मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
दु:खाला जे विसरवनिया दिव्...

ग्रंथमहिमा - दु:खाला जे विसरवनिया दिव्...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


दु:खाला जे विसरवनिया दिव्य आनंद देती
एकांती जे परम निकट स्नेहि सप्रेम होती
चित्ती ज्यांच्या मुळि न शिवतो भेद हा साव चोर
सर्वांनाही सुखवित सदा ग्रंथ हे संत थोर॥

कोणी येवो पुरुष वनिता बालिका बाल वृद्ध
सर्वा देती सुरस, करिती बुद्धिते जे समृद्ध
गांभीर्याते किति तरि पहा जीवनी आणितात
आपन्मग्ना हत-जन-मना ग्रंथ हे तातमात॥

तुम्हां द्याया सतत असती ग्रंथराजे तयार
पावित्र्याची परम विमला ज्ञानपीयूष-धार
जी संसारी तृषित हृदये ग्रंथ हे ज्ञानसिंधु
त्यांना होती मधुर, निवती सेविता एक बिंदु॥

झाले गेले कितिक परि ते ग्रंथ आहेत नित्य
आनंदाला वितरुन जगा दाविताती सुपंथ
सेवा धामी विपिनि करिता ग्रंथ तैशीच कारी
नाही सा-या भुवनि असले मित्र नित्योपकारी॥

रात्री प्रात:समयि उघडा ग्रंथ केव्हाहि वाचा
युष्मत्सेवा विपुल करणे हाच आनंद त्यांचा
हिंडायाची अविचलमने काळसिंधूवरून
ज्याला इच्छा, फिरविति तया ग्रंथ हातात धरून॥

नानालापे रमविति मना ग्रंथ ही गोड वेणू
जे जे वांछी मन वितरिती ग्रंथ ही कामधेनू
मातीलाही कनक करिती लाजवीती परीस
नाही मोठा हितकर सखा अन्य ग्रंथापरीस॥

आयुष्याची हितकर दिशा ग्रंथ हे दाखवीती
जीवित्वाची शिकविति कला नूतना दृष्टि देती
उन्मत्तांना नमविति विपदग्रस्त त्या हासवीती
प्रज्ञावंत स्थिर करुनिया मूर्ख त्या लाजवीती॥

संबोधूनी करिति जगदुत्कर्ष हे ग्रंथ साधे
ग्रंथलोके मनुजमतिला कार्यकौशल्य लाधे
नि:स्वार्थी हे अखिल-भुवनाचार्य सदग्रंथ दिव्य
मानव्याला उचलिति वरी पंथ दावीत भव्य॥

माता भ्राता प्रियसख गुरु तात वा रम्य कांता
नानारुपे रमविति पहा ग्रंथ हे मानवाता
जे ना कोणाप्रतिहि कथिले ग्रंथकारे विचार
ते या ग्रंथी प्रकट, उघडे अंतरातील सार॥

सांगे ना जी प्रियतमजनापाशिही ग्रंथकार
ओती ती हो खळबळ इथे, विवृत स्वांतदर
पापुद्रे ते सकळ दिसती चित्तकंदावरील
येई सारे हृदय कळुनी गूढ गंभीर खोल॥

ग्रंथाकारे विमल अमरा दिव्यरंगा समाधी
लावण्याची परम मधुरा लेखक स्वीय बांधी
कैसे तेथे झळकति हि-यांसारखे सद्विचार
जैसे नानाविध मणि तसे भावनांचे प्रकार॥

ग्रंथामाजी अमर असती दिव्य चैतन्यरुप
कर्ते, विश्वा सुखविति सदा मोद देती अमूप
केव्हाही ना मृति शिवतसे थोर सदग्रंथकारा
लोकोद्धारा निशिदीन उभा द्यावया ज्ञानधारा॥

त्रैलेक्यी या फिरविति तुम्हां ग्रंथ देऊन पंख
तत्त्वज्ञानी कवि मुनि तसे भेटती राव रंक
अंतर्यामी उसळविति ते गोड आनंदपूर
केव्हा केव्हा रडविति किती गाउनी दु:खसूर॥
==
संसाराचे त्रिविध मनुजा दाविती ग्रंथरुप
नाना रुपे मनुजहृदया ज्ञान देती अमूप
छेडोनीया तरल हृदयी सूक्ष्म तारा अनंत
जीवात्म्याला परिसविति ते दिव्य संगीत ग्रंथ॥

जे जे काही घडत असते मानवी जीवनात
अंतर्बाह्य प्रकट करिती ग्रंथ सामर्थ्यवंत
अंत:सृष्टी गुरु किती तरी बाह्यसृष्टीपरीस
ते सदग्रंथांवरुन कळते होइ अंतर्विकास॥

केव्हाही दुर्मुख न दिसती ग्रंथ नित्य प्रसन्न
ना कोणाला कथितिल कधी गोष्टी त्या भिन्न भिन्न
ग्रंथांऐसे परमसुख ना देखिले या जगात
ग्रंथी होता निरत मज तो होउ दे मृत्यु प्राप्त॥

आदर्शाला, शुभ अशुभ वा स्वीय रुपा बघाया
देती ग्रंथ स्वकरि मनुजा, या मिषे उद्धाराया
‘सत्याचा तो विजय ठरला, सत्य पूजा सदैव’
सदग्रंथी हे सतत असते सूत्र हो एकमेव॥

माते ना ते विभव रुचते राजवाडे नको ते
नाते गोते मजसि नलगे नाम मोठे नको ते
वस्त्रांची ती तलम न रुची ना अलंकार काम
व्हावे माझ्या निकट परि हे ग्रंथ कैवल्यधाम॥

रात्री माझ्या निकट असु दे तैलसंपूर्ण दीप
इच्छा नाही इतर असु दे ग्रंथराजे समीप
कोठे रानी मग सदनि वा अन्य देशी तुरुंगी
आनंदाने परिहरिन मी काळ सदग्रंथ-संगी॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP