TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
मी मांडितसे विचार साधे सर...

खरे सनातनी - मी मांडितसे विचार साधे सर...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


खरे सनातनी
मी मांडितसे विचार साधे सरळ
हे अमृत नसे हे गरळ
मी सनातनी धर्माचा सदभक्त
मी पूजितसे ऋषिसंत
निज संस्कृतिचा अभिमान असे माते
मी पूजित भूमातेते
निज संस्कृति व्हावी थोर
ती होवो ना अनुदार
हो एकच मजला घोर
मी नम्रपणे वदतो ओतुन हृदय
तुम्हि ऐका सारे सदय॥

ज्या नवनव हो सतत पल्लव फुटती
त्या सनातन असे म्हणती
जे नवनव हो ज्ञान शुभंकर येते
तो वेदच माते गमते
तो वेद असे अनंत, हळुहळु मूर्त
होऊन दिसे जगतात
नवविचार मी घेईन
मी पुढतिपुढति जाईन
सौंदर्यसिंधु जोडीन
जो ज्ञानाला सादर सतत घेई
तो खरा सनातनी होई॥

जे नित्य नवे सनातन तया वदती
जीर्णा न सनातन म्हणती
श्रीगीतेचे नित्य नवीनच सार
ज्ञानेश्वर म्हणती थोर
ती वाढ पुरी ज्याची झाली त्याते
मरण्याचे केवळ उरते
सद्धर्म सदा वाढेल
नवनविन रंग दावील
नव अर्थ अंगिकारील
हे वाढतसे सदैव जीवनशास्त्र
तद्विकास असतो होत॥

त्या शब्दांचा अर्थ वाढतो नित्य
तो अनंत असतो अर्थ
त्या यज्ञाचा बघा तुम्ही इतिहास
किति झाला अर्थ-विकास
जन मरताती कल्पना न परि मरते
ती सतत वाढत जाते
ते विचार होती खोल
होतील कल्पना विमल
हा विकास सकक सकल
जगि चालतसे मानव जातो पुढती
मुंगीपरि जरि ती प्रगती॥

ते ठरले ना अजुनि जीवनी काही
सिद्धांत ना एकहि पाही
जगि हितकर ती हिंसा अथवा प्रेम
ना झाला अजुनि नेम
ते सत्य सदा पूजावे वा अनृत
अद्याप न मत निश्चित
हे प्रयोग सारे अजुनी
करितात महात्मे झटुनी
का बिळात बसता घुसुनी
निजबुद्धीला स्वतंत्र करुनी उठणे
नवरंगे उत्कट नटणे॥

हे बाल्यदशेमाजी जीवनशास्त्र
ना निश्चित काही त्यात
ज्याबद्दल ना शंका तिळभर कोणा
जगि ऐसे काहि दिसे ना
तो घेउनिया सादर पूर्वानुभव
संपदा ज्ञानास नव
ते पूर्वज सर्वज्ञानी
जरि म्हणाल तुम्ही कोणी
ते हसतिल तुम्हां वरुनी
ते फरक सदा होते देखा करित
ऋषि ऋषिला नाही मिळत॥

तो मागतसे देवा विश्वामित्र
मति सतेज निर्भय मुक्त
तो गायत्रीमंत्र सनातन दिव्य
मागतसे बुद्धी भव्य
तो धर्माचा पाया म्हणता वेद
वेदार्थे ज्ञानच सिद्ध
ज्ञानासम पावन नान्य
ते मिळवुन व्हा रे धन्य
परि घरात बसता घुसुन
जो घरि बसला त्यास मिळे ना काही
त्या एकच मरणे राही॥

तुम्हि उघडा रे बंधूंनो निज डोळे
ना अंध असावे भोळे
जे इतर जगी थोर विचारा करिती
जे प्रयोग नव दाखविती
तुम्हि त्याचाही विचार सादर करणे
उपयुक्त असे ते घेणे
ज्ञानाचा मक्ता न कुणा
अधिकार सर्व राष्ट्रांना
अभिमान देतसे मरणा
ते ऋषिमुनि ना केवळ येथे झाले
हे बघणे उघडुन डोळे॥

हे कलियुग ना सत्ययुगचि हे माना
प्रभुच्या न करा अपमाना
जो रवि उगवे तारा ज्या लखलखती
ते तेज न त्यांचे कमती
हे कलियुग ना गंगा पावन तीच
फळपुष्प तरु हे तेच
प्रत्येक दिवस जो दिसतो
तो अनंततेतुन येतो
पावित्र्ये तिळ ना कमि तो
तो मूर्खपणा बाष्कळपण ते सोडा
सद्विचार नवनव जोडा॥

ते ऋषिमुनि हो काय एकदा झाले
ते काय आज ना उरले
ते पुन:पुन्हा ऋषिमुनि अवतरतात
भुवनात सदा सर्वत्र
तो लेनिन तो तैसा सन्यत्सेन
हे ऋषीच जनतामान्य
नव मंत्र जगा जो देई
नव तेज जगा जो देई
वैषम्य लयाला नेई
तो ऋषि जाणा जाणा तोची संत
तुम्हि उघडा अपुले नेत्र॥

श्रीज्ञानेशे संस्कृतातले ज्ञान
सर्वांस दिले वाटून
श्रीनाथांनी चालविले ते काम
परि त्यांना छळिती अधम
ती ज्ञानाची खुली कराया दारे
झगडले संत ते सारे
तुम्हि अनंत छळिले त्यांना
परि आज देतसा माना
ह्या गोष्टी ध्यानी आणा
त्या संतांचे काम चालवा पुढती
सर्वांना देण्या मुक्ती।

ह्या भारतभूमाजी आजहि संत
आहेत करु नका खंत
हे संत खरे गांधी पावनचरित
दीनास्तव सतत झिजत
तो धर्म खरे त्यांनाच कळे सत्य
जे गीता आचरतात
अंबरांबुधीचे कळते
गांभीर्य कुणाला जगि ते
बुडि घेत उडत वा त्याते
सद्धर्माचा गाभा संतच मिळवी
तो पंडित साली चघळी॥

ती पांघरुनी शालजोडि जे बसती
प्रेमा न जगा जे देती
जगि अन्याया पाहुन जे ना उठती
जे वैषम्ये ना जळती
जगि दास्याला दंभा दैन्य बघुन
उठतात न जे पेटून
त्या जडां कळे का धर्म?
त्या मृता कळे का वर्म?
जे घोकित बसती धर्म
तो धर्म कळे आचरतो जो त्यास
ना धर्म कळे इतरांस॥

निज धर्माला ओठावर ना मिरवा
सतत्त्वे जीवनि जिरवा
तुम्हि प्रेम करा विचार करणे नित्य
जगतात बघा सर्वत्र
या देशाला दिवस चांगले आणा
नव मंगल मिरवा बाणा
बंधुता जीवनी येवो
तो विचार हृदयी येवो
ते धैर्य कृतीचे येवो
सतज्ञानाने सत्करणीने मिळवा
गेलेल्या अपुल्या विभवा॥

निजधर्माचे करा मुख तुम्ही उजळ
मति उदार होवो विमल
ज्या बंधूंचे छळण आजवर केले
पशुहून नीच ज्या गणिले
त्या अस्पृश्या हरजन पावन म्हणणे
प्रेमाने हृदयी धरणे
आचारी येवो समता
प्रेमाची वाहो सरिता
दंभाची न उरो वार्ता
तुम्हि संसारी अंध-धी न रे व्हावे
मति हृदय निज न मारावे॥

ती सोडावी क्षुद्र सकल आसक्ती
ध्येयाची लागो भक्ती
तुम्हि मानव्या उठणे पूजायास
निज मोक्षहि मिळवायास
निज कातडिला न कुणी कुरवाळावे
ध्येयास्तव सर्वहि द्यावे
सत्तेज भारती भरु दे
सदभाव भारती भरु दे
सदविचार रवि उगवू दे
ती संपू दे कार्पण्याची रजनी
राहोत कुणी ना निजुनी॥

हे सनातनी सकळ खरे होवोत
ज्ञानाते मिठि मारोत
नव ऐकुनिया विचार हे नाचोत
नव करणीस्तव जागोत
हे वैषम्या दंभा दुरि नेवोत
त्यागाने हे तळपोत
यज्ञ हे सनातन तत्त्व
ज्ञान हे सनातन तत्त्व
मोक्ष हे सनातन तत्त्व
तुम्हि त्याग करा, ज्ञान वरा, व्हा मुक्त
व्हा खरे सनातन-भक्त॥

-पुणे, फेब्रुवारी १९३५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-04-23T16:05:17.4830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आजेसासू

  • f  The mother of one's father-in-law or of one's mother-in-law; the wife of one's आजेसासरा. 
  • स्त्री. सासर्‍याची किंवा सासूची आई ; बायकोची किंवा नवर्‍याची आजी ; आजेसासर्‍याची बायको . [ आजा + सासू ] 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.