मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
करुणाघन अघशमन मंगला जनार्...

प्रभु-प्रार्थना! - करुणाघन अघशमन मंगला जनार्...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


करुणाघन अघशमन मंगला जनार्दना श्रीहरी
मुकुंदा मनोहरा श्रीहरी
कृपाकटाक्षा क्षण तरि फेकी, देवा! दीनांवरी
हतबल विकल, प्रभो! जाहलो निराधार केवळ
खरोखर निराधार केवळ
पदारविंदा तुझ्या मुकुंदा पूजितसो दे बळ
पसरला निबिड अंधार
दे कर हितकर तू तार
होऊ दे अस्मदुद्धार
शिर वर करुनी जगी वावरु भाग्यश्रीला वरु
वैभवा संपत्तीला वरू
प्रपंच सुंदर करुनी देवा परमार्थाही करु॥

संकटांबुधीवरुनी येती पवन परम भीषण
भयंकर पवन परम भीषण
आशेचा ते दीप टाकिती झणी, प्रभो विझवुन
पुन:पुन्हा परि पाजळीतसो आशादीपाप्रती
उज्वला आशादीपाप्रती
धैर्याने पाउले टाकितो पुढती रे सत्पथी
त्वत्कृपा अम्हांवर असो
त्वदध्यान मानसी वसो
भयभीति न चित्ती असो
सद्धर्माचा सत्कर्माचा विजयध्वज उभवुन
सुमंगल विजयध्वज उभवुन
भूमातेच्या सशे मंगले उजळू हे त्रिभुवन॥

प्रगतिपथावर पराक्रमानं, गोविंदा, शोभवू
भारता या अमुच्या शोभवू
तदभाग्येंदूवरी सृष्टिची दृष्टि सदा लोभवू
अद्वैताचा आनंदाचा शांतीचा सुंदर
शुभंकर शांतीचा सुंदर
संदेश जगा वितरिल भारत सकलकलहसंहर
ही पवित्र मंगल क-ती
करण्यास अम्हां दे धृती
कर निर्मळ अस्मन्मती
जय जगदीशा! जय परमेशा! जयजय हे श्रीहरी
मुरारे जयजय हे श्रीहरी
धीबल वितरी, प्रेरणा करी, दे स्फूर्ती अंतरी॥

-अमळनेर छात्रालय, १९२८

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP