहे विभु॥

(बाबा, इतर धर्मांतील उदात्त गोष्टीच आपण बघाव्या. महान धर्मसंस्थापकांची निंदा करणे बरे नव्हे.)

“जो देवास भितो असे अधिक तो, तो उच्च, तो सत्कृती
नाही वंश कुळास मान लिहिले ऐसे कुराणी किती
झाल्या थोर विभूति या जगति ज्या हे विश्व ज्या वंदिते
त्यांना तुम्हिहि मान द्या अरब हे ऐसे कुराण सांगते॥

लोखंडाहुन अग्नि थोर, जल ते अग्नीहुनी उदबळ
वारा वारिहुनी, तयाहुन असे मोठा गिरी निश्चळ
त्या अद्रीहुन थोर जे सदय जे निष्पाप जे अंतर
ऐसे या जगतास नित्य करिते श्रीमत्-कुराण जाहिर॥

आकारी प्रभु तो नसे, विभु महान ना मूर्तिमर्यादित
तुम्ही बंधु समस्त, ईश्वर मनी भावोन जा वागत
शेजा-यास जरी नसे तुझी तू देत जा भाकर
साध्या, सुंदर गोष्टि सांगत अशा शिष्यांस पैगंबर॥

बुद्ध प्रीती कथी अनंत, न असे जी वस्तुमर्यादित
युष्मत्प्रेमजलामबुधीत सगळे राहो जगत् डुंबत
कोणाला दुखवा मुळी न, न कुणा जीवास लावा ढका
आचारा मधुरा सुरम्य असल्या बुद्धोपदेशी शिका॥

पश्चात्ताप खरा मनास तरि तो घेईल विश्वंभर
प्रेमाने जवळी, जरीहि असला दुर्वृत्त पापंकर
घाली बंध्वपराध पोटि सगळे, जैसे तुझे देव तो
तत्त्वे ऐशि उदार सुंदर जगा तो ख्रिस्त हो अर्पितो॥

जे जे सुंदर सत्य हृद्य, उचलू सर्वांहि धर्मातुनी
होऊ थोर सनातनी तरि खरे थोरांस या सेवुनी
‘अकाशामधला तुझा मज असे ठाऊक तो बाप रे’
ऐसे बोलु न पूज्यनिंदन करी तो जीव कैसा तरे॥

काही अन्य म्हणोत मी करिन मच्चित्तास मोठे खरे
जे जे सत्य दिसेल ते नमुनि मी घेईन अत्यादरे
ऐशी वृत्ति सनातनी कुठुनही येवो प्रकाशप्रभा
ओलावा कुठलाहि तो मिळवुनी सदवृक्ष राहे उभा॥
==
ओलावा हृदयास द्या मिळवुनी ठेवा न ते कोरडे
द्वेषाने जगतात तात उपजे तो द्वेष वाढे नडे
प्रेमाते प्रकटोनिया गुण दिसे तो मुख्य मानूनिया
दूरी दुर्गुण ते करून, झगडू तो स्वर्ग निर्मावया॥

रामोपासक गाणपत्य कुणि वा श्रीकृष्णनामी रत
जैसे एक घरात आज दिसती प्रेमे सुखे नांदत
ख्रिस्तोपासक रामभक्त अथवा पैगंबराला नत
हे एक्या घरि नांदण्यास नसती का तात हो संगत॥

बाबा थोर अपाय ह्या सकळही श्रीमद्विभूती शुभा
पूजावे मनुजे तयांस मिळते जेथून ज्याला प्रभा
सन्यत्सेन असून ख्रिस्ति, बनला तो चीनराष्ट्राग्रणी
राष्ट्राच्या जनकापरी समजती त्या लोक सारे चिनी॥

तो सेनापति नोगि ख्रिश्चन जगद्विख्यात शौर्याकर
त्याते देइ जपान मान न मनी आणीत धर्मांतर
तैसे आपणही खुशाल कुठल्या धर्मास मानो कुणी
होऊ चित्ति उदार, सत्यमय तो पूजू बनोनी गुणी॥

निष्ठा राखुन आपुली, न दुखवू जी अन्यनिष्ठा खरी
अन्याच्या हृदया जरा दुखविणे ती होय हत्या तरी
सांभाळून परस्परांस करुनी घेऊ विकासा चला
देणे हाच धडा समग्र जगता या भारताने भला॥

राहे जीव धरुन देश अपुला कंगाल दु:खी मुका
आहे ध्येय तयास काय? पडतो चित्ति प्रकाशांशु का?
आहे हा जगला कशास जगती प्राचीन हो भारत
देवोनी टकरा अनंत टिकला काळाशि हा झुंजत?॥

स्वातंत्र्या मिळवून काय जगती सांगेल हा भारत?
दास्यी लोटिल काय अन्य जनता होऊन सत्तारत?
ऐश्वर्यी मिरवेल काय जगती मत्तोन्मदांधापरी,
विश्वाला लुटुनी जगास करुनी दुर्मिळ ती भाकरी॥

व्हावा भारत शीघ्र मुक्त तरि तो व्हावा किमर्थ वदा
नाही खास जगामधील असती त्या पोसण्या आपदा
शांताचा जगतास सत्पथ भला दावावया भारत
होतो मुक्त, म्हणून ईश्वरकृपे तो जाहला ना मृत॥

युद्धाचा जगतास वीट लढुनी येईल तो अंतरी
शांतीचा मग त्या तहान हृदयी लागेल तीव्रा खरी
तेव्हा भारत हा स्वतंत्र जगता दावावया सत्पथ
अग्रे होइल, नीट चालविल हा विश्वंभराचा रथ॥

नाना धर्म विभिन्न ते असुनिही प्रेमादरे राहती
शेजारी, शिकवील सर्व जगता ही भारती संस्कृती
हिंदु ख्रिश्चन पारसीक शिखही ते जैन बौद्धादिक
इस्लामी अणखी कुणीहि सगळे नांदोनि निर्मू सुख॥

घेऊ सर्वहि तात! थोर हृदये अन्योन्य जे चांगले
होऊ उन्नत उत्तरोत्तर गळा घालून भावे गळे
शांती शांतिविहीन युद्धनिरता दावावया भारत
आहे हा जगला, न ईश्वरकृपे तो जाहला हो मृत॥

बाबा उदार शुभ उन्नत हे विचार
सर्वत्र भारतजनी करणे प्रसार
नि:शंक निर्भय बनोनी कथावयास
यावे पुढे जनहितास करावयास॥

ते आग पेटविति सर्वहि हाय बाबा
खोटीच दाखविति ऐट आणि रुबाबा
ना भांडणे मिटविती परि वर्धमान
बाबा करोनि अजि कापिति देश-मान॥

लावावया सजति लोक समस्त आग
ना शांतिचा कुणिहि दाखविण्यास मार्ग
ओतीत तेल सगळे विझवी न कोणी
प्रत्येक देशहित हेच मनात मानी॥

लागे कधी तरि जगी मनुजा शिकाया
ना भांडणे हित असे. श्रम वेळ वाया
होऊनिया स्वमनि केणि तरी उदार
लागेच शांत करणे हलके विकार॥

ना ह्यांत तो कमिपणा मच हानि यात
होण्यात उन्नत सदा सुख थोर तात
तो देव ना हृदयि मात्र समीप ओठा
पूजीतसो सकळही अभिमान खोटा॥

जो व्यापितो सकल विश्व, तदर्थ तात
भांडावया उठति, दुर्मति वाटतात
ना देवभक्ति हृदयी अभिमान-भक्त
भांडोनिया सतत सांडिति बंधुरक्त॥

बेधूवरी कर कधी न कुणी उगारी
जो लेकरे प्रभूचि मनि मनात सारी
ना बंधु-रक्त सुखवी जगदीश्वराला
देवा न पूजिति, परी अभिमानतेला॥

होऊन सर्द मनि एक, स्वतंत्र होऊ
विश्वास विक्रम अनंत सुतेज दाऊ
स्वातंत्र्यही मिळविणे न मुळी रणाने
मारू न, आम्हि मिळवू अमुच्या मृतीने॥

न तात युद्धमार्गाने स्वातंत्र्य भारता मिळे
न अत्याचार करुनी सत्य हे मन्मना कळे॥

ऐक्याचा एकजूटीचा नि:शास्त्राचा तसा नव
संदेश द्यावया लोका हजारो लागती युव॥

विचार-जागृती मोठी यदा देशात होइल
उठतील भय-त्यागे तेव्हा स्वातंत्र्य येइल॥

तात म्या काय सांगावे उठोनी मातृभूस्तव
प्रेमे त्यागे जरी शोभू वेळ मोक्षार्थ ना लव॥
==
(बाप बोलतो)

विचार बाळ हे खोल जनास रुचतील का
शंका चित्तांत ही माझ्या म्हणून बसतो मुका॥

धर्माच्या कल्पना रुढ स्वातंत्र्यप्राप्तिच्या तशा
तद्विरुद्ध जना गोष्टी वद तू रुचतील का॥

(हे ऐकून मुलगा एकदम आवेशाने म्हणतो.)

ध्येयाचा एक माणूस हलवील उभी वरा
तात! गंभीर चित्तांत विचार करणे जरा॥

म्हणेल जनता मूर्ख हसेल अवमानिल
ध्येयाचा नर तो थोर पद मागे न घेईल॥

नवीन कल्पना लोका रुचते नच तत्क्षणी
उपहासास्पद ठरे कल्पनाप्रसु जो जनी॥

निश्चयाने परी ठाण मांडितो वीर तो यदा
वंदाया येति तत्पाद टाकुन स्वमनोमदा॥

धैर्याने प्रथम नभात एक तारा
ठाके नंतर उडुवृंद येत सारा,
छातीचा नरच धजे जली शिराया
येती मागुन सगळेच येति बाया॥

निर्मी जो पदसगरा तयास मान
त्याला या जगि मिळते महोच्चस्थान
लागे ही पुढति कुणीतरी घुसाया
लागेच प्रथम कुणी तरी मराया॥

कोणीच प्रथम जरी पुढे न येई
सारे प्रेक्षक, जगदुन्नती न होई
ध्येयाचे नरच वरी समाज नेती
घेऊन ध्वज पुढती सदैव हो ती॥

सददृष्टी नच रममाण पार्थिवात
आकर्षी निशिदिन यन्मना उदात्त
श्रद्धेने मरति असे कितीक संत
ध्येयाते जगि करण्यास मूर्तिमंत॥

ध्येयाला चिकटुन नित्य राहतात
आघाता निजशिरि सर्व साहतात
ना घेती पदहि कधी भिऊन मागे
ज्योति प्रज्वलीत यदंतरंगि जागे॥

सत्याला धरुनि मनात सर्वदाही
तेजाने नरवर तो पुढेच जाई
सांगाती मिळति जरी तरी बरेच
थांबे ना पुढति निघेच एकलाच॥

मोहाला करुन दुरी असत्य सांडी
लोभाते करुन दुरी मदा विभांडी
श्रद्धेचा धरुन करी प्रशांत दीप
ध्येयाचे हळुहळु जातसे समीप॥

लोकांचा प्रबळ सुटे निरोध-वारा
दीपाते विझवि विनिर्मि अंधकारा
आशेने ज्वलित करी पुन:पुन्हा तो
पाऊल स्थिरमतिने पुढेच घेतो
सत्याचा धरुन मनी प्रचंड जोर
विघ्नांचा करुन समस्त चूर चूर
निद्रा न, तळमळ होत फार जीवा
अत्युत्कंठित बघण्या स्वध्येय- देवा॥

चित्ताची तगमग होइ, नाहि शांति
दृष्टीला दिसत अखंड दिव्य सृष्टी
कष्टा आमरण करीत, कार्यनिष्ठा
ही दिव्या उठविल अंति सुप्त राष्ट्रा॥

लोकांच्या कळकळ जिंकिते मनाला
विश्वास प्रगटवुनी, करी कृतीला
सौख्याचा अनुपम सोहळा पहाया
लागेल प्रथम जगात या मराया॥

निंदेने न खचत ना चढे स्तुतीने
अंधारी बिकट चढे कडे धृतीने
ज्यावेळी सकळहि बंधू झोपलेले
थोरांनी समयि तशाहि कष्ट केले॥

ज्यावेळी सकळहि बंधु घोरताती
हाकांनी मुळि न कदापि जाग घेती
खोली ना नयन जरीहि हालवीले
थोरांनी समयि अशाहि कष्ट केले॥

एकाकी झटति जगास हर्षवाया
एकाकी उठति तमास संहराया
एकाकी निघति विपत्ति दूरवाया
एकाकी मरति समस्त उद्धाराया॥

ध्येयाचे वरि अपुले सदैव डोळे
ठेवून स्थिर, करि काम तो न बोले
सत्याचा मम पथि अंश तो असेल
माते सद्यश तरि अंति ते मिळेल॥

ऐशी ती हृदयि अखंड वृत्ति शुद्ध
ठेवोनी, करित विरुद्धतेशि युद्ध
सत्याचा धृव नयनांसमोर तारा
राखोनी करित अखंड यत्न सारा॥

एकाकी शिरत पुढे, पडोहि काया
एकाकी धजति पहाड वाकवाया
एकाकी करित कमाल शर्थ यत्न
बांधाया निज पदरात सत्यरत्न॥

लावोनि तनमनवित्त ते पणाला
ध्येयार्थी झिजवित, तात, आपणाला
ओतोनी सकल सुखावरी निखारे
कष्टांना करित सदा मरे अहा रे॥
==
जाताती मरुन असे जगात थोर
हालांना सहन करुन घोर घोर
मेलेली मति अजिबात ना जयांची
ते तेव्हा उघडिति दृष्टि एकदाची॥

सत्याला कसुन पहाति मृत्युपाशी
सत्त्वाला बघति कसून संकटाशी
ज्वाळांच्या मधुन घुसून वीर जाई
लाटांशी प्रबळ करीत हातघाई॥

घालोनी स्वशिरि किरीट कंटकांचा
हालाचा मिरवुन कंठी हार साचा
मृत्यूला निरखुनिही करीत चाल
भेटाया मुदित अशास विश्वपाळ॥

सोसोनी छळ करुनी अहिंस युद्ध
त्यागाते तळपति दिव्य ख्रिस्त बुद्ध
आपत्ती कितिक तया महंमदाला
आल्या त्या तुडवुन विश्ववंद्य झाला॥

ब्रूनोला हरहर जाळिले जिवंत
सॉक्रेटीसहि मरणा वरीत शांत
सोसोनी सकलहि हाल ते अपायो
प्रस्थापी स्थिरमति सत्य गॅलिलीओ॥

एकाकी प्रथम महान उठे शिवाजी
होते ना प्रथम कुणी तयास राजी
निष्ठेने जनमन तो करी स्वकीय
त्यागाने मिळवित अंति दिव्य ध्येय॥

ऐसा या भुवनि सदा असे प्रकार
ध्येयार्थी बनून जिवावरी उदार
वाटेल न बघत होइ अग्रगामी
ईक्षेने विफल करी न आयु नामी॥

मागोनी मग अनुकारशील लोक
येती हो, धरुन मनात नीट रोख
यासाठी प्रथम कुणी तरी उठावे
लागे, हे खडतर तत्त्व आयकावे॥

(ध्येयार्थी पुरुषांचे वर्णन करुन मुलगा म्हणतो की, आज ह्या भारतात कवींद्र रवींद्रनाथ व मुनींद्र महात्मा गांधी हे दोन थोर ध्येयवादी पुरुष जगाला मार्ग दाखवीत आहेत.)

आजी या सकलहि भारतात दोन
ध्येयार्थी अचल विशालधी महान
ध्येयाच्यास्तव झटती सदैव तात
अश्रांत श्रम करिती पुढेच जात॥

टागोर प्रथित तसेच थोर गांधी
पुण्यात्मे उभय प्रसिद्ध ध्येयवादी
दोघांनी बघुन जगातले प्रकार
केला हो निशिदिन अंतरी विचार॥

युद्धे ही बघुन जगातील अघोर
स्वार्थाची निरखुन लालसा अपार
सत्तेची बघुन जगातील घमेंड
दोघांचे हृदय ते विदीर्ण ते दुखंड॥

सत्तेचा कारुन विशंक दुष्प्रयोग
लोकी या सृजन अनंत दु:खभोग
तोफांनी करुन जगास या गुलाम
गर्वाने मिरवित हे खल प्रकाम॥

लोकांना लुटुन करुन स्वीय दास
शक्तीने हरुन मुखामधील घास
दावोनी अहरह पाशवी कृतीते
गर्वाने स्तविति पुन्हा स्वसंस्कृतीते॥

कल्याणा करित असो अम्ही जगाचे
टेंभा हा मिरविति, सर्व दंभ साचे
मारोनी शर, वदतात पुष्पवृष्टि
दु:खाने भरिति नृशंस सर्व सृष्टी॥

पाहोनी सकल जगामधील दंभ
दुष्टावा बघुन जगातला अबंध
स्वार्थाचे बघुन हिडीस हे स्वरुप
दोघांच्या हृदयि विचार ये अमूप॥

जीवात्म्या करित निबद्ध यंत्रशक्ति
निर्मोमी हृदयि अदम्य स्वार्थभक्ति
देहाचे सकळ गुलाम होत दास
आळा ना मुळिहि तसेच वासनास॥

मी मोठा प्रबळ जगात श्रेष्ठ मीच
तोरा हा मिरविति उद्धतांत नीच
देहाला सुखविति पुष्ट तो करोनी
जाते हे हृदय सदा परी मरोनी॥

लाभावी निजवनलागि तूपपोळी
अन्यांची करित खुशाल राखहोळी
बांधाया निज रमणीय बंगल्यास
ठेवावे करुन जगास सर्व दास॥
==
होवोनी सकल जगात जेवि देव
दास्या ठेवुन इतरांस सर्वदैव
ना लज्जा तीळहि मनात, थोरवीच
वाटे ही, किति तरि लोक होत नीच॥

मोटारी उडविति तेवि ती विमाने
मोठाले अमित अजस्त्र कारखाने
याला ते वदति समस्त संस्कृती की
ठेवावे खितपत मात्र अन्य पंकी॥

‘मारावे इतर’ वदेल संस्कृती न
चित्ताची पशुसम वृत्ति ही निहीन
सर्वांचा जरि रमणीय तो विकास
जागा ती तरिच असेल संस्कृतीस॥

तुम्हाला जरि रुचते स्वतंत्रता ती
अन्या का पकडुन ठेविता स्वहाती
पृथ्वीचा जणु दिधलाच ताम्रपट्ट
राष्ट्रांना अबल करीत नित्य गट्ट॥

गर्वांध प्रबळ बनून पाश्चिमात्य
औद्धत्या प्रगट करी सदैव व्रात्य
ना त्याला हृदय जणू नसेच भाव
चोराचेपरि लुटुनी फिरुन साव॥

‘ज्याची ही प्रियकर भूमि तेथ त्याने
नांदावे, प्रगति करीत ती सुखाने
राष्ट्रे ही सकळ असोत ही स्वतंत्र
सांभाळू सकल मिळून विश्वयंत्र॥

घेऊ या करुन समस्तही विकास
दावू दे निखिल जन स्वयोग्यतेस
दावू दे अखिल जना स्व-सुंदरत्व
सर्वांना प्रकटवु दे विशिष्ट स्वत्व॥

उद्यांनी सकल फुलोत या जगाच्या
जावे ना पथि मुळिही कुणी कुणाच्या
राष्ट्रांनी करुनि अशी जगी व्यवस्था
निर्मावे मधुर अपूर्व शांतिगीता॥

घेवोनी गुणलव जो असे पराचा
साठा तो करु हृदयी अमोल त्याचा
वक्षाची पसरति दूर दूर मूळे
ओलावा मिळविति, ना म्हणून वाळे॥

तैसे या जगति करुन मानवांनी
घेवोनी किरण समीप वा दुरूनी
उत्कर्षा झटुन करीत हो रहावे
वाढोनी, जगति सुखास वाढवावे॥

सत्पुष्पे विविध फुलोत संस्कृतीची
अर्पू त्या प्रभुस मनोज्ञ माळ त्यांची
ती निर्मी मधुर जसा ध्वनी सतार
सदगंधा वितरिल हाहि दिव्य हार॥

भेटू या, ग्रहण करु परस्परांचा
आनंदे जरि दिधला सदंश साचा
ना घ्यावा ग्रह विपरीत तो करून
मोती ते मिळत बघाल जै बुडून॥

शेवाळ प्रथम वरी तुम्हां दिसेल
मोती ना वरवर खोल ते असेल
पंकाते विसरुन पंकजा विलोकी
नांदावे गुणवरणार्थ सर्वलोकी॥

लोकी या किति तरी दु:ख हो स्वभावे
भांडोनी सतत किमर्थ वाढवावे
केला या भुवनि विनाश मानवांनी
सामक्षा दिसती पहा स्वलोचनांनी॥

झाले जे विसरुन सर्व आज जाऊ
देवाला निशिदीन अंतरंगि गाऊ
निर्मू या सकल जगात बंधुभाव
वाढाया विपुल असो सदैव वाव’॥

संदेशा वितरित ह्या जगा रवींद्र
वाणीने मधुर नितांत हा कवींद्र
वाटे हा रवि म्हणजे मुकुंद-वेणु
वंदावा निजशिरि तत्पदाब्ज-रेणु॥

विश्वाला विसरविती दुराग्रहाते
सध्याची उपनिषदे यदीय गीते
आकाशी विहरत जो सदा पवित्र
मांगल्या पसरित नित्य यच्चरित्र॥

जो अंतर्बहि रमणीय निष्कलंक
मोठे यद्-हृदय गंभीर जे विशंक
जेथे ते अगणित स्वार्थ माजलेले
तेथेहि धृतिमति हे रवींद्र गेले॥

गावोनी गव हृदयंगम स्वगीते
स्थापोनी गुरुतर विश्वभारताते
एकत्र स्थिर करि पूर्व-पश्चिमेला
जो होता भ्रम विलयास आज गेला॥
 ==
गांधीही असुन असेच ध्येयवादी
स्वातंत्र्य स्वजनहितार्थ घेति आधी
होईल स्वजन यदा खरा स्वतंत्र
देता येइल जगतास शांतिमंत्र॥

गांधी हे परम पवित्र दीनबंधु
दारिद्रयी समरस होति प्रेमसिंधु
उद्धारा कथिति नवीनसा उपाय
त्यागाने तळपति तेज ते न माय॥

फुलासमान कोमळ मुलासमान निर्मळ
विशाल अंबरासम गंभीर अंबुधीसम॥

वसुंधरेसम क्षमी गिरीपरी सुनिश्चळ
पवित्र गांगतोयसा विशुद्ध सत्य यदबळ॥

अपाप कोकरापरी सतेज केसरी जसा
अथांग प्रेमसागर तमास दूर सूर्यसा॥
अनाथ-दीन-वत्सल उदार अब्द-सदृश
सहानुभूतिनिर्झर सुधेसमान यद्यश॥
विरक्त जो शुकापरी सहा रिपूंस जिंकिता
प्रबुद्ध वाक्पतीसम धुरीण सर्व जाणता॥

(गाणे)

धरु चरणासी। वंदु या महापुरुषासी॥
फासावरि जरि कुणि चढवील
देइल त्याला प्रेम-निर्मळ
अशुभ मनी ना कधीहि चिंतिल
मंगलराशी॥ वंदु....॥

दारिद्रयाशी समरस होत
कटिला पंचा एक लावित
अनाश-रोगग्रस्ता धरित
निजहृदयासी॥ वंदु....॥

अगणित अनुभव नानापरिचे
मेळवुनी ते बहुमोलाचे
प्रश्न सोडवीत जीवनाचे
थोर महर्षी॥ वंदु....॥

लाखो लोकांची चपल मने
घेतो वेधुन निज वचनाने
सर्वांनाही शांत ठेवणे
यत्कृति ऐशी॥ वंदु....॥

घोर समयिही पुढे जो सदा
पुढे टाकिले फिरवी न पदा
लागू देई ना मदबाधा
निजचित्तासी॥ वंदु....॥

स्वकीय दोषां उघडे करितो
दुस-याचे गुण सदैव बघतो
चूक पदरि घेउनी दावितो
थोर मनासी॥ वंदु....॥

अविरत करणे सत्यशोधन
अविरत करणे सत्यचिंतन
अविरत करणे सत्याचरण
ध्यास हा ज्यासी॥ वंदु....॥

जगा अहिंसा व्यापक शिकवी
मनानेहि जो कुणा न दुखवी
आपण करुनी इतरां करवी
कृति-शूरासी॥ वंदु....॥

नि:शस्त्राचे शस्त्र निर्मुनी
पद-दलितांचे करी देउनी
प्रयोग पही सदैव करुनी
कर्मयोग्यासी॥ वंदु....॥

क्षमा सहनशीलता अभयता
सत्यभक्ति तशि सत्याग्रहता
यांच्या जोरावरी मिळविता
स्वातंत्र्यासी॥ वंदु....॥

जगातून या तरवारीला
जगातून पाशवी बलाला
दूर कराया उभ्या राहिल्या
धृति-मूर्तासी॥ वंदु....॥

जगातून या दारिद्र्याला
जगातून या गुलामगिरिला
दूर कराया घेता झाला
संन्यासासी॥ वंदु....॥

गरिबांना जो बंधू वाटे
पतितांना जो पावन वाटे
दु:खितास जो त्राता वाटे
अहा ऐशासी॥ वंदु....॥

बुडत्याला जो तारक वाटे
बद्धांना जो मोचक वाटे
स्फूर्तिप्रद जडजीवा वाटे
चला हो त्यासी॥ वंदु....॥

हास्य जयाचे अतीव सुंदर
संकटातही शांत मनोहर
प्रेम पिकविणे या पृथ्वीवर
ठावे ज्यासी॥ वंदु....॥
==
लोकां कैशा मिळेल भाकर
स्वातंत्र कसे मिळेल लौकर
हृदयि कसा येइल परमेश्वर
चिंता ज्यासी॥ वंदु....॥

विश्वधर्म सत्याचा पाळी
विश्वधर्म प्रेमाचा पाळी
सत्यप्रेमास्तव ती जगली
मूर्ती ज्याची॥ वंदु....॥

स्वतंत्रता अर्पिणे भारता
परिहरणे ही जगत्क्रूरता
दाखवुनी प्रेमाच्या पंथा
ध्येय हे ज्यासी॥ वंदु....॥

केवळ सुखलालसा नसावी
सत्यसुंदरा कृती असावी
प्रेमाने ही सृष्टि भरावी
इच्छा ज्यासी॥ वंदु....॥

असे हे गांधि पुण्यात्मे करीत चिंतना सदा
भारतामधली माझ्या कशी ही हरु आपदा॥

सदैव ही मना चिंता लागली शांति ना असे
अंतर्ज्वलित ज्वालाद्रि तेवि तन्मूर्ति ती दिसे॥

हसे वरी जरी गोड आत ती आग पेटली
कशी मी हसवू माझी थोर भारत माउली॥

पस्तीस कोट हे बंधु दरिद्रदेव हे सखे
गुलाम, सुखशांतिला ज्ञानाला सर्व पारखे॥

संस्कृती मारिली जाते व्यसनेही बळावती
कशी मी थांबवू माझ्या राष्ट्राची ही अधोगती॥

उपाशी असती लोक शोकपीडित आर्तसे
अंधार भरला सारा यांना मी सुखवू कसे॥

तळमळे तडफडे जीव महात्मा गांधिंचा सदा
स्वातंत्र्य-सुख- ल्लाभ बंधुंना होइ तो कदा॥

लढला आफ्रिकेमाजी चंपारण्यामध्ये लढे
खेडाजिल्ह्यातही भांडे, भांडे बार्डोलिच्या मध्ये॥

हजारो करिती कष्ट नाम गेले दिगंतर
वंद्य स्तव्य महान गांधी वेधी सर्व जनांतर॥

लोकांच्या सुखदु:खाशी एक होईल जो नर
जिवाचे करुनी रान तन्मने तोचि जिंकिल॥

महात्मा गांधि हे थोर दु:खार्त-जन-तारक
मरतात जनांसाठी म्हणुनी होति नायक॥

त्याग प्रेम तथा सेवा विशाल मतिही तया
उलगडी जाहले गुंते म्हणून मिळवी जया॥

ध्येयवादी असोनीही व्यवहार न सोडितो
समोर संकटे देखे ध्येय ना परि टाकितो॥

निर्भय-स्वांत शांतात्मा व्यवहार-विदग्रणी
स्फूर्ति दाता भीर्ति-हर्ता तो धुरीण बने जनी॥

ठेवून दिव्यदृष्टीही व्यवहारपटुत्वही
जनांस उठवी कार्या संन्यासी दिपवी मही॥

विशाल दृष्टि ती आहे अपार त्याग तो असे
धडाडी शांतिही आहे उणे काहीहि ते नसे॥

उदार नीतिधर्माने सत्याने जगि निर्भय
सार घेती, करोनीया सर्वधर्मसमन्वय॥

अजातशत्रूसे झाले मुक्तात्मे रिपु ना जया
परि हे दास्य दारिद्र्य पाववीन, वदे, लया॥

रूढींचा दंभपापांचा अन्याय्य- राजनीतिचा
कराया नाश हा ठाके हराय भार भूमिचा॥

भारतातील हे हाल बघून उठती आता
प्रतिज्ञा करिती घोर मिळवीन स्वतंत्रता॥

माझे नि:शस्त्र हे युद्ध असे अंतिम जीवनी
आणील मजला मृत्यु न वा स्वातंत्र्य मज्जनी॥

जिथे चिंतन ते केले सोडिती स्वीय आश्रम
भारत करण्या मुक्त निघती करण्या श्रम॥

अनवाणी दंडधारी सानुली मूर्ति ती उभी
राहिली निकरे धैर्ये दिपली धरणी उभी॥

सोडी सात्त्विक शक्तींचे फवारे भारतामधी
सत्स्फूर्ति संचरे दिव्य उठती मृत तो मढी॥

चालला विश्ववंद्यात्मा निघाला हलले जग
तेजाचे झोत ते सोडी उठले बंधुही मग॥

धर्मयुद्धार्थ ती मूर्ति निघे बाहेर उज्ज्वल
असे युद्ध कधी झाले? नि:शस्त्राचे जिथे बळ॥

धर्मयुद्ध नसे झाले असे कोठे महीवर
अपूर्व घडवी गोष्ट भारती परमेश्वर॥

तात, ते चालले गांधी पायांनी जरि ऊन ते
सत्त्वाची दिव्य शक्तीची प्रभा विश्वात फाकते॥

लाखो येऊन ते लोक घेती दर्शन मर्तिचे
अंतरी स्फूर्तिचे लोट उठती देशभक्तीचे॥

‘मदीय रणविद्येत सेनानी पहिला मरे
या तुम्हां दावितो’ बोले ‘मरावे केवि ते खरे’॥
==
असे बोलून तो दिव्य धीर गंभीर उत्कट
निघतो मरण्यासाठी तेज:संदीप्त उद्धट॥

माते, रात्रंदिन तळमळे थोर गांधी महात्मा
भूमातेची बघुन विपदा तो जळे अंतरात्मा॥

वार्धक्यीही अनुपम तपे पेटवी राष्ट्र सर्व
कष्टे मोठ्या भरतभुवनी आणिती मोक्षपर्व॥

मोठ्या कष्टे जशि भगिरथे आणिली मर्त्यलोका
स्वर्गंगा, तत्कृतिसम महात्मा करी हे विलोका
आणयाते किति तरि महायास स्वातंत्र्यगंगा
तत्त्यागाला मिति न तुलना निश्चया ना अभंगा॥

आई पूर्वी सुखरत असे जे विलासी अमीर
देशासाठी त्यजुन सगळे आज होती फकीर
लोळावे गे पसरुनी मऊ गादिगिर्दी पलंगी
देशासाठी उठुन बनती आइ ते झाडु भंगी॥

जाते कारागृहि सकळ ते नेहरूंचे कुटुंब
देशप्रीती हृदयि भरली शुद्ध त्यांच्या तुडुंब
होते लाखोपति परि भिकारी जवाहीरलाल
देशासाठी श्रमति किति, ते जसे लाल बाल॥

टाकावे गे मजसम तुवा कोटि ओवाळुनिया
आई! ज्यांचेवरुन मरती देति ते स्वीय काया
मायामोहा तुडवुन अम्हां देशकार्यार्थ जाणे
प्राणा देणे गुणगुणत गे अंतरी दिव्य गाणे॥

जो जो आहे तरुण म्हणुनी त्यास ना राहवेल
सौख्ये त्याला विषसम, पलंगी तया आगलोळ
दीपी घाली उडिस निकरे त्या पतंगासमान
जावू धावू भडकलि चिता देउ देशार्थ प्राण॥

तारुण्याचे समयि असते वृत्ति नि:स्वार्थ माते
तेजस्वी जे झणि रुचत ते मोहिते अंतराते
भीती चित्ता तिळ न शिवते भावनाही उदार
माते, ऐशा तरुण युवकांचेवरी देशभार॥

देशोदेशी तरुण करिती क्रांती ताता सदैव
त्यांचे हाती जननि असते सर्वदा देश-दैव
तुर्कस्थानी तशिच रशियामाजि तैशी चिनात
केली क्रांती तरुण युवकी तत्त्व आणा मनात॥

होतो अग्रेसर तरुण जो, वृद्ध तो पाय ओढी
उन्मात्ताते तरुण नमवी, वृद्ध त्या हात जोडी
उत्साहाते तरुण वरितो, वृद्ध नैराश्यवादी
स्वतंत्र्याते तरुण वितरी, वृद्ध तो नित्य बांधी

भूमातेला सतत विपदी अस्मदाधार एक
आम्ही तीते सजवु करुनी आमुचा रक्तसेक
देशामाजी तरुण जन ज्या कल्पना बाळगीती
तैसी देशस्थिति बनतसे सांगती वंद्य मर्ती॥

‘माझ्यासाठी मरतिल मुदे पुत्र माझे’ जपान
बोले, तेवी वदति सगळे अन्यही देश जाण
ऐशी प्रौढी परि न वदता येइ या भारताला
आई आम्हां तरुणतरुणां लागला डाग काळा॥

भूमातेच्या बघुनि विपदा चैन ना गे पडावे
तद्दास्याला झणि चुरडण्या आइ आम्ही मरावे
आनंदाने निज तनु सुखे मातासेवेस द्यावी
काळोखी जी निजशुभयशा लागली ती पुसावी॥

तान्हाजीची कृति कशि? अम्हां काय बोलेल बाजी?
आई, सारे वरुन वदती ‘प्राण द्या मातृकाजी’
आलिंगावे निज सुत तया राखणे गे घरात
आईबाबा परम अघ ते घ्या विचारा मनात॥

आई वातावरण भरले दिव्य- विद्युत्प्रवाहे
राहे गेही कवण युव तो आज गे सौख्यमोहे
नाही तो गे तरुण, दिसतो वृद्ध नामर्द षंढ
राहे स्वस्थ स्वगृहि जरि है पेटता यज्ञकुंड॥

यावी स्फूर्ति प्रबळ-तर ती रक्त ते सळसळावे
भूमातेच्यास्तव मृति वरावयासआम्ही उठावे
राहो ना ती अशनशयनाची स्मृती अंतरंगा
वेडावोनी अम्हि जननीच्या धावणे बंधभंगा॥

नांदे गेही जननि सुत जो आजला खातपीत
आलापीत स्वनित कवने तो पशू गे खचित
नीच प्राणी परम तदध:पात गे जन्म सात
मातेच्या उद्धृतिसमयि जो लक्ष तेहि न देत॥

आई माझ्याहुन कितिक ते कोवळे सान बाळ
हालांमध्ये हसत असती नाहि का गे कमाल?
‘देशासाठी तनु झिजवु ही’ बाळ ते बोलताती!
मोठ्यांच्याही वच परिसुनी अश्रु नेत्रांत येती॥

स्वातंत्र्याची घुमघुमतसे भारती आज भेरी
व्हावे जागे झणि तरि अता, झोपलो अवेरी
माते, माते अडविशि कशी पाडिशी केवि मोह?
देशद्रोहा करु म्हणशि का? मी असे घट्ट लोह॥

मायापाशी झटदिशि झुगारुन देतात बंधू
होती सिद्ध प्रमुदित मने तो जरि क्लेश-सिंधू
गेही राहू? मरण बरवे त्याहुनी ते विशंक
लावू कैसा प्रियभरतभूमायिला मी कलंक॥

प्राणत्यागे निजयश टिको, नीति ही पूर्वजांची
रोमी रोमी भरलि अमुच्या गोष्ट ही सत्य साची
देऊ प्राणां फिकिर न करु सोडु ना स्वाभिमान
सत्त्वासाठी करित असती थोर ते देहदान॥
==
न करा अल्पही शोक आईबाबा मदर्थ तो
दु:खाची ही नसे गोष्ट पारतंत्र्यास मी धुतो॥

उपाशी बंधु जे कोटी त्यांना अन्न मिळावाया
करिती यत्न जे थोर त्यात गेलो मरोनिया॥

धन्य या निधना माना वदवे मज फार ना
आईबाबा सुखा माना नीर आणा न लोचना॥”

(इतक्यात एकदम एक गाणे ऐकू येते. तेव्हा मुलगा विचारतो.)

“तात, कोठून हे येते गीत ऐकावया बरे
कोण गातो दिव्य गाणे मोहितो मन्मना खरे॥”

(बाप सांगतो)

“बाळ शेजारच्या गेही कवि एक रहातसे
देशाचा ध्यास त्या नित्य पहाटे रोज गातसे॥

स्वातंत्र्याची दिव्य गाणी खिडकीत बसूनिया
गातसे होत तल्लीन वृत्ति ती पावुनी लया॥”

(मुलगा म्हणतो)

“तात ते ऐकु या गीत अपूर्व मज वाटते
अधीर मम हे कान ऐकाया गान दिव्य ते॥”

(स्वातंत्र्यशाहिराचे स्फूर्तीगीत)

समुद्रलाटा अदळताती कविचित्ता ज्या सदा मोहिती
निळे मनोहर सागरपाणी अनंत रत्नांची ती खाणी
अस्तोदय ते रविचे सुंदर दिनरजनी वा प्रशांत अंबर
अनंत तारे सुरम्य इंदु तरुवेलिलता ते दवबिंदु
फुले सुगंधी मुले मनोहर विहंगगण पाखरे खेळकर
मयूर कोकिळ चकोर चातक हरिणपाडसे तैसे हंस
चक्रवाक वा भेसुर घुक गजेंद्र वा ते सिंहशावक
चंचळ चपळा अंबद काळे चपळ वायुचे वेडे चाळे
सरित्सरोवर कमळे सुंदर मिलिंद मंजुल-गुंजारवकर
वने उपवने आम्रबकूल अशोक चंपक कदली मृदुल
पुष्करिणी कारंजी निर्झर चंदनचर्चन माळा सुंदर
हिरवे हिरवे गवत चिमुकले द-या खोल ज्या भिववित डोळे
पहाड मोठे प्रचंड पर्वत नभास शिर जे देउन उचलित
प्रेमे विव्हल रमणी रमण लताकुंज ते प्रेमराधन
चुंबन अलिंगन प्रकार विषयि जनांचे हे शृंगार
काव्य सृष्टिच्या ह्या संसारी मला न गोडी भरे शिसारी
ह्या वस्तूंचा मी ना भक्त यावर मन्मन ना आतक्त
असे भिकारी खरा फकीर ह्या वस्तूंची मज न फिकीर
हृदय कवीचे परी मम आहे प्रबळ भावनावारा वाहे
प्रतिभा स्फुरते मदंतरंगी काव्य नाचते मनस्तरंगी
चिता भडकली मदीय चित्ती गीत थरथरे ओठावरती
गीत कशाचे? मद्देशाचे स्वातंत्र्याचे समानतेचे
स्वतंत्रतेची गाइन गाणी जनात अथवा निर्जन रानी
स्वतंत्रतेचे विचार-वारे वातावरणी भरीन सारे
स्वातंत्र्याचे रणसंग्राम हृदयोद्दीपक जगदभिराम
स्वातंत्र्याचे झगडे भीषण जेथे चाले मारण मरण
त्यांची गाणी विशंक गाइन तदभक्तांची गाणी गाइन
प्राण अर्पिले ज्या वीरांनी त्यांना गुंफिन माझ्या कवनी
स्वतंत्रतेचा मी शाहीर करीत आहे जगजाहीर
नसानसांतुन ओतिन जोम स्वार्थाचा मग कराल होम
सिंहाचे परि तुम्ही उठाल धीर गर्जना तुम्ही कराल
देशभक्तिचा प्रवाहपूर खळखळाट वाहवीन धीर
देशभक्तिचा सागर खोल हृदयी निर्मिल माझा बोल
कठोर हृदये मृदु नवनीते करितिल माझी नवीन गीते
मृदु नवनीता वज्र करीन दिव्य असे मी निर्मिन कवन
पाषाणाला फोडिल पाझर ऐसे निर्मिन वाक्कल्लोळ
वेदजडांची वृत्ति हलेल ऐसे निर्मिन काव्य रसाळ
षंढहि होतिल रणझुंजार ऐसा ओतिन कवनी जोर
त्यागा उन्मुख मरणा सन्मुख मानितील त्यामध्ये खरे सुख
अशी जनांची वृत्ती करीन स्वातंत्र्याची गीते निर्मुन
होय, कशाला विचारता रे स्वातंत्र्याचा असे कवी रे
हसा, हसा, परि रडाल अंती मदध्येयाची मला संगती
स्वातंत्र्याचे सरोवरात मरालिनी मत्कविता रमत
स्वातंत्र्याचे सुमंदिरात विचार माझे सदैव गुंगत
स्वातंत्र्याचे स्वर्गीमाजी सदैव चमके प्रतिभा माझी
स्वातंत्र्याचे नभोवितान तेथे घेतो मी उड्डाण
स्वातंत्र्याचे विशाल गगन तेथे घेतो विशंक तान
स्वतंत्रतेचा, मायभूमिचा प्रियकर माझ्या भारतभूचा
पवित्र माझ्या भारतभूचा उज्ज्वल माझ्या भारतभूचा
मंगलतम मम भारतभूचा स्वातंत्र्योन्मुख भारतभूचा
कवी असे मी धीर नवीन सदैव पूजिन भारत-चरण
भारतभूची मंगल धुळी सतत माझ्या भाळी
भारतमाते तव शुभ गान मजला वाटे अमृतपान
तुलाच गाइन तुलाच ध्याइन तुलाच वंदिन मी गहिवरुन
हीच प्रतिज्ञा माझी माते पुरवी प्रेमाकरे अमृते
त्वांवंदेऽहम् तवैव गेऽहम्
==
(गाणे संपताच माता म्हणते)

“सुंदर कितिकरि हे गाणे वेडावुन जावे प्राणे
पहा तरू हे गहिवरले टपटप गळती अश्रुजले
पहा तुटे तो नभि तारा ऐकुन गीता मनोहरा
गुप्त खालती येवोनी गीताचा ऐकत ध्वनी
बाळ, कसे रे हे गाणे वेडा जणु हा कवी मने
वेडा इतरांनाहि करी हृदयि भावनापूर भरी”

(मुलगा म्हणतो)

“चित्रकार कवि हे सारे होतिल एकसरे
भूमातेचे हे भक्त भाग्य तिचे ते वाढवित
भारतभूच्या भाग्याची तहान सर्वांना साची
देशामाजी स्वतंत्रता आणायाला उत्कटता
कवीचित्रकारांनाही दास्य तयांचे मन दाही
देशासाठी तव गेला सुत, न नवल हे, हा झाला
धर्म आइ गे सकळांचा ध्यास समस्त देशाचा”

(इतक्यात एकदम दुसरे गाणे गाणे ऐकू येते.)
कोठुन दुसरा ध्वनी येतो हळुहळु मोठा हा होतो

(आई म्हणते)
“प्रभातफेरी करावया मुले चालली रे सखया
रुचे तयांना ना शय्या निघती जागृति ती द्याया.”

(मुलगा म्हणतो)
“ऐकू आई तरि त्यांचे गीत रोमहर्षक साचे”

(प्रभातफेरीचे गाणे)
उठा बंधुंनो! पहा उगवला भास्कर वेळेवरी
तमोहर भास्कर वेळेवरी
प्रकाश पसरी जिकडे तिकडे
धरणीवरि अंबरी॥

झोपेची का वेळ असे ही उघडा रे लोचन
आपुले उघडा रे लोचन
झापुन बसलो म्हणून आले आले हे दुर्दिन
झापड उडवा डोळे उघडा पहा काय चालले
सभोवती पहा काय चालले
स्वातंत्र्याच्या दिव्य विचारे राष्ट्र सर्व रंगले
गुलामगिरिचा अजुन न आला वीट तुम्हाला कसा
बंधुंनो, वीट तुम्हाला कसा
स्वातंत्र्यास्तव कष्ट कराया कंबर आता कसा
ऐशीही सोन्यासरी। संधी न पुन्हा येईल
जरी उठाल झडकरि सारे। भाग्योदय तरि होईल
प्रगटवा आपुले तेज। स्वातंत्र्य माय मिळवील
उठा, करावी अचाट करणी, झोप नसे ही बरी
बंधुंनो, झोप नसे ही बरी
उठा उठा रे मायभूमि ही मुक्त करा सत्वरी॥ उठा...॥

हिंदुमुसलमान एक होउनी स्वातंत्र्यास्तव उठा
उठा रे एक दिलाने उठा
स्वातंत्र्याचा निजसत्तेचा फडकू दे बावटा
ब्राह्मण अब्राह्मण बंधूंनो पुरे करा भांडणे
क्षुद्र ती पुरे करा भांडणे
श्रेष्ठकनिष्ठ न कोणी उठुनी देशास्तव झुंजणे
मायभूमिच्यासाठी जो ना धावे अस्पृश्य तो
समजणे मनात अस्पृश्य तो
बंधुबंधुसे उठा उठा रे भारत बोलावितो
मायभूमिसाठी आता होउनिया भाई भाई
भांडणा तुम्ही विसरावे ही स्वातंत्र्याची घाई
ही स्वतंत्र भूमी करणे आपुली भरतभूमाई
गुलाम म्हणुनी जगणे आता आपण धरणीवरी
अत:पर आपण धरणीवरी
स्वतंत्र भारत करावयाते उठा उठा सत्वरी॥ उठा बंधुंनो....॥

(मुलगा म्हणतो)
“आई पाहि हे दृश्य सर्व या भारतावरी
सर्वत्र जागृती झाली तम ना जनतांतरी॥

मुले बाळे पहा एक विचारे भारली जशी
हसेल दिव्य तेजाने भारताननसच्छशी॥

भारताचे दिव्य भाग्य मदीय नयना दिसे
आनेद शांति ती नांदे वाव ना कलहा असे॥"
==
(गाणे)
प्रियकर भारत, गुणमणि भारत, स्वातंत्र्या पावो
सकल विकलता
विलया जाउन
निजतेजा लाहो॥ प्रियकर....॥

संहारुन संसार-विषमता
निर्मुन धरणीवरती समता
शातिपथा दावो॥ प्रियकर....॥

मोहमलिनता दुरभिमानता
असुर-समरता सत्ता-रसता
जगतातुन जावो॥ प्रियकर....॥

मनुज-दिव्यता विश्वबंधुता
उदया येवो मरुनी पशुता
वरति जगा नेवि॥ प्रियकर....॥

धर्म सकल होवोत उदार
हंसासम जन निवडो सार
स्नेह विपुल होवो॥ प्रियकर....॥

करुनि निजांतर-तिमिर-निरास
करुन घेउ दे जगा विकास
प्रतिबंध न राहो॥ प्रियकर....॥

उत्साहाचा आनंदाचा
सहृदयतेचा जगदैक्याचा
पवन मधुर वाहो॥ प्रियकर....॥

ज्ञानहि वाढो आदर वाढो
श्रद्धा वाढो सदगुण वाढो
परमात्मा येवो॥ प्रियकर....॥

उत्तरोत्तर प्रकाश लाभुनी
पूर्णतेकडे डोळे लावुनी
प्रभुस मनुज पाहो॥ प्रियकर....॥

(मुलगा हे दिव्य दर्शन पित्यास घडवितो व विचारतो, “बाबा, तुम्ही भारतमातेसाठी नाही का मरणार, नाही का झिजणार?” तेव्हा बाप म्हणतो,)

“बाळ मी सर्व देईन सेवा हातूव ह्या घडो
जनांची करिता सेवा मदीय देह हा पडो॥
आम्ही दोघे जीवनाते उदात्ततर रे करू
बाळा हे गुण-लावण्य संसार लीलया तरू॥
पुत्र तू आमुचा धन्य अंजना घालुनी अम्हा
दिधली दिव्य तू दृष्टी हरुनी मोहता तमा॥
प्रकाश तो पहा येतो पसरेल महिवरी
त्यापरी सत्प्रभा येते आमुच्या सुप्त अंतरी॥”

(मुलगा म्हणतो, “खरेच बाबा, प्रभातप्रभा फाकत आहे व भाग्याची प्रभाही भारतावर फाकेल; भारतमाता स्वातंत्र्याने तळपेल.”)

प्रकाश आला पहा तरी। स्वतंत्रता भारतावरी
अमरत्वाची प्रभाचशी। उषा चमकते आकाशी
सकल लोपला अंधार। सृष्टी दिसते मनोहर
पवन वाहतो
सुमगण फुलतो
परिमल भरतो
हृदयाल्हादक दिगंतरी॥ प्रकाश....॥

चराचरा ह्या विश्वाला। चैतन्याची चढे कळा
निद्रातंद्रा दुरावली। जागृति सकलांतरि आली
तरु डोलती
विहंग उडती
कलरव करिती
सुरम्य मंजूळ शुभ स्वरी॥ प्रकाश....॥

हरित-श्यामल-तृणावरी। नाचत किरणे सोनेरी
मोत्यांसम हे दंव दिसते। प्रकाश हृदयी साठविते
मऊ गलिचे
लावण्याचे
हे मोत्यांचे
सृष्टिदेवता ही पसरी॥ प्रकाश....॥

पहा पहा तो उभा रवी। विश्वाचा तो मुका कवि
काव्य ओतितो विश्वात। श्रद्धा याची हृदयात
तेजोराशी
चराचराशी
देती आशी
आशा देतो खरीखुरी॥ प्रकाश....॥

जगी लोपुनी अंधार। प्रकाश येतो बाहेर
उत्साहाचे माहेर। बना सांगतो प्रभाकर
दु:ख न राही
अभ्र न राही
प्रकाश येई
पडला उठलो पुन्हा परी॥ प्रकाश....॥

प्रकाश येतो जन उठती। बंध भराभर ते तुटती
मायामोहातुन सुटती। आशेला पल्लव फुटती
वैभव येते
भाग्य हासते
तेज फाकते
विकास येइल घरोघरी॥ प्रकाश....॥

दिव्य कोंदला आनंद। शुभ मंगल परमानंद
नाचति गाणी गाऊन। हाती हाता घेऊन
विद्या येते
कला शोभते
मूर्ती दिसते
प्रभूची मज भारतांतरी॥ प्रकाश....॥
==
(मुलगा म्हणतो, “बाबा, माझी वृत्ती सदगदित झाली आहे. भारतमातेचे ग्रहण सुटलेले दिसत आहे. पहा पहा.” गाणे)
ग्रहण सुटले ग्रहण सुटले॥
माझ्या मातेचे पाश सारे तुटले॥ ग्रहण....॥

पारतंत्र्याचे नाव आता कुठले॥ ग्रहण....॥

आता बुद्धीवर नुरतिल पटले॥ ग्रहण....॥

द्वेषकलहादि दिसतिल मिटले॥ ग्रहण....॥

भारतमाताचे पांग आज फिटले॥ ग्रहण....॥

प्रतिभेला हो पाझर फुटले॥ ग्रहण....॥

आमच्या प्रेमाला पल्लव फुटले॥ ग्रहण....॥

दैन्य नैराश्य सकळहि हटले॥ ग्रहण....॥

जयजयकाराचे ध्वनि शत उठले॥ ग्रहण....॥

किति आनंद सुख किति पिकले॥ ग्रहण....॥

भारतमातेचे मुख तेजे नटले॥ ग्रहण....॥

(मुलगा आईला म्हणतो, “आई तुलासुद्धा माझ्या मरणाचे आता वाईट वाटणार नाही; भारतमातेची हजारो मुले स्वत:ची समज. मला प्रेम दिलेस ते त्यांना दे. आई, मी निष्ठुर नाही.”)

“आई ना मनि आण बाळ तव हा निष्प्रेम पाषाणसा
आहे प्रेम कृतज्ञता किति मनी शब्दांत वर्णू कसा
तू स्नेहार्द्र मदर्थ ते पिकविले प्रेमामृताचे मळे
आई मी विसरेन का? पुरविले माझे सदा तू लळे॥

आई तू जपलीस सतत मला प्राणांपरी आपुल्या
आई तू श्रमलीस गे निशिदिनी ह्या वाढवाया मुला
आई ना ऋण ते फिटे कधि तव प्रेमास सीमा नसे
माझे अंतर त्वद्विचार करता वोसंडुनी येतसे॥

गंभीरांबुधिहून खोल गगनाहूनी असे विस्तृत
माते प्रेम तुझे न गे वदवते वाणी तिथे कुंठित
पृथ्वीचे अणुरेणु तारक ते ते मोजता येतिल
त्वत्प्रेमामृत-मापनी मति परी वेडावुनी जाईल॥

आई जीव मदीय सतत तुझ्या प्रेमामृते पोसला
भूमातेस तिला सुखी बसवण्या मी तो सुखाने दिला
खेदाते न करी, हसे जननिये, प्रेमे बघे मन्मुख
आता शेवटचे, पहा पसरते तेथे प्रभा सन्मुख॥

आई भूमिवरी जनास सुखवी मानी तुझी ही मुले
प्रेमस्नेह तयांस दे मज दिले जे, ल हासवी ही फुले
कर्तव्या परमादरे करुनिया, येशील भेटावया
तेथे बाळ बसेल हा तुजकडे दृष्टीय लावूनिया॥”

वदुनि वचन ऐसे जाहला सदगदीत
नयनी घळाघळा ते तेधवा अश्रु येत
परि फिरुन पुसोनी लोचना बाळ बोले
परत जरि मधूनी नेत्र होतात ओले॥

मुलगा स्वत:च्या विधवा नववधूबद्दल सांगतो)
“अजुनी जननी मला असे
वदणे एक परी वदू कसे
अविनीत मला न तू गणी
मम शब्दा परसोनिया मनी॥

कठिणा करुणा किति स्थिती
मम पत्नी अजुनी लहान ती
विधवा वदचील लोक हे
मनि येऊन मदीय धी दहे॥

अवहेलन ना तिचे करी
मुळी आबाळ तिची न ती करा
न तिला श्रमवा, करा सुखी
फुलवावी कलिका हसन्मुखी॥

न ढका हृदयास लाविजे
जननी काळजि नीट घेइजे
लतिका हळुवार वाढवा
गुण-शीले रमणीय शोभवा॥

शिकवून करा सुधी तिला
तुम्हि देणे सुविचार शक्तिला
मनुजास जरी सुशिक्षण
तरि होईल जगात रक्षण॥

सकलीहि असो परिस्थिती
सुविचार-प्रभु नित्य रक्षिती
जरि बुद्धि विनीत होइल
न पडे वक्र कधीहि पाउल॥

जरि पालक इच्छिती तिचे
तरि माहेर असो तिला तिचे
जरि ती असली कुठे तरी
तिजला होउ न दु:ख अंतरी॥

‘मम भवनि हिचे पांढरे पाय आले
म्हणुनि मम सुताचे प्राण हा हाय गेले.’
जननि नच वदावे त्वां असे लोकरीती
कठिण कटु नृशंसा ही असे लोकनीती॥

‘अशुभ अवदसा ही कैशि आली घरात
मिळवित सुखि माती ही करी मत्सुतान्त
परम अवकळा ही आजि आली घराला
हरहर हर सारा हा हिने घात केला’॥

वचन वदुनि ऐसे, मानसाते तदीय
तुम्हि कधि दुखवा ना, काय तद्दोष होय?
कळतवळत नाही सान बाळा बिचारी
जननि! हृदय तीचे ना कधी तू विदारी॥
==
मृदु मधुर त-हेने वागवावे मुलीला
सहज कधि मदीय ध्येयही सांग तीला
हसत शिकत मोठी नीट होईल जेव्हा
भवजलधिमधूनी पार जाईल तेव्हा॥

परत जरि कराया वाटला तो विवाह
तरि परम सुखाने तो करो सौख्यवाह
गमत अपरिणीता बालिका आइ माते
करुनि निजविवाहा सेवुदे सन्मुखाते॥

जरि करिल विवाहा पाप ना ते गणावे
उलट विमल धर्मा अंगिकारी म्हणावे
तुम्हि तिजसि सुखाने संमति स्वीय द्यावी
मति करपुन आई ती तदीया न जावी॥

करणे क्षम तुम्हि तन्मति
निज कर्तव्य करावयाप्रती
मग बोल तुम्हास तो नसे
जननी मी वदु काय फारसे”

(माता गदगदून बोलते)

“करि न लवहि चिंता बाळ मी वाढवीन
तव करुण वधूला सर्वदा मी जपेन
हृदय न दुखवीन प्राण गेल्याहि माझा
तुझिच शपथ माझ्या मोहन प्रेमराजा
नयन बुबुळ तेवी तीस मानीन नित्य
सुखविन शिकवीन प्रेम देईन सत्य
मुळि न मनि करावी बाळ वेल्हाळ खंत
जरि जगति मदीया अश्रुला ती न अंत
जमले जल लोचनामधी
किति हेलावुन ये हृदंबुधी
पदरे झणि ती पुशी परी
मग गांभीर्य वरी मुखावरी॥”

(आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू जमलेले पाहून मुलगा शेवटचे सांगतो)
किति मी समजाविले तुला
न रडे देइ निरोप तू मुला
नच मोहदरीत तू पडे
परि कर्तव्यगिरीवरी चढे॥

धरि धीर मनात गाढसा
न रडावे जननी ढसाढसा
जगता सुखवी सदा सये
किति मी सांगु बरे तुला बये॥

रडणे प्रभुजीस नावडे
रडणे द्रोह तदीय तो घडे
हसुनी मज दे निरोप तो
मरणाने तव पुत्र शोभतो॥

मृति ही सदलंकृती मला
मृति देते मज किर्ति निर्मळा
सुत धन्य खराच जाहला
जननी तू करि थोर सोहळा॥

करुनी निज नेत्र कोरडे
निज कर्तव्य करावया पुढे
झणि सिद्ध विशंक आइ हो
मति मोदे तव दु:ख हे सहो॥”

(मातेचे म्हणणे)

“ठेवून हृदयी तूते स्मरुन त्वद्वचा सदा
हृदयी भगवंताच्या धरुनी पावना पदा॥

प्रेमस्नेहामृताचा मी सुकाळ धरणीवरी
करीन बाळका नित्य वाक्य हे हृदय धरी॥

येईल लोचनी पाणी त्वत्स्मृती मज येउन
कर्तव्य करण्यासाठी पुसून परि टाकिन॥

दोन ही पिकली पाने श्रमुनी गळती यदा
भोटाया तुजला येऊ बघाया प्रर्भुच्या पदा॥”

(मुलगा म्हणतो)

“मोहतिमिर नाशाया आला देवाचा हा बाळ
आई बाबा निरोप द्यावा देव करिल सांभाळ
येतो बाळ अता
सुखवा भारतमाता। येतो बाळ अता॥

(मुलगा आता कायमचा जाणार हा विचार मनात येऊन मातेला फार दु:ख होते. ती मुलाला सदगदित होऊन म्हणते-)

आपार पान्हा हृदयात हाटे
आपार पाणी नयनांत लोटे
पुसूनिया ती परि लोचनांस
अतीव कष्टे वदते मुलास॥

“उभा राहा नीट जरा समोर
गड्या तुला पाहिन एकवार
असे तुझे दर्शन शेवटील
पुन्हा न ते ह्या भुवनी मिळेल”॥

समोर येऊन सुपुत्र राही
तयास माता अनिमेष पाही
बघू न देती भरतीच डोळे
पुशी, पुन्हा ते बनतीच ओले॥
==
न बोलवे तृप्ति म ती बघून
भरेच पाणी नयनी फिरुन
पुन:पुन्हा लोचन ते पुसून
तयास ठेवी मनि साठवून॥

पिते जणू बाळकरुप आई
पिताहि साश्रु स्वसुतास पाही
उचंबळे वत्सलता अनंत
न वर्णनाला कवि हा समर्थ॥

पुन: पुन्हा बाळक-मूर्ति पाही
न तृप्ति ती मातृमनास होई
‘मदीय माते! मम वेळ आली’॥
वदून ती मूर्ति अदृश्य झाली॥

टवटवीत ती तरुची पाने। विहंग गाती मंजुळ गाणे
सृष्टी सांगते दु:ख गिळावे। कर्तव्यास्तव पुन्हा उठावे॥

माझी पत्री

कुठुन आणू सुमने सुवासी
उदार माते तव पूजनासी
न बाग येईल कधी फुलून
सुपुष्प-रोपे जळती सुकून॥

जुई न जाई न गुलाब राही
न मोगरा गे निशिगंध नाही
न पारिजाते न टिके बकूल
न रोप ते एकहि गे जगेल॥

कुठून आणू बहुमोल पाने
प्रयत्न केले किति लेकराने
जगे न आई तुलसी न वेल
जळेल दूर्वींकुर ना हसेल॥

सुपुष्प नाही न पवित्र पान
सदैव खालीच मदीय मान
सदैव माझी परडी रिकामी
श्रमूनिही बाग बये निकामी॥

मदंतरांतील उदंड पाणी
अखंड देतो नयनी भरोनी
तरी न ही बाग फुलून येई
बघू किती वाट मनात आई॥

करावयाला तव पूजनाला
किती परी उत्कटता मनाला
किती तरी दाबु कितीक रोधु
किती सदा मी समजावू बोधू॥

न वाट आता बघतो कशाची
कुचंबणा ना करितो मनाची
असेल बागेत मदीय जे जे
समर्पितो ते तव पादपूजे॥

अनंत-मालिन्ययुते विशीर्णे
निरस्त-तेजे कृश हीन दीने
कशीतरी ही परडीत पाने
करून गोळा भरिली मुलाने॥

मदंतरांतील अपार पाणी
सुदीन पानांवर शिंपडोनी
करुन मी निर्मळ आणिली ही
करुन घे गोड तयांस आई॥

हसोत सारे मम पूजनाला
न तू हसावे जननी मुलाला
भिकार माझी म्हण तू न पत्री
समर्पितो जी चरणी पवित्री॥

-पुणे, २७ फेब्रुवारी १९३५

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP