मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
नाही आता क्षणहि जगणे भारत...

तुफान झालो! - नाही आता क्षणहि जगणे भारत...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


नाही आता क्षणहि जगणे भारती या गुलाम
मारु सारे भय हृदयिचे निर्मू स्वातंत्र्यधाम
नाही एक क्षणहि खपते दास्य विश्वंभराला
स्वातंत्र्याला मिळउन चला जाउन तत्पूजनाला॥

जो या आहे क्षणिक शरिरी अंतिम श्वास एक
भूमातेला सुखविन सुखे होउ मद्रक्तसेक
माता आता क्षणभरिहि ना बंधनी ह्या बसू दे
जावो माझी तनु परि मम म्लान माता हसू दे॥

कैसे साहू? सतत जरि ते आइला नागवीती
कैसे पाहू? सतत जरि ते बंधुंना गांजिताती
बैसावे का विलपत? न का पौरुषाचा स्फुल्लिंग
न श्वानाचे वरु हत जीण, होउ या धीरधिंग॥

झालो का हो सकळ इतुके श्वान पस्तीस कोटी
कैसे दास्यी सतत पिचतो नाहि का त्वेष पोटी
आहो का हो हृदयि बघणे मेष मानूष वा ते
सारे तुम्हां जग भरडिते धान्य ते जेवि जाते॥

आता ओठी मधुरतम त्या गाउ या मातगीता
आता सारे उठुन करु या बंधमुक्त स्वमाता
ना लावावे क्षणहि पळहि भारते मुक्त व्हावे
लोकी आता वर करुनिया मस्तकाते जगावे॥

या रे सारे मिळून करु या आधि ऐक्यावलंब
स्पृश्यास्पृश्ये सकळ उडवू जाळु हे भेददंभ
हालक्लेशा मुळिहि न भिणे स्वीय स्वातंत्र्य घेणे
तेजे पेटू अनलसम ही वैभवी माय नेणे॥

या देहाचे करिल तुकडे राईराईसमान
कोणी क्रोधे तरि सतत मी उंच राखीन मान
ओठी माझ्या प्रियजननिचे दिव्य नाचेल गान
माझ्या मातेस्तव करित हो मी मुदे देहदान॥
 ==
मारी माते कुणि जरि न ती मन्मनोमातृमूर्ती
कंठा कापी कुणि जननिचि ती न कंठस्थकीर्ती
हालांची ना लवहि उरली आज आम्हां गुमान
आता गेलो खवळून खरे आम्हि झालो तुफान॥

केला विरोध जरि या सगळ्या जगाने
ना गांगरुन मुळि जाउ आता भयाने
मोक्षार्थ जे ज्वलित राष्ट्र उभे असेल
त्याच्यापुढे न जगती कुणिही टिकेल॥

या भारतास हसवू करुनि स्वतंत्र
ते देशभक्तिमय या म्हणु दिव्यमंत्र
सर्वस्व-होम करणे सगळे उठा रे
वारे पहा प्रबळ, हे झडती नगारे॥

ही वेळ बंधु न असे तुमच्या निजेची
ही वेळ बंधु न विलास-विनोदनाची
स्वातंत्र्य वेळ शुभ दिव्य अपूर्व आली
आता उठा सकळही झणि याच काळी॥

आली घडी पुनरपि परतोन ये ना
जो जातसे क्षण कधी फिरुनी मिळेना
ना आळशी तुम्हि बना न बना उदास
या आइचे सकळही झणि तोडु पाश॥

उत्साहसागर बना दृढ धैर्यमूर्ती
स्फूर्ति प्रचंड उसळो मिळवा सुकीर्ती
होईल माय अपुली शतबंधमुक्त
तेजे उठाल सगळे जरि रे सुपुत्र॥

हे राष्ट्रतेज सगळे भडके उफाळे
हे देशभक्तिस पाहा शतपूर आले
हे ठेउनी निज सुखावरती निखारे
दास्या पदी तुडविण्या सुत सिद्ध सारे॥

झालो तुफान सगळे न अता गुमान
झालो तुफान सगळे नच देहभान
झालो तुफान करु हासत देहदान
स्वातंत्र्य आणु अथवा मरु हीच आण॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP