मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
मंगल मंगल त्रिवार मंगल पा...

वातंत्र्यानंदाचे गाणे - मंगल मंगल त्रिवार मंगल पा...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने

मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला जय बोला हो॥

मेवाडाच्या रणशार्दूला उठा, उठा शिवराया हो
माता अपुली स्वतंत्र झाली जय बोला जय बोला हो॥

दिशा आज का प्रसन्न दिसती निर्मळ दिसती सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

पवन आजचा पावन वाटे कारण मजला सांगा हो
भारतमाता मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

पाषाणांची फुले जाहली का ते मजसी सांगा हो
गतबंधन भू झाली म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

मातीची ही माणिकमोती झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

काट्यांची मखमल मृदू झाली चमत्कार का झाला हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

सतेज आजी अधिकच दिसतो दिनमणि का मज सांगा हो
आई झाली मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

पर्वतातुनी खो-यांतूनिही दुर्गांतुन का गाणी हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

नद्या आज का तुडुंब भरल्या वाहावयाचे विसरुन हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

उचंबळे का अपार सागर सीमा सोडुनी आज अहो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

गगनमंडपी विमानगर्दी झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

स्वर्गातून सुमवृष्टि होतसे अपार का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

नारद तुंबर गाणी गाती सुरमुनि हर्षित ते का हो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

कैलासावर डमरु वाजतो नाचे शिवशंकर का हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

चार मुखांनी चतुरानन की सामगायना करितो हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

सृष्टी नाचते विश्व हासते चराचर भरे मोदे हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

पाहा पाहा ते विश्वजन बघा, भेट घेउनी आले हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो॥

चिनी जपानी अमेरिकन ते आले वंदन करण्या हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो॥

तार्तर मोगल अफगाणादी शेजारी ते आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो॥

युरोपातले सारे गोरे सविनय साश्रू आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो॥
 ==
भारतमाता अनाथनाथा प्रेमे कुरवाळीत अहो
आपपर तिला नाही ठावे जय बोला जय बोला हो॥

आज जगाचे भाग्य उदेले वैभव फुलले अगणित हो
उचंबळे सुखसागर मंगल जय बोला जय बोला हो॥

दैन्य पळाले दु:ख गळाले कलहद्रोह दुरावति हो
नव्या मनूचा उदय जाहला जय बोला जय बोला हो॥

चुकली माकली जगातील ती राष्ट्रे जवळी घेउन हो
प्रेमे न्हाणी त्यांना भारत जय बोला जय बोला हो॥

पिवळी ढवळी काळी सारी भुवनामधली बाळे हो
भारतमातेजवळ नाचती जय बोला जय बोला हो॥

“भलेपणाने खरेपणाने प्रेमे सकळहि वागा हो
सुखास निर्मा” बोले भारत जय बोला जय बोला हो॥

“शांति नांदु दे अता अखंडित आनंद सहा नांदो हो
विसरा मागिल” बोले भारत जय बोला जय बोला हो॥

“परमेशाची सकळ लेकरे सुखेन भुवनी खेळू हो
स्वर्ग निर्मु या” बोले भारत जय बोला जय बोला हो॥

“परस्परांचे हात धरु या फेर धरुनी नाचू हो
शांतिगीत गा” बोले भारत जय बोला जय बोला हो॥

“थोर भारता! मार्गदर्शका! तूच आमुचा सदगुरु हो”
वदती सारी राष्ट्रे सदगद जय बोला जय बोला हो॥

अनंत झाली सुपुष्पवृष्टी गगनामधुनी तेव्हा हो
थै थै थै थै नाचु लागले गाउ लागले जय जय हो॥
जयजय भारत प्रियतम भारत जयजय भारत बोला हो
जयजय जयजय जयजय जयजय जय भारत जय बोला हो॥

आनंदाने डोला हो
आनंदाश्रू ढाळा हो
जयजय भारत जयजय भारत जयजय भारत बोला हो॥

हृदय कपाटे खोला हो
बांधा चित्सुखझोला हो
नाचा त्यावर नाचत बोला जयजय भारत बोला हो॥

जय बोला जय बोला हो॥
जय भारत जय बोला हो॥
जयशब्दाने अंबर कोंदे जय भारत जय बोला हो॥

भारत प्यारा स्वतंत्र झाला जयजय म्हणुनी बोला हो
सृष्टी सकलही स्वतंत्र झाली जयजय म्हणुनी बोला हो॥

-अमळनेर छात्रालय, २६ जानेवारी १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP