मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
हे जीवन केविलवाणे। गाऊ मी...

गाऊ मी कसले गाणे? - हे जीवन केविलवाणे। गाऊ मी...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


हे जीवन केविलवाणे।
गाऊ मी कसले गाणे?॥

जगि झालो आम्ही दीन
जीवनावीण जणु मीन
ही अमुची स्थिति किति हीन
मन जळते मम अपमाने॥ गाऊ..॥

आमुचे असे ना काही
सत्तेची वस्तू नाही
सुतळीचा तोडा नाही
दुर्दशा देखणे नयने॥ गाऊ..॥

ना गायिगुरे ती दिसती
वासरे न ती बागडती
दूध तूप शब्दची उरती
दुर्मिळ ते झाले खाणे॥ गाऊ..॥

जी अन्न जगाला देई
ती उदार भारता मायी
किति रडते धायीधायी
मिळती ना चारहि दाणे॥ गाऊ..॥

अन्नास माय मोताद
घेई न तिची कुणि दाद
सुत घालित बसती वाद
पोट का भरे वादाने॥ गाऊ..॥

उद्योग सकलही गेले
बेकार सर्वही झाले
जगताती अर्धे मेले
श्रेयस्कर याहुन मरणे॥ गाऊ..॥

देण्यास नाहि तो कवळ
यासाठी माता विकळ
अर्पिती नद्यांना बाळ
जळतोच ऐकुनी काने॥ गाऊ..॥

उपजली न मरती तोची
प्रिय बाळे भारतभूची
मेजवानि मृत्युस साची
मांडिला खेळ मरणाने॥ गाऊ..॥

ना वस्त्रहि अंगी घ्याया
ना मीठहि थोडे खाया
ना तेल दिवा लावाया
मृति येना म्हणुनी जगणे॥ गाऊ..॥

लागल्या शेकडो जळवा
संपत्ती नेती सर्वा
आमुची न कोणा पर्वा
आम्हि हताश होउन रडणे॥ गाऊ..॥

जाहलो लोक फटफटित
नि:सत्त्व भुतांसम दिसत
पावले सर्वही अस्त
किति दिवस असे हे पडणे॥ गाऊ..॥

भारतीय जनता रोड
नि:सत्त्व करित काबाड
मोजुन घ्या हाडन् हाड
पोटभरी न मिळे खाणे॥ गाऊ..॥
 
पुढे जाण्यासाठी .......
==
तेजस्वी विद्या गेली
ती पोपटपंची उरली
जी गोष्ट पश्चिमे लिहिली
ती आम्हां श्रुतिसम माने॥ गाऊ..॥

सत्कला मावळे सारी
सच्छस्त्रे मेली सारी
अनुकरणे करित भिकारी
शेणात सदा हो सडणे॥ गाऊ..॥

ती थोर संस्कृती गेली
ती गजान्त लक्ष्मी गेली
पुरुषार्थ सत्त्वता गेली
उरली ती स्मृतिची चिन्हे॥ गाऊ..॥

सोन्याचा जेथे धूर
द्रव्याचा जेथे पूर
ती चिंतेमाजी चूर
भारतभू कैशी बघणे॥ गाऊ..॥

भरलेली होती बाग
भरलेले होते भाग्य
ते गेले परि सौभाग्य
अपमाने आता जगणे॥ गाऊ..॥

तो बाग मनोहर गेला
हा मसणवटा हो झाला
दैवाची भेसुर लीला
आम्हि गुलाम म्हणुनी जगणे॥ गाऊ..॥

कुणि उंदिर आम्हां म्हणत
ती मेयो निंदा करित
जग अस्पृश्य आम्हां गणित
किति निंदा ऐकू काने॥ गाऊ..॥

अज्ञानपंकगत लोक
आढळे घरोघर शोक
नांदतात साथि अनेक
ठाण दिले दृढ रोगाने॥ गाऊ..॥

शेतकरी मागे भीक
शिकलेला मागे भीक
तो भिकारी मागे भीक
धंदा ना भिक्षेवीणे॥ गाऊ..॥

हृदयाची होई होळी
आपदा सदा ही पोळी
खाऊ का अफुची गोळी
मज सहन होइ ना जगणे॥ गाऊ..॥

खाऊन अफू परि काय?
ही रडेल सतत माय
बंधूंची न हरे हाय
काय मिळे मज मरणाने॥ गाऊ..॥

हा हिमालय दिसे खिन्न
या सरिता दिसती दीन
पशूपक्षिवनस्पती हीन
सोडिती श्वास दु:खाने॥ गाऊ..॥
==
हे परात्परा भगवंता
हे अनंत करुणावंता
हे जगदीशा बलवंता
ऐकावे हे रडगाणे॥ गाऊ..॥

वाजवी मनोहर पावा
मोहांधतिमिर हा जावा
खडबडुनी लोक उठावा
उघडावी अस्मन्नयने॥ गाऊ..॥

दे स्फूर्ति आम्हाला दिव्य
कृति करु दे उत्कट भव्य
स्वातंत्र्य येउ दे नव्य
हलवावी अस्मद्वदने॥ गाऊ..॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP