मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
उत्साही मुखमंडले भुजगसे द...

तेव्हा घडे उन्नती! - उत्साही मुखमंडले भुजगसे द...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


उत्साही मुखमंडले भुजगसे दोर्दंड दिव्याकृती
नानापत्ति पथी जरी दिसती ना लोपे यदीया धृती
मोठे कार्य करावयास बघते दिव्या सदा यन्मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती॥

स्नेहाने भरले परस्पर सदा विश्वास जे दाविती
सर्वांची सहकार थोर करण्यासाठी असे संमती
ऐक्याचे कळुनी महत्त्व न कधी जे मत्सरे भांडती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती॥

ज्यांच्या निर्भय अंतरी सतत जो सत्स्वाभिमान स्फुरे
ज्यांच्या दृष्टिसमोर जाच जुलमी दुष्ट जनांचा नुरे
भीती एक जगत्पतीस, न दुजा कोणाहि, जे सुव्रती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती॥

तेजाला कवटाळिती परि सदा जे शिस्त सांभाळिती
अन्याला सुखवावया स्वसुखही नि:शंक जे होमिती
चित्ती उज्वल भावना परि विचाराला न जे सोडिती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती॥

देशाची अतुला निरंतर वसे भक्ती यदीयांतरी
देशाचे हित ज्यात तीच करिती कार्ये सदा जे करी
भूमातेस्तव जे सदा झिजविती वाणी, वपु, श्री, मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती॥

देशासाठि सचिंत अन्य कसली चिंता न ज्यांना असे
देशासाठि फकीर नित्य हृदयी ती मातृमूर्ती वसे
सेवा नित्य रुचे, सुचे न दुसरे सेवेत जे रंगती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती॥

जेव्हा ऐक्य सहानुभूती उदया येतील आम्हांमध्ये
त्यागी उद्यममग्न होतिल यदा, बंधुत्व चित्ति जडे
जेव्हा स्वार्थ असेल दूर, हृदया वाटेल सत्यीं रती
जेव्हा निर्भयता दिसेल नयनी, तेव्हाच राष्ट्रोन्नती॥

-अमळनेर, १९२६

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP