मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
प्राण अर्पावे। स्वातंत्र्...

स्वातंत्र्य - प्राण अर्पावे। स्वातंत्र्...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


प्राण अर्पावे। स्वातंत्र्यसौख्य मिळवावे॥

केवळ बडबड ना कामाची
गरज असे निशिदिन कष्टांची
कष्टत जावे॥ स्वातंत्र्य....॥

विलास-सुखभोगांना सोडा
मोह सकळ ते मारक तोडा
स्वार्थांकुर चित्तातील मोडा
निर्मळ व्हावे ॥ स्वातंत्र्य....॥

देशभक्तिचा मनात काम
भारतभूचे वदनी नाम
दृष्टि दिसावी तेजोधाम
निर्भय व्हावे ॥ स्वातंत्र्य....॥

द्वेष कलह ते विसरुन जावे
बंधुबंधुचेपरि सजावे
हाती हात प्रेमे घ्यावे
पुढे दौडावे ॥ स्वातंत्र्य....॥

उचंबळोनी वृत्ती जावी
उचंबळोनी हृदये जावी
वेडावुन जणु मति ती जावी
तन्मय व्हावे ॥ स्वातंत्र्य....॥

गुलामगिरिवर हाणा घाव
दास्या देशी नुरोच ठाव
प्रयत्नावरी ठेवुन भाव
सदा झुंजावे ॥ स्वातंत्र्य....॥

स्वातंत्र्याची जया तहान
धावून जाऊ घेऊ ठाण
गाठू ध्येया देऊ प्राण
व्रत हे घ्यावे ॥ स्वातंत्र्य....॥

परवशतेचे तोडा पाश
तोडा तोडा हरपो त्रास
चीड न येते काय तुम्हांस
चला चमकावे ॥ स्वातंत्र्य....॥

परदास्याच्या पंकी कीट
असणे याचा येवो वीट
होउन सावध नीट सुधीट
निजपद घ्यावे ॥ स्वातंत्र्य....॥

स्वातंत्र्याचा ईश्वरदत्त
हक्क करोनी घेऊ प्राप्त
करु यत्नाची अपूर्व शर्थ
मरुनी जावे ॥ स्वातंत्र्य....॥

निज मरणाने मंगल येइल
निज मरणाने वैभव येइल
निज मरणाने मोक्ष मिळेल
मरण वरावे ॥ स्वातंत्र्य....॥

-अमळनेर छात्रालय, जानेवारी १९३०


N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP