मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
हे शरणामतजन-करुण! दाखव मज...

दाखव मज अपुले चरण - हे शरणामतजन-करुण! दाखव मज...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


हे शरणामतजन-करुण! दाखव मज अपुले चरण॥
मी पतंग सूत्रावीण
मी पाखरु पंखावीण
मी मीन जीवनावीण
मज फारच होई शीण॥ दाखव....॥

हे प्रबळ वासनावारे
खेळणे करिति मज बा रे
उडविती भ्रमविती जोरे
सांभाळिल तुजविण कोण॥ दाखव....॥

मी पापपंकरत कीट
दुर्गंधि मनी ये वीट
होईल हृदय कधि नीट
मज बरवे वाटे मरण॥ दाखव....॥

वेढितो घोर अंधार
मजसि ना दिसतसे पार
कोण रे असे आधार
कासाविस होती प्राण॥ दाखव....॥

मी तुझी बघतसे वाट
डोळ्यांत अश्रुचे लोट
हृदयात शोक घनदाट
तू माय बाप गुरु जाण॥ दाखव....॥

ये करे मला कुरवाळी
मी मूल मला प्रतिपाळी
मी फूल होइ तू माळी
ये येइ करी उद्धरण॥ दाखव....॥

घे मांडीवर निज बाळ
प्रेमानं चुंबी गाल
ही इडापिडा तू टाळ
तू मंगल तू अघहरण॥ दाखव....॥

हे जीवन होवो सफळ
करि पूर्ण हेतु मम विमल
मम निश्चय राहो अचळ
आदर्श असो आचरण॥ दाखव....॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP