मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती...

देशभक्त किति ते मरती - धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती। देशभक्त किति ते मरती
त्यागराशि मंगलमूर्ती। देशभक्त किति ते मरती॥

मातृभूमि हसवायाते
मायभूमि सुखवायाते
निजबंधू उठवायाते
बलिदाना मोदे देती॥ देशभक्त....॥

निजमातृ-मोचनासाठी
निजबंधु समुदधृतिसाठी
निज सकल सुखाचे वरती
ठेवून निखारे हाती॥ देशभक्त....॥

निज यौवन निजधनमान
निज आप्त सकल बंधु-गण
हे जात सकल विसरून
करतळी प्राण निज घेती॥ देशभक्त....॥

करि घेति सतीचे वाण
होऊन मनी बेभान
घेतात उडी धावून
मरण दिसे जरि ते पुढती॥ देशभक्त....॥

ना चैन पडे जीवास
देश दिसे रात्रंदिवस
त्या देशभक्तिचा ध्यास
देशविचाराने जळती॥ देशभक्त....॥

सहन तो विलंब होई
जीवाची तगमग होई
करपून तन्मती जाई
मरणाचा पथ मग धरिती॥ देशभक्त....॥

तेजाला कवटाळावे
हे ध्येय पतंगा ठावे
मरुनीही त्यास्तव जावे
ही दिव्य वृत्ति तच्चित्ती॥ देशभक्त....॥
 ==
अजगरसे पडले सुस्त
निजबंधु, बघुन अस्वस्थ
त्या जागति देण्या त्वरित
प्राणांचा बळि ते देती॥ देशभक्त....॥

चर्चेने काहि न लाभ
याचनेत काहि न लाभ
स्वावलंबनाने शोभ
घोषणा वीर ते करिती॥ देशभक्त....॥

अजुन तरी झापड उडवा
स्वातंत्र्यध्वज फडफडवा
देशकार्य करण्या धावा
झाला का केवळ माती॥ देशभक्त....॥

घ्या स्वदेशिच्या त्या आणा
मनि धरा जरा अभिमाना
जगताला दावा बाणा
उद्धरा माय निज हाती॥ देशभक्त....॥

सुखविलास सारा राहो
आलस्य लयाला जावो
कर्तव्य-जागृती येवो
संपु दे निराशा-रात्री॥ देशभक्त....॥

आशेचा होवो उदय
कार्याचा आला समय
भय समूळ पावो विलय
निष्कंप करा निज छाती॥ देशभक्त....॥

वरुनिया पडो आकाश
वा होवो अशनि-नि:पात
कार्याला घाला हात
घ्या करुन मोक्षप्राप्ति॥ देशभक्त....॥

देशभक्त किति ते मेले
चंदनापरी ते झिजले
तत्कार्य अजुन जे उरले
ते पूर्ण करा निज हाती॥ देशभक्त....॥

तडफडत वरी असतील
पाहून तुम्हां सुखलोल
त्या शांती-लाभ होईल
जरि उठाल मातेसाठी॥ देशभक्त....॥

ही वेळ नसे निजण्याची
ही वेळ नसे हसण्याची
ही वेळ असे मरण्याची
ना मोक्षाविण विश्रांती॥ देशभक्त....॥

जरि नसाल तुम्ही क्षुद्र
तरि उठाल जैसे रुद्र
ती चळवळ करणे उग्र
घ्या रक्तध्वज निज हाती॥ देशभक्त....॥

आरती निजप्राणांची
ओवाळा मंगल साची
ही पूजा निज मातेची
सत्प्रसाद मिळवा मुक्ति॥ देशभक्त....॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP