TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
तुझ्याविणे कोणि न माते वत...

देवाजवळ - तुझ्याविणे कोणि न माते वत...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


देवाजवळ
तुझ्याविणे कोणि न माते वत्सले मला गे
तुझा ध्यास आता आई सर्वदैव लागे
अनाथास नाथ ग कोणी ना कुणीहि पाता
तूच तात माझा, प्रेमस्निग्ध तूचि माता॥

पाप अंतरंगी आहे संचले अनंत
सुचे रुचे काहि न वाटे दिवारात्र खंत
पापपंकमग्न मला तू काय ठेवशील
नसे असे आई!  तव गे क्रूर दुष्ट शील॥

परम सदय कोमल माते!  ते त्वदंतरंग
त्वत्कृपाबुधीचे येवो मजवरी तरंग
मलिन मानसी मम जे जे सकल ते धुवावे
विमल पुण्यवान आई!  लेकरु करावे॥

नको गर्व हेवा दावा लोभ तो नसावा
विषयवासनाकंद मळासकट तो खणावा
नको मान उच्च स्थान प्रभु!  नकोच किर्ती
मनी वसो एक सदा ती तुझी मधुर मूर्ती॥

करु काय?  संतापविती वासनाविकार
हीन दीन दुबळा मी तो शीण होइ फार
विषयडोहि डुंबे मोदे मन्मनोमतंग
कधी आइ!  या वृत्तीचा करिशि सांग भंग॥

मदिंद्रिया सकळा करितो मी तुझ्या अधीन
तूच त्यास आवर मी तो त्वत्पदी सुलीन
तुझ्यावरी घालुन आता सर्व दु:खभार
विसंबून राहिन देवा!  तार किंवा मार॥

मला देवदेवा! वाटे सांगण्यास लाज
मान घालुनीया खाली असे उभा आज
जगी घालवोनी देवा!  वत्सरांस तीस
काय मेळवीले?  काही नाहि!  धिक् कृतीस॥

कोप अल्प झाला न कमी, कामवासना ती
अहोरात्र गांजित, चित्ती अल्प नाही शांति
लोभ लुप्त झाला नाही, व्यर्थ सर्व काही
फुकट फुकट सारा गेला जन्म हाय पाहि॥

क्षुद्र- वस्तु- लोभी गेलो गुंतुनी कितीदा
क्षुद्र वस्तु हृदयी धरुनी मानिले प्रमोदा
कला नाहि, विद्या नाहि, शील तेहि नाहि
हाय हाय देवा!  स्थिति ही मन्मनास दाही॥

अता तरी देवा! ठेवा हृत्स्थ मोह दूर
आता तरी होवो मन हे विमल धीर वीर
सद्गुणाचि सत्कृत्याची मौत्किके अमोल
जीवनांबुधीत बनू दे रुचिर गोल गोल॥

नसो व्यर्थ, सार्थक होवो, प्रभो!  जीवनाचे
फुलो फल जीवनमय हे अता एकदाचे
दिसो रंग रमणीय असे वास दरवळू दे
तुझी कृपा झाली आहे हे मला कळू दे॥

मदाचरण होवो धुतल्या तांदळासमान
पुढे पुढे पाउल पडु दे जाउ दे चढून
तुझी कृपा होई तरि हे सर्व शक्य वाटे
नको अंत पाहू आता, लाव बाळ वाटे

स्नेहमयी माउलि तू गे साउली जिवाची
तूच एक आधार मला आस तू नताची
नको उपेक्षू तू, माते!  अश्रु हे पुसावे
मला नीट मार्गावरती आणण्यास धावे॥

तिमिर घोर नैराश्याचा मानसास घेरी
मला येइ मदध:पाता बघुन घोर घोरी
कृपाकौमुगदीचे आता किरण येउ देत
उदासीनता चित्ताची सकळ संहरोत॥

किती मनोरथ मी देवा मनी मांडियेले
भव्य किति ध्येयांना मी मनी खेळवीले
दिसे मला जे जे मोठे तेच तेच व्हावे
असे मनी वाटे, हाती काहिही न व्हावे॥
==
जसे मुल यात्रेमध्ये खेळणी विलोकी
फुगा घेइ किंवा चिमणी खळखुळाच तो की
असे त्यास होई, कोपे तो पिता तयाचा
काहिही न घेउन देई, बाळ रडत त्याचा॥

तसे जगी बाप्पा देवा!  जाहले मदीय
करु हे करु की ते हा निश्चयो न होय
मदुत्साह सतरा कामी विभागून जाई
म्हणुन देवराया!  हाती काहिही न येई॥

ग्रंथकार प्रतिभावान् या सत्कवि प्रभावी
राष्ट्रवृत्त- संशोधक- सत्कृति करी करावी
दयावंत व्हावे संत प्रभुपदाब्जरक्त
करुन लोकसेवा किंवा आटवू स्वरक्त॥

अशी किती ध्येये रात्रंदिन मला दिसावी
काहिही न करिता वर्षे व्यर्थ सर्व जावी
उभा रिक्त हस्ते त्वत्सिंहासनासमोर
प्रलज्जित, प्रभुजी!  ठरलो मी दिवाळखोर॥

दिली बुद्धि, शक्तिहि, दिधली इंद्रिये समर्थ
दिला देह अव्यंग असा व्हावया कृतार्थ
अल्प सार्थकाहि ना केले, मनोबुद्धिदेह
भ्रष्ट विकल सारी केली, नाशिले स्वगेह॥

वास घेतला रे माझा नित्य वासनांनी
कशी तुझी पूजा कारु मी वासल्या फुलांनी
अता तुझ्या ओतिन पायी कढत अश्रु माझे
प्रभो!  असे वदताना हे किति मदंत भाजे॥

दिले भांडवल तू देवा!  सत्कृपासमुद्रा !
काहि मी न केले झाली म्लान दीन मुद्रा
पोटि होइ अनुताप परी टिकत अल्प काळ
मोह-मधर-रुपे फसतो फिरुन फिरुन बाळ॥

पुन्हा पुन्हा पापे रचितो येति अश्रू डोळा
नाहि त्यांस किंमत, तू न प्रभुजि!  मूढ भोळा
खरे अश्रु अनुतापाचे येति एकदाच
म्हणुन अश्रु माझे हे तो नसति खास साच॥

प्रभो!  तुला सारे कळते तुजसि सांगु काय
तार तार तार मदीया तूच थोर माय
नाहि काय माया?  ये ना कळवळा तुला गे
तुझा बाळ भागे, घेई लोभुनि वा रागे॥

कधी कधी, आई!  वाटे जाउ की मरुन
नाही काहि उपयोग जगी हे जिणे जगून
भूमिभार केवळ झालो कर्महीन कीट
न लागेल आता माझ्या मना वळण नीट॥

पदोपदी घसरत जातो मोहमार्गगामी
कामना अनंता धरितो मी मनात कामी
या न जन्मि मज लाभेल प्रभा पुण्यतेची
अहा अहोरात्र मनाला गोष्ट हीच जाची॥

अहोरात्र झगडत आहे अंतरात, आई !
समर हे न संपेल असे वाटते कदाही
रिपूंजवळ झुंजत आहे एकला सदैव
अता धीर नाही आई!  मद्विरुद्ध सर्व॥

नको नको जीवन देवा!  नको अता आयु
ज्योत जीवनाची विझवी सरो प्राणवायु
जगा प्रभो!  उपयोग असे तरि नरे जगावे
भूमिभार जो कुणि त्याने शीघ्रची मरावे॥

भले जगाचे मी देवा अल्पही न केले
पुण्यवंतजननयनी मी अश्रु आणियले
परस्वांत निष्ठुरतेने नित्य पोळियेले
अन्य जीवनांस कितीदा दु:खदग्ध केले॥
==
मनी नित्य पापविचारा हसत खेळवीले
कुकर्मात जीवन सारे अहोरात्र नेले
विंचु अंतरंगी डसती शेकडो सदैव
म्हणुन मरण आता हेतू मनी एकमेव॥

पापविस्मृती ना देवा दीवनी पडेल
स्मृतिपिशाच्चगण मानेला सर्वदा धरील
मरुन जाउ दे रे आता दे मला मृतीस
मरण देइ, करितो चरणा साश्रु मी नतीस॥

होय, येति विमलहि माझ्या अंतरी विचार
अल्पकाळ टिकुन परू ते फिरुन जात दूर
जशी वीज लवुनी जाई ध्वांत फिरुन राही
तशी होइ मच्चित्ताची गति सदैव पाही॥

सद्विचार धरण्या जावे तोच जाति दूर
हर्षफुल्ल मद्वदनींचा जाइ गळुन नूर
खिन्नता अपारा पसरे अति निराश वाटे
येति अश्रु नयनी किति हे अंतरंग फाटे॥

त्वत्कृपा न, म्हणुनि न राहे सद्विचार चित्ती
दु:खदैन्यनैराश्याची घेरिते विपत्ती
पदोपदी होणारे हे बघुन मदन्याय
सांग तूच जीवन मग हे मज रुचेल काय॥

असा सरी, देवा!  ऐक प्रार्थना विनम्र
हृदय समुन्नत हे होवो विमल शांत शुभ्र
तुझी मूर्ति मधुरा राहो मनि, घडो विकास
पुरव पुरव, देवा!  माझी एक हीच आस॥

नयन येति भरुनी वदतो तुजसि कळवळोनी
आत जात आहे, आई!  बघ किती जळोनी
नको अंत आता पाहू धाव धाव धाव
सत्पती मला सतत तू हात धरुन लाव॥

अजुन पाप करण्यातचि ना वाटते कृतार्थ
पाप जाहल्यावरि तरि ते नयन आर्द्र होत
अजुन नाश नाही झाला सर्व तोच येई
असे अजुन आशा म्हणुनी शीघ्र येई आई!॥

तुझ्या करी देतो माझी मंद रुग्ण नाडी
असे अजुन धुगधुगि तोची औषधास काढी
रसायना दिव्या देई बाळ हासवावा
निज प्रभो!  करुणामहिमा आज दाखवावा॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-04-12T07:44:01.2030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

low note

  • Music नीच स्वर 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site