मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
“चिरमित्र सखा सहोदर मम तू...

जीवनमित्रास! - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


“चिरमित्र सखा सहोदर
मम तू मित्र उदार सुंदर
सहसा निघतोस सोडुनी
मम माया सगळीच तोडुनी॥

वदु काय कसे कळेच ना
वच कंठातुन ते निघेच ना
सगळे स्वचरित्र आठवे
हृदयी शोक अपार साठवे॥

सदया सखया! मनोहरा!
वद केवी उघडू मदंतरा
मज सोडुन ना गड्या निघे
मम आशा मम हेता तू बघे॥

किति येता विचार मोहना!
प्रिय मित्रा मम गोड जीवना
सखया! मज एक ठाउक
घडली भेट तुझी, न आणिक॥

जमली तव नित्य संगती
परि केव्हा कधि वा किमर्थ ती
न कळे न वळे मला लव
सगळे त्या प्रभुचेच लाघव॥

धरिली तव फार आवडी
किति माझी जमली तुझी गडी
दिनरात्र सदैव सन्निधी
तुझी माझी नव्हती तुटी कधी॥

हसलो रडलो कितीकदा
परि देशी मज धीर तू सदा
सुखदु:खरसी सखा खरा
मज देशी न कधीहि अंतरा॥

रडवीत अनंत आपदा
परि तू मन्निकटी उभा सदा
पुशिशी स्वकरे मदश्रुते
प्रियबंधो किति केवि वर्ण ते॥

सखया! सकला मदंतर
स्थिति तू जाणिशि जेवि ईश्वर
सदसत् मम जे तुजप्रती
कळलेले तुज सांगु मी किती॥

विहरून अभिन्न आपण
भुवनी जो मिळाला कधी कण
कटु गोड तसाच चाखिला
न दुजा भाव मनात राखिला॥

बघता तरि तू अमूर्तसा
हृदयी राहुन निर्मिशी रसा
तव रूप न देखिले जरी़
तव तो वास सदा मदंतरी॥

नयने नयनांत पाहणे
तुज बाहेर तसे विलोकणे
वरिशी मशि एकरूपता
असशी व्यापुन पूर्ण हृतस्थिता॥
==
कधि शुभ्र सुरेख चांगले
कधि काळे तुज रंग मी दिले
सजवीत तुला जसे सुचे
नटशी तूही तसा, तुला रुचे॥

न कधी तुज रुष्ट देखिले
किति तू प्रेम मला सदा दिले
चढशी पडशी बरोबर
बसशी वा पळशी भराभर॥

प्रगती अथवा अधोगती
त्यजिली तू न मदीय संगती
गगनी चढवूनिया वरी
तुज मी दाखविली पुन्हा दरी॥

कधि वैभवता तुला दिली
कधि कष्टस्थिति तीहि दाविली
तुज ना कुरकूर माहिती
तव निष्ठा तरि वर्णु मी किती॥

कधि रम्य विलास मांडिले
झणि सारे परि ते झुगारिले
वदशी परि एक शब्द ना
करु मित्रा तव केवि वर्णना॥

मम बाल्य तसेच यौवन
बघुनी जाशिल काय सोडुन
न मदीय विकास जोवरी
सखया तू न वियोग आदरी॥

मज सोडुन घोर या तमी
नच जाई, वरती चढेन मी
तुजला नटवीन मी बघ
पसरीन त्रिजगात सौरभ॥

घसरेन न मी अत:पर
मम कर्तृत्व दिसेल सुंदर
धवलोज्वल कांति देइन
तुजला जाउ नकोच सोडुन॥

पुरवीन गड्या तुझे लळे
पिकवीतो बघ मुक्तिचे मळे
बघ हे दिसती मुके कळे
न फुलावे वद का? तुला कळे॥

कसुनी खपुनी किती बरे
बघ केली मृदु शुद्ध भूमि रे
झणि येइल खास पाउस
सखया जाइ न तू, न रे रुस॥

जरि मी फिरलो इतस्तता
क्षण मी ना दवडीन रे अता
घडली जरि हातुनी अघे
मज कंटाळुन जाइ ना, बघे॥

करितो अध- मार्जनाप्रती
सखया! नित्य करीन सत्कृती
अजिपासुन नूतना दिशा
मज लागे, मग सोडिशी कसा?॥

अपुले रमणीय गोड ते
स्मरणीय स्मर तू प्रसंगी ते
भरसागरि तू न सोडिले
दिसते तीर न सो, ना भले॥

किति रे अनुरक्त आपण
कधि झालो न वियुक्त रे क्षण
अशनी शयनी जिथे तिथे
अविभक्त, स्मर, अंतरंगि ते॥

जरि वृंत गळून जातसे
जगती या जगणे फुले कसे?
जरि नीर समग्र आटले
तरि ते नीरज केवि रे फुले?॥
==
रुसुनी जरि जाइ अंबर
च्युत नक्षत्रतीहि सुंदर
तरुला जरु मळ ना धरी
तरि कैसे फळफूल ते वरी?॥

खुडिता स्पृहणीय अंकुरा
मिळते ते न कणीस ना तुरा
जरि निर्झर बंद होइल
तरि वापी सुकुनीच जाईल॥

करिता दुरि जीवनाश्रया
मग पावे झणि वस्तु ती लया
न तुझ्यावर का विसंबून?
करि, मित्रा! न कठोर रे मन॥

तुज निष्ठुरता न शोभते
तवठायी मम दृष्टि लोभते
तुजवीण जगी न मी उरे
मज आधार तुझाच एक रे॥

जगी होइन नीट चांगला
मग सारे म्हणतील हा भला
जगतास सुखास देइन
न जगाला मुळि भार होइन॥

मम गोड फुलेल जीवन
मग तदगंध सुटेल पावन
जगता वितरीन मी रस
जगता या नटवीन नीरस॥

फुलवी सुमनांस भास्कर
नटवी जीववि सृष्टि सुंदर
फुलवीन तशी जनांतरे
मनि माझ्या किति ये असे बरे॥

किति खेळवितो मनी अशा
मधु आशा, परि मारिशी कशा?
मम हेतु अपूर्ण राहती
किति वाटे मनि खेद ना मिति॥

न तुला दिसली सरस्वती
मम संगे, न तशी रमा सती
दिसली न उमाहि चिन्मया
म्हणुनी काय अधीर जावया?॥

मजला जगि मित्र ना कुणी
मज गेले सगळेच सोडुनी
मजला तव आस होति रे
परि तूहि त्यजिशी कसा बरे?॥

गळले सगळे मनोरथ
मम आशा सगळ्या पदच्युत
पुरवी न जगात एकही
मम सद्धेतु कठोर देवहि॥

सगळा मम धीर मावळे
किति नेत्रांतुन नीर हे गळे
दिधले मम सर्व मी तुला
परि जाशी अजि सोडुनी मला॥

जगि जन्म मदीय जाहला
तव मी स्नेह तदैव जोडला
तुज मी दिनरात्र पूजिले
परि माते अजि तूच टाकिले॥

रडण्यास्तव मात्र जन्मलो
जगता केवळ भार जाहलो
मज सोडुन जाशि, जीवना!
किति जाळी, बघ, शोक मन्मना॥

मज सोडु नयेच ती, असे
जरि वाटे बहु, ते घडे कसे?
मजपासुन जाशि जै दुरी
पहुडोन क्षितिला हतापरी॥
==
जगतास समीप ओढले
परि माते जगतेच सोडिले
अपवाद तुझा तरी कसा?
नशिबाता मम खेळ हा असा॥

करु मी तरि काय हाय रे!
मम उदध्वस्त समस्त हाय रे
पुरला मम हेतु एक ना
मज जाशी रडवून, जीवना!॥

किति रे हुरहूर मानसी
हृदयी क्रंदन धीर ना मशी
मम स्वप्न समस्त संपले
जणु शंपाहत चित्त कंपले”॥

विनवून सुदीन जाहलो
सखयाच्या किति कंठि झोंबलो
करुणा नुपजे मनामधी
मम हेलावुन ये हृदंबुधी॥

फिरुनी वदलो सगदगद
“मम मित्रा! धरितो तुझे पद”
परु तो न बघेहि निष्ठुर
अति झाला गमनार्थ आतूर॥

वच ऐक सख्या मदंतिम
परम प्रेम तुझ्यावरी मम
न मज, त्यज मत्सवे रहा
बघशी मन्मुखही न रे अहा॥

सकल प्रियबंध लोपले
तव माझ्यावर नेत्र कोपले
तुटते अजि भावबंधन
गळते मदहृदयावलंबन॥

सखया! जरि जाशि जा परी
वदतो एकच, ठेव अंतरी
तुजला पकडीन मी पुन्हा
करुनी जाशि मदीय तू गुन्हा॥

किति देख अनंत काळ हा
तुजला ओढिन मी पहा पहा
जगता वितरीन मी सुख
मग आझे करिशील कौतुक॥

करुनी जगदापदा दुरी
भरु सारी धरणी सुखस्वरी
वितरुन मुदा शुभा जनी
कलहद्वेष समूळ मारुनी॥

जगतात समस्त बंधुसे
बघ, नांदू अम्ही सर्व सौरसे
सकळा समता स्वतंत्रता
करु भूमीवर स्वर्ग नांदता॥

करुनी निज-कार्यपूर्णता
तुजलाही वितरीन धन्यता
तरि जाइ, विलंब ना करी
स्थिर मी शांत विकंप अंतरी॥

मज सोडिशि तू, न मी तुला
जननी सोडुन जातसे मुला
न फिकीर, पुन:पुन्हा परी
तुज भेटेन रवींदु जो वरी॥

शतवारहि जन्म घेइन
मम हेतूप्रति पूर्ण पाहिन
तुज खेचिन मी पुन:पुन्हा
दमवी कोण बघूच ये कुणा॥
==
तरि ये, मम रामराम घे
हृदयी स्नेह धरून तू निघे
परतून तुलो विलोकिन
अविलंबे, हृदयासि लाविन॥

जरि जाशि विशंक जा परी
वितरी हा मज आशि अंतरी
तुज शेवटचेच मागणे
करि ते पूर्ण गड्या न ना म्हणे॥

‘घृतिचा न झरा सुको, झरो;
मरताही तम ना मनि शिरो’
मज दे सखया असा वर
मग जाई तुज जायचे जर॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

कसे तरी मग जग दिसते?

नसती जगी या जरी मुले
नसती जगी या जरी फुले
नसते अंबरि वरि तारे
नसते गाणारे वारे
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते॥

जरी जगती या जल नसते
रविचे तेज जरी नसते
नसते जरि ते तरुवेल
नतसे दिनरजनी- खेळ
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते॥

नसती जरि ही वसुंधरा
धनधान्यवती मनोहरा
विहंगम जरी हो नसते
गाय बैल हे जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते॥

नसत्या प्रेमळ जरी माता
प्रेमसुधेच्या त्या सरिता
परोपकारी जन नसते
परदु:खे यन्मन जळते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते॥

कृतज्ञता जरि ती नसती
प्रेमबंधुता जरि नसती
अश्रु जगी या जरि नसते
हास्य जगी या जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते॥

सुंदर सकळहि या वस्तु
मधुर मनोहर या वस्तु
जगणे म्हणुनी धरेवर
सह्य होतसे खरोखर
हे वैभव हे सुख नसते।
कसे तरी मग जग दिसते॥

-अमळनेर, १९२७

(मरण ज्याच्या जवळ आले आहे, परंतु जो जगू इच्छित आहे, असा एक तरुण आपल्या जीवनास उद्देशून म्हणतो. इंग्रजीत अशी एक लहान कविता मी वाचली होती. ती कल्पना मनात येउन ही मी मराठीत लिहिली आहे.)


N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP